जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 144/2010. तक्रार दाखल दिनांक : 29/03/2010. तक्रार आदेश दिनांक : 11/02/2011. सौ. प्रभावती दगडू डोंगरे, वय 40 वर्षे, व्यवसाय : शेती व दुग्ध, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि., 15 ए.डी. कॉम्प्लेक्स, पहिला मजला, माऊंट रोड, सदर नागपूर - 440 001. (नोटीस विभागय व्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि., बाळीवेस, चाटी गल्ली, सोलापूर यांचेवर बजावण्या यावी.) 2. जैका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि., जैका बिल्डींग, सिव्हील लाईन्स, नागपूर - 440 001. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : श्री. एम.बी. अनपट विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : श्री. जी.एच. कुलकर्णी आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी शेतीसह पुरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकरिता जर्सी गाई, म्हशी व इतर गाई सांभाळलेल्या आहेत. त्यांच्याकडील एका जर्सी होस्टर्न गाईचा विरुध्द पक्ष क्र.1 (संक्षीप्त रुपामध्ये विमा कंपनी) यांच्याकडे दि.26/3/2008 रोजी रु.30,000/- चा दि.26/3/2008 ते 25/3/2011 या कालावधीकरिता विमा उतरविला आहे. विमा कंपनीचे गाईच्या कानामध्ये बिल्ला क्र.एस.ओ.एल.पी.नं.108233 बसविला होता. सदर बिल्ला हरविला आणि विमा कंपनीस कळविल्यानंतर बिल्ला क्र.एस.ओ.एल.पी. नं.119020 हा दुसरा बिल्ला बसविण्यात आला. तक्रारदार यांची गाय आजारी पडून उपचारादरम्यान दि.12/10/2008 रोजी मृत्यू पावली आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी क्लेम फॉर्मसह कागदपत्रे सादर करुनही त्यांना विमा रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे रु.30,000/- विमा रकमेसह त्यावरील व्याज, दुधाचे नुकसान, खर्च, मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई इ. अशी नुकसान भरपाई विरुध्द पक्ष यांच्याकडून वसूल होऊन मिळावी, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र शासनाच्या पशुधन विमा योजनेंतर्गत तक्रारदार यांनी प्रस्ताव सादर केल्यानुसार त्यांनी कव्हरनोट नं.108233, दि.26/3/2008 नुसार तक्रारदार यांच्या गाईस विमा संरक्षण दिलेले आहे. गाय दि.12/10/2008 रोजी मृत्यू पावली आहे. नुकसानीची सूचना मिळताच त्यांनी तक्रारदार यांच्याकडून पोस्टमार्टेम रिपोर्ट, पी.एम. पावती, खरेदी पावती व इतर कागदपत्रे मागविली. तक्रारदार यांनी त्यांच्याकडे काही कागदपत्रे दाखल केली, परंतु मूळ विमा पॉलिसी, खरेदी पावती, रु.50/- ची पी.एम. पावती, दूध संस्थेचे प्रमाणपत्र व मयत गाईचे फोटो दाखल केले नाहीत. त्यांच्या कार्यालयाने सर्व कागदपत्रांची छाननी केली असून तक्रारदार यांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे विमा रक्कम देय होऊ शकत नाही. तक्रारदार यांची तक्रार रद्द होण्यास पात्र असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या गाईचा विमा कंपनीकडे दि.26/3/2008 रोजी कव्हरनोट नं.108233 नुसार रु.30,000/- चा दि.26/3/2008 ते 25/3/2011 या कालावधीकरिता विमा उतरविल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांनी क्लेम सादर केला असता त्यांना विमा रक्कम देण्यात आल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, तक्रारदार यांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे विमा रक्कम देय होऊ शकत नसल्याचे विमा कंपनीने नमूद केले आहे. 5. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर क्लेम फॉर्म, ट्रीटमेंट सर्टिफिकेट, वेर्टनरी सर्टिफिकेट, पोस्टमार्टेम रिपोर्ट, पंचनामा, सरपंच दाखला, शवविच्छेदन फी पावती, विमा पॉलिसी इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदर कागदपत्रांवरुन तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावलेली असतानाही विमा कंपनीने तक्रारदार यांच्या क्लेमबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन विमा क्लेम सेटल करण्यास विमा कंपनी कशी असमर्थ ठरते ? याचे उचित स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. आमच्या मते, सदर कागदपत्रे तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे सिध्द करण्यास पुरेशी आहेत. वरील सर्व विवेचनावरुन विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम अत्यंत तांत्रिक व अनुचित कारणास्तव नाकारुन सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदार हे विमा रक्कम रु.30,000/- तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र ठरतात, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. 6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम रु.30,000/- तक्रार दाखल दि.29/3/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी नमूद मुदतीच्या आत उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तेथून पुढे देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने द्यावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) ( सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/4211)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |