जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –133/2011 तक्रार दाखल तारीख –29/09/2011
बबन पि.एकनाथराव गाडेकर
वय 54 वर्षे धंदा नौकरी .तक्रारदार
रा.धनगर जवळका ता.पाटोदा जि.बीड
ह.मु.रामा अपार्टमेंट जवळ, नगर रोड,बीड
विरुध्द
दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.
मार्फत शाखा व्यवस्थापक,
शाखा कार्यालय जालना रोड, बीड ता.जि.बीड. सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.पी.पळसोकर
सामनेवाला तर्फे ः- अँड.एस.एम.साळवे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हे मार्शल जिप नोंदणी क्र.एम.एच-23/ई-1026 चे मालक आहेत. सदर जिपचा विमा कालावधी दि.28.4.1998 मं 27.04.1999 चा सामनेवाला कडून घेतला आहे. त्या बाबत विमा कव्हर नोट नंबर 99/50008 ची सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिली आहे.
दि.17.10.1998 रोजी पांडूरंग लक्ष्मण भिंगारे जिप चालक आणि त्यांचे मित्र हे सदर वाहनातून माहूर व्हाया नांदेड कडे जात असताना अर्धापूर जवळ तिन किलोमिटर अंतरावर एक ट्रक नोंदणी क्र.यूऐआर/9501 विरुध्द बाजूने भरधाव वेगाने येऊन सदर जिपला ट्रकने धडक दिली. ट्रक धडक इरिगेशन कॉलनी समोर दिली. सदर अपघातामुळे जिपचे नूकसान झाले. जिपचा चालक आणि जिप मधील इतर व्यक्ती या जखमी झाल्या. त्यांना सर्वाना नांदेड हॉस्पीटल मध्ये भरती करण्यात आले.
रजिंत नामदेव बागाडे रा. घाटसावळी ता.जि.बीड यांनी त्या बाबतची फिर्याद अर्धापूर पोलिस स्टेशनला दिली. त्यांचा गुन्हा रजिस्ट्रर नंबर 125/98 दि.17.10.1998 सकाळी 2 वाजता सदरचा गुन्हा ट्रक ड्रायव्हर विरुध्द नोंदविण्यात आला.
सदरचा अपघात हा ट्रक ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे झाला. सदरर अपघातात तक्रारदाराचे जिपचे नुकसान झाले होते म्हणून त्यांनी सदरची जिप श्री. साई सर्व्हीस लि. औरंगाबाद यांचेकडे दि.5.6.1999 रोजी दाखवली. त्याचे अहवालानुसारव त्यांचे बिलानुसार दूरुस्तीचे अंदाजीत खर्च रु.2,59,140/- होते. सदर दूरुस्तीच्या बिलाची आकारणी सामनेवाला यांचे सर्व्हेअर यांना दाखवण्यात आली. त्यांनी सदरची आकारणी मान्य केली. म्हणून तक्रारदारांनी सामनेवाला यांचे सुचनेनुसार आवश्यक ती कागदपत्र उदा. नोंदणी बूक, चालकाचे उत्पन्न, टॅक्स बूक आणि वाहनाचे इतर पेपर्स सामनेवाला यांचेकडे दाखल केले.
याठिकाणी तक्रारदार आवर्जून नमूद करतात की, तक्रारदारांनी वाहन खाजगी, घरगुती वापराचे हेतूने वापरीत होता.
त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवालाकडे प्रस्ताव दाखल केला. परंतु सामनेवाला यांनी विमा प्रस्ताव दि.7.6.1999 रोजी नाकारला. त्या बाबतचे कारण सामनेवाला यांनी नमूद केले की अपघाताचे वेळी वाहन हे टॅक्सी म्हणून “Hire and reward purpose ” हेतूने वापरले जात होते. सदरची बाब ही विमा पत्राच्या शर्तीचा भंग करणारी आहे.
याठिकाणी तक्रारदार आर्वजून नमूद करतात की, अपघाताचे वेळी जिपमध्ये प्रवास करणा-या व्यक्ती या तक्रारदाराच्या परवानगीशिवाय व माहीतीशिवाय प्रवास करीत होत्या. वास्तविक सदरच्या प्रवास करणा-या व्यक्ती या भाडे देऊन प्रवास करणारे प्रवासी नव्हते.तक्रारदारांनी सदरचे वाहन कधीही टॅक्सी म्हणून वापरले नाही. सामनेवाला यांनी कूठल्याही योग्य चौकशीशिवाय स्वतःची चूक टाळण्यासाठी हेतूतः दावा नाकारला आहे. तो निसर्ग न्यायाचे विरुध्द आहे.
तक्रारदारांनी नूकसान भरपाई मिळण्यासाठी वाहन कायदयानुसार मोटार अँक्सीडेंट ट्रीब्यूनल क्लेम यांचेकडे दि.30.12.1999 रोजी क्लेम दाखल केला. त्यांचा नंबर 11/2000 होता. तक्रारदारांनी ट्रक नंबर यूऐआर/9501 चा चालक व मालकाच्या पत्त्या बाबत अनेक प्रयत्न करुन देखील त्यांचा योग्य पत्ता मिळाला नाही. म्हणून तक्रारदारांना सल्ला मिळाला की ट्रकच्या चालक व मालकाशिवाय क्लेम चालू शकत नाही म्हणून तक्रारदारांनी दि.29.10.2004 सदर क्लेममध्ये जिल्हा मंचात त्यांचे कारणास्तव तक्रार दाखल करण्याची परवानगी देऊन सदरचा क्लेम विड्रावल करण्या बाबत पुरशीस दाखल केली. त्यासाठी मा. कोर्टाने दि.29.10.2004 रोजी क्लेम विड्रावलची परवानगी दिली परंतु त्यांच कारणावर ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्याची परवानगी नाकारली म्हणून तक्रारदारानी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचेकडे रिट नंबर3790/2005 दाखल केले. त्यात दि.24.08.2005 रोजी मा. उच्च न्यायालयोन तक्रारदारांना रिव्हयू पिटीशन मोटार अँक्सीडेंट क्लेम ट्रीब्यूनल समोर दाखल करण्याची परवानगी दिली. त्यानुसार रिव्हयू पिटीशन तक्रारदारांनी एमसीऐ नंबर385/2008 विलंब अर्ज नंबर 180/05 दाखल केले. मा.एम.ए.सी.टी. बीड यांनी रिव्हयू पिटीशन एमसीऐ नंबर 385/08 दि.28.10.2010 रोजी मंजूर केले आणि तक्रारदारांना नवीन तक्रार योग्य त्या न्यायमंचा समोर मूदतीच्या कायदयातील तरतुदीनुसार दाखल करण्याची परवानगी दिली. त्यानुसार तक्रारदारांनी विलंबाच्या अर्जासह सदरची तक्रार दाखल केली होती. सामनेवाला यांनी तक्रारदारांचा दावा नाकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केला आहे.
विनंती की, सामनेवाला यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई रक्कम रु.2,59,140/- 12 टक्के व्याज अपघाताचे दिनांकापासून देण्याबाबत आदेश व्हावेत. तक्रारदारांचा खर्च रु.40,000/- सामनेवाला यांना दिलेल्या मानसिक त्रासा बाबत देण्या बाबत आदेश व्हावेत. तक्रारदारांनी सोबत विलंब माफीचा अर्ज शपथपत्रासह दाखल केला आहे.
सामनेवाला यांनी विलंब अर्जाचा खुलासा व तक्रारीचा खुलासा दि.03.12.2011 रोजी दाखल केला. सामनेवाला यांची तक्रारीतील विलंब माफीच्या अर्जास जोरदार हरकत आहे. तसेच मुळ तक्रारीचे संदर्भात तक्रारीतील सर्व आक्षेप सामनेवाला यांनी नाकारलेले आहेत.तक्रारदाराची जिप क्रमांक एम.एच.-23/ई-1026 प्रवासी वाहनासाठी भांडे घेऊन वापरतात. जिपचा अपघात दि.17.10.1998 रोजी अर्धापुर जिल्हा नांदेड जवळ ट्रक नंबर यूऐआर/9501 आणि तक्रारीतील जिप यांची धडक होऊन झाला. श्री. मूंढे हे पांडूरंग भिंगारे नेमलेले चाजक यांचे ऐवजी जिप चालवत होते. जिपचे नुकसान झाले आणि चार प्रवासी अपघात स्थळावरच मरण पावले आणि पाच प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहीती मिळाल्यानंतर सामनेवाला यांनी किशोर भिसे यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमले. किशोर भिसे यांनी सदर घटनेची चौकशी केली त्याचा अहवाल दाखल केला. घटना आणि किशोर भिसे यांचे अहवालात असे आढळून आले की, सदरचे वाहन हे अपघाताचे वेळी हायर अँन्ड रिवार्ड परपज तत्वाने वापरत होते म्हणून सदरचा दावा नामंजूर करण्यात आला. सदरचा दावा दि.7.6.1999 रोजी विमा पत्रातील शर्ती व अटीचा भंग या कारणाने नामंजूर केला.
चालक पांडूरंग भिंगारे, श्रीकृष्ण.मुंढे,विश्वनाथ आणि एक डान्सर अनिता हे प्रवासी अपघातात मरण पावले. त्यांचे वारसांनी एमएससी नंबर 25/1999, 42/99,340/99, 410/99 चे क्लेम अर्ज दाखल केले.तक्रारदारांनी एमएससी नंबर 11/2000 जिपच्या नुकसानी बाबत दाखल केला. वरील सर्व क्लेम अर्ज मा.ट्रीब्यूनल यांनी दि.12.8.2003 रोजी दिलेल्या निकालानुसार सदर विमा कंपनीला त्यांची नूकसान भरपाईच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदारांना एमएससी नंबर 11/2000 मध्ये गुणवत्ता दिसत नाही. म्हणून तक्रारदारांनी सदर दावा विड्रावल करण्याची पुरसीस दाखल केली. ट्रीब्यूनल यांनी दावा विड्रावल मंजूर केले. तक्रारदाराने हेतूतः सदरचे प्रकरण हे मा. उच्च न्यायालय तसेच रिव्हयू पिटीशन एम.ए.सी.टी. समोर प्रकरण लाबंवण्याचे उददेशाने असद हेतूने दाखल केला.
तक्रारदाराचा वाहन नुकसानीचा दावा सामनेवाला यांनी वर नमूद केल्याप्रमाणे नमूद कारणाने नामंजूर केलेला आहे. त्यानंतर संबंधीत विमेदारांनी दावा किंवा क्लेम कोर्ट ऑफ लॉ मध्ये 12 कॅलेंडर महिन्याचे आंत (दावा नाकारण्याच्या दिनांकापासून) दाखल करणे आवश्यक होते. तक्रारदारांनी दावा दि.7.6.2000 पूर्वी किंवा परंतु दाखल करणे आवश्यक होते. सदर तक्रारीस 11 वर्षापेक्षा जास्त विलंब झालेला आहे. संबंधीत ट्रीब्यूनल यांनी रिव्हयू पिटीशन मध्ये जिल्हा मंचात मूदतीच्या कायदयानुसार तक्रार करण्याची परवानगी दिलेली आहे. म्हणून ट्रीब्यूनल यांनी तक्रारदाराचे Time consumed चा माफ केलेला नाही. या सर्व कारणावरुन विलंब अर्ज आणि तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा, शपथपत्र व लेखी युक्तीवाद यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.ए.पी.पळसोकर व सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.साळवे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी त्यांची मार्शल जिप नोंदणी नंबर एम.एच-23/इ-1026 चा विमा दि.28.4.1998 ते 27.94.1999 या कालावधीचा सामनेवालाकडून घेतला होता. त्या बाबत सामनेवाला यांनी कव्हर नोट नंबर 99/50008 ची दिलेली आहे.
सदरच्या वाहनास दि.17.10.1998 रोजी माहूर व्हाया नांदेड येथे जात असताना अर्धापूर गांवाजवळ ट्रक क्रमांक यूएआर/9501 विरुध्द बाजूने भरधाव वेगाने येऊन धडक दिली व सदर अपघातात जिपचे नुकसान झाले व सदर जिपमध्ये प्रवास करणा-या चार व्यक्तीचा मृत्यू झाला व पाच व्यक्ती जखमी झालेल्या आहेत.
या बाबत तक्रारदारांनी अपघाताची रक्कम सामनेवाला यांना दिली. तक्रारदारांनी सदरचे वाहन श्री.साई सर्व्हीस यांचेकडे दूरुस्तीसाठी दाखवले त्यांनी दिलेल्या दुरुस्ती खर्चाची बिल सामनेवाला यांचे सर्व्हेअर यांना दाखवले व त्यांनी ते मंजूर केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी जिपची नुकसान भरपाई मिळण्यासाठी सामनेवालाकडे दावा दाखल केला. सदरचा दावा सामनेवाला यांनी दि.7.6.1999 रोजी विमा पत्रातील अटीचा भंग झाल्या कारणाने नाकारला आहे. या बाबत सामनेवाला यांनी अपघाताची सुचना मिळाल्यानंतर किशोर भिसे चौकशी अधिकारी यांची अपघाताची चौकशी करण्यासाठी नेमणूक केली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार वास्तविक परिस्थितीनुसार सामनेवाला यांना आढळून आले की, सदरचे वाहन अपघाताचे वेळी भाडयाने चालवित होते. सदर अहवालावर भर देऊन सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा वरील कारणास्तव नाकारला आहे. या संदर्भात तक्रारदारांनी दावा नाकारल्यानंतर मा.एम.ए.सी.टी यांचे न्यायालयात एमएससी नंबर11/2000 चा जिपची नूकसान भरपाई मिळण्याचा दावा दाखल केला होता. सदरचा दावा तक्रारदारांनी दि.29.10.2004 रोजी पुरशीस देऊन नवीन तक्रार त्यांच कारणावर जिल्हा मंचात दाखल करण्याच्या परवानगीने काढून घेण्याची पुरशीस दिली होती. त्यात संबंधीत न्यायालयाने तक्रारदारांना दावा काढून घेण्याची परवानगी दिली परंतु त्यांच कारणाने जिल्हा मंचात तक्रार दाखल करण्याची परवानगी नाकारली. त्या विरुध्द तक्रारदारांनी मा.उच्च न्यायालय औरंगाबाद यांचेकडे एमएससी नंबर 385/2008 विलंब अर्ज नंबर एमएससी नंबर 180/2005 चा दाखल केला होता. त्यात एमएससी नंबर 385/2008 दि.28.10.2010 रोजी मंजूर होऊन सदर अपिलात तक्रारदारांना एमएसीटी न्यायलयात रिव्हयू पिटीशन करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार तक्रारदारांनी एमएसीटी बीड यांचे समोर रिव्हयू पिटीशन दाखल केले. सदरचे पिटीशन मंजूर होऊन संबंधीत ट्रीब्यूनल यांनी तक्रारदारांना जिल्हा मंचात त्यांच कारणावर तक्रार दाखल करण्या संदर्भात मूदत कायदयातील तरतुदीनुसार परवानगी दिली आहे. त्यानुसार तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
यात सामनेवाला यांचे विलंब अर्जास जोरदार हरकत आहे. विलंब अर्जातील कोणतीही कारणे सबळ नाहीत. विलंब माफ करण्यास योग्य नाही. तक्रारदारांनी या संदर्भात खालील न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे,
2011 (4) AIR Boru R 711 (NAGPUR BENCH)
Jankiram Pandharinath Thorat Vs. Akot Municipal council, Akot & Ors.
“ Limitation Act, (36 of 1963), S. 14 –Exclusion of time spent in prosecuting an-other proceeding – Proceeding before Labour Court can be said to be civil proceeding – Accordingly time spent before Labour Court would be excluded whilst computing period of limitation. ”
सदर न्यायनिवाडयाचे सखोल वाचन केले. सदरचा न्यायनिवाडा हा मूदत कायदा कलम 14 या संदर्भात आहे. या बाबत तक्रारदारांनी अपघात घडल्यानंतर एमएसीटी न्यायलया समोर क्लेम दाखल केला होता. एमएससी नंबर 11/2000 चा मूदतीत दाखल केली होती. तसेच ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 24 (ए) नुसार कारण घडल्यापासून दोन वर्षाचे आंत तक्रार दाखल करणे आवश्यक होते. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा दि.7.6.1999 रोजी नाकारला आहे. त्यापासून दोन वर्षाचा कालावधी म्हणजे दि.7.6.2001 पर्यत तक्रार दाखल करणे आवश्यक होते परंतु वर उल्लेख केलेली परिस्थिती पाहता तक्रारदारांनी सदरचा दावा हा एमएसीटी क्लेम ट्रीब्यूनल कडे दाखल केल्यामुळे व त्यात तक्रारदारांना नवीन तक्रार दाखल करण्याची परवानगी मिळाली परंतु ती सर्व प्रोसिंडींग तक्रारदारांनी दाखल केलेली आहे. त्यात नमूद केलेल्या सर्व प्रोसिंडीग मध्ये सामनेवाला हे हजर आहेत व सदरची प्रोसिंडीग ही गुणवत्तेवरती निकाली झालेली आहेत. वरील सर्व प्रोसिंडीग मध्ये सामनेवाला यांनी त्या बाबत कूठेही वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केलेली नाही. त्यांमुळे मा.एमएसीटी न्यायालयाचा शेवटचा आदेश हा अंतिम झालेला आहे व त्यानुसार तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल केलेली आहे. सदरची तक्रार ही हेतूतः क्लेम ट्रीब्यूनल कडे तक्रारदारांनी दाखल केली असे सामनेवाला यांचा आक्षेप नाही व तसेच चूकीच्या ट्रीब्यूनल कडे नूकसान भरपाई मागण्याचा तक्रारदाराचा कोणताही उददेश राहू शकत नाही. तसेच ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 24 (ए) च्या तरतुदीमध्ये मूदत कायदयातील कलम 5 विलंबाचे संदर्भात नमूद केलेले आहे व विलंब कायदयाची सदर कायदयातील तदतुद आहे. परंतु प्रस्तूत प्रकरणात दावा हा योग्य न्यायलयात दाखल झालेला नाही त्यामुळे तो योग्य न्यायालयात दाखल करण्यासाठी जो कायदेशीर कालावधी गेलेला आहे त्यासाठी मूदत कायदयातील कलम 14 हे अत्यंत महत्वाचे कलम आहे. त्यानुसार कलम 14 चा विचार करता तसेच तक्रारीतील गुणवत्तेबाबतचा विचार करता तक्रारदाराचा विलंब हा हेतूतः विलंब झालला नाही. त्यामुळे तक्रार दाखल करण्यास लागलेला वेळ हा हेतूतः विलंब झाला असल्याची बाब स्पष्ट होत नाही. तसेच सदर मूदतीच्या कायदयातील कलम 14 याठिकाणी लागू होत असून कलम 14 प्रमाणे सदरचा काळ हा सोडल्यास तक्रारदाराची तक्रार रिव्हयू पिटीशनच्या आदेशापासून दोन वर्षाचे आंत दाखल होणे आवश्यक आहे. त्यानुसार ती दाखल आहे. त्यामुळे सदर तक्रारीतील विलंब माफ करण्याचा प्रश्न येत नाही. सदरचा विलंब हा विलंब नसून तो मूदतीच्या कायदयातील कलम 14 प्रमाणे सुट देण्यास पात्र असलेला काळ आहे.
तक्रारीतील घटना पाहता सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा हा किशोर भिसे चौकशी अधिकारी यांचे अहवालावरुन नाकारला आहे. या संदर्भात किशोर भिसे यांचे सदर प्रकरणात शपथपत्र दाखल नाही. तसेच या संदर्भात सामनेवाला यांनी मा. क्लेम ट्रीब्यूनल यांना क्लेम नंबर 25/99,42/99, 340/99, व 410/99 यात सामनेवाला विमा कंपनीवर जबाबदारी टाकली नाही. त्यांना सदर जबाबदारीतून मूक्त केलेले आहे. त्या संदर्भात सदरचे निवाडे दाखल केलेले आहेत.
सामनेवाला यांचा सदरचा पुरावा विचारात घेता किशोर भिसे यांचे सदर प्रकरणात शपथपत्र आवश्यक होते, त्यांचा अहवाल तक्रारीत दाखल होणे आवश्यक होते परंतु त्या दोन्ही बाबी तक्रारीत दाखल नाहीत. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराची तक्रार विमा पत्रातील अटीचा भंग झाला कारणाने योग्य रितीने नाकारली असे म्हणता येत नाही. या संदर्भात तक्रारदारांनी वेळेवर सूचना दिलेली नाही असे सामनेवाला यांचे म्हणणे नाही. सामनेवाला यांनी सर्व्हेअर नेमल्याचे व त्यांनी नुकसानी बाबत अहवाल दिल्याचे म्हणणे नाही. तसेच सर्व्हेअर यांचा अहवाल दाखल नाही. केवळ किशोर भिसे चौकशी अधिकारी यांचे अहवालावर भर ठेऊन दावा नाकारला आहे. या संदर्भात सर्व्हे का करण्यात आलेला नाही ? सर्व्हे झाला असल्यास त्यांचा अहवाल दाखल का केला नाही ? या बाबत सामनेवाला यांचा कूठेही खुलासा नाही. वर नमूद केल्याप्रमाणे सामनेवाला यांनी ज्या कारणाने दावा नाकारला त्या बाबतचा योग्य तो पुरावा नसल्याने सामनेवाला यांनी योग्य त-हेने दावा नाकारल्याची बाब स्पष्ट न झाल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते असे न्यायमंचाचे मत आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना अपघातग्रस्त जिपची नुकसान भरपाई देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी या संदर्भात साई सर्व्हीसचे जॉब कार्ड नंबर 303 ते 307 दि.5.6.1999 रोजीचे दाखल केलेले आहे त्यात रक्कम रु.2,59,140/- चे दाखल केले आहे. सदरचे बिल हे अंदाजीत खर्चाचे बिल आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. सदरचे वाहन तक्रारदारांनी दूरुस्ती केल्या बाबतचे तक्रारदाराचे म्हणणे नाही. तसेच दुरुस्ती केले असल्यास त्यांस सदर इस्टीमेटनुसार प्रत्यक्ष किती खर्च आला त्या बाबतचा कूठेही पुरावा नाही. त्यामुळे अंदाजीत खर्चाची रक्कम तक्रारदारांना देणे उचित होणार नाही. सदरचे बिले सामनेवाला यांनी नाकारलेली नाहीत.सदरची बिले ही अंदाजीत खर्चाची बिले असल्याने त्यांचे नॉन स्टँडर्ड तत्वाने 75 टक्के रककम रु.1,94,355/- सामनेवाला यांना विमा पत्र मान्य आहे व त्याचं कालावधीतील अपघात असल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सदर तक्रारीत तक्रारदारांनी एमएसीटी कडे दावा दाखल केलेला होता. त्याचा वरील सर्व प्रवास 11 वर्षाचा आहे व त्यासाठी तक्रारदाराने लढावे लागले आहे परंतु सदरची लढाई ही सामनेवाला यांचे चुकीमुळे तक्रारदारांना लढावी लागली नाही. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम देणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे. तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवाला यांनी तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, सामनेवाला यांनी तक्रारदारांना
अपघातग्रस्त जिपची रक्कम रु.1,94,355/- (अक्षरी एक लाख चौ-यानऊ
हजार तिनशे पच्चावंन फक्त) आदेश मिळाल्यापासून एक महिन्याचे
आंत अदा करावी.
- सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत
न दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार
दाखल दि.29.09.2011 पासून देण्यास जबाबदार राहतील.
4. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारीच्या खर्चाची
रककम रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) आदेश
प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
- ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड