:: निकालपत्र ::
(श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ), सदस्या यांचे आदेशान्वये)
(आदेश पारीत दि. 23 /12/2021)
प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये दाखल केली आहे. तक्रारीची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
- तक्रारकर्ती ही वरील पत्यावर राहत असुन तिचे पती श्री. कवडु नामदेव धाडसे हे दि. 11/08/2009 रोजी विषारी सापाने दंश केल्याने मरण पावले. त्यांच्या नावे शेतजमिन असुन सदर शेतीचा भुमापन क्र 70 असुन ती शेती मौजा अमरपुरी ता. चिमुर जि. चंद्रपुर येथे होती तक्रारकर्तीच्या पतीचा अपघात विमा काढला असल्याने तिने विरूध्द पक्ष क्र 2 कडे दस्तऐवजासह रितसर अर्ज केला. परंतु नुकसान भरपाई दावा विरूध्द पक्षाकडुन मिळाला नसल्यामुळे तिने दि. 10/09/2018 रोजी वकीलामार्फत विरूध्द पक्षांना नोटीस पाठविली. परंतु तरीही तिचा दावा मंजूर अथवा नामंजूर न कळविल्याने सदर तक्रार तक्रारकर्तीने दाखल केली आहे.
- तक्रारकर्तीने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि,विरुद्ध पक्ष ह्यांनी नुकसान भरपाई दाव्याची रक्कम रुपय 1,00,000/-प्रस्ताव दिल्याच्या तारखे पासून व्याजासह द्यावी तसेच शारिरीक मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई विरुद्ध पक्षांनी द्यावी.
- तक्रारकर्तीची तक्रार स्वीकृत करून विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना नोटीस पाठविण्यात आली.
- विरूध्द पक्ष क्र 1 हयांनी तक्रारीत उपस्थितीत होऊन त्यांचे लेखीउत्तर दाखल करीत तक्रारीतील मुद्दे खोडून काढले व विशेष कथनात नमूद केले की, सदर तक्रारीला कारण दि. 11/08/2009 रोजी घडले. परंतू तक्रारकर्तीने सदर तक्रार दि. 05/10/2018 म्हणजे 9 वर्षानी दाखल केली म्हणजेच सदर तक्रार ही कालबाहय मुदतीच्या बाहेर दाखल केलेली असून खारीज होण्यास पात्र आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दावा अर्ज तक्रारकर्तीने 90 दिवसाच्या आत दाखल करायला पाहिजे. तक्रारकर्तीचा दावा अर्ज विरूध्द पक्ष क्र 1 हयांना प्राप्त झाले नाही. तक्रारकर्तीने सुध्दा दावा अर्ज विरूध्द पक्ष क्र 1 हयांना पाठविल्याचे काहीही दस्तऐवज पुराव्या दाखल तक्रारीत नाहीत सबब, विरूध्द पक्ष क्र 1 हयांनी कोणतीही न्युनतापूर्ण सेवा तक्रारकर्तीला दिलेली नसल्यामूळे सदर तक्रार विरूध्दपक्ष क्र 1 विरूध्द खारीज करण्यात यावी.
- विरूध्द पक्ष हयांना नोटीस प्राप्त होऊन सुध्दा प्रकरणात उपस्थित न राहिल्यामूळे त्यांचे विरूध्द दि. 13/03/2019 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले.
- तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र व दस्तऐवज व विरूध्द पक्ष क्र 1 हयांचे लेखीबयान या अनुषंगाने केलेल्या युक्तीवादावरून आयोगाच्या निर्णयास्तव कारणे व निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेतः-
कारणमिमांसा
7.. तक्रारकर्ती ही राहणार रा. पोस्ट अमरपुरी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर, येथील रहीवासी असून तीचे पती मयत कवडु नामदेव धाडसे यांच्या मालकीची मौजा- अमरपुरी ता. चिमुर, जि. चंद्रपूर येथे भूमापन क्र 70 ही शेतजमिन आहे व सदर शेतजमिनीवर ते कुटूंबाचे पालनपोषण करित असून महाराष्ट्र शासनाच्या शेतकरीत अपघात विमा योजनेअंतर्गत विरूध्द पक्ष क्र 1 व 2 कडून तक्रारकर्तीच्य पतीचा विमा उतरविला होता. तक्रारकर्तीने सदर शेतीचा 7/12 व इतर दस्तऐवज तक्रारीत दाखल केलेले आहे. त्यावरून मय्यत कवडु नामदेव धाडसे हे शेतकरी होते हे सिध्द होते व तक्रारकर्ती ही त्यांची पत्नी असल्यामुळे ‘लाभार्थी’ आहे. म्हणून विरूध्द पक्ष क्र 1 व 2 हयांची ‘ग्राहक’ आहे.
8. तक्रारकर्तीच्या पतीचा दिनांक 11/08/2009 रोजी अपघाती मृत्यु झाला. शासनामार्फत शेतकरी विमा योजनेअंतर्गत विरूध्द पक्ष क्र. 1 यांचेकडून तक्रारकर्तीच्या मय्यत पतीचा रू.1 लाखाचा विमा काढलेला असल्यामुळे पतीचे मृत्युनंतर तक्रारकर्तीने सदर विमादाव्याची रक्कम मिळण्याकरिता विरुद्ध पक्ष क्रमांक 3 कडे दस्तावेजांसह रितसर अर्ज केला असे तक्रारकर्तीचे म्हणणे आहे. प्रस्तुत प्रकरणातील दस्तऐवजाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, विमाधारकाचा मृत्यु दि. 11/08/2009 रोजी झालेला असल्यामूळे तक्रारीला कारण दि. 11/08/2009 रोजी घडले. मात्र त्यानंतर एकदम 9 वर्ष तक्रारकर्तीने विमा दाव्याबाबत कोणताही पाठपुरावा केला गेल्याचे कागदोपत्री पुराव्यावरून दिसून येत नाही. आयोगाच्या मते विमा योजनेअंतर्गत मृत्युदावा दाखल करणारी कोणतीही लाभार्थी व्यक्ती, ही दावा प्राप्त करण्यासाठी कोणताही पाठपूरावा न करता 9 वर्षे वाट पाहणार नाही आणी दावा रक्कम मिळण्याकरिता तिचे सतत प्रयत्न सुरु राहतील. परंतु तक्रारकर्तीने प्रस्तुत प्रकरणात असा कोणताही पत्रव्यवहार किंवा पाठपूरावा केला हे कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल करून सिध्द केलेले नाही. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणात तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत असून त्यामुळे तक्रार मुदतबाह्य नाही हे तक्रारकर्तीचे म्हणणे ग्राह्य धरण्यायोग्य नाही. शिवाय तब्बल 9 वर्षानंतर म्हणजे दिनांक 10/9/2018 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविल्यामुळे तक्रारीला नवीन कारण उद्भवत नाही. सबब आयोगाचे मते सदर तक्रार विहीत मुदतीत नाही हि बाब सिद्ध होत असल्यामुळे आयोग खालील आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्तीची तक्रार क्रमांक 157/2018 खारीज करण्यात येते.
- उभयपक्षांनी आपआपला तक्रारखर्च सोसावा.
3 उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
4 प्रकरणाच्या “ब” व “क” फाईल्स तक्रारकर्तीला परत करण्यांत याव्यात.
श्रीमती. कल्पना जांगडे (कुटे) श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ), श्री. अतुल डी. आळशी
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर.