निकालपत्र (दि.06.04.2016) द्वारा:- मा. सदस्या - सौ. रुपाली डी. घाटगे.
1. वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2. प्रस्तुतची तक्रार अर्ज स्विकृत करुन वि.प. क्र.1 व 2 यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. क्र.1 व 2 यांना नोटीस लागू होऊन वि.प. क्र.1 यांनी वकीलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. वि.प. क्र.2 यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. तक्रारदार तर्फे वकील व वि.प. क्र.1 तर्फे वकील यांचा तोंडी अंतिम युक्तीवाद ऐकला.
तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की–
3. तक्रारदार हे मजकूर गावचे कायमचे रहिवाशी असून मजकूर गावी त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. तक्रारदारांचे आईचे नांवे शेतजमीन असून, त्यांचे शेतजमीनीचे खाते नं.120 असा आहे. तक्रारदारांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. वि.प.क्र.1 ही विमा कंपनी असून वेगवेगळया प्रकारचा विमा व्यवसाय करते व वि.प.क्र.2 ही इन्शुरन्स कंपनी असून ती ब्रोकरचे काम करते. तक्रारदाराचे आईचा “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना” या योजनेअंतर्गत विमा वि.प.कंपनीकडे उतरविला होता व आहे. सदर पॉलीसीचा विमा हप्ता वि.प.कंपनीकडे शासनामार्फत अदा केलेला होता व आहे. त्यामुळे वि.प.क्र.1 कंपनीचे ग्राहक आहेत व आहे. तक्रारदारांची आई-कै.शिरमाबाई तुकाराम पाटील हे दि.18.03.2010 रोजी त्यांची मुलगी-सविता बाबूराव भाटले, रा.राधानगरी (हुडा) ता.राधानगरी येथे सणानिमित्त गेली होती, त्यावेळी तेथे त्यांचे पायरीवरुन पाय घसरुन पडलेने त्यांचे डोकीस मार लागून कानातून रक्त येत होते व त्या बेशुध्द अवस्थेत होत्या, त्यावेळी त्यांना औषधापचाराकरीता कोल्हापूर येथील सिटी हॉस्पीटल येथे अॅडमीट केले होते. त्यावेळी तक्रारदारांचे आईवरती उपचार चालू असताना दि.19.03.2010 रोजी मयत झाल्या. तक्रारदारांची आई सिटी हॉस्पीटल, कोल्हापूर यांनी पोली निरीक्षकसो, राजारामपूरी पोलीस स्टेशन, यांचेकडे दि.18.03.2010 रोजी अपघाताबाबतची वर्दी दाखल केलेली होती. त्यानुसार राधानगरी पोलीसांनी तपास केलेला आहे. तसेच तक्रारदारांची आई ही पाय घसरुन डोकीस मार लागून मयत झालेबाबतचा सी.टी.हॉस्पीटल येथील डॉक्टरांनी दाखला दिलेला आहे. परंतु यातील तक्रारदारांचे आईचा प्रेताचा पोस्टमॉर्टम झालेला नाही. सदरहू घटनेनंतर तक्रारदारांच्या आईचा मृत्यु झालेनंतर त्यांना शेतकरी व्यक्तीगत अपघाती विमा योजना या योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळावी म्हणून कृषी अधिकारी राधानगरी यांचे माध्यमातून वि.प.कंपनीकडे दि.14.10.2010 रोजी सदरचा क्लेम फॉर्म योग्य त्या सर्व कागदपत्रांसह क्लेम फॉर्म भरुन दिलेला होता. तसेच दि.24.09.2010 रोजी तक्रारदारांनी विमा प्रस्तावाची एक प्रत वि.प.कंपनीस पाळंदे कुरिअरने पाठविलेली होती व आहे. तथापि वि.प.यांनी आजअखेर तक्रारदारांना क्लेमबाबत काहीही कळविलेले नाही. तसेच तक्रारदार यांना विना विलंब, सुलभ व तात्काळ सेवा देणेची कायदेशीर जबाबदारी वि.प.कंपनीवर असतानासुध्दा त्यामध्ये वि.प.कंपनीने प्रचंड त्रुटी व हयगय निर्माण आहे. म्हणून सदरची तक्रार तक्रारदारांना मे.कोर्टासमोर दाखल करणे भाग पडले आहे. वि.प.कंपनीकडून तक्रारदारांना त्यांची आईचे मृत्युपश्चात शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारी विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे.15% दराने वसुल होऊन मिळावे. तक्रारदारांना वि.प.यांचेमुळे झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च वकील फी सह रक्कम रु.3,000/- अशी मागणी सदरहू मंचास केलेली आहे.
4. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत 12 कागदपत्रें जोडलेली आहेत. अनुक्रमे ती पुढीलप्रमाणे – विमा प्रस्ताव भाग-1 व 2, खाते क्र.120 चा 8-अ उतारा, गट क्र.431 चा 7x12 उतारा, गांव नमुना सहा-क उतारा, तक्रारदारांचे प्रतिज्ञापत्र, तक्रारदारांचे आईचा मृत्यु दाखला, सी.टी.हॉस्पीटल यांनी दिलेली वर्दी, राजारामपूरी पोलीस ठाणे यांनी राधानगरी पोलीस ठाणे यांना दिलेले पत्र, तक्रारदारांचा जबाब, तक्रारदारांचे मयत आईवर सी.टी.हॉस्पीटल येथे केले उपचाराची समरी, वि.प.कंपनीस प्रस्तावाची प्रत तक्रारदारांनी पाठविलेबाबतची पोहच पावती व दि.19.11.2014 रोजीचे तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र, इत्यादीं कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5. वि.प. यांनी दि.11.08.2014 रोजी आपले म्हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. दि.24.08.2015 रोजी तक्रारदारांचा विमा प्रस्ताव राधानगरी ऑफीसमधून जिल्हा अधिक्षक, कृषीअधिकारी कोल्हापूर यांना पाठविलेची प्रत व वि.प.यांनी दि.20.04.2015 रोजी म्हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारुन तक्रारदारांचा क्लेम वि.प.विमा कपंनी प्राप्त झालेला नाही. तक्रारदाराने सदरचे क्लेमबाबत वि.प.यांना काहीही कळविलेले नाही. तक्रारदारांनी सदरचे क्लेम पेपर्स कृषिअधिकारी, राधानगरी यांचेमार्फत वि.प.यांना पाठविणे हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. कबाल जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ही वि.प.यांचे एजंट नाहीत. सबब, वि.प.यांना सदरचा क्लेम प्राप्त झालेला नसलेने वि.प.यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही.
6. दि.20.05.2015 रोजीचे वि.प.विमा कंपनीचे डिव्हीजनल मॅनेजर – श्री.राजेंद्र जयसिंग टोपरानी यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
7. तक्रारदारांची तक्रार तसेच वि.प.क्र.1 यांची कैफियत व अनुषांगिक कागदपत्रे व उभयतांच्या वकीलांचा युक्तीवादाचा विचार करीता, पुढील मुद्दे निष्कर्षाप्रत उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | वि.प.-विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे विमा पॉलीसीची विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत का ? | होय. |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. |
4 | आदेश काय ? | अंतिम निर्णयाप्रमाणे. |
कारणमिमांसा:-
मुद्दा क्र.1:- प्रस्तुत कामी, तक्रारदारांचे आईचे नावे शेतजमीन असून त्यांचा वि.प.विमा कंपनी “शेतकरी व्यक्तिगत अपघात योजना” अंतर्गत विमा उतरविलेला होता. विमा पॉलीसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. तक्रारदारांची आई –शिरमाबाई तुकाराम पाटील, दि.18.03.2010 रोजी पाय घसरुन पडलेने डोक्यास मार लागून बेशुध्द अवस्थेत औषधोपचारकरीता सिटी हॉस्पीटल, कोल्हापूर यांचेकडे उपचारासाठी दाखल केले असता, दि.19.03.2010 रोजी मयत झाली. तक्रारदारांनी दि.14.10.2010 रोजी वि.प.विमा कंपनी सदर अपघात योजनेअंतर्गत विमा क्लेम योग्य कागदपत्रासहीत भरुन दिला असता, वि.प.विमा कपंनी तक्रारदारांना आजतागायत सदर क्लेमबाबत काहीही न कळवून तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.
वि.प.यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये सदरचा विमा क्लेम वि.प.विमा आजतागायत प्राप्त झालेला नसलेने अदयाप कळविलेचे नाही. तसेच तक्रारदाराचे आईचा मृत्यु हा डोक्यास मार लागून झालेचे नाकारलेले आहे. त्या अनुषंगाने, या मंचाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदारांची दि.15.09.2010 रोजीचा मयत शिरमाबाई तुकाराम पाटील यांचा मृत्यु दाखला दाखल केलेला आहे. सदर दाखल्यावर मृत्युची कारणे –डोक्याला मार लागुन मृत्यु नमुद आहे. त्यावर ग्रामसेवक, ग्रामपंचायत, कासारपुतळे, ता.राधानगरी, जि.कोल्हापूर यांची सही आहे. अ.क्र.8 ला सिटी हॉस्पीटलने पोलीस निरीक्षक, राजारामपूरी यांना वर्दी दिल्याचे दाखल असून सदर पत्रात डोक्याला मार लागून जखमी अवस्थेत दि.18.03.2010 रोजी अॅडमीट करण्यात आले असे नमुद आहे. तसेच राजारामपूरी पोलीस ठाणे यांचेकडील पत्र व तक्रारदारांचे जबाबामध्ये मयत- शिरमाबाई तुकाराम पाटील घराच्या पाय-या उतरत असताना पाय घसरुन पडून डोक्यास जखम झाली आहे असे नमुद आहे. अ.क्र.11 ला सिटी हॉस्पीटल यांचेकडील ट्रीटमेंट समरी दाखल असून त्यावर तक्रारदारांचे आईचे नांव नमुद आहे. Fall From Steps, Right ear Bleed. Semi conscious, wide aware, Diffuse cerebral Odema असे नमुद आहे. वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांच्या आईचा मृत्यु हा नैसर्गिक नसून पायरीवरुन पाय घसरुन पडलेने डोक्यास मार लागून झालेचा निष्पन्न होते.
वि.प.यांनी युक्तीवादामध्ये तक्रारदारांचे आईचा पोस्ट मार्टेम दाखल नाही. त्याकारणाने, सदरचा क्लेम अदयाप प्रलंबित असलेचे कथन केले आहे. त्या अनुषंगाने हे मंच तक्रारदारांनी दाखल केलेला न्यायनिवाडयाचा आधार घेत आहे.
IV (2008) CPJ 312
ICICI Lombard General Insurance Co. Ltd. …Appellant
Versus
Raju Kachhawa …Respondent
(i) Consumer Protection Act, 1986 – Section 2(1))(g) and 15 –Insurance – Accidental death – Deceased slipped in house –Fell down on ground – Received head injury including brainstem haemorrhage – Head injury direct result of slipping of deceased, would be treated as slipping of deceased, would be treated as mishap or untoward event, not expected or designed –Death of deceased accidental proved – Non-furnishing of FIR and post mortem report would not mean that no accident took place – No crime/ offence took place, no necessity of lodging FIR and post mortem report – Repudiation of claim unjustified – Insurer liable under policy.
Result : Appeal dismissed.
सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदारांचे आईचा मृत्यु हा अपघाती असलेचा शाबीत होत असलेने केवळ पोस्ट मार्टेम नसलेचे कारणाने सदरचा क्लेम प्रलंबित ठेवणे अयोग्य आहे असे या मंचाचे मत आहे.
वि.प. यांनी सदरचा क्लेम आजतागायत प्राप्त झालेला नसलेचा कथन केले आहे. तथापि तक्रारदारांनी सदर कामी दि.24.09.2010 रोजी विमा प्रस्तावाची प्रत वि.प.कंपनीला पाळंदे कुरिअरमार्फत पाठविलेची प्रत दाखल आहे. सदरचे प्रतींवर वि.प.विमा कंपनी तर्फे कबाल जनरल इन्शु. सर्व्हिसेस पुणे यांचा शिक्का आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी, राधानगरी, कोल्हापूर यांनी तक्रारदारांना दिलेल्या पत्राची प्रत दाखल केलेली असून सदर पत्रामध्ये अपघात विमा मिळणेबाबत प्रस्ताव दि.18.10.2010 रोजी कार्यालयाला प्राप्त झालेचे मान्य केलेले असून सदरचा प्रस्ताव जा.क्र.1791 ने दि.21.10.2010 रोजी जिल्हा अधिकारी, कृषी अधिकारी यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविलेचे कथन केले आहे. वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांने विमा क्लेम वि.प.कंपनी दि.14.10.2011 रोजी दाखल केलेला होता. दि.18.10.2010 रोजी सदरचा प्रस्ताव प्राप्त झाला असून दि.21.10.2010 रोजी पुढील कार्यवाही पाठविलेचे स्पष्टपणे दिसून येते. विमा प्रस्ताव व त्यासोबतचे सर्व कागद हे वि.प.कंपनीस ब्रोकर व कंन्सल्टंट यांचेमार्फत फक्त तक्रारदारांना विनाविलंब आर्थिक सहाय प्राप्त व्हावे या उद्देशानेच व शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा प्रस्तावाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी या उद्देशानेच केलेला आहे. प्रोसीसिंग करता ब्रोकर व कंन्सल्टंट यांची मदत घेतली जाते. एखाद्या विमा धारकाने मुदतीत इंटिमेशन दिली नाही, म्हणून त्यांना विमा पॉलीसी अंतर्गत विमा रक्कमेच्या लाभापासून वंचित ठेवता येणार नाही. विमा कंपनीने राज्य शासनाकडून विमा प्रिमीअम स्विकारुन जोखीम स्विकारलेली आहे. केवळ कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस हे मध्यस्थ सल्लागार व शासनास विनामोबदला सहाय्य करतात. सबब, वरील सर्व कागदपत्रांचा विचार करता, तक्रारदारांच्या आईचा मृत्यु हा पायरीवरुन पाय घसरुन पडलेने डोकीस मार लागून झालेला आहे. सदरचा प्रस्ताव दि.21.10.2010 रोजीपासून पुढील कार्यवाहीसाठी पाठविलेला असताना देखील त्याबाबत तक्रारदारांना आजतागायत काहीही न कळवून व विमा पॉलीसीचा मूळ हेतु विचारात न घेऊन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2:- उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता, तक्रारदार हे विमा रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) व सदर रक्कमेवरती तक्रार स्विकृत तारखेपासून दि.12.05.2014 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9% प्रमाणे व्याज मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3:- प्रस्तुतची तक्रार ही वि.प. विमा कंपनी यांनी सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदारांना दाखल करावी लागली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला तसेच त्यांना सदरची तक्रार दाखल करण्यासाठी खर्च करावा लागला आहे. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) मिळण्यास पात्र आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4:- सबब, हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि.प. विमा कंपनीने तक्रारदारांना विमा रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) व सदर रक्कमेवरती तक्रार स्विकृत तारखेपासून दि.12.05.2014 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9% प्रमाणे व्याज अदा करावे.
3. वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु.1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त ) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.