(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौ.जागीरदार, सदस्या)
(पारीत दिनांक– 21 सप्टेंबर, 2019)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं- 1 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि इतर विरुध्द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्याचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती ही उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून, तिचे पती मृतक श्री रमेश देवराव गायधने हे व्यवसायाने शेतकरी होते व त्याचे मालकीची शेत जमिन ही मौजा- खुशारी तहसिल मोहाडी, जिल्हा भंडारा, येथे भुमापन क्रं 785 या वर्णनाची शेत जमीन होती.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचा पती नामे श्री रमेश देवराव गायधने यांचा दिनांक-15.06.2008 रोजी अपघातात मृत्यु झाला. यातील विरुध्दपक्ष क्रं- 1 ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-2) तहसिलदार असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीच्या पतीचा रुपये-1,00,000/- एवढया रकमेचा विमा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे काढण्यात आला असल्याने ती पत्नी या नात्याने कायदेशीर वारसदार म्हणून “लाभार्थी” आहे. पतीचे मृत्यू नंतर तिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-2 तहसिलदार, तहसिल कार्यालय मोहाडी, तहसिल मोहाडी, जिल्हा भंडारा यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्ताव दाखल केला होता. विरुध्दपक्षाने ज्या दस्ताऐवजाची मागणी केली त्या दस्ताऐवजांची पुर्तता तक्रारकर्तीने केली होती. तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना तिचा प्रस्ताव प्राप्त होवूनही त्यांनी सदर दाव्याचे भुगातान न करता तक्रारकर्तीचा विमा दावा विनाकारण प्रलंबित ठेवून तिची फसवणूक केली ही विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे तकारकर्तीला दिलेली दोषपूर्ण सेवा असून, त्यामुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारकर्तीने वकीलामार्फत कायदेशीर नोटीस दिनांक 20/11/2018 रोजी पाठविली. सदर नोटीसला विरुध्दपक्षाने उत्तरही दिलेले नाही, म्हणून शेवटी तिने प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्षां विरुध्द ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा कडून विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- प्रस्ताव सादर केल्याच्या दिनांकापासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह मिळावी तसेच तिला झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 20,000/- आणि तक्रार खर्च रुपये-10,000/- अशा रकमांची मागणी विरुध्दपक्षा विरुध्द केलेली आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने आपले लेखी उत्तर अभिलेखावर पान क्रं 60 ते 62 वर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरात असे नमुद केले की, मृतक श्री रमेश देवराव गायधने हा शेतकरी होता व त्याचा दिनांक 15/06/2008 रोजी ट्रॅक्टर अपघातात मृत्यु झाला होता याबाबत वाद नाही. परंतु घटनेच्या वेळी तक्रारकर्तीचा पती ट्रॅक्टरच्या चाकाच्या मडगार्डवर बसून जात होता, सदरचे त्याचे कृत्यू गैरकायदेशीर आणि मोटर वाहन नियमांचे उल्लंघन करणारे असल्यामुळे विमा दावा देय होत नाही. सदरची बाब पोलीस दस्तऐवज जसे घटनास्थळ पंचनामा, प्रत्यक्षदर्शी बयानात नमुद केलेली आहे. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक 28/01/2009 रोजी नामंजूर केल्याचे पत्र रजिष्टर पोस्टाद्वारे तक्रारकर्तीला पाठवून तसे कळविले होते. तक्रारकर्तीने विमा दावा 1 वर्षाच्या आंत दाखल करायला पाहिजे होता, परंतु 09 वर्षानंतर प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे ती कालमर्यादेच्या बाहेर असल्यामुळे खारीज होण्यास पात्र असल्याचे नमुद केले.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 तहसिलदार, तहसिल कार्यालय मोहाडी, जिल्हा भंडारा यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्याने त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 23/04/2019 रोजी पारीत करण्यात आला.
05. तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं- 09 नुसार एकूण-10 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये शेतकरी अपघात योजना शासन निर्णय, तहसिलदार मोहाडी यांनी कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस नागपूर यांना दिनांक-13.08.2008 रोजी विमा दावा सादर केल्याचे पत्र, 7/12 उतारा, मृत्यूचे प्रमाणपत्र, मृतकाचे ओळखपत्र, पोलीस दस्तऐवज एफआयआर, इन्क्वेस्ट पंचनामा, शव विच्छेदन अहवाल, विरुध्द पक्षाला पाठविलेली कायदेशीर नोटीस व पोस्टाची पावती अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं- 57 वर तक्रारकर्तीने दाखल केलेल्या तक्रार अर्जाला शपथेवरील पुरावा समजण्यात यावा अशी पुरसिस दाखल केली असून, पृष्ट क्रं-64 व 65 नुसार तक्रारकर्तीने लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
06. विरुध्दपक्ष क्रं- 1 विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर अभिलेखावरील पान क्रं 60 ते 62 वर दाखल केले. तसेच पुराव्याचे शपथपत्र पृष्ठ क्रं- 58 व 59 वर दाखल केले.
07. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र, विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर व शपथपत्र तसेच उभय पक्षाने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचा तर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री देवेद्र हटकर आणि विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती निला नशिने यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
08. तक्रारकर्तीचा पती शेतकरी होता, त्याचा शेतकरी अपघात विमा योजने मध्ये समावेश होता व तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यु दिनांक-15.06.2008 झाला या बाबी उभय पक्षांमध्ये विवादास्पद नाहीत.
09. विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने मंचासमक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात, असे नमुद केले आहे की, मृतक श्री रमेश देवराव गायधने हा शेतकरी होता व त्याचा दिनांक 15/06/2008 रोजी ट्रॅक्टर अपघातात मृत्यु झाला होता याबाबत वाद नाही. परंतु घटनेच्या वेळी तक्रारकर्तीचा पती ट्रॅक्टरच्या चाकाच्या मडगार्डवर बसून जात होता, सदरचे त्याचे कृत्यू गैरकायदेशीर आणि मोटर वाहन नियमांचे उल्लंघन करणारे असल्यामुळे विमा दावा देय होत नाही. सदरची बाब पोलीस दस्तऐवज जसे घटनास्थळ पंचनामा यामध्ये नमुद केलेली आहे. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक 28/01/2009 रोजी नामंजूर केल्याचे पत्र रजिष्टर पोस्टाद्वारे तक्रारकर्तीला पाठवून तसे कळविले होते. तक्रारकर्तीने विमा दावा 1 वर्षाच्या आंत दाखल करायला पाहिजे होता, परंतु 09 वर्षानंतर प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे ती कालमर्यादेच्या बाहेर असल्यामुळे खारीज होण्यास पात्र असल्याचे नमुद केले.अपघात विमा योजना सन-2007-08 अंतर्गत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा काढला होता या बाबी प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांवरुन सिध्द होतात आणि या बाबी प्रकरणातील उभय पक्षांना मान्य आहेत, त्या बाबत विवाद नाही.
10. महाराष्ट्र शासनाचे दिनांक-24 ऑगस्ट, 2007 रोजीचे परिपत्रका अनुसार शेतकरी अपघात विमा योजना-2007-2008 या वर्षा करीता राबविली होती आणि त्यामध्ये अपघाती मृत्यू आल्यास संबधित शेतक-याचे वारसदारांना रुपये-1,00,000/- विमा संरक्षण देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने स्विकारलेली होती.
11. सदर प्रकरणांत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीच्या लेखी उत्तरानुसार तक्रारकर्तीने वि.प.क्रं 2 कडे आवश्यक सर्व दस्तऐवजांसह विमा दावा एक वर्षाच्या आत सादर करावयास हवा होता. तक्रारकर्तीने तिच्या पतीच्या मृत्युपासून 09 वर्षानंतर तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने नियम व अटीचे आधिन राहून तक्रारकर्तीचा विमा दावा मोटर वाहन कायद्यातील तरतुदीचा भंग झाला असल्याचे कारणावरुन नामंजूर केला ही त्यांची कृती कायदेशीर आहे असे विमा कंपनीचे म्हणणे आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रं. 1 यांनी वर्णन यादीतील पृष्ठ क्रं. 68 वर तक्रारकर्तीला रजिस्टर पोस्टाने पत्र पाठविल्याची प्रत दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीने नऊ वर्षा नंतर प्रस्तुत ग्राहक तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे, त्यामुळे ती मुदतबाहय असल्याने खारीज होण्यास पात्र असल्याचे नमुद केले. परंतु तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, तिचा विमा दावा नामंजूर झाल्या बाबतचे पत्राची प्रत तिला विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून प्राप्त झालेली नाही. तक्रारकर्तीने घेतलेल्या सदर आक्षेपा बाबत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने कोणताही लेखी पुरावा ज्यामध्ये दावा नामंजूर केल्याचे पत्र तक्रारकर्तीला मिळाले असल्या बाबत रजि. पोच इत्यादी प्रकरणात दाखल केलेली नाही.
12. या संदर्भात ग्राहक मंचा तर्फे खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयावर भिस्त ठेवण्यात येत आहे-
Hon’ble N.C.D.R.C. New-Delhi-Revision Petition No.-1179 of 2015 Decided on-01st December, 2015-“Divisional Manager, Oriential Insurance Company-Versus-Damni & 2 others.
उपरोक्त नमुद आदरणीय राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात स्पष्टपणे नमुद केलेले आहे की, विमा दावा नाकारल्याचे दिनांका पासून मुदत सुरु होते. आमचे समोरील प्रकरणात विमा दावा नाकारल्याचे पत्र तक्रारकर्त्याला दिल्या बाबतचा कोणताही पुरावा विरुध्दपक्ष विमा कंपनीने दाखल केलेला नसल्याने सदर न्यायनिवाडा आमचे समोरील प्रकरणात अंशतः लागू होतो असे आमचे मत आहे.
13. दुसरी बाब अशी आहे की, विरुध्दपक्ष विमा कंपनीने घटनेच्या वेळी तक्रारकर्तीचा पती ट्रॅक्टरच्या चाकाच्या मडगार्डवर बसून जात होता, सदरचे त्याचे कृत्यू गैरकायदेशीर आणि मोटर वाहन नियमांचे उल्लंघन करणारे असल्यामुळे विमा दावा देय होत नाही असे कारण दर्शवून तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक-21.01.2009 रोजीचे पत्रान्वये नामंजूर केला. पोलीस स्टेशन मोहाडी, तहसिल मोहाडी, जिल्हा भंडारा यांनी नोंदविलेला एफ.आय.आर.प्रत पान क्रं 25 ते 27 वर दाखल आहे. पोलीसांचे क्राईम डिटेल फॉर्म मध्ये असे नमुद आहे की, फीर्यादी ब्रम्हानंद रामचंद्र भुरे वाहन चालक याने पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की, दिनांक-15.06.2008 रोजी दहेगाव मार्गे मोहगाव येथे फीर्यादी वाहनचालक हा ट्रक्टर क्रमांक-MH-36/D-8688 चालवित होता व त्याचे सोबत रमेश गायधने (मृतक विमाधारक) होता परंतु मागाहून येणारा ट्रक क्रं-MH-40/6981 च्या चालकाने लापरवाहीने वाहन भरधाव वेगाने चालवून ट्रॅक्टरला धडक मारली व रमेश गायधने हा गंभिर जख्मी झाला, त्या प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.
14. पोलीस दस्तऐवजांवरुन असा निष्कर्ष निघतो की, घटनेच्या वेळी मृतक विमाधारक श्री रमेश गायधने हा ट्रॅक्टर चालवित नव्हता तर घटनेच्या वेळी ट्रॅक्टर हा श्री ब्रम्हानंद रामचंद्र भुरे हा वाहन चालक चालवित होता आणि मागाहून येणा-या ट्रक चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून मृतक विमाधारक बसलेल्या ट्रॅक्टरला धडक मारली आणि विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला. यामध्ये विमाधारक हा घटनेच्या वेळी प्रत्यक्ष ट्रॅक्टर चालवित होता असे कुठेही पोलीस दस्तऐवजा मध्ये नमुद नाही. दुसरी बाब अशी आहे की, दुस-या ट्रकच्या चालकाचे निष्काळजीपणामुळे सदर अपघात घडलेला आहे, यामध्ये मृतक विमाधारकाची अपघाताचे वेळी कोणतीही चुक होती असे ग्राहक मंचाला दिसून येत नाही.
15. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे दिनांक-28.01.2009 रोजीचे पत्रात असे नमुद केलेले आहे की, उपरोक्त मयत श्री रमेश देवराम गायधने यांचा मृत्यू ट्रॅक्टरवर बसून जात असताना दुस-या वाहनाने धडक दिल्यामुळे झाला पण ट्रॅक्टरवर बसून प्रवास करणे मोटर वाहन कायद्याचा भंग असल्यामुळे हा दावा या पॉलिसी अंतर्गत देय नसल्यामुळे तो अस्विकृत करुन फाईल बंद करीत आहे.
16. विमाधारकाचा विमा दावा नामंजूरीचे संदर्भात प्रस्तुत ग्राहक मंच हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना शासन निर्णय दिनांक 24 ऑगस्ट, 2007 जे अभिलेखावरील पान क्रं 10 ते 17 वर दाखल आहे, त्यामध्ये मुद्या क्रं-क मध्ये नमुद केल्या प्रमाणे काही अटी नमुद केलेल्या आहेत, त्या खालील प्रमाणे आहेत-
अट क्रं- (4) अपघातग्रस्त वाहनचालकाचे चुकीमुळे शेतक-याचा मृत्यू झाल्यास/अंपगत्व आल्यास, दोषी वाहन चालक वगळता सर्व शेतक-यांना प्रपत्र ड मध्ये नमुद केलेल्या बाबीमुळे मृत्यू/अपंगत्व आल्यास केवळ अपघात झाला या कारणास्तव नुकसान भरपाई दावे मंजूर करण्यात येतील.
अट क्रं-(5) अपघाती मृत्यू संदर्भात दुर्घटना घडल्याचे सिध्द झाल्यास अनावश्यक धोका पत्करला या कारणास्तव एकही प्रकरण नाकारता येणार नाही असे स्पष्टपणे नमुद आहे.
हातातील प्रकरणात मृतक विमाधारक हा घटनेच्या वेळी वाहन चालवित नव्हता ही बाब पोलीस दस्तऐवजा वरुन सिध्द होते तसेच दुर्घटना घडल्याचे सिध्द झाल्यास अनावश्यक धोका पत्करला या कारणास्तव एकही प्रकरण नाकारता येणार नाही असे स्पष्टपणे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रका मध्ये नमुद आहे. महाराष्ट्र शासनाचे सदरचे परिपत्रक हे विशेषत्वे करुन शेतकरी अपघात विमा योजने संबधीचे आहे त्यामुळे त्यामधील तरतुदी सदर प्रकरण गुणवत्तेवर निकाली काढण्यासाठी योग्य आहेत. ईतर कोणत्याही कायद्यातील तरतुदींचा येथे विचार करण्याची ग्राहक मंचाला येथे आवश्यकता वाटत नाही.
17. याशिवाय तक्रारकर्तीचे वकीलांनी या संदर्भात खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडयांवर आपली भिस्त ठेवली-
- Hon’ble High Court at Bombay Appellate Side Bench At Aurangabad Writ Petition No. 10185 of 2015 with Civil Application No.-12687of 2016-Decided on-06/03/2019- “Latabai wd/o Raosaheb Deshmukh-Versus-State of Maharashtra & others”
सदर मा.उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडयाचे आम्ही वाचन केले असता मृतक विमाधारकाचा मृत्यू हा त्याचे निषकाळजीपणाने झाल्याचे दिसून येत नसल्याने विमारक्कम देय आहे असे स्पष्ट नमुद केले आहे.
- Hon’ble State Commmission, Circuit Bench Nagpur-FA No-205/2013,decided on-24/04/2017-“National Insurance Company-Versus-Smt. Sushila Dnyneshwarrao Bobade & others”
मा.राज्य ग्राहक आयोग, खंडपिठ नागपूर यांचे अपिलीय प्रकरणात अपिलार्थी विमा कंपनीने मूळ तक्रारकर्तीला तिचा विमादावा नामंजूरझाल्या बाबत रजिस्टर पोस्टाने कळविल्या बाबत रजि.पोस्टाची पोच पुराव्या दाखल सादर केलेली नसल्याने तक्रारीचे कारण हे तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करे पर्यंत सतत घडत असल्यामुळे मुदतीची बाधा येत नाही असे स्पष्टपणे नमुद केले आहे.
उपरोक्त नमुद मा.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे हातातील प्रकरणात लागू पडतात असे ग्राहक मंचाचे मत आहे.
18. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ती ही तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- तक्रार दाखल दिनांक-20/12/2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीकडून मिळण्यास पात्र आहे. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीकडून तक्रारकर्तीला मंजूर करणे योग्य व न्यायोचित आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(2) तहसिलदार, तहसिल कार्यालय, मोहाडी, तहसिल मोहाडी, जिल्हा भंडारा यांनी दोषपूर्ण सेवा दिली असे तक्रारकर्तीचे म्हणणे नाही त्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
19. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
:: आदेश ::
(01) तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी, नागपूर यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष 1 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त) तक्रार दाखल दिनांक-20/12/2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्तीला द्यावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं. 1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष -(2) तहसिलदार, तहसिल कार्यालय, मोहाडी, जिल्हा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने न केल्यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्ये नमुद केलेली देय विमा राशी मुदती नंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्याजासह तक्रारकर्तीला देण्यास विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी जबाबदार राहिल.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.