जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 774/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-23/06/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 11/09/2013.
सुभाष विष्णू गोसावी,
रा.दामजी नगर, भडगांव रोड,पाचोरा,
ता.पाचोरा,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
ब्रँच मॅनेजर,
दि.ओरिएंटल इंश्योरेन्स कंपनी लि,
सेंट्रल फुले मार्केट,जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.महेंद्र सोमा चौधरी वकील.
विरुध्द पक्ष तर्फे श्री.आर.व्ही.कुलकर्णी वकील.
निकालपत्र
श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः अपघातातील वाहनाचा विमा क्लेम न देऊन विरुध्द पक्षाने केलेल्या सेवेतील त्रृटीदाखल प्रस्तुत तक्रार तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदाराच्या मालकीची टाटा पॅसिओ डिझेलवर चालणारी लाईट मोटार वाहन क्र.एम.एच.19/ए ई-1992 असुन सदरचे वाहन सुस्थितीत होते. तक्रारदाराने सदर वाहनाचा प्रायव्हेट कार पॅकेज पॉलीसी कव्हरनोट क्र.1193378 , विमा पॉलीसी क्र.162500/06/3717 अन्वये दि.12/10/2005 ते दि.11/10/2006 पर्यंत विरुध्द पक्ष विमा कंपनीकडुन विमा उतरविला होता. सदरचे विमाकृत वाहन कंरजीहून शुरुड चौफुलीकडे दि.4/8/2006 रोजी जात असतांना साके शिवारात नागेश्वर फाटयाजवळ वळणावर रात्री 9.30 ते 10.00 चे सुमारास पलटी होऊन पुर्वेस खडयात पडली. सदर अपघातात वाहनाचे खुप मोठे नुकसान झाले. अपघाताची पारोळा पोलीस स्टेशनला रितसर नोंद होऊन अपघातात वाहनाचे इंजिनचे तसेच टोटल शो व फ्रेमचे खुप मोठे नुकसान झाले. वाहन चालकावर भा.दं.वी 304 अ, 279,337,338 या कलमाखाली गुन्हा नोंद झाला. योग्य त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर विमा कंपनीने अगोदर तक्रारदारास वाहन दुरुस्त करुन घेण्याबाबत कळविले तथापी तक्रारदाराकडे एवढी मोठी रक्कम नसल्याने तसेच सदर वाहनाचे कर्जाचे व्याजाचे हप्ते आजही चालु असल्याने तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. सबब सदर वाहनाची नुकसान भरपाई रु.3,00,000/- देण्याचे आदेश व्हावेत, सर्व्हेअरने केलेला रिपोर्ट विमा कंपनीने दाखल करण्याचे आदेश व्हावेत, तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.50,000/-, वकील फीचे रु.5,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या.
4. विरुध्द पक्षाने याकामी हजर होऊन तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडुन वाहनाचा विमा काढला होता तसेच सदर वाहनास दि.4/8/2006 रोजी अपघात होऊन नुकसान भरपाई मिळावी म्हणुन तक्रारदाराने क्लेम फॉर्म भरला तथापी नुकसान भरपाई मिळणेसाठी तक्रारदार यास आलेल्या प्रत्यक्ष खर्चाची बिले त्यांनी सादर करणे आवश्यक असतांनाही तक्रारदाराने ती सादर केलेली नाही त्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारदारास दि.11/9/2007 रोजी पत्र देऊन मागणी केली तरी देखील तक्रारदाराने अद्यापपावेतो पुर्तता केलेली नाही त्यामुळे सर्व्हेअर यांना फायनल सर्व्हे करता आलेला नाही. तक्रारदार हे स्वतः कागदपत्रांची पुर्तता करुन देण्यास तयार नाहीत. तक्रारदार हे क्षमतेपेक्षा जादा प्रवासी बसवुन वाहन चालवित होते तसेच सदरचे वाहन हे भाडयाने दिलेले होते या कारणामुळे विमा शर्त भंग झालेला आहे. विरुध्द पक्षाने प्राथमीक सर्व्हे केलेला असुन तक्रारदाराने दुरुस्तीचे बिले दिलेले नसल्याने फायनल सर्व्हे करता आलेला नाही त्यामुळे अशा परिस्थितीत काही झाले तरी सदर सर्व्हे रिपोर्ट नुसार नमुद केलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम मंजुर करण्यात येऊ नये. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी व नुकसानी दाखल तक्रारदाराकडुन रु.10,000/- मिळावेत अशी विनंती विरुध्द पक्षाने केलेली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्द पक्षा चे लेखी म्हणणे, व तक्रारदाराचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
6. मुद्या क्र.1 - तक्रारदाराची तक्रार व त्यासोबत दाखल कागदपत्रे तसेच विरुध्द पक्ष इंन्शुरन्स कंपनीचे म्हणणे इत्यादीचे बारकाईने अवलोकन करता तक्रारदाराच्या वाहनाची विमा पॉलीसी कव्हरनोट क्र.1193378 अन्वये दि.12/10/2005 ते दि.11/10/2006 या कालावधीत विमा पॉलीसी उतरविली होती व सदर विमाकृत वाहन क्र.एम.एच.19/ए ई 1992 यास दि.4/8/2006 रोजी अपघात होऊन त्यात त्याचे फार मोठे नुकसान झाले या बाबी वादातीत नाही तसेच विरुध्द पक्षाने त्या नाकारलेल्या नाहीत. दोन्ही पक्षांमध्ये वादाचा मुद्या एवढाच आहे की, विमाकृत वाहनाची अपघातात नुकसान झालेली भरपाई विमा कंपनीने न दिल्याने तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केला. याउलट तक्रारदाराने प्रत्यक्ष खर्चाची बिले सादर केलेली नसल्याने फायनल सर्व्हे अभावी विमा क्लेम देणे अशक्य असल्याचे विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे. तक्रारदाराचे वकीलांनी या मंचासमोरील युक्तीवादामध्ये तक्रारदाराकडे पुरेशे पैसे नसल्याने तो अपघातातील विमाकृत वाहनाची दुरुस्ती करु शकला नाही असे प्रतिपादन केलेले असुन विमा कंपनीने विमा क्लेम मंजुर केला असता तर तक्रारदाराने वाहनाची दुरुस्ती करुन त्याचा वापर केला असता असे नमुद केलेले आहे. तसेच विरुध्द पक्ष विमा कंपनीने लेखी म्हणण्यातुन शेवटी विकल्पेकरुन सर्व्हे रिपोर्ट नुसार नमुद असलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम मंजुर करण्यात येऊ नये असेही नमुद केलेले आहे. उपरोक्त दोन्ही बाजुंचे म्हणणे व एकंदर परिस्थितीचा विचारात घेता तक्रारदाराचे वाहनाचे अपघातात फार मोठे नुकसान होऊनही त्याने केवळ दुरुस्तीची बिले विरुध्द पक्षाकडे दाखल न केल्याने त्याचा विमा क्लेम तसाच प्रलंबीत ठेवुन विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदारास प्रदान करावयाच्या सेवेत त्रृटी केली असल्याचे निष्कर्षाप्रत हा मंच आलेला आहे. सबब मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7. मुद्या क्र. 2- तक्रारदाराने त्याचे तक्रार अर्जातुन वाहनाची नुकसान भरपाई रु.3,00,000/- देण्याचे आदेश व्हावेत, सर्व्हेअरने केलेला रिपोर्ट विमा कंपनीने दाखल करण्याचे आदेश व्हावेत, तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.50,000/-, वकील फीचे रु.5,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळावेत अशी विनंती केलेली आहे. तक्रारदाराने त्याचे नुकसान भरपाईचे मागणी पुष्ठयर्थ तज्ञ इंजिनिअर्सचा पुरावा किंवा तज्ञ मेकॅनिकचा अहवाल दाखल केल्याचे दिसुन येत नाही. उलटपक्षी विरुध्द पक्ष विमा कंपनीने त्यांचे म्हणण्यासोबत श्री.पी.के.राठी, सर्व्हेअर यांचा अहवाल दाखल केलेला असुन सदर अहवालानुसार नमुद रक्कम देण्यास त्यांची हरकत नसल्याचे लेखी म्हणण्यातुन कबुल केलेले आहे. सबब तक्रारदार हा विरुध्द पक्ष विमा कंपनीचे सर्व्हेअरने निश्चित केलेली नुकसान भरपाई रक्कम रु.1,00,945/- तक्रार अर्ज दाखल दि.23/06/2009 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे. तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.4,000/- मिळण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) विरुध्द पक्ष विमा कंपनी यांना असे निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास वाहनाचे नुकसान भरपाई दाखल एकुण रक्कम रु.1,00,945/- (अक्षरी रक्कम रु.एक लाख नऊशे पंचेचाळीस मात्र ) तक्रार दाखल दि. दि.23/06/2009 पासुन ते प्रत्यक्ष अदा करेपावेतोचे तारखेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह तक्रारदार यांना या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
( क ) विरुध्द पक्ष विमा कंपनी यांना असे निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास झालेल्या शरिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 25,000/- (अक्षरी रक्कम रु.पंचवीस हजार मात्र ) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.4,000/-(अक्षरी रक्कम रु.चार हजार मात्र ) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 11/09/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.