(मा.अध्यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कम रु.89,461/- मिळावी व या रकमेवर दि.17/12/2009 पासून 18 टक्के व्याज मिळावे, नोटीसखर्चापोटी रु.750/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाला यांनी पान क्र.45 लगत लेखी म्हणणे, पान क्र.48 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढील प्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत. 1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? - होय. 2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?- होय. 3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी व्याजासह रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. 4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून नोटीस खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. 5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. विवेचन या कामी अर्जदार यांनी पान क्र.64 लगत लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. सामनेवाला यांचेवतीने अँड पी.पी.पवार यांनी युक्तीवाद केलेला आहे सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये, त्यांनी अर्जदार यांना विमापॉलीसी दिलेली आहे ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी या कामी पान क्र.7 लगत विमापॉलीसी शेडयुल हजर केलेले आहे. पान क्र.7 चे कागदपत्र व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांची रिक्शा दि.17/12/2009 रोजी चोरीला गेलेली आहे परंतु त्यापुर्वीच अर्जदार यांनी त्यांची रिक्शा विनोद नामदेव चौधरी यांना विकलेली आहे. रिक्शा चोरीला गेल्याबाबत विनोद नामदेव चौधरी यांनीच पोलीसस्टेशनला फिर्याद दिलेली आहे. अर्जदार यांनी त्यांची रिक्शा विनोद चौधरी यांना विकलेली असल्यामुळे अर्जदाराचा ऑटो रिक्शाशी कोणताही संबंध राहीलेला नाही त्यामुळे विमाक्लेम देता येत नाही. सेवा देण्यात कमतरता केलेली नाही.” असे म्हटलेले आहे. अर्जदार यांनी पान क्र.7 लगत जे विमा सर्टिफिकेट दाखल केलेले आहे ते विमा सर्टिफिकेट अर्जदार यांचेच नावावर आहे. पान क्र.8 लगत रिक्शाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दाखल आहे. या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवरती अर्जदार यांचेच नाव आहे. जरी पान क्र.17 प्रमाणे विनोद चौधरी यांनी पोलिसांकडे फिर्याद दिलेली असली तरीसुध्दा चोरीच्या घटनेच्या वेळी वादग्रस्त रिक्शा व त्याची विमापॉलीसी अर्जदार यांचेच नावावर आहे हे पान क्र.7 व 8 चे कागदपत्रावरुन स्पष्ट झालेले आहे. अर्जदार यांनीच पान क्र.12 लगत आर.टी.ओ. यांचेकडील फॉर्म नं.35 दाखल केलेला आहे. रिक्शा चौधरी यांचे नावावर वर्ग होण्यासाठी अर्जदार यांनी हा फॉर्म आर.टी.ओ. यांचेकडे दिलेला नाही. अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्ज कलम 2 ते 4 मध्ये, “त्यांनी आर्थीक अडचणीमुळे रिक्शा विक्रीचा करार विनोद चौधरी यांचेबरोबर केलेला होता, परंतु प्रत्यक्षात रिक्शा विक्रीपावती दिलेली नव्हती व आर.टी.ओ कार्यालयात हस्तांतराचा फॉर्म भरुन दिलेला नव्हता” असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सामनेवाला यांनी पान क्र.53 लगत अर्जदार व विनोद चौधरी यांचेमधील गाडी विक्रीचा करारनामा हजर केलेला आहे. जरी हा करारनामा रेकॉर्डवर असला व चोरीची फिर्याद पोलीसांचेकडे श्री.विनोद चौधरी यांनी दिलेली असली तरी सुध्दा अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होता, चोरीच्या घटनेच्या वेळी वादातील रिक्शा ही अर्जदार यांचेच नावावर आहे व विमापॉलीसी ही सध्या अर्जदार यांचेच नावावर आहे असे दिसून येत आहे. चोरीच्या घटनेच्या वेळी किंवा त्यापुर्वी वादातील रिक्शा श्री.विनोद चौधरी यांचे नावावर ट्रान्सफर झालेली आहे हे दर्शवण्याकरीता सामनेवाला यांनी कोणतीही योग्य ती कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. आज तारखेपर्यंत वादातील रिक्शा अर्जदार यांचेच नावावर आहे हे सर्व कागदपत्रावरुन स्पष्ट झालले आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता, सामनेवाला यांनी अर्जदार यांचा विमाक्लेम अयोग्य व चुकीचे कारण देवून नाकारलेला आहे व त्यामुळे सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कम रु.89,461/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.9 व 10 लगत रिक्शा खरेदीची बिले दाखल केलेली आहेत. या बिलांचा विचार होता चोरीला गेलेल्या रिक्शाची किंमत रु.79,461/- आहे हे स्पष्ट होत आहे. पान क्र.17 चे फिर्यादीमध्ये रिक्शाची किंमत रु.40,000/- लिहीलेली आहे. पान क्र.9 व 10 चे पावतीचा विचार होता अर्जदार यांनी दि.26/12/2006 रोजी रिक्शा खरेदी घेतलेली आहे असे दिसून येत आहे. तक्रार अर्जातील कथनाचा विचार होता अर्जदार यांची रिक्शा दि.17/12/2009 रोजी चोरीस गेलेली आहे. म्हणजेच रिक्शा खरेदी केल्यानंतर सुमारे तीन वर्षाचे कालावधीनंतर रिक्शा चोरीस गेलेली आहे याचा विचार होता रिक्शाची किंमत रु.79,461/- या रकमेमधून द.सा.द.शे.10 टक्के प्रमाणे घसाराची किंमत रक्कम र.7946/- इतक्या रक्कमेची वजावट केली असता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी रु.71,515/- इतकी रक्कम वसुल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांना रक्कम रु.71,515/- इतकी मोठी रक्कम योग्य त्या वेळेत मिळालेली नाही. यामुळे अर्जदार यांना निश्चीतपणे आर्थीक नुकसान सहन करावे लागले आहे. याचा विचार होता, अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून आर्थीक नुकसान भरपाई म्हणून मंजूर रक्कम रु.71,515/- या रकमेवर रिक्शाच्या चोरीची तारीख दि.17/12/2009 पासून दोन महिन्यानंतर म्हणजे दि.18/02/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे. 1) 2 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान क्र.186. ओरीएंन्टल इंन्शुरन्स कंपनी विरुध्द राजेंद्रप्रसाद बंन्सल. 2) 1 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान क्र.265. संजीवकुमार विरुध्द न्यु इंडिया इंन्शुरन्स कंपनी. अर्जदार यांनी अर्जाचे खर्चाची व मानसिक त्रासाची रक्कम मिळावी अशी मागणी केलेली नाही. सामनेवाला यांचेकडून रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांनी पान क्र.38 प्रमाणे सामनेवाला यांना अँड.कैलास शिंदे यांचेमार्फत दि.23/09/2010 रोजी नोटीस पाठवलेली आहे या नोटीसीचा विचार करता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून नोटीशीचा खर्च म्हणून रक्कम रु.500/- इतकी रक्कम सामनेवालाकडून वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी या कामी पान क्र.49 लगत पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे हजर केलेली आहेत. 1) 1(2011) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. न्यु इंडिया इन्शुरन्स कं. लि. विरुध्द श्री.दिव्य प्रसाद 2) मा.राज्य आयोग राजस्थान जयपूर यांचेसमोर अपील क्र.1795/2005 दिलीपकुमार विरुध्द नॅशनल इन्शुरन्स कं. 3) मा.राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांचेसमोर रिव्हीजन अर्ज क्र.2012/2007 निकाल ता.5/5/2011 ओरीएंटल इन्शुरन्स कं. विरुध्द मेसर्स कमल टुर्स अँण्ड ट्रॅव्हल्स परंतु सामनेवाला यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतचे तक्रार अर्जामधील हकिकत यामध्ये फरक आहे. प्रस्तुत तक्रार अर्जामध्ये चोरीला गेलेली रिक्शा ही चोरीच्या दिवशी अर्जदार यांचेच नावावर नोंद आहे. यामुळे वर उल्लेख केलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे या कामी लागु होत नाहीत. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाला यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यातः अ) विमा क्लेमपोटी रक्कम रु.71,515/- दयावेत व आर्थीक नुकसान भरपाई म्हणून या मंजूर रकमेवरती दि.18/02/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज द्यावे. ब) नोटीस खर्चापोटी रु.500/- द्यावेत. |