जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –169/2010 तक्रार दाखल तारीख –06/12/2010
रमेश पि.आसाराम कासट
वय 49 वर्षे धंदा व्यापार .तक्रारदार
रा.व्यंकटेशन निवास गजानन मंदिर रोड,
माजलगांव ता.माजलगांव जि.बीड
विरुध्द
ओरिएटंल इश्युरन्स कंपनी लि.
मार्फत शाखाधिकारी .सामनेवाला
शाखा शांताई हॉटेल समोर,जालना रोड
बीड ता.जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.बी.एस.जाजू.
सामनेवाला तर्फे :- अँड.ए.पी.कूलकर्णी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार यांने सामनेवाला यांचेकडून सन 2008-09 या चालू वर्षासाठी मेडीक्लेम विमापत्र नंबर 161904/48/2009/1371 घेतले आहे. यापूर्वी तक्रारदारांनी नियमित विमापत्रे घेतली होती.
सदरचे विमापत्राप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदार,त्यांची पत्नी, मूलगा यांचा विमा घेतलेला आहे. विमा पत्रातील शर्ती व अटी नुसार विम्याची रक्कम तक्रारदारांना त्वरीत देणे ही कायदेशीर जबाबदारी सामनेवालेवर आहे.
माहे 2009 मध्ये तक्रारदाराच्या पत्नीची प्रकृती अचानक ढासळल्यामुळे तिला तक्रारदाराने वैद्यकीय इलाजासाठी माणिक हॉस्पीटल, औरंगाबाद येथे शरीक केले असता तिचेवर उपचार करण्यात आले. उपचारासाठी बराच खर्च आला परंतु प्रकृतीत सुधारणा झाली नाही.दि.10.02.2009 रोजी पासून दि.6.3.2009 पर्यत उपचार करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी पत्नी वाचण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे तिला घेऊन जावे व माजलगांव येथील डॉक्टराकडून वैद्यकीय इलाज करुन घ्यावा असा सल्ला तक्रारदारांना दिला. त्याप्रमाणे तक्रारदारांनी माजलगांव येथील रुद्रवार हॉस्पीटल मध्ये उपचार केले परंतु शेवटी दि.09.03.2009 रोजी तिचे दुखद निधन झाले.
तक्रारदाराला माणिक हॉस्पीटल औरंगाबाद व रुद्रवार हॉस्पीटल माजलगांव येथील वैद्यकीय औषधीसाठी,हॉस्पीटल बिलासाठी, तपासणीसाठी असा एकूण रु.1,03,000/- खर्च आला. उपचाराची सर्व कागदपत्रे खर्चाचे बिले विमा रक्कम मिळण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज सामनेवालाकडे दिला परंतु सामनेवाला यांनी रक्कम दिली नाही. विनाकारण रक्कम देण्यास कसूर केला. रक्कमेच्या वापरापासुन वंचित केले. सामनेवाला यांचे कृत्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक व मानसिक पिळवणूक केली. या सदराखाली रक्कम रु.10,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. मेडीक्लेम जास्तीत जास्त तिन महिन्याचे आंत मंजूर करणे गरजेचे होते. सामनेवाला यांनी तक्रारदारास योग्य सेवा देण्यास कसूर केला. तक्रारदार खालील प्रमाणे रक्कमेची मागणी करीत आहे.
अ) मेडीक्लेम ची रक्कम रु.1,00,000/-
ब) आर्थिक व मानसिक त्रास रु.10,000/-
क) रक्कम रु.1,00,000/- वर दि.09.6.2009
ते 23.11.2010 या कालावधीचे द.सा.द.शे
18 टक्के प्रमाणे व्याज. रु.26,170/-
------------------------------------
एकूण रु.1,36,170/-
-------------------------------------
विनंती की, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे रक्कम रु.1,36,170/- मिळण्याबाबत आदेश व्हावेत. त्यावर द.सा.द.शे 18 टक्के प्रमाणे व्याज देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा दि.28.03.2011रोजी नि.11 द्वारे दाखल केला आहे. खुलाशात सामनेवाला यांनी तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. विमा पत्र व त्यांचा कालावधी मान्य आहे. तक्रारदारांना विमापत्रातील अटी व शर्ती मान्य आहेत. सदरच्या विमापत्राचा दावा तपासणे हा Raksha Third Party Administrator यांचेकडून सेटर करण्यात येईल Administrator यांनी दावा स्विकारावा किंवा सदरचा दावा विमापत्रातील शर्ती व अटीनुसार तो नाकारावा. Raksha Third Party Administrator यांनी दाव्याच्या गुणवतेचा आणि पुर्वीच्या आजाराच्या बाबत निर्णय घ्यावा. तक्रारदारांनी Raksha Third Party Administrator म्हणून रक्षा प्रा.लि. यांनी स्विकारला आहे. त्यांना तक्रारीत पार्टी केलेले नाही.त्यामुळे आवश्यक ती पार्टी न केल्याचे तत्वाने तक्रार रदद करावी.
दि.10.04.2009 रोजी तक्रारदारांनी त्यांची पत्नी किरणच्या मृत्यूची सूचना दिली आणि सामनेवाला यांचे कार्यालयात दावा अर्ज दाखल केला. सदरचा अर्ज हा Raksha Third Party Administrator कडे ताबडतोब पाठविण्यात आला. त्यांनी दाव्याची तपासणी केली त्यात त्यांना आढळून आले की,तक्रारदारांनी उपचाराचे पेपर्स उदा. केस पेपर, नर्सिग शिट, ट्रीटमेंट चार्ट इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. त्यामुळे त्यांनी दि.08.07.2009 रोजी तक्रारदारांना पत्र दिले. सदरचे कागदपत्राची मागणी केली. सदरचे पत्र तक्रारदारांना मिळाले परंतु त्यांनी त्या कॉपीज दिल्या नाहीत.
दि.06.10.2009 रोजी Raksha Third Party Administrator यांना पत्र देऊन कागदपत्राची मागणी केली. परंतु तक्रारदारांनी पूर्तता केली नाही.दि.11.03.2010 रोजी पून्हा प्रथम स्मरणपत्र तक्रारदारांना देण्यात येऊन कागदपत्र देण्या बाबतविनंती करण्यात आली. तक्रारदारांना पत्र मिळाले परंतु पूर्तता केली नाही. म्हणून सामनेवाला Raksha Third Party Administrator यांना दावा फाईल बंद करण्याशिवाय दूसरा पर्याय नव्हता. शेवटी दि.23.03.2010 रोजी Raksha Third Party Administrator यांनी तक्रारदारांना पत्र देऊन सुचना केले की, त्याचा दावा फाईल बंद करण्यात येत आहे. तक्रारदार ग्राहक या संज्ञेत येत नाहीत. सामनेवाला यांचे सेवेत कसूर नाही. तक्रार खोटी आहे. तक्रारदाराना तक्रार करण्यास कोणतेही कारण घडले नाही. तक्रार मुदतबाहय आहे व ती खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा,शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.जाजू व सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.ए.पी.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केलेल्या नंबरचे मेडीक्लेम विमापत्र स्वतःसाठी पत्नीसाठी व मूलासाठी घेतलेले आहे.
फ्रेबूवारी 2009 मध्ये तक्रारदाराच्या पतभ्नीची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना वैद्यकीय इलाजासाठी माणिक हॉस्पीटल औरंगाबाद येथेदि.10.02.2009 ते 06.03.2009 पर्यत भरती करण्यात आले. सुधारणा न झाल्याने डॉक्टराचे सल्ल्यावरुन माजलगांव येथील डॉ.रुद्रवार हॉस्पीटल मध्ये त्यांना भरती करण्यात आले परंतु उपचाराला यश न येता शेवटी दि.09.03.2009 रोजी तक्रारदाराच्या पत्नीचे निधन झाले.
या बाबतचा प्रस्ताव तक्रारदारांनी सामनेवालाकडे दाखल केलेला आहे. त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे दाखल केल्याचे तक्रारदाराचे विधान आहे.
या संदर्भात सामनेवाला यांनी तक्रारदाराचा प्रस्ताव अर्ज आल्यानंतर विमापत्रातील शर्ती व अटीनुसार सदरचा दावा तक्रारदाराच्या सहमतीने नेमून दिलेल्या Raksha Third Party Administrator कडे दाव्यातील कागदपत्र तपासणीसाठी पाठविण्यात आले परंतु सदर दाव्या सोबत कागदपत्र पूरेशी नसल्याकारणाने संबंधीत Raksha Third Party Administrator यांनी तक्रारदारांना कागदपत्र मागणीसाठी खुलाशात नमूद केल्याप्रमाणे पत्र दिलेले आहे. स्मरणपत्रे दिलेली आहेत. तथापि, त्यांची पूर्तता तक्रारदाराकडून न झाल्याने सदरचा दावा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तक्रारीसंबंधी तक्रारदारांनी केवळ विमापत्र दाखल केलेले आहे. विमा प्रस्ताव अर्ज व त्यासंबंधीचे कागदपत्र संदर्भात कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. विमा कंपनीकडे कागदपत्र दाखल केल्यानंतर पून्हा Raksha Third Party Administrator कडे कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही असे यूक्तीवादाचे वेळी विधान तक्रारदाराकडून करण्यात आले परंतु दावा अर्ज कागदपत्र मिळाल्यानंतर Raksha Third Party Administrator ने त्यांची तपासणी करुन त्यात अपूर्ण असलेल्या कागदपत्राची मागणी केली आहे. त्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी तक्रारदाराची आहे. त्या पूर्तते बाबत तक्रारदाराचा कोणताही पूरावा नाही. त्यामुळे तक्रारदाराचे वरील म्हणणे याठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही. त्यामुळे दावा रक्कम न देऊन सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब कूठेही स्पष्ट होत नाही. याउलट तक्रारदारानी कागदपत्र मागणी प्रमाणे पुर्तता केली नाही. दावा बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात तक्रारदार हे स्वतःच रक्कम न मिळण्यासाठी जबाबदार असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदाराचा दावा सामनेवाला यांनी योग्य रितीने बंद केलेला असलयाने तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे रक्कम देणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड