1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. 2. अर्जदार ही राह.वार्ड नं.1, गाडीसुर्ला, ता. मुल, जि.चंद्रपूर येथील रहिवासी असून तीचे पती श्री. कोमरू पोचू येग्गावार यांच्या मालकीची मौजा नवेगांव भू, तह.मुल, जि.चंद्रपूर येथे भुमापन क्र. 190 ही शेतजमीन आहे. गैरअर्जदार क्र. 1 ही विमा कंपनी असून शासनाच्या वतीने गैरअर्जदार क्र.2 हे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्विकारतात. अर्जदार हिच्या पतीचा गैरअर्जदार क्र.2 मार्फत गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे रू.1 लाखाचा विमा उतरविण्यांत आला होता. अर्जदार ही सदर विम्याची लाभधारक असून गैरअर्जदारांची ग्राहक आहे. अर्जदाराचा पती दिनांक 5/5/2018 रोजी मेटॅडोरने जात असता अपघात होवून त्यात अर्जदाराचे पती जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यु झाल्याने तिने गैरअर्जदार क्र.2 कडे रोजी रितसर अर्ज केला व दस्तावेजांची पुर्तता केली. परंतु गैरअर्जदाराने सदर दाव्याबाबत काहीही न कळविल्याने अर्जदाराने दिनांक 21 /12/2017 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांना नोटीस पाठविला परंतु त्यांनी उत्तरही दिले नाही व पुर्तताही केली नाही. अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदारांनी प्रलंबीत ठेवून अर्जदाराची फसवणूक करून सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब गैरअर्जदार क्र.1 व 2 विरूध्द सदर तक्रार मंचात दाखल केलेली आहे. 3. अर्जदाराची मागणी अशी आहे की अर्जदाराचा अर्ज मंजूर करून तिला विमादाव्याची रक्कम रू.1 लाख, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे प्रस्ताव दाखल केल्यापासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्यात यावे तसेच शारीरिक मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.10,000/- गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावेत. 4. अर्जदार यांची तक्रार दाखल करून गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांना नोटीस पाठविण्यात आले. 5. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी प्रकरणात उपस्थीत राहून आपले लेखी उत्तर दाखल करून त्यामध्ये अर्जदार चे म्हणणे खोडून काढीत प्राथमीक आक्षेप घेतला की विमा करार हा त्रिपक्षीय करार असूनही अर्जदाराने कृषी आयुक्त पुणे यांना सदर तक्रारीत पक्ष न केल्यामुळे आवश्यक पक्षकाराअभावी तक्रार खारीज करण्यात यावी. नियमानुसार गैरअर्जदार क्र.2 कडून विमादावा हा आवश्यक दस्तऐवजांसह 90 दिवसांचे मुदतीत गैरअर्जदार क्र.1 कडे यावयास हवा. सदर तक्रारीचे कारण दिनांक 5/5/2008 रोजी घडल्यामुळे अर्जदाराने सदर विमादावा दस्तावेजांसह कृषी अधिका-याकडे 90 दिवसांचे आंत दाखल करावयास हवा होता. परंतु त्याबाबत कोणताही पुरावा दस्तावेज तक्रारीत दाखल नाही. विमादावा मुदतीत दाखल न झाल्यामुळे अर्जदाराने सदर अटी व शर्तींचे उल्लंघन केले आहे. सबब सदर तक्रार मुदतबाह्य असून खारीज करण्यात यावी. मे.कबाल एजंसी ही या प्रकरणांत नोडल एजंसी असून त्यांना गैरअर्जदार क्र.1 कडून त्याकरिता ब्रोकरेज चार्जेस मिळतात, परंतु गैरअर्जदार सदर नोडल एजंसीने तसेच गैरअर्जदार क्र.2 हयांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही. प्रस्तूत प्रकरणात गैरअर्जदार क्र.1 यांचे सेवेत कोणतीही न्युनता नाही. सबब सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केली आहे. 6. गैरअर्जदार क्र.2 हयांना प्रस्तूत प्रकरणात नि.क्र.13 नुसार नोटीस प्राप्त झाली, परंतु ते मंचासमोर उपस्थीत झाले नाहीत तसेच त्यांनी तक्रारीला लेखी उत्तर दाखल केले नाही. सबब त्यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याबाबत मंचाने दि.16/1/2019 रोजी नि.क्र.1 वर आदेश पारीत केला. 7. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार क्र. 1 यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष (1) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 यांचा ग्राहक आहे काय ? होय. (2) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 2 यांचा ग्राहक आहे काय ? नाही. (3) गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदारांस न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? होय. (4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे. कारण मिमांसा मुद्दा क्रं. 1 बाबत :- 8. अर्जदार हिने निशाणी क्रमांक 4 वर दाखल केलेला 7/12 उतारा, फेरफारपत्रक व शेतीचे दस्ताऐवज यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की अर्जदाराचे पती कोमरू पोचू येग्गावार यांच्या मालकीची मौजा नवेगांव भू, तह.मुल, जि.चंद्रपूर येथे भुमापन क्र. 190 ही शेतजमीन आहे. यावरून मयत विमाधारक श्री.कोमरू पोचू येग्गावर हे शेतकरी होते व शेतीतील उत्पन्नावर ते कुटूंबाचे पालन पोषण करीत होते हे सिध्द होते. अर्जदाराचे पतीचा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 2008-09 या कालावधीकरता रू.1,00,000/- चा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढण्यात आला होता ही बाब स्पष्ट दिसून येत आहे. अर्जदार ही मयत विमाधारक शेतक-याची पत्नी असून सदर विम्याची लाभधारक आहे. सबब अर्जदार ही गैरअर्जदारक्र.1 ची ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्रं. 2 बाबत :- 9. गैरअर्जदार क्रं. 2 यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा गैरअर्जदार क्र.1 कडे विमा काढला व सदर विमा काढण्याकरीता गैरअर्जदार क्र. 2 ने विना मोबदला मदत केली असल्याने अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 2 यांचा ग्राहक नाही. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे. मुद्दा क्रमांक 3 बाबत..
10. अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेले दस्तावेज व गैरअर्जदार क्र.1 हयांनी दाखल केलेले उत्तर हयांचे अवलोकन केले असता निदर्शनांस येते की अर्जदाराचे पतीचा मेटॅडोरने जात असता अपघाती मृत्यु झाला असून सदर अपघाताबाबत नोंदविण्यांत आलेला एफ.आय.आर.तसेच घटनास्थळ पंचनामा, पि.एम.रिपोर्ट इत्यादि दस्तावेज प्रकरणांत दाखल आहेत. गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदाराकडून प्राप्त विमादावा हा दस्तावेज दाखल केलेला आहे. अर्थातच गैरअर्जदार क्र.1 यांना गैरअर्जदार क्र.2 तसेच नोडल एजंसीमार्फत अर्जदाराचा विमादावा प्राप्त झाला होता हे सिध्द होते. गैरअर्जदार क्र.1 ने सदर विमादावा कधी प्राप्त झाला याबाबत कोणताही दस्तावेज प्रकरणांत दाखल केलेला नाही. मात्र सदर विमादावा अर्जदाराने विमाधारकाच्या अपघाती मृत्युनंतर 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर दाखल करण्यांत आला असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र या कारणास्तव गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर विमादावा फेटाळला किंवा कसे याबाबत गैरअर्जदार क्र.1 यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमादाव्यांबाबत मार्गदर्शक तत्वे घालून दिली असून त्यांत विमादावा 90 दिवसांच्या मर्यादेत दाखल न होता विलंबाने दाखल झाला तरीदेखील तो स्विकारावा असे दिशानिर्देश दिलेले आहेत. असे स्पष्ट निर्देश असूनही गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराच्या विमादाव्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. गैरअर्जदार क्र.1 यांची सदर कृती त्यांचे सेवेतील न्युनता दर्शविते या निष्कर्षाप्रत मंच पोहचले आहे. अंतीम आदेश (1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र. 07/2018 अंशतःमंजूर करण्यात येते. (2) गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम रू.1 लाख त्यावर आदेशाच्या दिनांकापासून रक्कम तक्रारकर्तीच्या हाती पडेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह द्यावी. (3) गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीस मानसीक व शारिरीक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.5,000/- द्यावेत. (4) गैरअर्जदार क्र. 2 विरुद्ध कोणताही आदेश नाही. (5) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. |