( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या)
आदेश
( पारित दिनांक : 15 नोव्हेबर, 2011 )
तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्तीचे म्हणण्यानुसार तक्रारकर्तीचे मयत पती हे तडस ठेकेदार यांचेकडे स्वच्छकाचे काम करीत होते. तडस ठेकेदार यांनी इंडोराम कंपनीचा तडस स्वच्छतेचा ठेका घेतला होता. त्याकामाकरिता मयत कृष्णा व इतर लोकांना नेमले होते. दिनांक 3.12.2004 रोजी मयत कृष्णा हा इंडोरामा कंपनीमधे स्वच्छतेचे काम करीत असतांना विद्युत धक्का लागुन जागीच मरण पावला. मृतक कृष्णा यांनी जीवंत असतांना गैरअर्जदार कंपनीकडे नागरी जीवन सुरक्षा नावाची पॉलीसी काढली होती व त्याचा 3 वर्षाचा कालावधी होता. सदर पॉलीसी ही दिनांक 19/12/2002 रोजी काढली होती व नॉमीनी मयताची पत्नी ललीता बहादुरे हिचे नाव नोंदविले होते. सदर पॉलीसीचा क्रमांक-73042/0290 असुन विमा दाव्यापोटी रुपये 1,60,000/- मिळणार होती. सदर तक्रारकर्तीने पॉलीसी अटी व शर्तीनुसार अपघाताची सुचना गैरअर्जदार यांना दिली. त्यांचे सुचनेनुसार तक्रारकर्तीने विमा दावा आवश्यक कागदपत्रासोबत गैरअर्जदार यांचेकडे पाठविला. गैरअर्जदारानी दिनांक 3/6/2006 रोजीच्या पत्राद्वारे केलेल्या मागणीनुसार तक्रारदाराने शवविच्छेदन अहवाल गैरअर्जदाराकडे सादर केला. दिनांक 4/4/2008 रोजी गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा तक्रारदार अपघाताचे वेळी दारुच्या नशेत होता या कारणास्तव नाकारला. ही गैरअर्जदाराचे सेवेतील कमतरता आहे म्हणुन तक्रारकर्तीने ही तक्रार दाखल करुन विमा दावा रक्कम रुपये 1,60,000/-, 12 टक्के द.सा.द.शे व्याजासह मिळावी. मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळावा अशी मागणी केली.
सदर प्रकरणात तक्रारदाराने तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब माफ करण्याचा अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज दिनांक 19/7/2010 रोजीचे आदेशान्वये मंजूर करण्यात आला व तक्रार ग्रा.स.का.1986 चे कलम 12 प्रमाणे नोंदविण्यात आली.
यात गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदार यांचे मते सदर तक्रार कालमर्यादेत नाही. तसेच तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. कारण शवविच्छेदन अहवालानुसार मृतक हा दारुच्या नशेत होता हे सिध्द झाले म्हणुन विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे सदरचा दावा बसत नसल्यामुळे दिनांक 4/4/2008 रोजी तो नाकारण्यात आला. यामधे गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस कुठलीही सेवेतील कमतरता दिली नाही म्हणुन तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी केलेली आहे
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्तऐवज यादीनुसार 12 कागदपत्रे दाखल केलीत. गैरअर्जदाराने आपला जवाब प्रतिज्ञालेखवर दाखल केला व कागदपत्रे दाखल केलीत. उभयपक्षकारांचा युक्तिवाद ऐकला.
-: का र ण मि मां सा :-
निर्वीवादपणे प्रकरणातील एकंदरीत वस्तुस्थिती व दस्तऐवज पाहता या मंचाचे असे निदेशनास येते की, तक्रारकर्तीचे मयत पती कृष्णा बहादुरे यांनी जनता वैयक्तिक अपघात पॉलीसी घेतली होती. त्याचा कालावधी 30/12/2002 ते 29/12/006 होता व विमा रक्कम 1,00,000/- मिळणार होती. त्याचप्रमाणेदाखल दस्तऐवजावरुन हे निर्देशनास येते की, पॉलीसीच्या वैध कालावधीमधे दिनांक 3.12.2004 रोजी तक्रारकर्तीच्या पती यांचा मृत्यु झाला होता. गैरअर्जदार यांचे मते अपघाताचे वेळी मयत दारुच्या नशेत होता. त्यामुळे सदरचा दावा पॉलीसीच्या अटी व शर्तीत बसत नाही. यासाठी त्यांनी शवविच्छेदन अहवालाचा आधार घेतला.वास्तवीक सदर अहवालात मृत्युचे कारणासमोर “ opinion reserved, waiting for chemical analysis and histopathology report ” अशी नोंद दिसुन येते. कागदपत्र क्रं.7 वरील Department of Forensic Medicine and Toxicology, Government Medical College and Hospital,Nagpur. यांचे अहवालामध्ये मृत्युचे कारण “ Autopsy findings are consistent with that of death due to electrocution ”. असा असुन हे पाहता तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा विजेच्या धक्का लागल्याने झाला हे सिध्द होते. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचे पती अपघाताचे वेळी दारुच्या नशेत होता या अयोग्य कारणास्तव विमा दावा नाकारला ही गैरअर्जदार यांचे सेवेतील कमतरता आहे. म्हणुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस विमा दाव्यापोटी रुपये 1,00,000/- द्यावे. सदर रक्कमेवर विमा दावा नाकारला त्या तारखेपासुन म्हणजेच तक्रार दाखल दिनांक 4/4/2008 पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो द.सा.द.शे 9 टक्के दराने व्याज द्यावे.
3. गैरअर्जदाराने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी व दाव्याच्या खर्चापोटी रुपये 5,000/- द्यावे.
3.वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.