2. अर्जदार ही इंदिरानगर, गडचिरोली येथे राहणारी असून अर्जदाराचे पती हे शेतकरी होते. त्यांचे नावाने भूमापन क्र. 93 ही शेती पांजरेपार तहसील नागभीड येथे होती. अर्जदाराचे पतीचा दिनांक 1/6/2009 रोजी सायकलने जात असता एका महिंद्रा मॅक्स गाडीने धडक दिल्याने गंभीर दुखापत होऊन दिनांक 10/6/2009 रोजी मृत्यू झाला. त्यांनी शेतकरी अपघात विमा काढला असल्याने अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 कडे रीतसर अर्ज करून विमा दाव्याची गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे मागणी केली. परंतु गैरअर्जदार यांनी सदर योजना ही शेतकऱ्याच्या वारसांना आधार देण्याकरिता निर्गमित केले असूनही त्या उद्देशाला तडा देऊन गैरअर्जदारांनी अर्जदाराला उपरोक्त दाव्याबद्दल काहीही कळविले नाही. सबब दिनांक 30/12/2017 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविला परंतु काहीही उत्तर मिळाले नाही. सबब गैर अर्जदाराची ही कृती सेवेत न्यूनता व अनुचित व्यापार पद्धतीची असल्यामुळे अर्जदार हिने सदर तक्रार मंचात गैरअर्जदारां विरुद्ध दाखल केली आहे. 3. तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदार क्र. 1 व 2 ह्यांना नोटीस पाठविण्यात आली. गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारीत उपस्थित होऊन त्यांचे उत्तर दाखल करून तक्रारी तील अर्जदाराचे म्हणणे खोडून काढीत प्राथमिक आक्षेप घेत अर्जदाराने कृषी आयुक्त यांना तक्रारीत पक्ष न केल्यामुळे आवश्यक पक्ष न जोडल्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी असे नमूद केले तसेच अर्जदार बाईचे पतीचा मृत्यू दिनांक 10/6/2009 रोजी झाला त्यानंतर 90 दिवसाच्या आत दावा गैरअर्जदार क्र. 2 कडे दाखल होणे आवश्यक होते परंतु असा कोणताही दस्तावेज दावा मुदतीत दाखल केल्याबद्दल अर्जदाराने जोडलेला नाही. तसेच अर्जदार बाईचा दावा छाननी बद्दल तसेच अर्जदाराला दिलेले दिनांक 22/1/2010 चे माहिती दिल्याबद्दलचे पत्र सदर उत्तरा सोबत जोडले आहे. अर्जदार ही तिच्या माहितीच्या शिक्षित व्यक्ती सोबत गैरअर्जदाराकडे आली असता दाव्याबद्दलची व अपुऱ्या दस्तावेजाबद्दलची माहिती तिला देण्यात आली होती. परंतु अर्जदाराने उपरोक्त दस्तावेज न पुरवल्यामुळे दावा खारीज करण्यात आला. शेतकरी अपघात विमा योजनेच्या अटीप्रमाणे अर्जदार बाईचा मयत पती हा शेतकरी हवा व त्याचे नावावर शेत जमीन असायला पाहिजे. परंतु अर्जदाराचे पतीच्या नावाने कोणतीही शेत जमीन नाही तसेच गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास दावा मिळवून देण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली नाही. अर्जदाराने तक्रार दाखल करण्यास का विलंब केला याबद्दल कोणतेही कारण दिलेले नाही. तसेच विलंब माफीचा अर्ज तक्रारीत नाही सबब सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
4. गैरअर्जदार क्र. 2 यांना मंचातर्फे नोटीस प्राप्त होऊन सुद्धा ते मंचात उपस्थित न राहिल्यामुळे प्रकरणात गैरअर्जदार क्र. 2 विरुद्ध एकतर्फा आदेश दिनांक 16/1/2019 रोजी करण्यात आला.
5. तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार क्र. 1 यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प क्र. 2 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष 1. तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र. 1 ची ग्राहक आहे काय ? होय 2. तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र. 2 ची ग्राहक आहे काय ? नाही 3. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीस त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे काय ? होय 4. आदेश काय ? अंशत: मान्य कारण मिमांसा मुद्दा क्र. 1 बाबत 6. अर्जदाराचे पती हे शेतकरी होते व त्यांचे नावाने भूमापन क्र. 93 ही शेती पांजरेपार तहसील नागभीड येथे होती. त्यांचा शेतकरी विमा योजनेअंतर्गत विमा उतरविण्यात आला होता व सदर विम्यायोजनेअंतर्गत अर्जदार ही गैरअर्जदाराची ग्राहक आहे ही बाब सिद्ध करण्याकरीता अर्जदाराने तक्रारीत निशाणी क्र. 5 वर दस्त क्र. अ 1ते अ 3 वर विमा पॉलिसी, शेतजमिनीचा 7/12 उतारा, नमूना 8 क इत्यादि दस्तेअवज दाखल केलेले आहेत. त्यावरून अर्जदाराचे पती हे शेतकरी असून त्यांचा शेतकरी विमा योजनेअंतर्गत विमा उतरविण्यात आला होता हे सिध्द होते. सदर विम्याअंतर्गत लाभधारक वारस असल्यामुळे अर्जदार ही गैरअर्जदार क्र.1 ची ग्राहक आहे हे स्पष्ट होते. मुद्दा क्र. 2 बाबत 7. गैरअर्जदार क्र. 2 हे शासकीय कार्यालय असून मध्यस्थ म्हणून विना मोबदला शेतकरी विमायोजनेअंतर्गत कागद पत्रांची देवाणघेवाण करतात. त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार क्र.2 चा ग्राहक या संज्ञेत बसत नाही. शिवाय त्यांनी त्यांचे कर्तव्य चोख बजावले असूल्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 विरुद्ध कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही. मुद्दा क्र. 3 व 4 बाबत 8. अर्जदार बाई ही मयत श्री मनोहर सोमानी रामटेके यांची पत्नी असून अर्जदाराचे पतीच्या नावाने भूमापन क्र. 93 मौजा पांजरे पार तहसील नागभीड येथे शेत जमीन आहे. त्याबद्दल अर्जदाराने तक्रारीत दस्तावेज दाखल केलेले आहेत. परंतु गैर अर्जदार क्र. 1 यांनी त्यांचे उत्तरात अर्जदाराच्या पतीच्या नावाने अपघाताचे वेळी शेत जमीन नाही असा आक्षेप घेतलेला आहे. परंतु अर्जदाराने तक्रारीत दाखल दिनांक 23. 8. 2018 रोजी च्या दस्तावेज क्र. 6 वरून ही बाब सिद्ध होत आहे कि अर्जदाराचा पती हा उपरोक्त शेत जमिनीचा मालक होता. गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्यांचे उत्तरात नमूद केले आहे की अर्जदार बाईला दिनांक 22.1.2010 रोजी तिचा दावा आवश्यक कागदपत्रे न पुरवल्यामुळे फेटाळण्यात आला असे पत्रान्वये कळविले परंतु अर्जदार बाईला असे पत्र मिळाल्याचे कोणतेही दस्तावेज गैर अर्जदार क्र. 1 यांनी उत्तरा सोबत दाखल केलेले नाही. तसेच अर्जदार हिने तिचे पती दिनांक 1 6 2009 रोजी सायकलने जात असताना एका महिंद्रा मॅक्स गाडीने धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन दिनांक 10. 6 .2009 रोजी तो मरण पावला याबाबतचे दस्तावेज घटनास्थळ पंचनामा शवविच्छेदन अहवाल तक्रारी सह दाखल केलेले आहेत. तसेच दिनांक 23. 8. 2018 रोजी अर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्त क्र. 1 वरून सुद्धा असे स्पष्ट होत आहे कि अर्जदारांने तिचा दावा गैरअर्जदार क्र. 2 कडे दिनांक 9. 10 .2009 च्या आधीच दाखल केला होता. सबब गैरअर्जदार क्र. 1 चे त्यांचे उत्तरातील म्हणणे की अर्जदाराने मुदतीत दावा गैरअर्जदार क्र. 2 कडे दाखल केला नाही ही बाब ग्राह्य धरता येत नाही. तसेही सयुक्तिक कारणावरून 90 दिवसांनंतरही विमा प्रस्ताव दाखल करण्यात आला नाही या कारणावरून गैरअर्जदार क्र. 1 ला विमा दावा नाकारता येत नाही. वरील विवेचनावरून अर्जदाराचा विमा प्रस्ताव योग्य असून सुद्धा गैरअर्जदार क्र. 1 ने चुकीच्या कारणावरून नाकारल्याचे दिसून येत आहे व त्यामुळे अर्जदाराला मिळणाऱ्या लाभाचे रकमेपासून वंचित राहावे लागले असल्यामुळे अर्जदाराची तक्रार मंजूर करून मंच खालील आदेश पारित करीत आहे. अंतिम आदेश
1) अर्जदाराची तक्रार क्र. 5/2018 अंशतः मंजूर करण्यात येते 2) गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम रू.1 लाख त्यावर आदेशाच्या दिनांकापासून रक्कम तक्रारकर्तीच्या हाती पडेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह द्यावी. 3) गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्तीस मानसीक व शारिरीक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.5,000/- द्यावेत. 4) गैरअर्जदार क्र. 2 विरुद्ध कोणताही आदेश नाही. 5) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी . (श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |