आदेश पारित द्वारा मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक 1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विम्याची रक्कम मिळण्यासाठी दाखल केली आहे. 2. तक्रारकर्तीचे पती श्री. गोविंदा नकटू सोनवाने, राह. मडेघाट, जिल्हा भंडारा हे शेती व्यवसाय करीत होते व ते कुटुंबप्रमुख होते. ते दिनांक 08/08/2009 रोजी रोवणीच्या कामाने शेतावर गेले असतांना पाण्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यु झाला. श्री. दयाराम वलथरे यांनी लाखांदूर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. त्यावरून अकस्मात मृत्यु क्रमांक 31/09 अन्वये घटनेची नोंद करून मृतकाच्या शरीराचे शवविच्छेदन करून तपास करण्यात आला. श्री. गोविंदा सोनवाने यांच्या मालकीची मौजा मडेघाट येथे गट क्रमांक 449, 450, 451 व 455 एकूण आराजी 2.65 हे.आर. शेत जमीन होती. त्यांच्या मृत्युनंतर सदर शेत जमीन त्यांची पत्नी/तक्रारकर्ती व 2 मुलींच्या नावाने सात बारा रेकॉर्डला लागली. 3. पतीच्या अपघाती मृत्युनंतर तक्रारकर्तीने तालुका कृषि अधिकारी, लाखांदूर यांच्यामार्फत शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा याकरिता रितसर अर्ज व संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून विरूध्द पक्ष 3 यांच्यामार्फत पुढील कार्यवाहीस पाठविला. परंतु सदर योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे तिने विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात तक्रारी केल्या. विरूध्द पक्ष 3 यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल केलेली आहे. 4. तक्रारकर्तीने तक्रारीमध्ये विमा लाभ रक्कम रू. 1,00,000/- व्याजासह तसेच तक्रारीचा खर्च मिळण्याची विनंती केलेली आहे. तक्रारकर्तीने दस्तऐवजांच्या यादीप्रमाणे अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 7 ते 46 पर्यंत दस्तऐवज दाखल केलेले आहेत. 5. मंचाची नोटीस विरूध्द पक्ष यांना प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांचे लेखी उत्तर दाखल केलेले आहे. विरूध्द पक्ष क्र. 2 चे लेखी उत्तर पोष्टाद्वारे प्राप्त झाले आहे. विरूध्द पक्ष 1 चे म्हणणे आहे की, विरूध्द पक्ष क्र. 2 कडून म्हणजेच कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा. लि. यांच्याकडून त्यांना तक्रारकर्तीचा दावा अर्ज प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कागदपत्रांच्या अभावी व दावा अर्ज प्राप्त न झाल्यामुळे विरूध्द पक्ष 1 यांनी विमा दावा मंजूर करण्याचा वा नामंजूर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष 1 यांच्या सेवेत त्रुटी वा निष्काळजीपणा नाही. विरूध्द पक्ष 1 चे पुढे असेही म्हणणे आहे की, विरूध्द पक्ष 2 यांच्यामार्फत संपूर्ण कागदपत्र विरूध्द पक्ष 1 यांना आजही पाठविल्यास ते या दाव्याबाबत विचार करू शकतील. कारण शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत दावा अर्ज संपूर्ण कागदपत्रांसह विरूध्द पक्ष 2 यांच्याकडून विरूध्द पक्ष 1 यांना प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यामुळे विरूध्द पक्ष 2 यांना निर्देश देण्यात यावे की, सदर दाव्याची संपूर्ण कागदपत्रे ताबडतोब दाव्याबाबत विचार करण्यासाठी विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे पाठविण्यात यावीत. 6. विरूध्द पक्ष क्र. 2 चे म्हणणे आहे की, मयत गोविंदा सोनवाने यांचा अपघात दिनांक 08/08/2009 ला झाला. परंतु सदरील प्रस्ताव आमच्या कार्यालयास प्राप्त न झाल्याने आम्ही या प्रस्तावाबाबत काहीही सांगण्यास असमर्थ आहोत. 7. विरूध्द पक्ष क्र. 3 यांना मंचाची नोटीस पाठवूनही ते गैरहजर राहिले तसेच त्यांनी त्यांचे लेखी उत्तर सुध्दा दाखल केलेले नाही. 8. तक्रारकर्तीची तक्रार, विरूध्द पक्ष 1 व 2 यांचे लेखी उत्तर, लेखी युक्तिवाद यावरून मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो. तक्रारकर्त्यांची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? -ः कारणमिमांसा ः- 9. तक्रारकर्तीने संपूर्ण कागदपत्रांसह विमा प्रस्ताव विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे सादर केला हे तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजावरून स्पष्ट होते. विरूध्द पक्ष 3 यांनी तक्रारकर्तीचा दावा अर्ज दस्तासह जिल्हा कृषि अधिकारी, भंडारा यांच्याकडे सादर केला हे सुध्दा स्पष्ट आहे. तक्रारकर्तीने जिल्हा कृषि अधिकारी, भंडारा यांना तक्रारीत विरूध्द पक्ष म्हणून समाविष्ट केलेले नाही. जिल्हा कृषि अधिकारी यांच्याच मार्फत विमा प्रस्ताव कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस कंपनी यांना पाठविण्यात येतो. 10. सदर प्रकरणात क्लेम फॉर्म भाग-3 पृष्ठ क्रमांक 13 वर दाखल केलेला आहे. ज्यामध्ये कबाल इन्शुरन्स ला दिनांक 06/11/2009 ला मुळ दावा अर्ज, तलाठ्याचे प्रमाणपत्र, अपघाताचे अनुषंगाने आवश्यक कागदपत्र (क्लेम फॉर्म 3 व 4 चे सहपत्रात उल्लेखित) 06/11/2009 ला प्राप्त म्हणून स्वाक्षरी आहे. शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांचे कर्तव्य व जबाबदारी यामध्ये, "विमा सल्लागार कंपनीचे प्रतिनिधीस कार्यालयात जागा उपलब्ध करून देणे" याचा उल्लेख आहे. म्हणजेच जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात विमा सल्लागार कंपनी म्हणजे कबाल इन्शुरन्स चे प्रतिनिधी हजर असतात. त्यामुळे तालुका कृषि अधिकारी, लाखांदूर यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात तक्रारकर्तीचा विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह सादर केल्यावर त्याचवेळी तिथे त्यांच्या कार्यालयात उपस्थित असलेल्या विमा सल्लागार कंपनीच्या म्हणजेच विरूध्द पक्ष 2 यांच्या प्रतिनिधीनी तो प्राप्त केला. त्यामुळे तक्रारकर्तीचा विमा प्रस्ताव विरूध्द पक्ष 2 यांच्या कार्यालयास प्राप्त झाला नाही हे विरूध्द पक्ष 2 यांचे म्हणणे मान्य करता येत नाही. शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा सल्लागार कंपनीच्या मार्फतच विमा कंपनीकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्याची तरतूद आहे. तक्रारकर्तीने विमा प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे मुदतीमध्ये सादर केल्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी ही महसूल यंत्रणा, विमा सल्लागार यंत्रणा व विमा कंपनी यांची असते. तसेच विमा कंपनी/विमा सल्लागार कंपनीकडून दावे मंजुरी/नामंजुरीबाबतची प्राप्त माहिती तालुका कृषि अधिकारी यांना देण्याची जबाबदारी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांची आहे. तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 3 यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधून तिच्या विमा प्रस्तावाबाबत माहिती मागितल्यावर त्यांनी ती माहिती दिली नाही. शिवाय मंचाची नोटीस प्राप्त झाल्यावरही ते गैरहजर राहिले तसेच उत्तर सुध्दा दाखल केले नाही. 11. विरूध्द पक्ष 1 यांनी मान्य केले आहे की, विरूध्द पक्ष 2 मार्फत कागदपत्रांसह आजही विमा प्रस्ताव त्यांच्या कार्यालयास प्राप्त झाल्यास ते त्याबाबत निर्णय घेऊ शकतील. करिता आदेश. आदेश 1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. विरूध्द पक्ष 3 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी पुन्हा संपूर्ण प्रस्ताव कागदपत्रासहित योग्य त्या यंत्रणेच्या माध्यमातून पाठवावा. 3. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |