जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 102/2010. तक्रार दाखल दिनांक : 05/03/2010. तक्रार आदेश दिनांक :18/01/2011. स्नेहलता सुनिल मंठाळकर, वय 33 वर्षे, रा. फ्लॅट नं.2, विठ्ठल अपार्टमेंट, दक्षीण सदर बझार, सोलापूर. तक्रारदार विरुध्द पी.सी. डॉक्टर कॉम्प्युटर सेल अन्ड सर्व्हीसेस, प्रोप्रा. विनायक बेनगी, वय सज्ञान, रा. प्लॉट नं.159, प्रियदर्शिनी रेसिडेन्सी, शॉप नं.19, मरिआई चौक, दमाणी नगर, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एम.एम. कुलकर्णी विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : एम.एम. वाले आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांना अभियोक्त्यांची टायपींग कामे करण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्याकडून नवीन असेम्बल केलेला पी.सी. व जुना मॉनीटर रु.12,000/- किंमतीस खरेदी केलेला आहे. रक्कम तीन हप्त्यामध्ये देण्यासह सी.पी.यू. ला एक वर्षाची वॉरंटी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. दि.23/2/2009 रोजी कॉम्प्युटर तक्रारदार यांच्या घरी बसविण्यात आला. त्यानंतर एक आठवडयामध्ये कॉम्प्युटर वारंवार बंद पडू लागल्यामुळे त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याशी संपर्क साधला असता, दि.21/3/2009 रोजी कॉम्प्युटर दुरुस्त केला, परंतु तो पुन्हा सातत्याने बंद पडत आहे. त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी कॉम्प्युटरची दुरुस्ती करण्यास टाळाटाळ केलेली आहे. तसेच झालेल्या व्यवहाराप्रमाणे त्यांना बिले व धनादेश परत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन रु.12,000/- मिळावेत किंवा कॉम्प्युटर व्यवस्थितरित्या दुरुस्त करुन मिळावा आणि आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु.60,000/- व त्रासापोटी रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी तक्रार अमान्य केली असून तक्रारदार 'ग्राहक' संज्ञेत येत नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी जुना कॉम्प्युटर पसंत करुन तो खरेदी केला आहे आणि त्यास वॉरंटी दिलेली नव्हती व नाही. तक्रारदार यांनी अर्थिंग व यु.पी.एस. शिवाय कॉम्प्युटर कार्यान्वित केल्यामुळे तांत्रिक अडचणी येत आहेत. तसेच त्यांनी बंद कॉम्प्युटर दुरुस्तही करुन दिलेला आहे. तक्रारदार यांनी कॉप्युटरची उर्वरीत बाकी रक्कम रु.2,500/- व प्रोसेसर फॉनची किंमत रु.300/- बुडविण्याकरिता प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. शेवटी त्यांनी तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? नाही. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून संगणक संच खरेदी केल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून जुना मॉनीटर व नवीन असेम्बल यु.पी.एस. खरेदी केलेला आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तक्रारदार यांना जुना पी.सी. विक्री केलेला असून त्यास कोणतीही वॉरंटी दिलेली नाही. 5. तक्रारदार यांचा कॉम्प्युटर बंद पडल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून कॉम्प्युटर खरेदी केल्याची बाब दोन्ही पक्षांस मान्य असली तरी तो कॉम्प्युटर जुना की नवा आहे ? असा प्रश्न निर्माण होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे, कॉम्प्युटर खरेदी-विक्री व्यवहाराची कोणतीही पावती रेकॉर्डवर दाखल नाही. ज्यावेळी वरील प्रश्न निर्माण होतात, त्यावेळी कॉम्प्युटरला वॉरंटी दिल्याची व तो जुना की नवीन आहे ? ही बाब सिध्द होणे अत्यंत कठीण आहे. त्याशिवाय तक्रारदार यांनी अर्थिंग व यु.पी.एस. शिवाय कॉम्प्युटर कार्यान्वित केल्यामुळे तांत्रिक अडचणी येत असल्याचे विरुध्द पक्ष यांनी नमूद केलेले आहे. अशा परिस्थितीत, कॉम्प्युटरला वॉरंटी असल्याचे यदाकदाचित मान्य केले तरी, तक्रारदार यांच्या पी.सी.मध्ये उत्पादकीय दोष असल्याचे पुराव्याद्वारे सिध्द करण्यात आलेले नाही. त्यामुळे कॉम्प्युटर दोषाकरिता विरुध्द पक्ष हे जबाबदार असल्याचे निदर्शनास येत नाही आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होत नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. 6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते. 2. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/18111)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT | |