जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/22 प्रकरण दाखल तारीख - 19/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 28/04/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य श्यामसूंदर पि.किशनराव इंगोले, वय वर्षे 80, धंदा शेती/व्यापार, अर्जदार. रा.भगनूर ता.मुखेड जि.नांदेड. विरुध्द. ओरिएटल इंशुरन्स कंपनी लि, गैरअर्जदार. तर्फे शाखाधिकारी/ब्रँच मॅनेजर, शाखा संतकृपा मार्केट, जी.रोड,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.भूरे बी.व्ही. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.एस.आर.देशमुख,सदस्या) अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा टाटा सुमो नंबर एमएच-26/एल-884 या वाहनाचे मालक आहेत. अर्जदाराने सदरील वाहनाचा विमा गैरअर्जदाराकडुन काढलेला आहे. अर्जदार दि.14/09/2007 रोजी नांदेड तुळजापुर येथे देवी दर्शन करीता जात असतांना सोलापुर – पुणे महामार्ग क्र.09 वर अर्जुन सोंड पाटी जवळ टाटा सुमो क्र. एमएच 26/एल 884 ची व टमटम क्र. एमएच-45/2313 ची धडक झाली. त्यात अर्जदाराचे रु.1,77,446/- चे नुकसान झाले. पोलिस स्टेशन मोहोळ जि.सोलापुर यांनी गुन्हा क्र.232/2007 अन्वये सदरील घटनेचा गुन्हा नोंदवला व घटनास्थळ पंचनामा केला. अर्जदाराने सदर घटनेची माहिती गैरअर्जदार कंपनीला दिली, त्यानंतर गैरअर्जदार यांनी सर्व्हेअर व लॉस असेसर यांची नेमणुक केली. सर्व्हेअर व लॉस असेसर यांनी अर्जदाराच्या वाहनाचे किती नुकसान झाले याची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी भेटी दिली आणि तपासणी अंती सर्व कागदपत्रे आणि सर्व्हेचा अहवाल त्यांनी गैरअर्जदाराकडे जमा केली. त्यांनतर सर्व्हेअर आणि गैरअर्जदार यांचया सांगण्याप्रमाणे अर्जदार यांनी सदरील वाहन घटना स्थळापासुन काढुन वाहनाची दुरुस्ती केली. गैरअर्जदार यांच्याकडे इस्टीमेट प्रमाणे पैशाची मागणी केली परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा क्लेम मुदतीमध्ये मंजुर करण्यासाठी टाळाटाळ केली. अर्जदार यांनी क्लेम दाखल केल्यापासुन गैरअर्जदार कंपनीकडे वारंवार चकरा मारुन वाहनाची नुकसान भरपाई मंजुर करण्यासाठी विनंती केली परंतु नुकसान भरपाई दिली नाही. शेवटी दि.10/07/2008 रोजी गैरअर्जदार कंपनीने हायर आणी रिवार्ड हे कारण दाखऊन अर्जदाराच्या नुकसान भरपाईचा क्लेम नामंजुर केला. अर्जदार यांनी गैरअर्जदार कंपनीकडे क्लेम दाखल करते वेळी ड्रायव्हरचे ड्रायव्हिंग लायसंन्स, आर.सी.बुक व इतर कागदपत्र दाखल केली आहेत. गैरअर्जदाराने अर्जदाराचा क्लेम मुदतीत मान्य न केल्यामुळे अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अपघाताच्या तारखेपासुन म्हणजेच दि.14/09/2007 पासुन नुकसान भरपाई रक्कमेवर 18 टक्के प्रमाणे व्याज देण्याचा हुकूम करावा, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- नुकसान भरपाई देण्यात यावी वरु.5,000/- दाव्याचा खर्च म्हणुन अर्जदारास देण्यात यावी अशी विनंती केली आहे. सदरील प्रकरणांत गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की, तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण नाही व म्हणुन सदरील तक्रार खारीज करण्यात यावी. सदरील प्रकरणांत साक्ष घेऊन जिरा करणे आवश्यक आहे. अर्जदार हा वाहन क्र. एमएच 26 एल 884 चा मालक आहे ही बाब गैरअर्जदारास मान्य आहे. अर्जदार हा त्याचे वाहन किरायाने देत होता व वाहन किरायाने देण्याचा व्यवसाय करीत आहे. अर्जदार हा ग्राहकच्या व्याखेत बसत नाही कारण तो गाडी स्वतः वापरीत नव्हता व यामुळे सदरील प्रकरण या मंचात चालु शकत नाही. अर्जदाराची सदरील वाहन खाजगी आहे. सदरील गाडीचा विमा खाजगी गाडीचा म्हणुन काढलेला आहे व त्या प्रमाणात अर्जदाराकडुन प्रिमीयमची रक्कम घेतलेली आहे. सदरील गाडीचा अपघात झाला ही बाब गैरअर्जदारास अमान्य आहे. अर्जदाराच्या गाडीचे रु.1,77,446/- चे नुकसान झाले ही बाब गैरअर्जदारास अमान्य आहे. वाहनाचे नुकसान पाहण्यासाठी सर्व्हेअरची नियुक्ती करण्यात आली त्यांनी सर्व्हे करुन गाडीचे रु.34,337/- चे नुकसान झाले असा अहवाल दिला. दुसरे सर्व्हेअरने वाहनाची तपासणी करुन बिल चेक रिपोर्ट गैरअर्जदाराकडे सादर केला व त्या रिपोर्ट प्रमाणे सर्व्हेअरने गैरअर्जदाराची जबाबदारी रु.33,534/- एवढी ठरविली. गैरअर्जदार अर्जदारास फक्त रु.33,534/- देणे लागते पण अर्जदाराने घटनेच्या वेळेस वाहन किरायाने दिलेले असल्यामुळे अर्जदाराने विमा पॉलिसीचे उल्लंघन केले आहे व म्हणुन गैरअर्जदार अर्जदारास काहीही देणे लागत नाही. सदरील अपघाताच्या वेळैस गाडीमध्ये आशीष देवसरवार, सौ.माधवी बासटवार, अजय वासटवार हे प्रवास करीत होते. वरील तीघांनी पोलिसासमोर सांगितले की, त्यांनी सदरची गाडी किरायाने घेवुन गेले होते. गैरअर्जदाराने त्याची सत्यता पडताळण्या करीता श्री.एस.आर.इंगळे यांना इन्व्हेस्टीगेटर म्हणुन नेमले होते. त्यांनी दि.12/06/2008 रोजी आपला रिपोर्ट सादर केला. त्या रिपोर्ट प्रमाणे सुध्दा घटेनेच दिवशी सदरची गाडी अर्जदाराने किरायाने दिली होती ही बाब सिध्द होते. गैरअर्जदाराने अर्जदाराचा क्लेम दि.10/07/2008 रोजी नामंजुर केला आहे व त्यानंतर दिड वर्षानंतर सदरची तक्रार दाखल केली आहे व ते दाखल करण्यास उशिर झाला याचे कोणतेही कारण दिलेले नाही व सदरच्या दाव्यामध्ये 2007 पासुन व्याज मागितले आहे. सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे अर्जदाराच्या गाडीचे फक्त रु.33,534/- चे नुकसान झाले आहे. अर्जदाराने विमा पॉलिसीचे उल्लंघन केल्यामुळे खाजगी वाहन किरायाने दिल्यामुळे गैरअर्जदार अर्जदारास काहीही देणे लागत नाही. म्हणुन सदरीच तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदाराचे कागदपत्र तपासणी केली असता, खालील मुद्ये निदर्शनास आले. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिली त्याबद्यल ते नुकसान भरपाई देण्यास बांधील आहेत काय? होय. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 चे उत्तर. अर्जदार श्यामसुंदर इंगोले यांचे गैरअर्जदार ओरिएंटल इंशुरन्स कंपनी लि यांचेकडे त्याची गाडी क्र. एम.एच-26/एल-884 टाटा सुमोचा विमा उतरविलेला आहे. सदरील पॉलिसी अर्जदाराने मंचा समोर दाखल केलेली आहे. म्हणुन अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत. यास्तव मुद्या क्र. 1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येत आहे. मुद्या क्र. 2 चे उत्तर. दि.14/09/2007 रोजी नांदेड येथुन तुळजापुर येथे अर्जदार आपल्या मित्रांना घेऊन देवदर्शनासाठी जात असतांना सोलापुर- पुणे महामार्ग क्र. 9 वर अर्जुन सोंड पाटी जवळ अर्जदाराच्या वाहनास एम.एच.45/2313 या टमटमने धडक दिली व अर्जदाराचे रु.1,77,446/- चे नुकसान झाले. सदरील घटना अर्जदाराने गैरअर्जदारांना कळविले व पोलिस स्टेशन मोहोळला कळविले. मोहोळ पोलिस स्टेशन येथे 232/2007 अन्वये गुन्हा नोंदविला व घटनास्थळ पचंनामा केला . म्हणजे अर्जदाराने त्यांचे वाहनाचे अपघात झाल्यावर नुकसान झाले हे मंचासमोर आणले आहे. त्यानंतर गैरअर्जदार कंपनीने सर्व्हेअर व लॉस असेसर यांना पाठविले त्यांनी घटनास्थळ पाहुन अर्जदाराचे वाहनाचे किती नुकसान झाले आहे यासाठी तपासणी केली. अर्जदाराने गैरअर्जदार यांना विनंती केली व सदरील वाहन दुरुस्तीची परवानगी मागीतली त्याप्रमाणे गैरअर्जदार यांनी अर्जदारास परवानगी दिली. अर्जदाराने नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल केला तेंव्हा वाहन दुरुस्तीचे इस्टीमेटप्रमाणे सर्व बिल गैरअर्जदाराचे कार्यालयात दाखल केले आहे व वारंवार चकरा मारल्या तरी देखील गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा क्लेम मंजुर केला नाही. म्हणुन अर्जदारास न्यायमंचा समोर आपली तक्रार घेऊन यावे लागली. अर्जदाराने टाटा सुमो ही एम.एच.26/एल.884 ही गाडी देवदर्शनासाठी तुळजापुरला नेला होती ही बाब खरी असली तरी पोलिस स्टेशन मोहोळ येथे गुन्हा रजिस्टर केल्यानंतर पोलिस स्टेशनचे पेपर्स हे गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केले आहे. त्यामध्ये अर्जदार यांची गाडीमध्ये असलेले प्रवासी हे गाडी किरायाने घेतली होती. गाडी तिरुपती बालाजी येथे नेली होती तसेच पंढरपुरहुन तुळजापुर येथे जात असतांना सोलापुर- पुणे महामार्गावर सदरील गाडीचा अपघात झाला, असे लिहून दिलेले आहे. सदरील गाडीचा विमा उरवितांना तो खाजगी वापरासाठी घेतलेले आहे असे म्हणणे गैरअर्जदाराने मांडलेले आहे. तसेच अर्जदार हे सदरील वाहन किरायाने देण्याचा व्यवसाय करीत असल्यामुळे अर्जदार हे ग्राहकाच्या व्याखेत बसत नाही. गैरअर्जदार यांनी इन्व्हेस्टीगेटर श्री.एस.आर.इंगळे यांची नेमणुक करुन त्यांचा रिपोर्ट दाखल केला त्याप्रमाणे गाडीचे फक्त रु.33,534/- एवढे नुकसान झाले आहे, अशा प्रकारचा रिपोर्ट त्यांनी दाखल केला. गाडीमध्ये प्रवास करणारे माधवी बासटवार याचा व अशीष देवसरवार या दोघाचा पोलिस स्टेशन मोहोळ यांनी घेतलेला जबाब जे की, सिव्हील कोर्ट, मोहोळ येथे केसमध्ये दाखल केलेले होते त्याची सत्यप्रत दाखल केलेली आहे. दि.10/07/2008 रोजी गैरअर्जदार यांनी हायर अण्ड रिवार्ड बेसेसवर अर्जदाराचा क्लेम नामंजुर केलेला होता व त्यामुळे अर्जदारास मजबुरीने ग्राहक मंचासमोर केस दाखल करावी लागली. अर्जदार यांनी लेखी युक्तीवाद सादर केला व त्यामध्ये राष्ट्रीय आयोग यांनी दिलेल्या निकालाची प्रती दाखल केली आहे. नॅशनल इंशुरन्स कंपनी विरुध्द श्रीमती. जसोदाबीन व इतर 2009 (2) सीपीआर.307, या केसमध्ये सदरील केस लॉ लागू आहे व खाजगी वाहन व्यवसायासाठी वापरला तरी इंशुरन्स कंपनीने क्लेम द्यावा असा निर्णय दिलेला आहे. अर्जदाराच्या गाडीत प्रवास करणारे प्रवासी पोलिस स्टेशनने घेतलेला जबाब हे गैरअर्जदारांनी दाखल केलेला आहे परंतु त्यासोबत त्यांचे शपथपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे सदरील जबाबाला महत्व देता येणार नाही. म्हणुन अर्जदार हा क्लेम रक्कम मिळण्यास पात्र आहे, या निर्णयास्तव हे मंच आलेले आहे. म्हणुन गैरअर्जदार ओरिएंटल इंशुरन्स कंपनी नांदेड यांनी अर्जदारास गाडीचे अपघाती नुकसान झाले बाबत रु.33,534/- व त्यावर 9 टक्के व्याज, क्लेम दाखल केलेल्या तारखे पासुन एक महिन्याचे आत द्यावे तसेच मानसिक त्रासापोटी व दावा खर्चापोटी रु.5,000/- एक महिन्याचे आंत द्यावेत. सदरील रक्कम अर्जदारास एक महिन्यात दिली नाही तर त्यावर रक्कम फिटेपर्यंत 12 टक्के व्याज दराने गैरअर्जदारांनी अर्जदारास रक्कम द्यावी, या निर्णयास्तव हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता, आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदारास गाडीचे अपघाती नुकसानीबद्यल रु.33,534/- व त्यावर 9 टक्के व्याज दराने, क्लेम अर्ज दाखल केलेल्या तारखे पासुन एक महिन्याचे आंत द्यावेत. 3. तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व दावा खर्चापोटी रु.5,000/- गैरअर्जदारांनी एक महीन्याचे आंत द्यावे. 4. वरील आदेश क्र.2 व 3 मधील रक्कम गैरअर्जदारांनी अर्जदारास एक महिन्यात दिली नाही तर त्यावर 12 टक्के व्याज रक्कम फिटेपर्यंत द्यावे. 5. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक |