नि.15
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा. सदस्या - सौ वर्षा नं. शिंदे
मा.सदस्या - सौ मनिषा कुलकर्णी
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 22/2013
तक्रार नोंद तारीख : 11/03/2013
तक्रार दाखल तारीख : 20/03/2013
निकाल तारीख : 17/02/2014
----------------------------------------------
छाया आण्णासाहेब बंडगर
रा.नागोळे, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि.
तर्फे मॅनेजर अरुनाभ वर्धन
कृष्णा कमर्शियल कॉम्प्लेक्स,
अमराई रोड, सांगली ........ सामनेवाला
तक्रारदार तर्फे : अॅड श्री पी.एस.परीट
जाबदारतर्फे : अॅड श्री ए.बी.खेमलापुरे
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : सौ वर्षा नं. शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराचा न्याययोग्य पशुविमा दावा नाकारलेने दाखल करण्यात आली आहे. प्रस्तुत तक्रार अर्ज स्वीकृत करुन सामनेवाला यांना नोटीस आदेश झाला. सामनेवालांना नोटीस लागू झालेनंतर सामनेवाला हे वकीलांमार्फत मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदार व सामनेवाला यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी -
तक्रारदार या नागोळे येथील रहिवासी असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीस पूरक म्हणून दुग्धव्यवसाय करतात. त्यासाठी त्यांनी होस्टेन क्रॉस जातीची काळया पांढ-या रंगाची शिंगे नसलेली, शेपूटगोंडा पांढरी असलेली, किंमत रक्कम रु.25,000/- ची गाय खरेदी केलेली होती. सदर वर्णनाच्या गायीचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे विमा पॉलिसी नं. 181100/48/2008/2397 अन्वये उतरविलेला होता. नमूद गायीच्या कानात बिल्ला नं. ओआयसी/181100/एस.एन.जी./100803 असा मारला होता. विमा कालावधी दि.15/3/08 ते 14/3/11 असा तीन वर्षासाठी होता. नमूद गाय दि.16/11/10 रोजी पहाटे 5.00 वा. अचानक मयत झाली. त्याचदिवशी सामनेवाला कंपनीचे एजंट जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. यांना सदर बाब पत्राने कळवून क्लेम फॉर्मची मागणी केली. त्यानंतर त्याचदिवशी मयत गायीचे पोस्ट मॉर्टेम व पंचाचे समक्ष पंचनामा केला. योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करुन विमा कंपनीकडे विमादावा दाखल केला. बरेच हेलपाटे मारले, तदनंतर दि.21/9/11 रोजी क्लेम वेळेत सादर केला नाही, शवविच्छेदन करताना डॉक्टर फोटोत दिसत नाही, गायीच्या मृत्यूचे कारण नमूद नाही अशा खोटया मजकूराचे पत्र देवून विमा रक्कम देण्याचे नाकारले. तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सामनेवाला यांनी सेवात्रुटी केल्यामुळे प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल करावा लागला. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन गायीची विमा रक्क्म रु.25,000/- जाबदार कंपनीकडे हेलपाटे मारणे, फोन करणे व मानसिक त्रासासाठी रु.15,000/- अशी एकूण 400000 सामनेवालांकडून वसुल होवून मिळावेत अशी विनंती केलेली आहे.
3. आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारदाराने नि.2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे. तसेच नि.4 चे फेरिस्त अन्वये नि.4/1 ते 4/12 अन्वये पॉलिसी, कंपनीस दिलेले पत्र, कुरियरची पावती, क्लेम फॉर्म सोबत पाठविलेले पात्र, क्लेमफॉर्म, शवविच्छेदन अहवाल, सरपंचाचा दाखला, पोलिस पाटील दाखला, पंचनामा, शवविच्छेदनाची पावती आणि क्लेम नाकारलेचे पत्र दाखल केलेले आहे. तक्रारदाराने नि.12 वर पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
4. सामनेवाला यांनी नि. 11 वर लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार मान्य केले कथनाखेरिज परिच्छेदनिहाय नाकारली आहे. तक्रारदाराने त्याचे तक्रारअर्जातील कलम 3 मध्ये जी पॉलिसी नमूद केली आहे, त्या पॉलिसीनुसार गायीचा विमा उतरविलेला आहे. त्याबाबत वाद नसल्याचे त्याचे म्हणणेतील कलम 3 मध्ये कथन केले आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराने ब-याच बाबींची वस्तुस्थिती मे. मंचापासून दडवून ठेवलेली आहे. नमूद तक्रारीस मुदतीची बाधा येते. वस्तुतः तक्रारदारास हे माहित होते की, कोणताही विमादावा हा योग्य त्या प्रक्रियेचा अवलंब करुन जायका इन्शुरन्स ब्रोकर मार्फत सामनेवालांकडे पाठवायचा होता. मात्र तक्रारदाराने तसे केले नाही. तसेच तक्रारदाराने टॅगही दिलेला नाही. तक्रारदाराने नमूद सामनेवालांकडे अथवा जायका इन्शुरन्स ब्रोकरेज कडे क्ल्ेम मागणीबाबत दावा दाखल केला याबाबत कोणताही पुरावा नाही. तक्रारदाराच्या क्लेममध्ये त्रुटी आहेत. जर जनावर दि.16/11/10 ला मेले असेल तर त्याला पुरलेबाबतची पावती मात्र दि.16/2/11 ची आहे, म्हणजे जवळजवळ 3 महिन्यानंतरची ती पावती आहे. तसेच मयत गायीचे शवविच्छेदन बाबत तक्रारदाराने जो फोटो दाखल केला आहे, त्यामध्ये शवविच्छेदन केल्याचे दिसून येत नाही. शवविच्छेदन अहवालामध्ये किंवा क्लेम फॉर्ममध्ये गाय कोणत्या रोगाने मेली याचा उल्लेख नाही. प्रस्तुत तक्रारदाराचा नमूद विमाक्लेम genuine नसल्यामुळेच जायका इन्शुरन्स ब्रोकरेज व नमूद विमा कंपनीने क्लेम नाकारला आहे. तक्रारदारानेच नमूद पॉलिसीच्या अटींचा भंग केलेला आहे. त्यामुळेच योग्य त्या कारणावरच नमूद दावा नाकारुन सामनेवालाने कोणतीही सेवात्रुटी केली नसल्याने प्रस्तुतची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केलेली आहे.
5. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेचे पुष्ठयर्थ नमूद म्हणणेवरच शपथपत्र दाखल केले आहे व स्वतंत्ररित्या शपथपत्र दाखल केलेले नाही. तसेच पुराव्याचे शपथपत्र दिलेले नाही. तसेच म्हणण्याचे पुष्ठयर्थ कोणतीही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे म्हणणे व उभय पक्षांचे वकीलांचा युक्तिवाद यांचा विचार करता सदर प्रकरणात खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हा ग्राहक आहे काय ? होय.
2. प्रस्तुत तक्रारीस मुदतीचा बाध येतो का ? नाही.
3. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देणेमध्ये त्रुटी
केली आहे काय ? होय.
4. तक्रारदार विमा रक्कम तसेच अन्य मागणी केलेल्या रकमा
मिळणेस पात्र आहेत काय ? होय. अंशतः
5. अंतिम आदेश शेवटी दिलेप्रमाणे.
:- कारणे -:
मुद्दा क्र.1
7. नि.4/1 वर तक्रारदाराने पॉलिसी दाखल केलेली आहे. सदर पॉलिसीचा नंबर एसएनजी/ 100803 आहे. प्रस्तुत पॉलिसी तक्रारदाराचे नावे असून ती पशुविमा पॉलिसी आहे. सदर पॉलिसी ही गायीची असून तिच्या कानातील बिल्ला नं. ओआयसी/181100/एसएनजी/100803 असा आहे. तसेच सदर गाय दुभती असलेचे व तिचे वय 5 वर्षे असलेचे नमूद केले आहे. तसेच सदर गाय काळया पांढ-या रंगाची, डोक्यावर ठिपका असणारी, शेपूट गोंडा पांढरा व शिंगे नसलेली असे वर्णन नमूद आहे. तसेच तिचे दुसरे वेत झालेचेही नमूद केले आहे. नमूद गायीची बाजारी किंमत रु.25,000/- व विमा संरक्षणाची रक्कम रु.25,000/- आहे. नमूद पॉलिसी दि.15/3/08 रोजी उतरल्याचे दिसून येते. सबब तक्रारदार हा सामनेवालाचा विमाधारक असल्याने ग्राहक आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.2
8. सामनेवाला यांनी दि.21/9/11 रोजी क्लेम नाकारलेला आहे तर प्रस्तुतची तक्रार दि.11/3/13 रोजी दाखल केलेली आहे. सबब तक्रारीस क्लेम नाकारले तारखेपासून कारण घडलेले आहे. ग्राहक संरक्षण कायदा कलम 24 अ नुसार तक्रारीस कारण घडल्यापासून दोन वर्षाचे आत प्रस्तुतची तक्रार दाखल केली असल्याने या तक्रारीस मुदतीचा बाध येत नाही. त्यामुळे सामनेवालाचा सदरचा आक्षेप हे मंच फेटाळत आहे व प्रस्तुतची तक्रार मुदतीत आहे व ती चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.3 व 4
9. सदर गाय दि.16/11/10 रोजी मयत झाल्याचे सामनेवालांचे नागपूर शाखेस कळवून क्लेम फॉर्मची मागणी केलेचे नि.4/2 वरील पत्रावरुन स्पष्ट होते. सदर पत्र पाठविलेचे व ते पोचल्याचे अनुक्रमे नि.4/3 व 4/4 चे कुरियरची पावती व त्याची पोहोच वरुन स्पष्ट होते. तक्रारदाराने नि.4/6 वर दाखल केलेल्या पशुविमा दावा अर्जावरील गायीचे वर्णन हे पॉलिसीतील वर्णनाबरहुकूम आहे. तसेच सदर गाय मयत झाली त्यावेळेला गायीचे वय 7 वर्षे आहे ही वस्तुस्थिती सत्य आहे कारण सन 2008 मध्ये पॉलिसी उतरविली त्यावेळी गायीचे वय 5 वर्षे नमूद केलेले आहे व ती मेली त्यावेळी ती 7 वर्षाची होती ही वस्तुस्थिती दाखल पुराव्यावरुन निर्विवाद आहे. नि.4/7 वर दाखल असणा-या शवविच्छेदन अहवालामध्ये सुध्दा गायीचे वर्णन तसेच गाय ज्या कारणाने मेली त्याचीही नोंद केलेली आहे. नमूद मयत गायीचे शवविच्छेदन दि.16/11/10 रोजी सकाळी 12.30 वा ते 1.00 वा या कालावधीत केलेचे दिसून येते. तसेच पॉलिसीमध्ये दावा अर्जामध्ये शवविच्छेदन अहवाल व नि.4/8 वर सरपंचाचा दाखला, नि.4/9 वरील पोलिस पाटलांचा दाखला, नि. 4/10 वरील पंचनामा या कागदपत्रांमधील गायीचे वर्णन व गायीच्या कानात असलेला बिल्ला ओआयसी 181100/एसएनजी 100803 व पॉलिसीमधील वर्णन एकच असल्याची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. नमूद गाय मयत झालेनंतर गट नं.677 मध्ये ती चिरफाड करुन पुरलेली आहे. नमूद गायीचे शवविच्छेदन डॉ एच.डी.देवकर यांनी केलेचे निदर्शनास येते.
10. दाखल पुराव्यांवरुन ज्या वर्णनाच्या गायीची पॉलिसी उतरविलेली होती तीच गाय मयत झालेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराने दाखल केलेले नि.4/11 वरील शवविच्छेदनाच्या पावतीबाबत आक्षेप घेतलेला आहे. सदर पावती दि.16/2/11 ची आहे. मात्र सदर पावतीवर नमूद गाय मयत झालेचे तारीख ही दि.16/11/10 अशीच नोंद केलेली आहे. यावरुन असे म्हणता येणार नाही की, पावती उशिरा घेतली म्हणजे ती गाय मेलीच नाही अथवा तिचे शवविच्छेदन झालेलेच नाही अथवा तिची विल्हेवाट लावली नाही. यावरुन ज्या गायीचा विमा उतरविला तीच गाय मयत झाली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
11. सामनेवाला यांनी प्रस्तुत तक्रार मुदतीत नसलेबाबतचाही आक्षेप घेतलेला आहे. तक्रारदाराने नि.4/12 वर दाखल केलेले सामनेवाला इन्शुरन्स कंपनीचे क्लेम नाकारलेचे पत्र दि.21/9/2011 रोजीचे आहे. सदर पत्रानुसार नमूद गाय मयत झालेनंतर सामनेवाला कंपनीस किंवा जायका इन्शुरन्स ब्रोकरेजला दाव्याची सूचना दिली नसल्याचे नमूद केले आहे. तसेच मयत गायीच्या मृत्यूनंतर साडेनऊ महिन्यांनी क्लेम व कागदपत्रे पाठविलेली आहे विलंबाबत कोणताही स्पष्ट लेखी खुलासा दिलेला नाही. तसेच क्लेमफॉर्मच्या सत्यप्रतीचा वापर केलेला आहे. तसेच जनावराचा मयताचा मूळ दाखला न देता त्याची सत्यप्रत दिलेली आहे. जनावर दि.6/11/10 ला मयत झालेले आहे मात्र शवविच्छेदन पावती ही दि.16/2/11 ची आहे. शवविच्छेदनाच्या फोटोग्राफमध्ये मयत गायीच्या शवविच्छेदन केलेच्या खुणा दिसून येत नाहीत तसेच फोटोत डॉक्टरसुध्दा दिसून येत नाहीत गायीच्या मृत्यूचे कारण क्लेमफॉर्म व मृत्यू प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेले नाही. या कारणास्तव क्लेम नाकारलेला आहे.
12. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता, दि.16/11/10 रोजीच नमूद सामनेवाला विमा कंपनीस गाय मयत झाल्याची लेखी सूचना दिल्याचे व क्लेम फॉर्मची मागणी केलेचे नि.4/2 4/3 व 4/4 वरील कागदपत्रांनुसार निर्विवाद आहे. सबब सामनेवालांचा सदरचा आक्षेप हे मंच फेटाळत आहे.
13. प्रस्तुत प्रकरणातील सर्व कागदतप्रे ही दि.16/11/10 ची असून केवळ शवविच्छेदनाची पावती ही दि.16/2/11 रोजीची आहे. यावरुन प्रस्तुतचा क्लेम हा दि.16/2/11 रोजी दिलेला आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सामनेवालांनी नि.21/9/11 रोजी क्लेम नाकारलेला आहे. यावरुन सदर कागदपत्रे तत्पूर्वी सामनेवाला यांना प्राप्त झालेली आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. नमूद अर्जात नमूद गायीच्या कानात असलेला बिल्ला मिळालेला नाही असे कुठेही नमूद केलेले नाही. यावरुन तक्रारदाराने नमूद क्लेम सोबत हा बिल्ला पाठवून दिलेला आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी त्यांचे म्हणणेतील कलम 10 मध्ये टॅग मिळाला नसलेचा आक्षेप हे मंच ग्राहय धरु शकत नाही. तसेच शवविच्छेदन अहवालामध्ये Disease suspected and Disease confirmed in P.M. - Tymphalis अशी नोंद आहे तसेच सदर शवविच्छेदनामधील क्लॉज 22 मध्येही त्याची नोंद आहे. सामनेवालांच्या मताप्रमाणे ब्रोकरेज कंपनीमार्फत क्लेम पाठविणे अपेक्षित असले तरी येनकेनप्रकारे सामनेवालपर्यंत प्रस्तेुत क्लेम व त्याची कागदपत्रे पोचलेली आहे हे नि.4/5 वरील पत्रानुसार निर्विवाद आहे. या वस्तुस्थितीकडे या मंचास दुर्लक्ष करता येणार नाही.
14. सर्वसामान्य शेतकरीवर्ग हा आर्थिकदृष्टया मागासलेला आहे. शेतीव्यवसायाला पूरक म्हणून हा वर्ग पशुपालनाचा व्यवसाय करीत असतो. त्याच्याजवळ असणारे पशुधन ही त्याची अमूल्य संपत्ती असते. सदर गाय अगर म्हैशीचा अचानक मृत्यू झाल्यास संबंधीत शेतक-याला आर्थिक अरिष्टाला तोंड द्यावे लागते व त्याला आर्थिक नुकसान सोसावे लागते. अशा अचानक होणा-या आर्थिक अरिष्ट व नुकसानी संरक्षणासाठीच नमूद पशुधन विमायोजना राबविली जाते.
15. तक्रारदाराचे नमूद गायीचा विमा नव्हताच, सदर गाय मयत झाली नाही किंवा त्याने खोटा विमादावा दाखल केलेला आहे, खोटी कागदपत्रे दिलेली आहेत किंवा तक्रारदाराने सामनेवालाकडून पैसे उकळण्याच्या गैरहेतूने तक्रार दाखल केली आहे, अशी तक्रारदाराच्या हेतूबाबत शंका निर्माण होण्यासारखी वस्तुस्थिती या मंचास दिसून येत नाही. विमाक्लेम बाबतची आवश्यक पूर्तता तक्रारदाराने केलेली आहे परंतु त्याचा विमादावा खोटा आहे अथवा त्याची विमादाव्याची मागणी ही कोणत्याही गैरहेतूने प्रेरीत आहे असे म्हणता येणार नाही.
वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता अशी वस्तुस्थिती असतानाही, केवळ तांत्रिक कारणास्तव सामनेवालाने न्याययोग्य क्लेम नाकारुन सेवा त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.4 व 5
16. युक्तिवादाच्या वेळेस तक्रारदाराच्या वकीलांनी प्रचलित पूर्वाधाराआधारे व्याजरकमेची मागणी केली. त्यास सामनेवालांचे विधिज्ञ अॅड खेमलापुरे यांनी हरकत घेतली आहे. मूळ तक्रारअर्जात तक्रारदाराने व्याजाची मागणी केलेली नाही तसेच तक्रारदाराकडूनही दफतरी दिरंगाई झालेली आहे. तसेच तक्रारदाराच्या वकीलांनी नमूद व्याजाची मागणी सोडून देत असलेबाबत केलेले प्रतिपादनाची न्यायीक नोंद या मंचाने घेतली आहे. सबब प्रस्तुत प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदार व्याज मिळणेस पात्र नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. नमूद पशुविमा योजनेचा मूळ हेतू लक्षात घेता व नैसर्गिक न्यायतत्वाचा (Principle of natural justice) विचार करता तक्रारदार हा विम्याची रक्कम रु.25,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेच झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.7,000/- मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये 25,000/- (अक्षरी रुपये
पंचवीस हजार माञ) अदा करावेत.
3. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी मानसिक त्रास इ.पोटी रुपये 7,000/- (अक्षरी रुपये
सात हजार माञ) अदा करावेत.
4. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत
करणेची आहे.
5. सामनेवाला यांनी विहीत वरील आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तक्रारदारास ग्राहक
संरक्षण कायदयातील कलम 25 किंवा 27 खाली प्रकरण दाखल करण्याची मुभा राहील.
सांगली
दि. 17/02/2014
( सौ मनिषा कुलकर्णी ) (सौ वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या सदस्या अध्यक्ष