:: नि का ल प ञ ::
(मंचाचे निर्णयान्वये, श्री मिलींद रामराव केदार, मा.सदस्य)
(पारीत दिनांक :24 मे, 2013)
तक्रारकर्ता याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे.
ग्राहक तक्रार क्रं-95/2011
तक्रारकर्त्यानुसार तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे.
1 तक्रारकर्ता ही भागीदारी संस्था असून रजिस्ट्रार ऑफ फर्म्स नागपूर यांच्याकडे पंजीयीत क्रं. NGP-4928/95-96 अंतर्गत पंजीबध्द आहे. सदर संस्थेचे श्रीनिवास मुरलीधर जाजोदिया व गोपिका बालकृष्ण जाजोदिया हे भागीदार आहेत. त.क.चा तेल गिरणीचा व्यवसाय आहे.
त.क. हा दरवर्षी कारखान्याची बिल्डींग संयंत्र यंत्रसामुग्री व विजेचे उपकरण तसेच सरकी तेल, ढेप, सरकी स्टॉक मध्ये असलेली तेल बॅरल टँक मध्ये भरलेले आणि प्रक्रियेत निघणारे ढेप पोत्यात भरलेली व खुली ढिगात असलेली, अन्य कच्चा माल, पॅकींग मटेरीयल, बारदाना व उद्योगाच्या व्यवसायाशी संबंधित अन्य साहित्य बिल्डींग मध्ये व खुल्या जागेत संग्रहित या सर्वांचा विमा काढीत असतो.
2. त.क.यांनी स्टॅण्डर्ड फायर एण्ड स्पेशल पेरिल्स पॉलिसी विरुध्द पक्ष 1 यांच्याकडून घेतल्या.
(अ) त.क. यांनी पहिली पॉलिसी क्रं 182302/11/2009/255 ही रुपये
10,00,000/- आहे. या पॉलिसी अंतर्गत खुल्या मैदानात संग्रहित सरकी, बॅरल
व टैंक मध्ये भरलेले तेल, बारदाना, पॅकींग मटेरीयल, ढेप व व्यवसायाशी
संबंधित अन्य सामग्री यांचा विमा घेतलेला आहे. त्याकरिता रु.1,958/- चे
प्रिमियम दिलेले असून सदर पॉलिसीचा अवधी दि. 03.03.2009 च्या 11.40
पासून दि. 02.03.2010 च्या मध्यरात्री पर्यंत आहे.
(आ) दुसरी पॉलिसी क्रं 182302/11/2009/253 या पॉलिसी अंतर्गत त.क.चा
सरकीचा साठा व प्रक्रियेत असलेली सरकी, तेल बॅरल किंवा टँक मध्ये संग्रहित निर्माण होणारे, ढेप पोत्यात भरलेली व खुल्या ढिगात ठेवलेली व प्रक्रियेत निर्माण होणारी, पॅकींग मटेरीयल, पक्का-कच्चा माल व व्यवसायाशी संबंधित सामग्रीचा विमा घेतलेला आहे. ही पॉलिसी वि.प.क्रं. 1 कडून रुपये 1 कोटीची घेतली आहे व त्याकरिता रु. 17,841/- चे प्रिमियम दिले आहे. सदर पॉलिसीचा अवधी दि. 03.03.2009 ला 11.40 पासून दिनांक 02.03.2010 च्या मध्यरात्री पर्यंत आहे.
इ) तक्रारकर्त्याने वि.प.क्रं. 1 कडून तिसरी पॉलिसी क्रं 182302/11/2009/254 सुध्दा घेतली आहे . या पॉलिसीचा अवधी दि. 03.03.2009 च्या 10.40 पासून दि. 02.03.2010 च्या मध्यरात्री पर्यंत आहे. या पॉलिसी द्वारे फर्निचर, फिटींग्ज, फिक्चर्सचा विमा रु.80,000/- प्लांट व मशिनरीचा रुपये 18,00,000/- (अठरा लाख रुपये) , बिल्डींगचा रुपये 20,00,000/- (वीस लाख रु) आहे. याकरिता त.क. नी वि.प. क्रं. 1 ला रुपये 6,254/- चे प्रिमियम दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
3. दि. 13.03.2009 आणि 14.03.2009 च्या मध्यरात्री अंदाजे सकाळी 3.00 वाजता तक्रारकर्त्याच्या कारखान्यात आग लागली. या घटनेची सूचना विरुध्द पक्ष क्रं. 1 तसेच पोलिस अधिकारी, अग्निशामन अधिकारी यांना दिली. या आगी मध्ये प्लांट आणि यंत्र सामग्री यांचे रुपये 12.75 लाखाचे नुकसान झाले. बिल्डींगचे रुपये 17,32,456/- चे व मालसाठयाचे रुपये 29 लाखाचे नुकसान झाले. याप्रमाणे एकूण रुपये 66,54,749/- चे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
आगीची सूचना मिळाल्यानंतर वि.प.क्रं. 1 यांनी सर्व्हेअर म्हणून वि.प.क्रं. 2 ला
नियुक्त केल्याचे त.क.ने नमूद केले. दोन्ही विरुध्द पक्षांनी मागितलेले सर्व दस्ताऐवज त.क.ने दि.21.03.2009 च्या पत्रासोबत दिले. तसेच त.क.ने दोन्ही पक्षांना रुपये 66,54,797/-चा सुधारित क्लेम बिल सुध्दा दिले. तक्रारकर्त्या नुसार वि.प.क्रं. 1 यांना संपूर्ण क्लेम फॉर्म भरुन दिला. तसेच वि.प.क्रं. 2 ने दि. 09.04.2009 ला जी-मेल द्वारे मागणी केलेले दस्ताऐवज तक्रारकर्त्याने दि. 02.06.2009 व 08.06.2009 ला दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
त.क. नी तक्रारीत आक्षेप घेतला आहे की, वि.प. यांना सर्व दस्ताऐवज देऊन सुध्दा त.क.चा नुकसान क्लेम निर्धारित केलेला नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दि.24.06.2009 ला वि.प. क्रं. 1 यांना पत्र दिले व साडेचार महिने होऊन ही व सर्व दस्ताऐवज देऊन सुध्दा क्लेम दिला नाही. याबद्दल विचारणा केली व त्वरित नुकसानभरपाई देण्याची विनंती केली.
तक्रारकर्त्याने पुढे असे ही नमूद केले की, विरुध्द पक्ष क्रं. 2 च्या पुनःश्च मागणी प्रमाणे तक्रारकर्त्याने दि. 03.08.2009 च्या पत्राद्वारे लागलेला वास्तविक खर्च, मजुरी व सामानाचे बिल, दुरुस्तीचे बिल याप्रमाणे पूर्ण खर्चाचे व्हाऊचर वि.प. 1 व 2 ला दिले.
4. तक्रारकर्त्याने पुढे असे नमूद केले की, विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी दि. 06.08.2009 च्या जी-मेल द्वारे त.क.ला त्यांनी निर्धारित केलेल्या नुकसानीचे निर्धारण पत्र पाठविले. तसेच दि. 13.08.2009 ला नुकसान निर्धारणचा दुसरा जी-मेल पाठविला. विरुध्द पक्ष क्रं. 2 ने नुकसान निर्धारणाचा अंतिम निर्धारित रिपोर्ट म्हणून वि.प. 1 ला पाठविला व त्यानुसार वि.प. 1 ने त्याचे पत्र दि. 7.9.2009 द्वारे त.क.ला वि.प. 2 ने नुकसानीचे रुपये 37,03,068/- ची शिफारस केल्याचे कळविले.
5. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केले की, विरुध्द पक्ष क्रं. 2 ने हेतुपुरस्सर व जाणूनबुजून सुड-बुध्दीने चुका केल्या. त्या विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 च्या निदर्शनास
आणून देण्याकरिता तक्रारकर्त्याने दि. 14.08.2009 ला पत्र पाठविले. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केले की, स्टॉकचा नुकसानीचा क्लेम रुपये 29,31,211/- चा होता. विरुध्द पक्ष क्रं. 2 ने पहिला असेसमेंट दि. 06.08.2009 मध्ये व दुसरा असेसमेंट दि. 13.08.2009 मध्ये तक्रारकर्त्याच्या क्लेमचे निर्धारण रुपये 27,73,133/- चे केले. परंतु तिस-या असेसमेंट मध्ये नुकसानीचे निर्धारण रुपये 27,66,243/- चे केले. त.क.ने नमूद केले की, विरुध्द पक्ष यांनी under Insurance म्हणून 1.29% प्रमाणे रुपये 36,241/- नुकसानीतून कमी केले होते. वास्तविक तक्रारकर्त्याची रु.1 कोटी 10लाख रुपयाची पॉलिसी होती व याबाबत दोन्ही विरुध्द पक्षांना कळविले होते. सदर बाब विरुध्द पक्षांनी हेतुपुरस्सर केल्याचे त.क.चे म्हणणे आहे. त.क.ने पुढे असे ही नमूद केले की, जळालेल्या तेलाचे मूल्य रुपये 10,11,328/- चे निर्धारण वि.प.क्रं. 2 ने केले आणि तेलाचा साठा पूर्णपणे जळाल्यावरही तेलाच्या नुकसानीचे निर्धारण रुपये9,68,549/- ची शिफारस केली. यामध्ये सुध्दा जाणूनबुजून रुपये 42,779/- कमी केले. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत विरुध्द पक्षाने केलेल्या नुकसान निर्धारणा विषयी अनेक आक्षेप घेतले आहे. त्यानुसार जळालेल्या ढेपीचे मूल्य , जळालेला माल, सरकी, बारदाना व कॉस्टीक सोडा असे एकूण रुपये 17,80,450/- व त्यावर दिलेला व्हॅट 4% याप्रमाणे रुपये 71,218/- चे आकलन नुकसानीमध्ये केलेले नाही असे त.क.ने तक्रारीत नमूद केले. त.क.ने वि.प.यांना या सर्व बाबीची माहिती दि.14.08.2009 च्या पत्राद्वारे दिली. त.क.चे म्हणणे की, त्याच्या नुकसानभरपाईचे योग्य निर्धारण विरुध्द पक्षानी केले नाही.
6. तक्रारकर्त्याची विमा पॉलिसी क्रं. 182302/11/2009/254 या द्वारे फर्निचर फिक्चर रु.80,000/- बिल्डींग रुपये 20 लक्ष व संयंत्र व यंत्र सामुग्री व इलेक्ट्रीक इंस्टालेशन, रुपये 18 लक्ष चा विमा घेतला होता. विरुध्द पक्ष 2 ने स्वतः आर्किटेक्ट कडून प्रमाणपत्र त.क.द्वारे मागितले. असेसमेंट प्रमाणे पुनर्निमाणचा खर्च रु.17,32,456/- आहे. परंतु विरुध्द पक्ष क्रं. 2 ने पहिल्या व दुस-या असेसमेंट मध्ये रुपये 4,41,168/- व तिस-या असेसमेंट मध्ये रुपये 4,28,118/- चे असेसमेंट केले. त.क.चे म्हणणे की, वि.प. 2 ने चुकीचे नुकसानीचे निर्धारण केले. अयोग्य मार्गाने व हेतुपुरस्सर चुकीचे नुकसानीची आकारणी केली.
7. यंत्र सामुग्री व नुकसानभरपाई करिता त.क.ने नुकसानी दाखल रु.12,75,000/- ची मागणी केली होती. परंतु वि.प. 2 ने पहिल्या व दुस-या आकारणीत रु.5,00,217/- एवढी केली व तिस-या आकारणीत रु.4,88,807/- ची केली व तिस-या आकारणी मध्ये 11,410/- रुपये कमी केले. त.क.चे म्हणणे आहे की, लोखंड व अन्य आवश्यक सामुग्री मजुरी असे एकूण 6,46,794/- रुपये विरुध्द पक्षाने विचारात घेतले नाही. त.क. ने असेही नमूद केले की, जळालेली मशीनरी नवीन घेण्याऐवजी डीलक्स
इंजीनिअरींग अमरावती कडून रिपेयर करुन घेतले व त्याकरिता 5,27,000/- रुपये खर्च आला तो सुध्दा वि.प. क्रं. 2 ने लक्षात घेतला नाही व इतर बाबी सुध्दा वि.प. क्रं. 2 ने विचारात घेतले नसल्याचे त.क.चे म्हणणे आहे. वि.प. 2 ने गैरकायदेशीररित्या रुपये 13,34,584/- ची कमी शिफारस केली.
8. त.क.ने पुढे असे ही नमूद केले की, जळालेल्या कैच्या पर्लिन टीनाचे पत्रे कॉलम लोखंडी टाक्या व अन्य स्ट्रक्चर्स जळालेल्या मालाचा साठा इत्यादी हटविण्यासाठी दि. 6.8.2009 च्या असेसमेंट मध्ये रुपये 27,731/-ची नुकसानभरपाईची शिफारस केली होती. परंतु दि. 13.08.2009 च्या तिस-या असेसमेंट मध्ये खर्चाची शिफारस शून्य केली, ही बाब सुध्दा वि.प.यांनी जाणूनबुजून केल्याचे त.क.चे म्हणणे आहे.तसेच सामुग्री हटविण्यासाठी दिलेले रुपये 2,00,000/- मजुरी विचारात घेतली नाही. तसेच आर्थिक आक्षेपाचे रुपये 2,500/- पुनर्निमाणाला लागलेले आर्किटेक्ट कडून घेतलेले परिश्रमिक रु.7,000/- याप्रमाणे त.क.चे रुपये 2,09,500/- ची शिफारस सुध्दा विरुध्द पक्षानी केली नाही. वि.प.ने मालाच्या स्टॉकमध्ये रुपये 1,69,753/- , बिल्डींग मध्ये रुपये 1,84,616 व प्लांट मशिनरी रुपये 13,34,584/- तसेच जळालेला मलमा हटविण्यासाठी व आर्किटेक्ट अंतर्गत फी यासाठी केलेला खर्च रुपये 2,09,500/- याप्रमाणे एकूण रुपये 18,88,453/- चा क्लेम हेतुपुरस्सर, सुडबुध्दीने दिलेला नाही. तसेच तक्रारकर्त्याने पत्राला उत्तर देतांना खोटी विधाने केली व बहुतांश पत्रे मिळून सुध्दा उत्तर दिली नाही.
9. तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्याचे नुकसान योग्य निर्धारण न करणे, कायदेशीर भरपाई त्वरित न देणे व त.क.ला अडचणीत आणण्याचे कार्य वि.प.नी केली. त.क.यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्र याचे कर्ज होते, त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र , वर्धा यांनी विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांना पत्र लिहून त.क.चा नुकसान क्लेम लवकरात लवकर अदा करण्याबाबत कळविले. त.क.ने दि. 8.9.2009 व 7.9.2009 च्या पत्राद्वारे वि.प.ने केलेला नुकसान निर्धारणाला विरोध दर्शविला. त.क.ने नमूद केले की, वि.प.ने जे निर्धारण केले होते ते देण्याकरिता सुध्दा योजनाबध्द पध्दतीने हंगाम पर्यंत व गैरकायदेशीर व कुत्सित बुध्दीने केली होती व त्यामध्ये त.क.ला कोंडीत पकडून वि.प.ने स्वेच्छाचारी व अयोग्य रक्कम घेण्यास भाग पाडण्याचा कट्ट रचला व त्यानुसार स्टॉकच्या नुकसानीचे रुपये 27,73,319/- , बिल्डींग यंत्र समुग्री संदर्भात रुपये 9,12,735/- घेण्यास भाग पाडले . त.क.ने तक्रारीत नमूद केले की, सदर रक्कम अडचणीमुळे विरोधासह घेतली व त.क.ला विरुध्द पक्षाने सदर रक्कम घेण्याकरिता अयोग्य मार्गाचा उपयोग करुन अडचणीत आणले. त.क. ने दि. 14.8.2009, 21.8.2009 व 8.10.2009 च्या पत्राद्वारे विरोध दर्शवून ही रक्कम घेतली.
10. त.क.चे पुढे असे ही म्हणणे की, त्याला रुपये 18,88,753/- कमी देण्यात आले. सदर रक्कम मिळण्यासाठी तो पात्र असून सदर रक्कमेवर व्याज मिळण्यासही तो पात्र आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने विनंती केली की, रुपये 20 लक्ष व त्यावर 15℅व्याज तक्रार दाखल तारखेपासूनची मागणी केली असून इतर ही मागण्या केल्या आहेत.
11. सदर तक्रारीची नोटीस विरुध्द पक्ष यांना मंचामार्फत बजाविण्यात आली. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी सदर तक्रारीला खालीलप्रमाणे उत्तर दाखल केले.
12. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्त्याचे बहुतेक म्हणणे मान्य केले असून त.क.चा तेल गिरणीचा व्यवसाय आहे हे मान्य केले. वि.प.ने मान्य केले की, त.क.च्या कारखान्यामधील यंत्र सामुग्री, विजेच्या उपकरणाचा व तेथील वस्तुंचा वि.प. क्रं. 1 कडे विमा काढण्यात आला होता व तक्रारीत नमूद पॉलिसी क्रमांक बरोबर आहे. तक्रारकर्त्याने दर्शविलेले रुपये 59,07,456/- चे नुकसान अमान्य केले. वि.प. 1 यांनी मान्य केले की, त्यांनी वि.प. क्रं. 2 यांना सर्व्हेअर म्हणून नियुक्त केले. दि. 21.03.2009 चे पत्र त्याला मिळाले व त्यामध्ये दर्शविलेले नुकसान रुपये 66,54,797/- मान्य नाही. वि.प. 1 ने त.क.यांना खर्चाचे, मजुरीचे बिल व व्हॉऊचरच्या प्रती दिल्या हे मान्य केले . वि.प. 1 यांनी नमूद केले की, त.क. यांनी Full and final settlement म्हणून विमा रक्कम मान्य केले असल्याने रुपये 37,03,068/- नुकसान क्लेम स्विकारला व तो स्विकारीत असतांना त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे त.क.यांनी मागितलेली जास्त नुकसान भरपाई ही योग्य नसल्याचे वि.प. 1 चे म्हणणे आहे.
13. विरुध्द पक्ष 1 ने Salvage and depreciation वजा करुन जे नुकसान झाले त्याचे योग्य मुल्यमापन केल्याचे आपल्या उत्तरात नमूद केले. त्यांनी पुढे असे ही नमूद केले की, तक्रारकर्त्याने Full and final settlement म्हणून रक्कम स्विकारली आहे, त्यामुळे त.क. आता परत रुपये 18,88,753/- वाढीव विमा दावा मागू शकत नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विरुध्द पक्ष क्रं. 1 ने विनंती केली.
14. सदर तक्रार मंचासमक्ष दि. 22 मे व 23 मे रोजी युक्तिवादाकरिता आली. मंचाने उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. तसेच दोन्ही पक्षाने दाखल केलेले दस्ताऐवज, प्रतिज्ञापत्र व कथन याचे निरीक्षण केले असता मंच खालील निष्कर्षा प्रत आला.
कारणे व निष्कर्ष
15. तक्रारकर्ता ही भागीदारी संस्था आहे व त्यांचा तेल गिरणीचा व्यवसाय आहे ही बाब त.क.नी तक्रारीत नमूद केली आहे. वि.प. क्रं. 1 यांनी त.क.यांचा तेल गिरणीचा व्यवसाय आहे ही बाब आपल्या लेखी उत्तरात मान्य केली. त्यामुळे उभय पक्षांच्या कथनावरुन ही बाब स्पष्ट होते की, त.क.यांचा तेल गिरणीचा व्यवसाय आहे.
16. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 यांच्याकडून स्टॅण्डर्ड फायर एण्ड स्पेशल पेरिल्स पॉलिसी घेतल्या होत्या. पहिली पॉलिसी क्रं.182302/11/2009/255, दुसरी पॉलिसी क्रं. 182302/11/2009/253 व तिसरी पॉलिसी क्रं. 182302/11/2009/254 अशा तीन पॉलिसी घेतल्या होत्या ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पान क्रं. 100 ते 108 या दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. तसेच वि.प. 1 ने सुध्दा आपल्या उत्तरामध्ये पॉलिसी बाबतचा त.क.ने केलेला उल्लेख बरोबर असल्याचे नमूद केले आहे. यावरुन त.क. यांनी वि.प. 1 यांच्याकडून 3 विमा पॉसिली घेतल्या होत्या हे सिध्द होते. त.क. हे वि.प. यांचे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सेवा घेतली असल्यामुळे ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे.
17. तक्रारकर्त्याने स्टॅण्डर्ड फायर एण्ड स्पेशल पेरिल्स पॉलिसी
(i) पॉलिसी क्रं.182302/11/2009/255, रुपये 10 लक्ष ची घेतली होती. सदर पॉलिसी खुल्या मैदानात संग्रहीत सरकी, बॅरल व टैंक मध्ये भरलेले तेल, बारदाना, पॅकिंग मटेरीयल, ढेप व व्यवसायाशी संबंधित सामुग्रीचा विमा घेतला होता व याकरिता त.क. ने रुपये 1,958/- चे प्रिमियम दिले होते व सदर पॉलिसीचा अवधी दि. 03.03.2009 च्या 11.40 पासून दि. 02.03.2010 च्या मध्यरात्री पर्यंत होता. ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पॉलिसीवरुन स्पष्ट होते. तसेच याबाबत वि.प. क्रं. 1 यांनी आपल्या उत्तरात देखील कोणताही आक्षेप घेतला नाही.
(ii) दुसरी पॉलिसी क्रं. 182302/11/2009/253 या पॉलिसी द्वारे त.क.ने सरकीचा साठा व प्रक्रियेत असलेली सरकी, तेल बॅरल किंवा टँक मध्ये संग्रहीत निर्माण होणोरे, ढेप पोत्यात भरलेली व खुल्या ढिगात ठेवलेली व प्रक्रियेत निर्माण होणारी, पॅकिंग मटेरीयल, पक्का-कच्चा माल व व्यवसायाशी संबंधित सामुग्रीचा विमा घेताला होता. याकरिता त.क.ने रुपये 17,841/- एवढा प्रिमियम वि.प.1 यांच्याकडे भरलेला होता व पॉलिसीची विमा मर्यादा रुपये 1 कोटीची होती. सदर पॉलिसीचा विमा अवधी दि. 03.03.2009 ला 11.40 पासून 2.3.2010 च्या मध्यरात्री पर्यंत होता, हे त.क. ने दाखल केलेल्या पॉलिसी दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. तसेच वि.प.1 ने आपल्या उत्तरात कोणताही आक्षेप घेतला नसल्यामुळे त.क.च्या असलेल्या या विमा पॉलिसीबद्दल कोणताही वाद नसून सदर पॉलिसी विमा वि.प. 1 यांनी दिला होता व वि.प.1 यांनी त्यानुसार विमा संरक्षण स्विकारले होते हे स्पष्ट होते.
(iii) तक्रारकर्त्याने तिसरी विमा पॉलिसी क्रं. 182302/11/2009/254 ही सुध्दा घेतली होती. या पॉलिसीचा अवधी दि. 03.03.2009 ला 11.40 पासून 02.03.2010 च्या मध्यरात्री पर्यंत होता. याकरिता त.क.ने रुपये 6254/- चे प्रिमियम दिलेले होत. सदर पॉलिसी द्वारे फर्निचर फिटींग्ज, फिक्चर्स चा विमा रुपये 80,000/- प्लांट व मशिनरीचा रु.18 लाखाचा , बिल्डींगचा रु. 20 लाख असा होता ही बाब सुध्दा त.क.ने दाखल केलेल्या विमा पॉसिलीवरुन स्पष्ट होते. तसेच याबाबत सुध्दा वि.प.यांनी आपल्या उत्तरात कोणताही आक्षेप नोंदविला नसल्यामुळे वि.प.यांनी या पॉलिसी अंतर्गत विमा प्रिमियम स्विकारुन त.क.ला विमा संरक्षण दिले होते ही बाब स्पष्ट होते.
18. त.क.च्या कारखान्याला दि. 13.03.2009 व 14.03.2009 च्या मध्यरात्री अंदाजे सकाळी 3.00 वाजता आग लागली ही बाब उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते. तसेच त्याबाबत वि.प. 1 यांना सुध्दा काही आक्षेप नसल्याचे त्याच्या उत्तरावरुन स्पष्ट होते. त.क.ने दाखल केलेल्या पोलिस घटना स्थळ पंचनामावरुन (पान नं.118) त.क. यांच्या कारखान्याला आग लागली होती ही बाब स्पष्ट होते.
19. त.क. यांनी त्यांच्या कारखान्याला आग लागल्याची सूचना पोलिस अधिकारी यांना दिली होती ही बाब पोलिस घटना स्थळ पंचनामावरुन स्पष्ट होते. त.क. यांच्या नुसार एकूण नुकसान रुपये 66,54,797/-चे झाले होते व याबाबतची सूचना त्यांनी सुधारित क्लेम बिल द्वारे दि. 21.03.2009 ला वि.प. 1 यांना दिली ही बाब त.क.ने दाखल केलेल्या क्लेम फॉर्मवरुन ( पान नं. 114 व 115 ) स्पष्ट होते. वि.प. 1 यांनी त.क.चा सदर क्लेम अमान्य असल्याचे त्यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे. वि.प. 1 यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, त्यांनी वि.प. 2 यांना सर्व्हेअर म्हणून नियुक्त केले व त्यानुसार वि.प. 2 यांनी जे नुकसान निर्धारित केले त्यानुसार रुपये 37,03,068/- चे नुकसान रक्कम त.क.ला Full & Final Settlement म्हणून दिले. त्यामुळे आता त.क. हे जास्तीची रक्कम मागू शकत नसल्याचे वि.प.चे म्हणणे आहे. सदर प्रकरणात त.क. यांनी त्यांच्या सोबत वि.प.यांनी चुकिचे नुकसान निर्धारित केले व त्यांना अडचणीत आणून त्यांच्याकडून त.क. यांनी कमी रक्कम घेण्याकरिता भाग पाडले असे म्हटले आहे.
20. तक्रारकर्ता यांनी तक्रारीत स्पष्टपणे नमूद केले आहे की, वि.प. 2 यांनी त.क. यांना दि. 9.4.2009 रोजी जी-मेल द्वारे दस्ताऐवजाची मागणी केली. सदर दस्ताऐवज त.क. यांनी ( पान नं. 56 वर) दाखल केले आहे व वि.प. 2 च्या मागणीनुसार त.क.
यांनी दि. 2.6.2009, 8.6.2009 ला मागितलेले सर्व कागदपत्र वि.प. 1 व 2 ला दिल्याचे (पान नं. 58 ते 61) दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. याप्रकारचे दस्ताऐवज त.क. यांनी दिले नसल्याचे कोणतेही आक्षेप वि.प.यांनी सदर प्रकरणात घेतलेले नाही.
21. सदर प्रकरणामध्ये वि.प. 2 ने नुकसानीचे असेसमेंट करीत असतांना तीन वेळा असेसमेंट केल्याचे दिसते व तीन ही वेळा वेगवेगळे नुकसान निर्धारणा केली आहे परंतु त्याबाबतचा कोणताही स्पष्ट खुलासा वि.प.यांनी या प्रकरणात केलेला नाही.
22. पॉलिसी क्रं. 182302/11/2009/255 ही रुपये 10 लाखाची आहे. पॉलिसी क्रं. 182302/11/2009/253 चा रुपये 1 कोटीचा विमा घेतलेला होता. त्यामुळे त.क.ने स्टॉकच्या नुकसान क्लेम द्वारे रुपये 29,66,243/- एवढा केला. याबाबतचे दस्ताऐवज त.क.नी पान नं. 64 ते 75 वर दाखल केलेले आहे. सदर नुकसान निर्धारणा मध्ये आलेल्या तफावत मध्ये वि.प. 1 ने विशेष महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिलेले नाही. यावरुन या प्रकरणात त.क. विषयी नुकसान निर्धारण करीत असतांना वि.प.ने जाणूनबुजून (mischief) अयोग्य पध्दतीचा अवलंब केला असून योग्य नुकसान निर्धारण केले नाही ही बाब स्पष्ट होते. तसेच वि.प.ने under Insurance म्हणून 1.29℅ प्रमाणे रुपये 36,241/- कमी केले याबाबत सुध्दा योग्य ते स्पष्टीकरण दिले नाही.
23. त.क.च्या जळालेल्या तेलाचे मूल्य रुपये 10,11,328/- एवढे निर्धारण वि.प. 2 ने केले परंतु तेलाचा साठा पूर्णपणे जळाल्यावरही नुकसान निर्धारण करतांना तेलाचे नुकसान रुपये 9,68,549/- ची शिफारस केली. याकरिता जाणूनबुजून रुपये 42,779/- कमी केले हे स्पष्ट होते. याबाबत सुध्दा सर्व्हे रिपोर्टमध्ये कोणतेही कारण नमूद केले नसल्याचे मंचाच्या निदर्शनास येते. तसेच जळालेल्या ढेपचे मूल्य रुपये 63,000/- निर्धारण करुन वि.प. 2 ने जळालेल्या ढेपीची नुकसानीची शिफारस 60,375/- रुपये एवढीच केली. तर वि.प. 2 ने जळालेला माल सरकी, रुपये 16,49,700/-, बारदाना रु.56,230/- व कॉस्टीक सोडा रु.74,250/- असे एकूण रु.17,80,450/- वर विक्रेत्याला दिलेले व्हॅट 4℅ प्रमाणे रुपये 71,218/- याचे सुध्दा आकलन केले नाही. त.क.यांना सदर व्हॅट कायद्यानुसार रिफण्ड मिळू शकत नाही हे वि.प. 2 यांना माहित असतांना सुध्दा या मुद्दयाचा विचार केला नाही, ही बाब आश्चर्यकारक आहे. यानुसार वि.प. 2 ने त.क.च्या स्टॉकची हानी म्हणून रुपये 1,59,753/- ची शिफारस जाणूनबुजून कमी केले असे स्पष्ट होते.
24. तक्रारकर्त्याने पॉलिसी क्रं. 182302/11/2009/254 द्वारे फर्निचर फिक्चर रु.80,000/- , बिल्डींग रु.20 लक्ष व संयंत्र व यंत्र समुग्री व इलेक्ट्रीक इंस्टालेशन रु.18 लक्ष चा विमा घेतला होता. यामध्ये आर्किटेक्ट कडून पुनर्निमाणचा खर्च
रुपये 17,32,456/- चे असेसमेंट घेण्यात आले. वि.प. 2 ने पहिल्या व दुस-या असेसमेंट मध्ये रुपये 4,41,618/- चे असेसमेंट दिले. परंतु तिस-या असेसमेंट मध्ये रु.4,28,118/- चे निर्धारण केले. यामध्ये सुध्दा कां कमी करण्यात आले याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख वि.प. 2 यांनी त्याच्या असेसमेंट रिपोर्टमध्ये दिलेला नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे वि.प. 2 ने त्याच्या असेसमेंट रिपोर्टच्या 20.2 या परिच्छेद मध्ये श्री. डी.एस.भैसारे , आर्किटेक्ट इंजिनियर यांनी दिलेल्या व्हॅल्यूऐशन रिपोर्ट मध्ये दिलेल्या बिल्डींगच्या निर्धारणावर 54℅ घसारा (Deprecation) आकारल्याचे असेसमेंट रिपोर्टवरुन लक्षात येते. त्याबाबत सदर बिल्डींग ही 27 वर्ष जुनी होती हे कारण दिलेले आहे. परंतु श्री. डी.एस.भैसारे यांनी जे असेसमेंट दिले ते दि. 10.04.2009 च्या आधारे दिलेले असल्यामुळे परत त्यावर डिप्रेशन कसे आकारता येते याबाबत कोणताही स्पष्ट खुलासा दिलेला नाही. मंचाचे मते श्री. डी.एस.भैसारे, आर्किटेक्ट यांनी सदर बिल्डींगचे असेसमेंट वर्ष 2009 मध्ये असलेल्या स्थितीवरुन दिलेले आहे. त्यामुळे वर्ष 2009 मध्ये बिल्डींगची स्थिती व त्याचे निर्धारण आर्किटेक्टने केले आहे. सदर निर्धारण हे 27 वर्ष जुने नसून 2009 च्या स्थितीवर आधारित असतांना सदर बिल्डींगवर 54 % घसारा आकारणे व बिल्डींग 27 वर्ष जुनी आहे हे कारण देणे अनुचित असल्याचे मंचाचे मत आहे.
25. सदर प्रकरणामध्ये वि.प.यांनी त.क.ची कोंडी करण्याचा प्रयत्न केला व त.क.यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्र, चे कर्ज होते. याबाबतचा उल्लेख विमा पॉलिसीवर होता तरी देखील आगीच्या घटने पासून 7 महिने पर्यंत नुकसानीची योग्य आकारणी न करता तक्रारकर्त्यास त्याने दाखल केलेल्या दाव्या पेक्षा कमी रक्कम रुपये 37,03,068/- घेण्याकरिता त.क.ला भाग पाडले. याबाबत त.क.ने दि.14.08.2009 व 8.10.2009 च्या पत्राद्वारे विरोध (पान क्रं. 76 व 98) दर्शविला. त.क. यांनी दि. 14.8.2009 च्या पत्राद्वारे नुकसान निर्धारण कसे चुकीचे आहे ही बाब वि.प.क्रं. 1 व 2 च्या निदर्शनास आणून दिली. सदर पत्र वि.प.यांना प्राप्त होऊवूनही वि.प.यांनी त्याबाबत कोणताच खुलासा केला नाही ही वि.प.यांच्या सेवेतील त्रृटी आहे. हंगामाची वेळ जवळ असल्यामुळे त.क.ने मिळालेली रक्कम स्विकारली यात जरी काही वाद नसला तरी त.क.ला दिलेली रक्कम ही झालेल्या नुकसानी पेक्षा अत्यंत कमी आहे ही बाब स्पष्ट होते. त.क.ने दाखल केलेल्या पोलिस घटना स्थळ पंचनामावरुन ही बाब स्पष्ट होते की, संपूर्ण सरकीचे पोते जळालेले होते.सिड क्लिनर मशिन सुध्दा पूर्णतः जळालेली होती. (1) एलीवेटर-2, (2) सिड कन्व्हेयर-1, (3) ऑईल एक्सप्लेयर -3, (4) रिफाईन मशिन-1, (5) रिफाईन वरील प्लॅटफार्म, (6) ऑईल स्टोअर टँक (7) तेलाचे लोखंडी ड्रम भरलेले-8, (8)अंडर ग्राऊंड तेलाच्या टँक -5, (9) सिड स्टोअर प्लॅटफार्म -1, (10) इलेक्टीक इन्स्टोलेशन तसेच दोन्ही रुमच्या लोखंडी टीना एंगल आगीमुळे भिंती क्रॅक झाल्याचे घटना स्थळ पंचनाम्यावरुन दिसते. यावरुन आगीमुळे मोठया प्रमाणात हानी झाली होती व बिल्डींग संयंत्र , कच्चा व पक्का माल पूर्णतः जळालेला होता ही बाब स्पष्ट होते असे असतांना त.क.ला अडचणीत पकडून कमी रक्कम घेण्यास भाग पाडले हे सदर प्रकरणावरुन स्पष्ट होते. त्यामुळे वि.प. 1 यांनी घेतलेला बचाव आक्षेप की, त.क. यांनी Full & final settlement मंजूर केले होते ही बाब स्पष्ट होत नाही. जरी त.क. यांनी व्हाऊचरवर सहया केल्या असल्या तरी त्यापूर्वी त.क. यांनी अनेक पत्रा द्वारे वि.प.यांनी विमा दाव्याची मंजूर केलेली रक्कम नामंजूर असून त्यावर आक्षेप घेतल्याचे सदर प्रकरणात स्पष्ट होते.. त.क.ला अडचणीत पकडून त्याच्याकडून खोटी संमती वि.प.यांनी मिळविली असून त.क.यांना संमती पत्रावर सहया करण्यापूर्वी त.क.यांनी दिलेल्या पत्राचे कोणतेही उत्तर अथवा खुलासा न करता संभ्रमात्मक अवस्था निर्माण करुन त.क.यांचेकडून वि.प.यांनी fraudulently संमती घेतल्याचे सदर प्रकरणावरुन स्पष्ट होते. वि.प.यांनी त्यांनी त.क.यांच्याकडून स्वेच्छापूर्वक संमती प्राप्त केली ही बाब सिध्द केलेली नाही असे सदर प्रकरणावरुन स्पष्ट होते.
26. मंच याकरिता मा. सर्वोच्च न्यायालयाने United India Insurance Vs. Aimer Singh Cotton & Ors., II (1999) CPJ 10 (SC) = VI (1999) SLT 590 = (1996) 6 SCC 400, मधील खालील भाग या ठिकाणी नमूद करतात.
“The mere execution of discharge voucher
would not always deprive the consumer from
preferring claim with respect to the deficiency
in service or consequential benefits arising out
of the amount paid in default of the service
rendered. Despite execution of the discharges
voucher, the consumer may be in a position to
satisfy the Tribunal or the Commission under
the Act that such discharge voucher or receipt
had been obtained from him under the circumstances
which can be termed as fraudulent or exercise of
undue influence or by misrepresentation or the
like, If in a given case the consumer satisfies the
authority under the Act that the discharge voucher
was obtained by fraud, misrepresentation, undue
the influence or the like, coercive bargaining
compelled by circumstances, the authority
before whom the complaint is made would
be justified in granting appropriate relief " .
यावरुन जरी धोखाधडी करुन व्हॉऊचर वर सहया घेतल्या असल्या तरी विमा धारकास त्याची मागणी करण्याकरिता बंधन राहत नाही असे मंचाचे मत आहे. सदर प्रकरणामध्ये त.क. यांना वाढीव विमा राशी व झालेले नुकसान मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. कारण त.क. यांनी वि.प.यांना नुकसान निर्धारण चुकीचे केल्याचे व वारंवार नुकसान निर्धारणामध्ये फेरबदल केल्याचे अनेक पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले. त.क.नी दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन सुध्दा ही बाब स्पष्ट होते की, वि.प.2 यांनी तीन वेळा नुकसानीचे निर्धारण केले व तिन्ही वेळा वेगवेगळे निर्धारण केलेले आहे ही बाब दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. त्याबाबत सुध्दा त.क.यांनी वि.प.यांना पत्रे पाठविली व त्याचे पुरावे मंचासमक्ष दाखल केले आहे. वि.प.यांना सदर पत्रे प्राप्त होऊन सुध्दा त्यांनी त.क. यांना सदर पत्राच्या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण अथवा उत्तर दिल्याचे दिसत नाही व त्याकरिता कोणताही पुरावा वि.प.यांनी दाखल केला नाही. सदर प्रकरणात वि.प.1 ने उत्तर दाखल करीत असतांना त्याबाबत कोणतेचे सुस्पष्ट स्पष्टीकरण असे दिले नाही. यावरुन वि.प.यांच्याकडे सदर पत्राला कोणतेही न्यायोचित उत्तर नव्हते हे स्पष्ट होते.
27. सदर प्रकरणामध्ये वि.प. क्रं. 2 यानां मंचाची नोटीस पाठविली व त्यांनी दिलेल्या नुकसान निर्धारणा बाबत त्यांचे मत मागविले होते. परंतु नोटीस मिळून सुध्दा वि.प.क्रं. 2 मंचासमक्ष हजर झाले नाही परंतु त्यांनी मंचाला एक पत्र पाठविले व त्यामध्ये (पान क्रं. 169) वि.प. क्रं. 1 यांनी दिलेल्या सूचनेनुसार नुकसान निर्धारित केल्याचे म्हटले आहे व त्याचे कार्य फक्त असेसमेंटचे होते ऐवढे म्हटले आहे. वि.प. 2 यांनी दिलेल्या असेसमेंट मध्ये अनेक त्रृटी आहेत व विमा क्लेमची रक्कम कमी करण्या मागचे कारण स्पष्ट करण्याकरिता दि. 31.01.2012 च्या आदेशाद्वारे मंचाने नोटीस बजाविली. तक्रारीची प्रत व सदर आदेशाची प्रत वि.प. 2 यांना मिळून सुध्दा त्यांनी कोणती तसदी न घेता मंचास स्पष्टीकरणासह खुलासा सादर केला नाही. त.क.यांनी घेतलेले आक्षेप नाकारल्याबाबत सुध्दा कोणतीही सूचना वि.प.यांनी त.क.ला दिल्याचे कोणत्याही दस्ताऐवजावरुन स्पष्ट होत नाही. सदर प्रकरणामध्ये त.क.यांचे पत्र विचाराधीन ठेवून चुकीच्या व अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन ग्राहकाला/ त.क.ला कट करुन अडचणीत आणल्याचे सदर प्रकरणावरुन स्पष्ट निष्पन्न होते. सदर प्रकरणात त.क.यांना संभ्रमात ठेवून , fraudulently संमती घेतल्याचे स्पष्ट होते. तसेच सदर प्रकरणामध्ये वि.प.क्रं. 1 यांनी सर्व्हेअरचे प्रतिज्ञापत्र सुध्दा दाखल केले नाही. मा. राष्ट्रीय आयोगाच्या अनेक न्याय निवाडयावरुन ही बाब स्पष्ट आहे की, जर सर्व्हेअरचे प्रतिज्ञापत्र नसेल तर त्या सर्व्हेअरच्या रिपोर्टला पुरावा समजण्या योग्य नाही असे मत दिले आहे. सदर प्रकरणामध्ये वि.प.यांनी सदर प्रकरणामध्ये त.क. यांनी वि.प.यांना वारंवांर पत्र पाठवून त.क.चे नुकसान निर्धारणाबद्दल वारंवांर विनंती केली परंतु त्या विषयाकडे वि.प.यांनी जाणूनबुजून दुर्लश केल्याचे स्पष्ट होते. त.क. यांनी दि. 14.08.2009, 7.9.2009, 8.9.2009 व 8.10.2009 ला वि.प.यांना पत्र लिहिले व आपला आक्षेप नोंदविला. सदर पत्र वि.प.यांना मिळाल्याचे दस्ताऐवज त.क. यांनी दाखल केले. परंतु वि.प.यांनी कोणत्याही पत्राला सदभावनापूर्वक उत्तर दिले नाही व तसे कोणतेही दस्ताऐवज वि.प.यांच्या तर्फे दाखल झाले नाही. यावरुन वि.प.यांनी त.क. यांना दोषपूर्ण सेवा दिल्याचे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते.
28. त.क. यांनी त्याने दाखल केलेल्या क्लेमच्या संदर्भात तज्ञ आर्किटेक्ट कडून व सी.ए.कडून पत्र दिले ही बाब त.क.ने दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते व सदर प्रमाणपत्राचा उल्लेख वि.प. क्रं. 2 यांनी त्यांच्या असेसमेंट रिपोर्ट मध्ये सुध्दा केले आहे. परंतु सदर प्रमाणपत्र तज्ञ व त्रयस्थ व्यक्तिकडून असतांना सुध्दा ते नाकारण्या मागे कोणतेही न्यायोचित कारण वि.प.यांनी मंचासमक्ष दाखल केले नाही.तसेच वि.प.क्र. 2 यांनी वि.प. 1 यांना दिलेल्या असेसमेंट रिपोर्टमध्ये सुध्दा याबाबीचा स्पष्ट खुलासा दिलेला नाही. सदर प्रकरणामध्ये त.क.चे जरी नुकसान 66,54,797/- रुपयाचे झाले असे त.क. ने नमूद केले असले तरी त्यांना वास्तविक दस्ताऐवजाच्या आधारे त.क.यांना मिळालेल्या विमा पोटीचे रुपये 37,03,068/- व त्यानी दाखल केलेल्या दस्ताऐवजाच्या आधारे परत 18,88,543/- रुपयाची मागणी केली आहे असे एकूण 55,91,611/-रुपयाची मागणी केल्याचे दिसते. यापैकी 37,03,068/- रुपये तक्रारकर्ता यांना मिळाले आहे व त्यांनी वाढीव रक्कम 18,88,543/-रुपया करिता सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
29. सदर प्रकरणामध्ये स्टॉकच्या संदर्भात सर्व्हेअरचे प्रथम व दुसरे असेसमेंट तसेच वास्तविक झालेले नुकसान व त्यासंबंधी दिलेले दस्ताऐवज व वि.प.नी दिलेली क्लेमची कमी रक्कम याबाबतचे दस्ताऐवजाच्या आधारे मंचाने खालीलप्रमाणे तक्ता तयार केलेला आहे.
नुकसानीचा तक्ता | वास्तविक नुकसान झाले | क्लेम ची रक्कम दिली | क्लेम कमी दिलेली रक्कम |
1. Stock सर्व्हेयरचे प्रथम व दुसरे असेसमेंट 27,73,133.00 | 29,31,211.00 त्रयस्थ CA च्या Certificate प्रमाणे सर्व्हेयरनी घेतले | 27,66,243.00 | 1,64,986.00 |
2. इमारतला नुकसान (Building) | 7,32,456.00 त्रयस्थ आर्किटेक्ट कडून Surveyor ने घेतली | 4,28,118.00 | 1,84,616.00 |
3. यंत्र सामुग्री सर्व्हेयर चे प्रथम व दुसरे असेसमेंट 5,00,217.00 | 18,23,391.00 त्रयस्थ तज्ञांकडून Surveyor ने Certificate घेतले. | 4,88,807.00 | 13,34,584.00 |
4. जळलेला सर्व मलमा व सामान हटविणे (Debris) | 2,00,000.00 | | 2,00,000.00 |
5. Architect Fees | 7,000.00 | | 7,000.00 |
6. CA Fees | 2,500.00 | | 2,500.00 |
एकूण नुकसानी | 18,88,543.00 |
वरुन त.क. हा 18,88,543/- रुपये एवढी विमा राशी मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे स्पष्ट व प्रामाणिक मत आहे व त्याकरिता त.क. यांनी तक्रारी सोबत दस्ताऐवज सुध्दा दाखल केले आहे. त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, वि.प. क्र 1 यांनी त.क.यांना आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत रुपये 18,88,543/- एवढी रक्कम अदा करावी. जर ती 30 दिवसाच्या आत अदा न केल्यास त्यावर रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्याजसह रक्कम त.क.ला देय राहील.
वरील सर्व निष्कर्षाच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला सदर प्रकरणातील पॉलिसी क्रं. 182302/11/2009/255, 182302/11/2009/253, 182302/11/2009/254 च्या अनुषंगाने आदेश मिळाल्यापासून तक्रारकर्त्यास विमा नुकसानभरपाई पोटी विमा राशी 18,88,543/-रुपये 30 दिवसाच्या आत द्यावे. तदनंतर सदर रक्कमेवर रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्याजासह देय राहील.
3 विरुध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल व तक्रारीचा
खर्च म्हणून रुपये 5000/- द्यावे. सदर रक्कम आदेश पारित तारखेपासून 30
दिवसांच्या आत अदा करावी.