::: नि का ल प ञ :::
(मंचाचे निर्णयान्वये, मिलिंद बी. पवार (हिरुगडे), मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 30/04/2013)
1 अर्जदारानी, गैरअर्जदाराविरुद्ध सरंक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहेत व ती तक्रार दाखल करण्यास विलंब झालेला आहे म्हणुन अर्जदारांनी प्रस्तुत प्रकरणात विलंब माफीचा अर्ज दाखल केला आहे सदर विलंब माफी अर्जाचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे.
अर्जदार यांचे पती देविदास मारोती/कोंडाजी मांदाडे यांचा दिनांक 07/10/2008 रोजी सर्प दंश होऊन मृत्यु झाला आहे. मयत हे शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाचे शेतकरी व्यक्तीगत अपघात योजनेअंतर्गत रक्कम मिळणेसाठी तहसिलदार यांचे मार्फत प्रस्ताव सादर केला आहे. सदर शासकीय योजनेची माहिती अर्जदाराला नव्हती. तहसिल कार्यालयात वारंवार चौकशी करुनही माहिती मिळाली नाही. अर्जदार ग्रामिण भागातील शेतकरी कुटुंबातील आहेत. अर्जदाराला ग्राहक मंचात न्याय मिळतो याची माहिती नाही. अर्जदाराने गै.अ. 1 यांना दिनांक 23/02/2012 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवुन विमा रकमेची मागणी केली, शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती नसल्यामुळे तक्रार दाखल करणेस 20 महिने 08 दिवस उशीर झाला आहे तो उशीर माफ व्हावा.
2 सदर विलंब अर्ज नोंदनी करुन गै.अ. यांना नोटीस काढण्यात आल्या. गै.अ. 2 यांना सदर नोटीस न बजावता परत आली परंतु अर्जदार यांनी गै.अ.2 यांना नोटीस बजावणी बाबत कोणतीही पुर्तता केली नाही. गै.अ. 2 यांना नोटीसची बजावणी झाली त्याप्रमाणे गै.अ. 2 हे मंचासमक्ष हजर झाले परंतु त्यानी विलंब माफीचे अर्जावर म्हणणे दाखल केले नाही. गै.अ. 1 यांना नोटीस बजावणी झाली व त्यांनी विलंब माफीचा अर्जावर म्हणणे दाखल केले. गै.अ. 1 यांनी म्हणणे दाखल करुन प्राथमिक आक्षेप घेतला आहे की अर्जदार हिने मयत देविदास मांदाडे यांचे सर्पदंशाने मृत्यु झाल्याबाबत विमा रकम मिळणेची तक्रार अधि. विद्या मासाडे व अधि. विनय लिंगे यांचे मार्फत याच विद्यमान मंचात दाखल केली होती व त्याचा क्रमांक 181/2010 असा होता. सदर तक्रार दिनांक 18/04/2011 गुणदोषावर निकाली होऊन खारीज करण्यात आली. त्यामुळे एकदा खारीज झालेली तक्रार विद्यमान मंचासमक्ष पुन्हा चालु शकत नाही व ती प्राथमिक आक्षेपावर खारीज होण्यास पाञ आहे असे कथन केले व सोबत ग्रा.त.क्र. 181/2010 ची निकालाची प्रत निशानी 12 कडे हजर केली आहे तसेच सदर विलंब माफी अर्जास प्रखर विरोध केला. गै.अ. 1 यांचे नुसार विलंब माफी अर्जात विलंब माफीसाठी कोणतेही सबळ कारण दिलेले नाही. अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. विलंब माफीचे अर्जात अर्जदारांनी प्रस्तुत मुदतीत पाठविलेले कथन केले आहे तर दुसरीकडे प्रस्तावाची माहिती नव्हती अशी परस्पर विरोधात्मक कथने केलेली आहे त्यामुळे ती ग्राहय धरण्यास पाञ नाही. झालेला विलंब योग्यरित्या मोजलेला नाही, अर्जदाराने प्रत्येक दिवसाचे विलंबाचे कारणअर्जात नमुद केलेले नाही, विमा योजनांची माहिती नव्हती हे विलंब माफीसाठी कारण होऊ शकत नाही अशा प्रकारे कथने करुन गै.अ. 1 यांनी विलंब माफीचे अर्जास विरोध केला आहे.
गै.अ. 2 यांना नोटीस बजावणी करीता तक्रारदार यांनी कोणतीही पुर्तता केली नाही तसेच अर्जदार व त्यांचे विधिज्ञ ब-याच तारखांना मे. मंचासमक्ष प्रस्तुत प्रकरणात हजर राहिले नाहीत व विलंब माफीचे अर्जावर युक्तीवाद ही केला नाही व गै.अ. यांनी घेतलेला प्राथमिक आक्षेपावर उत्तर दिले नाही त्त्यामुळे सदर तक्रार गै.अ.1 यांचे प्राथमिक आक्षेपावर प्राथमिक सुनावणीसाठी ठेवण्यात आली.
3 निशानी 12 कडे गै.अ.1 यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रार अर्ज क्र. 180/2010 चे अवलोकण करता गै.अ. 1 यांनी घेतलेला प्राथमिक आक्षेप ग्राहय धरण्यासारखा आहे कारण तक्रारदार हिने मयत पती देविदास मांदाडे यांचे दिनांक 20/01/2008 रोजी सर्पदंशाने मृत्यु झाल्यामुळे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळणेसाठी अर्ज केला होता परंतु सदर विमा प्रस्ताव कागदपञा अभावी बंद करण्यात आला होता म्हणुन तक्रारकर्ता हिने आपला मुलगा पुरुषोत्तम मांदाडे यांचे मार्फत याच विद्यमान मंचात ग्रा.त.क्र. 180/2010 चा तक्रार अर्ज दाखल केला होता व तो तक्रार अर्ज गुणदोषावर निकाली होऊन दिनांक 18/04/2011 रोजी खारीज करण्यात आला होता.
त्यामुळे पुन्हा त्याच मुद्दावर नव्याने तक्रार दाखल करण्याचा तक्रारकर्ता हिला कोणताही अधिकार पोहचत नाही त्यामुळे तो प्राथमिक सुनावणीतच रद्द होण्यास पाञ आहे असे या विद्यमान मंचाचे मत झाले आहे म्हणुन खालिल प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
1. अर्जदाराचा विलंब माफीचा अर्ज प्राथमिक सुनावणीत खारीज करण्यात येत आहेत.
2. विलंब अर्जासोबत मुळ दस्तऐवज असल्यास ते अर्जदाराला परत करण्यात यावेत.
3. अर्जदार व गैरअर्जदार यांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 30 /04/2013