ग्राहक तक्रार क्र. 80/2014
दाखल तारीख : 14/03/2014
निकाल तारीख : 26/03/2015
कालावधी: 01 वर्षे 0 महिने 13 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. मारुती बेलाजीराव बनसोडे,
वय-82 वर्षे, धंदा – स्वातंत्र्य सैनिक,
हैद्राबाद व गोवा मुक्ती संग्रम,
रा.पारगाव, ता.वाशी, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मा. शाखा अधिकारी,
उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँक लि.
शाखा –पारगाव, ता.वाशी, जि. उस्मानाबाद.
2. मा.कार्यकारी संचालक,
उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँक लि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : स्वत:
विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी. दानवे.
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा.
आपल्या मुदत ठेवीच्या रकमा विरुध्द पक्षकार (विप) बँकेकडे ठेवल्या असतांना मुदत संपल्यानंतर रकमा परत न देऊन विप ने सेवेत त्रुटी केली म्हणून तक्रारकर्ता (तक) यांनी ही तक्रार दिलेली आहे.
अ) 1. तक चे तक्रारीमधील कथन थोडक्यात असे की तो 82 वर्षाचा स्वातंत्र्य सैनिक आहे. त्याने दि.29/05/2012 रोजी रु.1,00,000/- ची एक अशा चार व रु.50,000/- ची एक अशा मुदतठेवी विप कडे तेरा महिन्याचे कालावधीसाठी ठेवल्या. मुदत संपल्यानंतर तक ने विप कडे व्याजासह रकमेची मागणी केली विप क्र.1 पारगाव शाखाधिका-यांनी आमचेकडे पैसे नाहीत म्हणून वरिष्ठांकडे जा असे सांगितले. तक ने दि.04/09/2013 रोजी कार्यकारी संचालक विप क्र.2 यांच्याकडे प्रथम व नंतर दि.02/12/2013 रोजी दुसरा अर्ज दिला तसेच दि.02/09/2013 रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना अर्ज दिला परंतू विप यांनी रक्कम दिली नाही.
2. विप यांचेवर अंजिओग्राफी व अंजिओप्लास्टी करणे होती त्यासाठी रकमांची जरुरी होती पण मिळाली नाही. उपचारास उशीर झाल्यामुळे बायपास सर्जरी करणे महाग पडले. तक ला विप मुळे मोठया खर्चास व त्रासास सामोरे जावे लागले. तक ने दि.04/01/2014 रोजी विप क्र.2 यांना नोटिस पाठविली पण काही उपयोग झाला नाही. विप यांनी मुदत ठेवीची रक्कम व्याजासह दयावी व भरपाई दयावी म्हणून तक ने ही तक्रार दिलेली आहे.
3. तक्रारी सोबत तक ने दि.02/09/2013 चे अर्जाची प्रत, दि.07/09/2013 चे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचे पत्र, दि.20/09/2013 चे जिल्हा उपनिबंधक यांचे पत्र, दि.23/05/2012 च्या मुदतठेव पावत्या इत्यादी कागदपत्रांच्या प्रती सोबत जोडल्या आहे.
ब) विप यांनी हजर होऊन आपले म्हणणे दाखल केलेले आहे. त्याप्रमाणे तक यांनी ठेवपावत्यांच्या पुर्णछायांकित प्रती हजर केलेल्या नाहीत. विप ने ठेवींच्या रकमां देण्यास टाळाटाळ केली हे अमान्य आहे. तक यांना मानसिक शारीरिक व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागले हे अमान्य आहे. तक मुळ पावत्या घेऊन बँकेकडे आला नाही. मुळ पावत्या व सहया करुन बॅकेत दिल्यावर ठेवींच्या रकमा बचत खात्यात वर्ग कराव्या लागतात व त्यानंतर ठेवीच्या रकमा मिळू शकतात. विप यांनी तक ला रकमांची प्रचलित व्याज दराने पुर्नंगुंतवणूक करण्यास सांगितले होते. विप च्या तत्कालीन पदाधिका-यांनी गैरकारभार व कुटाने केल्यामुळे बँकेस मोठया प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले त्याबद्दल विविध कोर्टात प्रकरणे प्रलंबित आहेत. बँकेच्या विरोधात वसूलीस स्थगीती आदेश देण्यात आलेले आहेत. अवर्षणामुळे शेतक-यांकडून वसूली झालेली नाही. जिल्हा परिषदेने पगारांची खाती अन्य बँकांत वर्ग केली. अशा आर्थिक अडचणींमुळे विप यांना तक ची रक्कम परत करण्यास सुलभ हप्ते मिळावे अशी विप ने विनंती केली आहे.
क) तक ची तक्रार त्याने दाखल केलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे लक्षात घेता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहली आहेत.
मुद्दे उत्तर
1) विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे ?
कारणमीमांसा
ड) मुद्दा क्र. 1 व 2 :
1. असे दिसते की रु.1,00,000/- च्या दोन ठेवी तक ने प्रथम दि.29/04/2011 रोजी तेरा महिन्यासाठी 9 टक्के व्याजाने विप कडे ठेवल्या. मुदत संपल्यावर आणखी तेरा महीन्यासाठी 10.75 व्याज दरावर त्यांचे नुतनीकरण करण्यात आले. दि.29/05/2012 रोजीच आणखी दोन रु.1,00,000/- तसेच रु.50,000/- ची एक ठेव त्याच पध्दतीने विप कडे ठेवण्यात आल्या. सर्व ठेवींची मुदत दि.29/05/2012 रोजी संपली आहे. त्या ठेवींचे पैसे विप देणे लागतो. सुमारे तीन वर्षाचा कालावधी संपत आला पण विप ने तक ला पैसे दिलेले नाहीत.
2. तक ने त्याचे वरील शस्त्रक्रियेसंबंधी कागदपत्रे हजर केली आहेत. एशीअन हार्ट इन्टीटयूअट मध्ये ऑगस्ट सप्टेंबर 2013 मध्ये उपचार घेतल्याचे दिसून येते. –हदय विकारासाठी उपचार घेतल्याचे दिसून येते. तक च्या तक्रारी नंतर विप ने पावत्यांच्या संपूर्ण प्रती हजर केल्या आहेत. तक ने ठेवींची मुदत पुन्हा वाढविल्याचे दिसून येत नाही. विप ने तक ची रक्कम अडवण्याचे कोणतेही कारण दिसून येत नाही.
3. आता विप चे म्हणणे आहे की तत्कालीन पदाधिका-यांनी गैरकारभार व घोटाळे त्यामुळे विप बँकेची परीस्थिती खालावलेली आहे. विप ने तेरणा साखर कारखाना तुळजाभवानी साखर कारखाना यांच्या कोर्ट केसेसचा उल्लेख केलेला आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की विप हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका प्रत्येक जिल्हयामध्ये शेतकरी शेतमजूर तसेच आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांना अर्थसहाय्य इत्यादी कारणांसाठी स्थापन करण्यात आल्या. मात्र अशा बँका राजकारण्यांचे अडडे बनल्या. राजकारण्यांनी अनागोंदी कारभार व संधी साधूपणा बँक अधिका-यांच्यासहका-याने केल्यामुळे अनेक बॅका अडचणीत आलेल्या आहेत. विप ही त्यापैकीच एक बँक असल्याचे दिसून येते. जर पदाधिका-यांनी अपहार व घोटाळे कले असतील तर त्यांचेकडून नुकसान वसूल करण हे विप चे कर्तव्य आहे. सहकारी साखर कारखान्यांनी अशाच प्रकारे अशा बँकांना वेठीस धरल्याचे जाहीर आहे. आता अशा कारणापाठी मागे विप यांना लपता येणार नाही. विप चे पदधिका-यांनी गैरकारभाराची जबाबदारी घेतलीच पाहिजे. गैरकारभारामुळे ठेवीदारांची रक्कम अडविण्याचा विप ला काहीही अधिकार नाही. त्यामुळे विप ने तक ची रक्कम अडवून सेवेत त्रुटी केली हे उघड आहे. तक हा 82 वर्षाचा स्वातंत्र्य सैनिक आहे. पण त्याला आपल्या वैद्यकीय उपचारासाठी आपल्याच ठेवींची रक्कम मिळू शकली नाही हे उघड आहे. त्यामुळे तक हा अनुतोषास पात्र आहे म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व पुढीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विप यांनी तक याला मुदत ठेवींची रक्कम रु.4,50,000/- (रुपये चार लाख पंन्नास हजार फक्त) दि.29/05/2012 पासून रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.10.75 व्याजाने दयावी.
3) विप यांनी तक ला झालेल्या त्रासापोटी तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रु.50,000/-(रुपये पंन्नास हजार फक्त) दयावे.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.