निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 28/10/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 03/11/2010 तक्रार निकाल दिनांकः- 10 /08/2011 कालावधी 09 महिने 07 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. 1 नवनाथ पिता गणेशराव मोहिते. अर्जदार वय 35 वर्ष.धंदा.शेती. अड.जे.बी.गिरी. रा.खानापूर ता.जि.परभणी. 2 रामेश पिता गंगाधर गरुड. वय 42 वर्षे,धंदा. व्यापार. रा.महक-हाळा,ता.जि.परभणी. विरुध्द ओरियंटल इन्शुरन्स कं.लि. गैरअर्जदार. मार्फत शाखा व्यवस्थापक, अड.नरवाडे जि.व्हि. शाखा दौलत बिल्डींग,शिवाजी चौक,परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्रीमती. अनिता ओस्तवाल.सदस्या.) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदारांनी हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार क्रमांक 1 हा वाहन ऑटो क्र.एम.एच. – 22 एच.- 2161 चा मालक व ताबेदार होता.व अर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदाराकडून सदरील वाहनाचा विमा दिनांक 02/09/2008 ते 01/09/2009 या कालावधीसाठी घेतला होता.त्याचा पॉलिसी क्रमांक 182003/31/2009/1757 होता.तदनंतर दरम्यानच्या काळात अर्जदार क्रमांक 1 याने दिनांक 02/09/2008 रोजी अर्जदार क्रमांक 2 यास सदरचे वाहन विमा प्रमाणपत्रासह विकले.त्यामुळे दिनांक 02/09/2008 पासून अर्जदार क्रमांक 2 हा सदर वाहनाचा मालक व ताबेदार आहे.दिनांक 02/09/2008 रोजी त्यानंतर देखील गैरअर्जदारास या व्यवहाराची माहिती देवुन सुध्दा गैरअर्जदाराने अर्जदार क्रमांक 2 च्या नावे विमा पॉलिसीचे हस्तांतर केले नाही.दिनांक 15/12/2008 रोजी परभणी – वसमत रोडवर असोला शिवारा मध्ये वृध्दाश्रमा जवळ सदर वाहनास अपघात होवुन अंदाजे रक्कम रु.50,000/- चे नुकसान झाले.या घटनेची माहिती गैरअर्जदारास दिल्यानंतर सर्व्हेअरने क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन केल्यानंतर अहवाल गैरअर्जदाराकडे दाखल केला.अर्जदारांनी क्षतीग्रस्त वाहनाच्या पॉलिसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यासाठी गैरअर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रांसह क्लेम दाखल केला,परंतु गैरअर्जदाराने दिनांक 25/11/2009 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदाराचा क्लेम नोक्लेम करण्यात येईल अशी धमकी दिली.तदनंतर अर्जदार क्रमांक 1 ने दिनांक 06/04/2010 रोजी कायदेशिर नोटीस पाठवुन नुकसान भरपाईची रक्कम देण्याची मागणी केली,परंतु गैरअर्जदाराने त्यास कोणताही प्रतिसाद दिलेला नाही म्हणून अर्जदारांनी मंचासमोर तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदाराने क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 50,000/- 18 टक्के व्याजदराने द्यावे तसेच मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- द्यावे अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 व नि.3 व पुराव्यातील कागदपत्र नि.5/1 ते नि.5/5 मंचासमोर दाखल केली. मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर त्याने लेखी निवेदन नि.13 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदार चे म्हणणे असे की, गैरअर्जदाराने सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन करण्यासाठी सर्व्हेअर विलास चंदन याची नेमणुक केली त्याने सर्व्हे करुन रक्कम रु.22,362/- चा असेसमेंट रिपोर्ट दाखल केला परंतु अर्जदार उपरोक्त रक्कम मिळण्यास पात्र नाही कारण अर्जदाराने सदरील वाहनाची Private car package policy घेतली होती परंतु पोलिस पेपर्स वरुन अपघाता समयी प्रवाशांच्या वाहतुकीसाठी अटोचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्याने पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केलेला आहे,पुढे गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, दिनांक 15/12/2008 रोजी सदर वाहनास अपघात झाल्यानंतर अर्जदाराने पोलिसांशी संगनमत करुन 5 दिवस उशिरा F.I.R. दाखल केला.अर्जदाराने सदरील ऑटो transfer करण्यासंबंधीची सुचना जी.आर. 17 प्रमाणे 14 दिवसांच्या आत विमा कंपनीला द्यावयास पाहिजे,परंतु अर्जदार क्रमांक 1 ने ऑटो अर्जदार क्रमांक 2 च्या नावे केला या बद्दलची कल्पना गैरअर्जदारास देण्यात आली नाही. तसेच गैरअर्जदाराने दिनांक 30/04/2009 दिनांक 08/06/2009 रोजीच्या पत्राव्दारे आवश्यक कागदपत्राची मागणी अर्जदाराकडे केली होती,परंतु अर्जदाराने त्या कागदपत्राची पुर्तता न केल्यामुळे व अपेक्षीत सहकार्य न केल्यामुळे अर्जदाराचा क्लेम नो क्लेम करावा लागला व याची कल्पना दिनांक 13/04/2010 रोजी रजिस्टर पोस्टाने पत्र पाठवुन अर्जदाराच्या वकिलास दिली होती तसेच पॉलिसीमध्ये सदरील वाहनाच्या मालक अर्जदार क्रमांक 1 आहे तर आर.सी.पर्टीक्युलर वरुन ऑटोचा मालक हा अर्जदार क्रमांक 2 असल्याचे दर्शविण्यात आले आहे.म्हणून वरील सर्व कारणास्तव अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती गैरअर्जदाराने केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत शपथपत्र नि. 14 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.19/1 ते नि.19/2 मंचा समोर दाखल केली दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 – अर्जदाराच्या अटोस दिनांक 15/12/2008 रोजी अपघात झाला क्षतीग्रस्त वाहनाची पॉलिसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रासह क्लेम दाखल केला असता गैरअर्जदाराने नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ केली अशी अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, सदर वाहनाची पॉलिसी ही Private car package पॉलिसी होती परंतु पॉलिसी पेपर्स वरुन अपघाता समयी सदर वाहनातून प्रवाशांची वाहतुक होत असल्याचे शाबीत झाल्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे तसेच सदर वाहनाचे हस्तांतर अर्जदार कमांक 2 ला केल्यानंतर या व्यवहाराची सुचना GR 17 प्रमाणे 14 दिवसांच्या आत गैरअर्जदारास द्यावयास हवी होती,परंतु अर्जदार क्रमांक 1 ने त्याचे पालन केले नाही तसेच मागणी करुनही अर्जदाराने आवश्यक कागदपत्र गैरअर्जदाराकडे दाखल केली नाही निर्णयासाठी महत्वाचा मुद्दा असा की, गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा अर्जदारास दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? याचे उत्तर होकारार्थी द्यावे लागेल. अपघाता समयी सदर वाहनातून भाडे घेवुन प्रवाशांची वाहतुक होत असल्याचे ठोसरित्या शाबीत करण्याची जबाबदारी गैरअर्जदाराची होती,परंतु गैरअर्जदाराने तशी तसदी घेतल्याचे दिसत नाही.पुढे गैरअर्जदाराने कागदपत्राची मागणी करणारे पत्र अर्जदारास पाठविले परंतु त्याने त्याची पुर्तता केलेली नाही असा बचाव गैरअर्जदाराने घेतलेला दिसतो परंतु गैरअर्जदाराने ते ही मंचासमोर शाबीत केलेले नाही त्यामुळे नेमक्या कोणत्या कागदपत्राची मागणी गैरअर्जदाराने अर्जदाराकडे केली होती हे ही स्पष्ट होत नाही,पुढे अर्जदार क्रमांक 1 ने अर्जदार क्रमांक 2 ला सदर वाहन दिनांक 02/09/2008 रोजी transfer केले, परंतु या व्यवहाराची सुचना जी.आर. 17 प्रमाणे 14 दिवसांच्या आत कंपनीला देण्यात आलेली नाही त्यामुळे पॉलिसीवर अर्जदार क्रमांक 1 चे नाव मालक म्हणून नमुद करण्यात आले आहे परंतु आर.सी.पर्टीक्युलर वरुन अर्जदार क्रमांक 2 च्या नावे सदर वाहनाचे हस्तांतर झाल्याचे दिसते.असा बचाव गैरअर्जदारांने घेतलेला आहे.यावर मंचाचे असे मत आहे की, तक्रार अर्जातून व शपथपत्रातून (नि.2 व नि.3) दोघांपैकी कोणालाही क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाई मिळाली तरी त्यास दोघांची ही हरकत नसल्याचे नमुद केले आहे पॉलिसीची झेरॉक्सप्रत नि.5/4 वर मंचासमोर दाखल केली आहे.त्यावरुन अर्जदार क्रमांक 1 हा विमाधारक असल्याचे स्पष्ट होते.त्यामुळे अर्जदार क्रमांक 1 ला क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाईची रक्कम द्यावयास काहीच हरकत नव्हती,परंतु गैरअर्जदाराने तकलादु स्वरुपाचा बचाव घेवुन विनाकारण अर्जदाराचा क्लेम नोक्लेम केला असे मंचाचे मत असल्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले. तसेच तक्रार अर्जातून अर्जदाराने क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.50,000/- देण्याची मागणी केलेली आहे,परंतु त्याच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्र अथवा बील मंचासमोर दाखल न केल्यामुळे अर्जदाराची मागणी मान्य करता येणार नाही.त्यापेक्षा गैरअर्जदाराने नि.19/1 वर सर्व्हेअर व लॉसअसेसर विलास चंदन याचा सर्व्हे रिपोर्ट (Final survey ) ची झेरॉक्सप्रत दाखल केली आहे.त्यावरुन क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन रक्कम रु. 22,362/- केलेले आहे यातून Salvage रक्कम रु. 800/- वजा जाता (22362/- रु.800/-) = एकुण रक्कम रु. 21,562/- एवढी होते.तेवढीच रक्कम अर्जदार क्रमांक 1 ला मंजूर करण्यात येवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आ दे श 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार विमा कंपनीने निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.21,562/- तक्रार दाखल तारखे पासून म्हणजे दिनांक 28/10/2010 रोजी पासून ते पूर्ण रक्कम देय होई पर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजदराने अर्जदार क्रमांक 1 ला द्यावी. 3 गैरअर्जदार विमा कंपनीने मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- अर्जदार क्रमांक 1 ला आदेश मुदतीत द्यावी. 4 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |