( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आदेश
( पारित दिनांक : 08 फेब्रुवारी, 2012 )
तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
यातील तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द अशी आहे की, महाराष्ट्र सरकारने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना राबविली व विमा कंपनीशी करार करुन विमा हप्त्याचा भरणा केला आहे. त्यामध्ये शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्यास त्यास अपघाती विमा रक्कम रुपये 1,00,000/- मिळण्याची व्यवस्था आहे. सदर विमा गैरअर्जदार क्रं.1 यांचेकडे नोंदविण्यात आलेला आहे. तक्रारकर्ता हा मृतक सखुबाई कुसन मंदीरकर हिचा पती असुन सदर शेती हि मृतकाला आईवडीलाकडुन मिळालेली होती. त्यांची शेती मौजा–सोनेगाव, तालुका–कुही, जिल्हा – नागपूर शेत क्रं.153, आराजी 1.20 हे.आर.ही होती. तक्रारकर्ताच्या पत्नीचे दिनांक 04/9/2008 रोजी 11 वाजताचे सुमारास शेतात काम करीत असतांना मनगटाला साप चावल्याने उमरेड येथे प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तिला मेडीकल हॉस्पीटल नागपूर येथे उपचाराकरिता पाठविले असता दुपारी 3.50 वाजता तिचा मृत्यु झाला. त्यानंतर तक्रारकर्त्याने नुकसान भरपाई मिळावी यासाठी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करुन, साक्षांकीत करुन अर्ज तलाठी मार्फत तहसील कार्यालय कुही येथे सादर केला व दिनांक 17/11/2008 रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविला. गैरअर्जदाराने वेळोवेळी मागणी केलेल्या कागदपत्रांची पुर्तता केली. दिनांक 7/1/2011 रोजी अर्जदाराला बचत भवन येथे शिबीरामध्ये कागदपत्रांची मागणी केली असता अर्जदाराने जवळ असलेले 7/12 उतारा, गाव नमुना 6-ड, 6-क, ची मुळप्रत सादर केली. त्यापत्रात विसेरा रिपोर्ट अर्जदाराला मागण्यात आला होता. परंतु पोलीस स्टेशन उमरेड मधुन व्हिसेरा रिपोर्टची प्रत मिळालेली नाही. त्यामुळे अर्जदार ते सादर करु शकला नाही. महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्युचे कारण स्पष्ट केले असेल तर व्हिसेरा रिपोर्टची देण्याची आवश्यकता नाही. असे असुन देखिल गैरअर्जदाराने तक्रारदाराचा दावा नाकारला व शेवटपर्यत त्यांना विमा दावा रक्कम देण्यात आली नाही. म्हणुन तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन, विमा रक्कम रुपये 1,00,000/- व त्यावर 15 टक्के दराने व्याज मिळावे. मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- व दाव्याचा खर्चापोटी रुपये 5,000/- मिळावे अशी मागणी केली.
तक्रारकर्त्याने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार एकुण 14 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात गाव नमुना 7/12, फेरफार पत्रक,गाव नमुना 6 क , नमुना 7/12, नमुना 6 क, ओळखपत्र, मरणान्वेषण प्रतिवृत्त, मर्ग रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्युचा दाखला, तहसिदारचे पत्र, जिल्हा अधिक्षकाचे पत्र, कायदेशीर नोटीस, इत्यादी कागदपत्रे दाखल केलीत.
यात गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले नाही व आपला लेखी जवाब दाखल केला नाही. म्हणुन प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
तक्रारकर्त्यातर्फे वकील श्री प्रकाश नौकरकर यांचा युक्तिवाद एैकला. गैरअर्जदार गैरहजर.
-: का र ण मि मां सा :-
यातील दोन्ही गैरअर्जदार हे मंचासमक्ष हजर झाले नाही आणि तक्रारदाराच्या तकारीतील बाबी त्यांनी कोणताही बचाव घेऊन खोडुन काढल्या नाहीत. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन सोबत आवश्यक ते दस्तऐवज दाखल केले आहे. त्या दस्तऐवजांचे अवलोकन करता तक्रारीतील तक्रारदाराचा मुत्यृ सर्पदंशाने झालेला आहे याबाबी तक्रारदाराने सिध्द केल्या आहेत. गैरअर्जदाराने विसेरा रिपोर्टची केलेली मागणी ही चुकीची आहे कारण शवविच्छेदन अहवालात मृतक हा कसा मृत्यु पावला हे स्पष्ट केले आहे. अशाप्रकारे गैरअर्जदाराने तक्रारदारास विम्याची रक्कम न देणे ही त्यांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे म्हणुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा दाव्यापोटी रुपये 1,00,000/- अदा करावे. सदर रक्कमेवर दिनांक 17/11/2008 नंतर 2 महिन्यांपासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे 9 टक्के दराने व्याज द्यावे.
3. मानसिक व शरिरिक त्रासापोटी रुपये 10,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रुपये 2,000/- गैरअर्जदार क्रं.1 ने तक्रारकर्त्यास द्यावे.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार क्रं. 1 यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे न पेक्षा ते 9 टक्क्याऐवजी 12 टक्के व्याज देय ठरतील