(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागिरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक– 10 मार्च, 2021)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 क्षेत्रीय कार्यालय, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नागपूर आणि इतर दोन यांचे विरुध्द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्याच्या आईचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून, त्याची आई नामे श्रीमती लता ओमप्रकाश पेटकुले ही व्यवसायाने शेतकरी होती व तिचे मालकीची शेत जमिन ही मौजा-मोरगाव, पोस्ट-सालेभाटा, तालुका-लाखनी, जिल्हा- भंडारा येथे भुमापन क्रं -115/1 या वर्णनाची होती व सदर शेतीचे उत्पन्नावर कुटूंबाचे पालनपोषण ती करीत होती.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 अनुक्रमे विमा कंपनी आणि विमा सल्लागार कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, लाखनी, जिल्हा भंडारा असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्याचे आईचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे काढण्यात आला असल्याने तो आईचे अपघाती मृत्यू नंतर मुलगा या नात्याने विमा योजने मध्ये “लाभार्थी” आहे. तक्रारकर्त्याची आई दिनांक-23.08.2018 रोजी बकरीचे गोठयात झाडझुड करताना विद्दुत तांराचा स्पर्श झाल्याने विद्दुत धक्क्याने तिचा मृत्यू झाला होता. त्याचे आईचे मृत्यू नंतर त्याने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी लाखनी, तालुका-लाखनी, जिल्हा- भंडारा यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्ताव दिनांक-25.10.2018 रोजी दाखल केला होता.विरुध्दपक्षाने ज्या दस्ताऐवजाची मागणी केली त्या दस्ताऐवजांची पुर्तता त्याने केली होती.
त्याने पुढे नमुद केले आहे की, त्याची आई शेतकरी असल्या बाबतचे तसेच तिचे अपघाती मृत्यू संबधात सर्व दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे दाखल केल्या नंतरही त्यांनी विहित मुदतीत विमा दावा मंजूर केला नाही आणि विमा दावा विनाकारण प्रलंबित ठेवला. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला विमा दाव्याची रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने विमा दाव्यावर आज पर्यंत निर्णय घेतला नाही त्यामुळे त्याचे विमा दावा रकमेचे आणि व्याजाचे नुकसान होत आहे. ज्या उद्देश्याने शासनाने मृतक शेतक-याचे वारसदारांसाठी ही योजना सुरु केली, त्या उद्देश्यालाच विरुध्दपक्ष तडा देत आहेत. अशाप्रकारे विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दावा प्रलंबित ठेऊन त्याला दोषपूर्ण सेवा दिलेली असून, त्यामुळे त्याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्षां विरुध्द जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा कडून विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- विमा दावा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-25.10.2018 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह मिळावी तसेच त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 50,000/- आणि तक्रार खर्च रुपये-20,000/- अशा रकमांची मागणी विरुध्दपक्षा विरुध्द केलेली आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नागपूर तर्फे वरिष्ठ मंडलीय प्रबंधक यांनी लेखी उत्तर अभिलेखावर पान क्रं 64 ते 66 वर दाखल केले. त्यांनी तक्रारकर्त्याचे आईचे मालकीची शेती होती ही बाब नामंजूर केली. तक्रारकर्ता हा मृतक श्रीमती लता ओमप्रकाश पेटकुले हिचा कायदेशीर वारसदार असल्या बाबत कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाहीत. तक्रारकर्त्याचे आईचा अपघाती मृत्यू दिनांक-23.08.2018 रोजी झाला होता ही बाब मान्य केली. तक्रारकर्त्याने ईतर वारसदारांची नावे व त्यांचे ना-हरकत-प्रमाणपत्र विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिलेले नाही. तक्रारकर्त्याच्या चुकीमुळे सदर विमा दावा निकाली निघू शकला नाही. तक्रारकर्त्याची आई मोलमजूरी व बक-या सांभाळण्याचे कार्य करीत होती, ती शेतकरी नव्हती, त्यामुळे तिचा विमा काढण्यात आलेला नव्हता. तक्रारकर्त्याने तक्रारी मध्ये अवास्तव नुकसान भरपाईच्या रकमा मागितलेल्या आहेत. तक्रारकर्त्याचा विमा दावा फेटाळल्या गेला किंवा नाही याची शहानिशा करुनच त्याने न्यायालया समोर दावा दाखल करावयाचा होता परंतु तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नसताना प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे, जी अपरिपक्व आहे. त्यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारी मधून केलेले आरोप नामंजूर करण्यात येतात. सबब तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपले लेखी उत्तर पान क्रं 58 व 59 वर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये ते फक्त विमा कंपनी आणि महाराष्ट्र शासन यांचे वतीने मध्यस्थ म्हणून कार्य करतात. विमा दावा मंजूर करणे वा नामंजूर करणे ही बाब विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे अधिकारातील बाब आहे, त्याचेशी विरुध्दपक्ष क्रं 2 चा कोणताही संबध नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचेकडे विमा दावा प्रस्ताव दिनांक-03.11.2018 रोजी सादर केला होता. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फतीने त्यांना विमा दावा दिनांक-23.11.2018 रोजी प्राप्त झाला होता व त्यांनी तो विमा दावा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे दिनांक-08.03.2019 रोजी सादर केला होता. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे सदर विमा दावा प्रस्ताव अद्दाप पर्यंत प्रलंबित आहे. त्यांनी विहित मुदतीत विमा दाव्या संबधी कार्यवाही केली. त्यांनी असल्याने तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही, त्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
05. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, लाखनी, जिल्हा यांनी आपले लेखी उत्तर पान क्रं 61 व 62 वर दाखल केले. त्यांनी तक्रारकर्त्याची मृतक आई श्रीमती लता ओमप्रकाश पेटकुले ही शेतकरी होती व तिचा बकरीच्या गोठयात झाडझुड करताना विद्दुत तारांचा स्पर्श होऊन विजेच्या धक्क्यामुळे दिनांक-23.08.2018 रोजी मृत्यू झाला होता. तिचे अपघाती मृत्यू संबधाने विमा दावा त्यांचे कार्यालयात दिनांक-30.10.2018 रोजी दाखल केला होता. त्यांनी विमा दाव्यातील त्रृटींची पुर्तता करुन सदर विमा दावा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-01.11.2018 रोजी सादर केला होता. विमा दावा मंजूर करणे वा नामंजूर करणे ही बाब त्यांचे अधिकारातील नाही. त्यांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने विहित मुदतीत केलेले असल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
06. तक्रारकर्त्याने तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं- 10 नुसार एकूण-07 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. पृष्ट क्रं- 67 व 68 वर त्याने शपथेवरील पुरावा दाखल केला असून, पृष्ट क्रं-69 व 70 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
07. विरुध्दपक्ष क्रं- 1 विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर अभिलेखावरील पान क्रं 64 ते 66 वर दाखल केले. पान क्रं 71 वर पुरसिस दाखल करुन लेखी उत्तरालाच पुराव्याचे शपथपत्र समजावे असे कळविले. तसेच पान क्रं 72 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. विरुध्दपक्ष क्रं 2 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपले लेखी उत्तर पान क्रं 58 व 59 वर दाखल केले. तर विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, लाखनी, जिल्हा भंडारा यांनी आपले लेखी उत्तर पान क्रं 60 ते 62 वर दाखल केले.
08. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र आणि त्याने दाखल केलेले दस्तऐवज तसेच विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनी तर्फे दाखल लेखी उत्तर तसेच विरुध्दपक्ष क्रं-2 आणि विरुध्दपक्ष क्रं 3 यांचे लेखी उत्तर इत्यादीचे जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री उदय क्षिरसागर यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती निला नशिने यांचा मौखीक युक्तीवाद ऐकला, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्या | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा ग्राहक होतो काय? | -होय- |
2 | वि.प क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा विहित मुदतीत निर्णय न घेता प्रलंबित ठेऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
3 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: निष्कर्ष ::
मुद्दा क्रं 1 बाबत
09. तक्रारकर्त्याची आई नामे श्रीमती लता ओमप्रकाश पेटकुले हिचे नावाने मौजा मोरगाव, तहसिल लाखनी, जिल्हा भंडारा येथे गट क्रमांक-115/1 शेती होती व तिचे मृत्यू नंतर दिनांक-07.10.2018 रोजीचे फेरफार नोंदीने नाव कमी करण्यात आल्याची बाब पान क्रं 23 वरील दाखल गाव नमुना सात वरुन दिसून येते. पान क्रं-27 वरील गाव नमुना-6-क मधील नोंदीं वरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याचे वडील नामे श्री ओमप्रकाश नारायण पेटकुले यांचा दिनांक-15.04.2014 रोजी मृत्यू झाला होता आणि त्यांचे मृत्यू नंतर त्यांची मुले श्री सुभाष ओमप्रकाश पेटकुले व श्री महेंद्र ओमप्रकाश पेटकुले आणि पत्नी लता ओमप्रकाश पेटकुले हे कायदेशीर वारसदार असल्या बाबतची नोंद दिनांक-07.03.2018 रोजी मंजूर करण्यात आलेली आहे. तक्रारकर्त्याची आई नामे लता ओमप्रकाश पेटकुले हि तिचे पती श्री ओमप्रकाश नारायण पेटकुले यांचे दिनांक-15.04.2014 रोजीचे मृत्यू नंतर आपोआपच वारसाहक्काने शेतकरी झालेली आहे, त्यामुळे शेतकरी अपघात विमा योजनेच्या दिनांकास तक्रारकर्त्याची आई शेतकरी होती ही बाब सिध्द होते. तक्रारकर्त्याचे आईचे अपघाती मृत्यू नंतर तक्रारकर्ता हा मुलगा व कायदेशीर वारसदार या नात्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा ग्राहक (लाभार्थी) आहे करीता मुद्दा क्रं 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी नोंदवित आहोत. तक्रारकर्त्याची आई व्यवसायाने शेतकरी नव्हती या विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्तरातील आक्षेपात जिल्हा ग्राहक आयोगास कोणतेही तथ्य दिसून येत नाही.
मुद्दा क्रं 2 व 3 बाबत
10. तक्रारकर्त्याची आई नामे श्रीमती लता ओमप्रकाश पेटकुले ही दिनांक-23.08.2018 रोजी सायंकाळी घरातील बकरीचा गोठा झाडझुड करीता असताना गोठयातील इलेक्ट्रिक वायर लागून विजेच्या धक्क्याने मृत पावली व ग्रामीण रुग्णालय लाखनी, जिल्हा भंडारा येथील डॉक्टरांनी तिला मृतक घोषीत केले असे पान क्रं 29 ते 36 वर दाखल पोलीस स्टेशन लाखनी, जिल्हा भंडारा यांचे अकस्मात मृत्यू खबरी, घटनास्थळ पंचनामा इत्यादी दस्तऐवजा वरुन दिसून येत असल्याने तक्रारकर्त्याचे आईचा अपघाती मृत्यू झाला होता ही बाब सिध्द होते, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने जरी अपघाती मृत्यूची बाब लेखी उत्तरातून नामंजूर केली तरी त्यामध्ये फारसे तथ्य जिल्हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही. पान क्रं 37 ते 44 वर वैद्दकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, लाखनी यांनी तक्रारकर्त्याचे आईचे शवविच्छेदन केल्याचा अहवाल दाखल आहे, सदर शवविच्छेदन अहवाला मध्ये मृत्यूचे कारण “Probable cause of Death may be electrocution” असे नमुद केलेले आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग ग्रामपंचायत मोरगाव राजे यांनी निर्गमित केलेल्या मृत्यू प्रमाणपत्रा नुसार लता ओमप्रकाश पेटकुले हिचा मृत्यू दिनांक-23.08.2018 रोजी झाला असल्याचे नमुद आहे.
11 या प्रकरणा मध्ये मुख्य विवाद असा आहे की, तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याचे आईचा अपघाती मृत्यू संबधीचा दावा आज पर्यंत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने प्रलंबित ठेवला व त्या संबधात त्याला आज पर्यंत काहीही कळविण्यात आलेले नाही. या उलट विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने ईतर वारसदारांची नावे व त्यांचे ना-हरकत-प्रमाणपत्र विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिलेले नाही. तक्रारकर्त्याच्या चुकीमुळे सदर विमा दावा निकाली निघू शकला नाही.
12. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने घेतलेला उपरोक्त बचाव हा अत्यंत तोकडया, आधारहिन (Baseless) स्वरुपाचा आहे, याचे कारण असे आहे की, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याशी त्याचे विमा दाव्या संबधात कोणताही पत्रव्यवहार केला नाही वा असा पत्रव्यवहार केल्याचे त्यांचे म्हणणे सुध्दा नाही आणि तसा कोणताही पुरावा त्यांनी या प्रकरणात दाखल केलेला नाही. ईतर वारसदारांचे ना-हरकत-प्रमाणपत्राची आवश्यकता विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला होती तर त्यांनी त्या प्रमाणे लेखी स्वरुपात तक्रारकर्त्यास कळविणे आवश्यक होते.
13. प्रकरणातील पान क्रं 26 वर दाखल गाव नमुना 6 फेरफार नोंद वही वरुन तक्रारकर्त्याचे वडील श्री ओमप्रकाश नारायण पेटकुले यांचा दिनांक-15.04.2014 रोजी मृत्यू झालेला असून त्यांचे मृत्यू पःश्चात सुभाष गोमप्रकाश पेटकुले (तक्रारकर्ता) मुलगा, महेंद्र ओमप्रकाश पेटकुले (मुलगा) आणि लता ओमप्रकाश पटले (मृतक श्री ओमप्रकाश यांची पत्नी आणि तक्रारकर्त्याची आई) हे वारसदार असल्या बाबत प्रतिज्ञापत्र, पोलीस पाटील, नगरपालिका दाखला इत्यादी दाखल पुराव्या वरुन फेरफार नोंद घेतल्याचे नमुद आहे. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, तक्रारकर्त्याने पान क्रं 46 व 47 वर स्टॅम्प पेपर वरील त्याचा वारसदार भाऊ श्री महेंद्र ओमप्रकाश पेटकुले याचे समतीपत्र दाखल केलेले आहे त्यामध्ये त्याने स्पष्ट नमुद केलेले आहे की, त्याची आई नामे लता ओमप्रकाश पेटकुले हीचा दिनांक-23.08.2018 रोजी मृत्यू झालेला असून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे अनुदान मिळण्या करीता त्याचा भाऊ श्री सुभाष ओमप्रकाश पेटकुले (तक्रारकर्ता) हयाला उचल करण्या करीता त्याची पूर्णपणे सम्मती आहे. तसेच श्री महेंद्र ओमप्रकाश पेटकुले याने स्वतःचे स्वयंघोषणापत्र सुध्दा पान क्रं 49 वर दाखल केलेले आहे. हा सर्व दस्तऐवजी पुरावा पाहता तक्रारकर्ता श्री सुभाष ओमप्रकाश पेटकुले हा त्याचे मृतक आईच्या विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
14. विरुध्दपक्ष क्रं 2 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड जे महाराष्ट्र शासन आणि विमा कंपनी यांचे मध्ये विमा दाव्या संबधी मध्यस्थ म्हणून कार्य करतात तसेच प्राप्त विमा दाव्याची शहानिशा करुन तृटींची पुर्तता संबधितां कडून करवून घेऊन विमा दावा प्रस्ताव विमा कंपनीकडे विमा दावा निश्चीतीसाठी पाठवितात, त्यांचे लेखी उत्तरा प्रमाणे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फतीने त्यांना विमा दावा दिनांक-23.11.2018 रोजी प्राप्त झाला होता व त्यांनी तो विमा दावा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे दिनांक-08.03.2019 रोजी सादर केला होता. सर्वसाधारण व्यवहारात विमा दावा प्रस्ताव प्राप्त झाल्या नंतर त्यावर तीन महिन्यात विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने निर्णय घेणे अभिप्रेत आहे परंतु तसे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने केलेले नाही, याउलट विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार ही अपरिपक्व (Immature) आहे कारण त्याने दाखल केलेल्या विमा दाव्यावर अदयाप पर्यंत निर्णय झालेला नसताना त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी विरुध्द जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केलेली आहे. परंतु या विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे म्हणण्यात काहीही तथ्य दिसून येत नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि.यांचे म्हणण्या नुसार त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा दावा दिनांक-08.03.2019 रोजी दाखल केला होता आणि तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समोर दिनांक-23.12.2019 रोजी दाखल केलेली आहे, म्हणजेच जवळपास नऊ महिन्यानंतर दाखल केलेली आहे. विमा दावा दाखल केल्या पासून ते तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा पर्यंत दाखल करे पर्यंत विमा दाव्या संबधी तक्रारकर्त्याशी कोणताही पत्रव्यवहार विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने केलेला नाही वा तसा कोणताही पुरावा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याचा विमा दावा प्रलंबित ठेवणे, त्यावर कोणताही निर्णय विहित मुदतीत न घेणे, दरम्यानचे काळात त्याचेशी विमा दाव्या संबधी कोणताही पत्रव्यवहार न करणे हा सर्व प्रकार पाहता विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने त्याला दिलेली दोषपूर्ण सेवा आहे आणि त्यामुळे त्याला निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे आणि शेवटी ही तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करावी लागली असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला विमा दावा हा दिनांक-08.03.2019 रोजी पाठविल्या नंतर तो दिनांक-15.03.2019 पर्यंत मिळालेला असेल असे जिल्हा ग्राहक आयोगास गृहीत धरण्यास काहीही हरकत नाही. दिनांक-15.03.2019 पासून विमा दावा निश्चीतीसाठीचा कालावधी तीन महिने हिशोबात घेतल्यास विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कपंनीने सदर विमा दाव्यावर 15.06.2019 पर्यंत निर्णय घेणे अभिप्रेत होते परंतु तसे या प्रकरणात झालेले नाही.
15. उपरोक्त सखोल विवेचना वरुन तक्रारकर्त्यास त्याचे आईचे अपघाती मृत्यू बाबत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) आणि सदर विमा रकमेवर दिनांक-15.06.2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल. याशिवाय त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- अशा नुकसानभरपाईच्या रकमा मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे स्पष्ट मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-2 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड यांनी विहित मुदतीत तक्रारकर्त्याचा विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे पाठविला व कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी लाखनी, तालुका-लाखनी, जिल्हा भंडारा यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विहित मुदतीत दाखल केल्याने त्यांचे सेवेत कोणतीही त्रृटी दिसून येत नाही व तक्रारकर्त्याची सुध्दा त्यांचे विरुध्द तशी कोणतीही तक्रार नसल्याने विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी लाखनी, तालुका-लाखनी, जिल्हा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
16. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन जिल्हा ग्राहक आयोग प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे क्षेत्रीय व्यवस्थापक, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष 1 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला त्याच्या आईचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) अदा करावी आणि सदर विमा रकमेवर दिनांक-15.06.2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याज तक्रारकर्त्याला निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत दयावे. विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्यास सदर विमा रक्कम आणि त्यावर दिनांक-15.06.2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्याज यासह येणारी रक्कम तक्रारकर्त्याला रक्कम देण्यास विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी जबाबदार राहिल.
- विरुध्दपक्ष क्रं.-1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याला द्यावेत.
- विरुध्दपक्ष क्रं-2 जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) विरुध्दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी, लाखनी, तालुका- लाखनी, जिल्हा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(06) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
(07) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(08) तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांचे तर्फे दाखल संच त्यांना परत करण्यात यावे.