निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 06/11/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 26/11/2012
तक्रार निकाल दिनांकः- 21/06/2013
कालावधी 05 महिने. 26 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
शांतीकुमार पिता.विश्वनाथराव धर्माधिकारी. अर्जदार
वय 48 वर्षे. धंदा.व्यापार. अड.डि.व्हि.दाभाडे.
रा.श्रीराम कॉलनी,सेलु ता.सेलु.जि.परभणी.
विरुध्द
ओरिएन्टल इन्श्युयरन्स कंपनी लि. गैरअर्जदार.
तर्फे,शाखा व्यवस्थापक. अड.ए.डी.गिरगांवकर.
दौलत बिल्डींग शिवाजी चौक,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा ता.सेलु जिल्हा परभणी येथील रहिवाशी असून अर्जदाराने दिनांक 06/04/2010 रोजी हिरो होंडा स्पेलन्डर ही मोटार सायकल विकत घेतली ज्याचा आर.टी.ओ. नोंदणी क्रमांक M.H.-22 M. 4598 होता तसेच सदरील मोटार सायकलचा विमा अर्जदाराने गैरअर्जदार यांचे प्रतीनिधी कडुन दिनांक 08/04/2011 रोजी घेतला. गैरअर्जदार यांनी पॉलिसी क्रमांक 182090/31/2012/29 ही पॉलिसी अर्जदारास दिली.सदर पॉलिसी नुसार अर्जदाराचे मोटार सायकलचा विमा घोषीत किंमत 31,000/- रुपये धरण्यात आला.सदर पॉलिसी ही 07/04/2012 पर्यंत वैध होती.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 05/02/2012 रोजी संध्याकाळी अर्जदाराने त्याची सदरची मोटार सायकल आपल्या घरा समोर उभी करुन लॉक लावुन अर्जदार हा परभणीस गेला अर्जदाराच्या घराच्या लोकांनी काही वेळानंतर पाहिले असता सदरची मोटार सायकल दिसली नाही. सदर मोटार सायकलची शोधाशोध केली असता अर्जदारास व त्याच्या कुटूंबियास सदरची मोटार सायकल आढळून आली नाही, त्यामुळे अर्जदाराने पोलिस स्टेशन सेलू येथे अज्ञात चोरां विरुध्द मोटार सायकल चोरीची फिर्याद दिली त्यावरुन गुन्हा क्रमांक 24/2012 कलम 379 भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यानंतर तपास करुन ही सदरची मोटार सायकल आढळून आली नाही, त्यामुळे अंतिम अहवाल “ अ ” वर्ग मंजुरीसाठी न्यायालयात दिनांक 29/06/2012 रोजी पाठविले. घटना घडल्यानंतर अर्जदाराने दिनांक 05/03/2012 रोजी गैरअर्जदारास सदर वाहन चोरीस गेल्याबाबत लेखी सुचना दिली त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या कार्यालयात जावुन विमा दावासोबत लागणा-या कागदपत्रांची चौकशी केली तेव्हा गैरअर्जदार यांनी पोलिसांचा अंतिम अहवाल दाखल झाल्या शिवाय विमा मिळणार नाही असे सांगीतले. त्यामुळे अर्जदार हा एकतर मोटार सायकल परत मिळण्याचे कामाने पोलिसांने गुन्हयाची अंतिम अहवाल दाखल करण्याची प्रतिक्षा करीत होता, परंतु गैरअर्जदार यांना दिनांक 15/03/2012 रोजी अर्जदारास एक पत्र पाठविले, ज्यामध्ये त्यांनी वाहन चोरी बाबतची माहिती गैरअर्जदार कंपनीस घटने पासून 48 तासांच्या आत दिली नाही तर विमादावा मिळणार नाही, असे सांगीतले सदरचे पत्र प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली की, आम्ही व पोलिस हे वाहन व चोराच्या शोधात होतो, म्हणून लवकर सुचना विमा कंपनीस देण्यात आली नाही हे अर्जदाराने त्यानंतर वेळोवेळी जावुन गैरअर्जदार यांना विमादावा देण्याची विनंती केली. परंतु गैरअर्जदारांने सदर दावा देता येणार नाही असे तोंडी सांगीतले व दावा मंजूर होण्याचे पत्र अद्याप दिले नाही. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार व गैरअर्जदार यांच्या मध्ये विमा करार होतांना चोरीच्या घटना बाबतची माहिती विमा कंपनीस 48 तासांच्या आत द्यावी अशी कोणतीही अट करारपत्रांत नव्हती तसेच गैरअर्जदाराच्या एजंटने अर्जदारास करारनामाच्या कोणत्याही अटी वाचून समजुन सांगीतल्या नाही,तसेच विमा करारातील काही अटी क्लिष्ट भाषेत आहे व त्या प्रचलित कायद्यात दिलेल्या व्याख्येच्या विरोधात आहे.गैरअर्जदाराच्या म्हणण्या नुसार 48 तासाच्या आत सुचना देणे हे नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरोधात आहे, कारण कोणतीही व्यक्ति जर त्याची वस्तु हरवली तर प्रथम आजुबाजूस त्या वस्तुचा शोध घेवुन जर सापडली नाही तरच त्याची सुचना पोलिस किंवा विमा कंपनीस देईल सदरच्या प्रकरणात अर्जदाराने लवकरात लवकर मोटार सायकल चोरीची सुचना दिली होती अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचा विमा गैरअर्जदाराने नाकारुन अर्जदारास मानसिकत्रास झाला आहे म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदार यांस अर्जदाराची मोटार सायकल क्रमांक M.H. 22. M 4598 हि चोरीस गेल्या बद्दल नुकसान भरपाई 31,000/- रुपये हे दिनांक 15/03/2012 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा व अर्जदारास गैरअर्जदार यांच्याकडून मानसिकत्रासापोटी 10,000/- रुपये व तक्रारीचा खर्च 5,000/- रुपये देण्याची विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केलेला आहे. व नि.क्रमांक 4 वर 9 कागदपत्रांच्या यादीसह 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. नि.क्रमांक 4/1 वर एफ.आय.आर.ची कॉपी. नि.क्रमांक 4/2 वर स्पॉट पंचनामाची प्रत, 4/3 वर 173 सी.आर.पी.सी. अन्वये नोटीसची प्रत, 4/4 वर चार्जशिटची कॉपी, 4/5 वर गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा नाकारल्याचे पत्र, 4/6 वर पॉलिसीची कव्हरनोट, 4/7 वर पॉलिसीची डिक्लीयर्ड व्हॅल्युची प्रत, 4/8 वर इंशुरन्स कंपनीची पावती, 4/9 आर.सी. बुक. इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीसा काढण्यात आल्या त्याप्रमाणे गैरअर्जदार मंचासमोर वकिला मार्फत हजर, व गैरअर्जदाराने नि.क्रमांक 9 वर आपले लेखी जबाब दाखल केलेले आहे. त्यामध्ये त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व कायदेशिरदृष्टया ते चालू शकत नाही, म्हणून सदरचा अर्ज फेटाळण्यात यावा. तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने हिरो होन्डा स्पेलन्डर ज्याचा क्रमांक एम.एच. 22 एम. 4598 ही 08/04/2011 रोजी खरेदी केली होती व तसेच अर्जदाराची मोटार सायकल हि दिनांक 05/02/2012 रोजी अर्जदाराने घरासमोर लॉक करुन ठेवली असता चोरीस गेली व सदर चोरी बाबत पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली व संबंधीत पोलिसांनी सदरची केस अ वर्गातील न्यायालयात पोलिसांनी दिनांक 29/06/2012 रोजी कोर्टात दाखल केली या सर्व बाबी खोट्या व बनावटी आहेत व तसेच गैरअर्जदाराने हे मान्य केले आहे की, अर्जदाराने त्यांच्याकडे सदरच्या मोटार सायकलचा विमा त्यांच्याकडे काढला होता व सदरच्या विम्याची वैधता ही 07/04/2012 पर्यंत होती व तसेच त्यांचे हे म्हणणे आहे की, सदरच्या पॉलिसी मध्ये स्पष्टपणे हे नमुद केले आहे की, वाहनाची चोरी झाल्याची माहिती चोरी झाल्या पासून 48 तासांच्या आत गैरअर्जदाराकडे द्यावी असे नमुद केले आहे परंतु सदरच्या तक्रारी मध्ये हे निष्पन्न होते की, अर्जदाराच्या म्हणण्या प्रमाणे अर्जदाराची मोटार सायकल ही 05/02/2012 रोजी चोरीला गेली व अर्जदाराने सदर चोरी झाल्याची माहिती गैरअर्जदार कंपनीस 05/03/2012 रोजी दिली व सदरच्या झालेल्या घटने बद्दल अर्जदाराने त्याबद्दल एक महिन्या नंतर विमा कंपनीस कळविले व अर्जदाराने उशीर झाल्याबद्दलचे कारण हे योग्य सांगीतलेले आहे, त्यामुळे गैरअर्जदार कंपनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव 48 तासांच्या आत माहिती दिली नसल्यामुळे विमा प्रस्ताव नाकारण्यात आला.गैरअर्जदार कंपनीने कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी,
गैरअर्जदाराने आपल्या लेखी जाबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 10 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदाराने अर्जदाराचा मोटार सायकल क्रमांक
एम.एच.22 एच.4598 ही चोरीला गेल्याबद्दल
नुकसान भरपाई देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदाराने हे सिध्द केले आहे की, अर्जदाराची मोटार सायकल क्रमांक एम.एच. 22 एम. 4598 हिरोहोंडा स्पेलन्डरचा मालक होता ही बाब नि.क्रमांक 4/9 वर आर.सी.बुकवरुन सिध्द होते तसेच अर्जदाराची मोटार सायकल ही चोरीस गेली ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील एफ.आय.आर. 4/2 वरील स्पॉट पंचनामा व 4/3 वरील 173 सी.आर.पी.सी. नोटीस यावरुन सिध्द होते तसेच अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडे सदरच्या मोटार सायकलचा विमा काढला होता ही बाब नि.क्रमांक 4/6 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते व सदर पॉलिसीची वैधता 07/04/2012 पर्यंत हे सिध्द होते व तसेच नि.क्रमांक 4/6 वरील कागदपत्रा वरुन हे सिध्द होते की, अर्जदाराची मोटार सायकल चोरीला गेली त्यावेळेस सदरची पॉलिसी वैध होती व तसेच गैरअर्जदार कंपनीने अर्जदारास त्याची गाडी चोरीला गेल्यानंतर नुकसान भरपाई म्हणून गैरअर्जदाराकडे मागणी केली होती व ती सदरची मागणी गैरअर्जदाराने घटना घडल्यापासून 48 तासांच्या आत घटनेची माहिती न दिल्यामुळे अर्जदाराचा विमा नाकारण्यात आला ही बाब नि.क्रमांक 4/5 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते तसेच गैरअर्जदाराने सदरचा विमा दावा नाकारतांना नि.क्रमांक 4/5 वरील कागदपत्रावरुन हे सिध्द होते की, “ सदरची माहिती घटना घडल्या पासून 48 तासांच्या आत विमा कंपनीस कळविली नाही म्हणून ” त्यावेळेस गैरअर्जदाराने अर्जदारास परत एकदा संधी देवुन सदर घटने बाबत व कारणे बाबत दोन आठवड्याच्या आत उशीर का झाला याबाबत स्पष्टीकरण मागीतले होते, परंतु अर्जदाराने सदर गैरअर्जदार कंपनीकडे स्पष्टीकरण दोन आठवड्याच्या आत दिले होते, रेकॉर्डवर दिसून येत नाही.व त्याबाबत अर्जदाराने कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही.अर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदाराची मोटार सायकल दिनांक 05/02/2012 रोजी त्याच्या घरासमोरुन चोरी झाली व याबाबतची माहिती अर्जदाराने संबंधीत पोलिस स्टेशनकडे 08/02/2012 ला दिली व अर्जदाराने सदरच्या घटनेची माहिती गैरअर्जदारास त्याच्या म्हणण्यानुसार 05/03/2012 रोजी दिली यावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराने त्याची मोटार सायकल चोरीला गेल्यापासून 1 महिन्यानंतर गैरअर्जदार कंपनीस कळविले व तसेच सदरच्या घटने बाबत एफ.आय.आर. देखील घटना घडल्या पासून तिस-या दिवशी दाखल केले हे सिध्द होते, रिपोर्टेड केस रिव्हीजन पिटीशन 3965/2011 सी.पी.आर. पार्ट 5 मे 2013 पान क्रमांक 517 लखनपाल विरुध्द युनायटेड इंडीया इंशुरंस कंपनी मध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने न्यु इंडीया अश्युरेंस कंपनी लि.विरुध्द त्रिलोचन जैन FA No. 321/2005 या निकालाचा आधार घेत न्यायनिवाडा देतांना असे म्हंटले आहे की, Insurance Company must be immediately informed after alleged theft. या निकालाचा आधार घेत हे सिध्द होते की, अर्जदाराने सदरच्या मोटार सायकल चोरीची घटना घडल्यानंतर 3 दिवसांनंतर पोलिस स्टेशन मध्ये दिली व सदर घटना बाबतची माहिती गैरअर्जदार कंपनीकडे तब्बल एक महिन्या नंतर उशिरा दिली म्हणून, यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराचा विमा दावा 48 तासांच्या आत माहिती दिली नाही, म्हणून विमादावा नाकारुन सेवेत कोणत्याही प्रकारची त्रुटी दिली नाही.
म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष