(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
अर्जदार यांचे पती कै.बाळु चिंधा देवरे यांचे दि.10/05/2009 रोजी मोटार सायकल अपघातात निधन झाले. अर्जदार यांना शेतकरी अपघात विमा योजनेप्रमाणे सामनेवाले यांनी लाभ न दिल्याने सदरचा अर्ज दाखल करावा लागलेला आहे. सबब अर्जदार यांना सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- व त्यावर जून 2009 पासून 15% व्याजदराने मिळावे, तसेच मानसिक,शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावेत या मागणीसाठी सदर अर्ज दाखल केलेला आहे.
सामनेवाला क्र.1 यांचेतर्फे अँड.एस.एस.गांगुर्डे हजर झाले. त्यांनी त्यांचा जबाब पान क्र.21 लगत व प्रतिज्ञापत्र पान क्र.22 लगत दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.2 त्यांचा पोष्टाद्वारे पाठवलेला जबाब प्राप्त झाला. तो पान क्र.18 लगत दाखल केलेला आहे.
अर्जदार यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र व त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
मुद्देः
1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय
2. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय? -- नाही.
3. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचनः
याकामी अर्जदार व सामनेवाले यांचा युक्तीवाद ऐकला.
महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरीता दि.12/8/2008 चे परिपत्रकाप्रमाणे शेतकरी व्यक्तीगत अपघात संरक्षण विमा योजना सुरु केलेली आहे. त्याचा कालावधी दि.15/8/2008 ते दि.14/8/2009 असा होता. सामनेवाले क्र.1 यांनी शेतकरी अपघात विमा योजना प्रस्ताव स्विकारलेला आहे.
सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे पोष्टामार्फत दाखल केले आहे. सदर जबाब पाहता त्यामध्ये सामनेवालेची भूमिका अत्यंत जुजबी आहे, यामध्ये शेतक-यांचा विमादावा अर्ज तहसिलदारांमार्फत आल्यावर दावा अर्ज योग्यपणे भरलेला आहे काय? सोबत जोडलेली कागदपत्रे मागणीप्रमाणे आहेत काय? नसल्यास तहसिलदार यांना कळवून त्यांची पूर्तता करवून घेणे, त्यानंतर विमा कंपनीकडे पाठविणे, विमा कंपनीकडे दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबंधीत वारसांना देणे ही कामे आहेत. यासाठी सामनेवाले हे राज्य शासन वा शेतकरी यांचेकडून कोणताही मोबदला घेत नाही असे नमूद आहे. याचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध्द नामंजूर करणेत यावा असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी जबाबात सदर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना नाकारलेली नाही. सदर पॉलिसी ही शेतक-यांकरीता विमा योजनेंतर्गत घेतलेली होती ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार हे मयत बाळु चिंधा देवरे यांच्या पत्नी आहेत
ही बाब सामनेवालेंनी नाकारलेली नाही. सामनेवाले यांचे लेखी म्हणणे व त्यामधील कथनावरुन अर्जदार हे मयत देवरे यांचे वारस म्हणून सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये घेतलेल्या बचावामध्ये, “अर्जदार हे सामनेवालेंचे ग्राहक नाहीत. मयत बाळु चिंधा देवरे हे शेतकरी नव्हते. सदर अपघाताचेवेळी मयत देवरे यांचे व्हॅलीड व इफेक्टीव्ह एम.डी.एल.रेकॉर्डवर असणे आवश्यक आहे. मयताचे योग्य असे एम.डी.एल.प्राप्त न झाल्यामुळे अर्जदाराचा दावा प्रलंबीत ठेवण्यात आला. मयताने आजपावेतो एम.डी.एल.सादर केलेले नाही. या कारणाने पॉलिसीच्या करारनाम्यातील शर्थीचा भंग झालेला आहे. त्यामुळे अर्जदार यांचा क्लेम नाकारलेला आहे. सबब अर्जदाराचा अर्ज रद्द करावा,” असे नमूद केलेले आहे.
अर्जदार यांनी अपघाताचेबाबत पोलिसांकडील कागदपत्रे दाखल केलेली आहेत. या कागदपत्रांमध्ये पान क्र.5 व 6 लगत दाखल खबर व फिर्याद मध्ये रस्त्यावर झालेल्या अपघातात मयत बाळु चिंधा देवरे यांचा मृत्यु झाला असल्याचे नमूद आहे. मयताचा पोष्ट मार्टेम रिपोर्ट पान क्र.9 लगत दाखल केलेला आहे. त्यामध्ये मयताच्या मृत्युचे कारण हे हेड अँण्ड माऊथ इन्ज्युरीने झाले असे नमूद केलेले आहे. यावरुन मयताचा मृत्यु हा अपघाताने झालेला आहे हे स्पष्ट होत आहे.
सदर अपघाताबाबत सामनेवाला यांनी असा बचाव घेतलेला आहे की, अर्जदार यांनी मयताचे मोटार ड्रायव्हींग लायसन्स दाखल केलेले नाही. अर्जदार यांनी मयत देवरे यांचेकडील मोटार सायकल चालवण्याचा परवान्याची झेरॉक्स प्रमाणीत प्रत पान क्र.26 वर सादर केलेली आहे. त्यावर मयताचे नाव असून त्या परवान्याचा कालावधी हा दि.06/03/2006 ते 31/03/2009 असा नमूद आहे. परंतु सदर कागदपत्राप्रमाणे परवान्याचा कालावधी हा दि.31/03/2009 रोजी संपुष्टात आलेला आहे व मयताने सदर परवान्याचे नुतनीकरण केलेले दिसत नाही. यावरुन मयत यांचा अपघात हा दिनांक दि.10/05/2009 रोजी झालेला असून अपघाताचे दिवशी मयताकडे मोटारसायकल चालविण्याचा वैध परवाना नव्हता ही बाब स्पष्ट झालेली आहे.
याबाबत सामनेवाला यांनी पान क्र.30 लगत शासन परीपत्रक दिनांक 29 मे 2009 चे दाखल केलेले आहे. सदर परीपत्रकाचा कालावधी हा 15 ऑगस्ट 2008 ते 14 ऑगस्ट 2009 असा नमूद आहे. या परीपत्रकातील अ.क्र.23(इ)(8) नुसार वाहन चालकाकडे वैध परवान्याची आवश्यकता आहे. या परीपत्रकाप्रमाणे मयताकडे वाहन चालवित असतांना वैध परवाना नव्हता ही बाब स्पष्ट झालेली आहे. याचा विचार होता अर्जदार हे सदर क्लेम मिळण्यास पात्र नाहीत. सबब सामनेवाला यांचे सेवेत कमतरता नाही असे या मंचाचे मत आहे.
अर्जदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाले क्र.1 यांचे लेखी म्हणणे, दाखल केलेली कागदपत्रे, वर उल्लेख केलेली व आधार घेतलेली वरिष्ठ कोर्टाची निकालपत्रे व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.