जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 1558/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 16/10/2009
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 16/03/2012
राशिद खॉं लतीफ खॉं शिकलकर, .......तक्रारदार
उ.व.सज्ञान धंद ड्रायव्हर,
रा. इस्लामपूर पोलिस लाईनच्या मागे,
अमळनेर ता.अमळनंर जि.जळगांव.
विरुध्द
1. ओरिएन्टल इन्शोरन्स कंपनी लि.,
तर्फे शाखा प्रबंधक, .....विरुध्दपक्ष
के.एम.भावसार, शाळा क्र.9 चे समोर, गल्ली क्र.5,
धुळे ता.जि.धुळे.
2. ओरिएन्टल इन्शोरन्स कंपनी लि.
तर्फे शाखा प्रबंधक,
सेंटल फुले मार्केट, तिसरा मजला,
जळगांव ता.जि.जळगांव.
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.सलिम आय शेख.
विरुध्दपक्षा तर्फे अड. आर.व्ही.कुलकर्णी.
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष ः तक्रारदार यांचा विमा दावा अयोग्य कारण देऊन नाकारला म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी टाटा मॅटेडोअर 407 क्र.एम.एच.08, एच 4788 हे वाहन उदरनिर्वाहासाठी घेतले आहे. त्याचा विमा विरुध्दपक्ष ओरिएंटन इन्शोरन्स कंपनी लि (यापुढे संक्षिप्ततेसाठी विमा कंपनी असे संबोधण्यात येईल) कडुन दि.14/01/2008 रोजी घेतला होता. दि.12/04/2008 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर भंडारा येथुन नागपुर-अमरावती मार्गे जात असतांना त्यास अपघात झाला. त्यात तक्रारदार जखमी झाला व त्यास 47 टक्के अपंगत्व आले. औषधोपचारासाठी त्यांना रु.1,00,000/- खर्च झाला व दरमहा रु. 5 ते 7 हजार खर्च चालू आहे.
3. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, अंपगत्व आल्यामुळे तो कायमच वाहन चालवू शकणार नाही. सदर अपघात त्याच्या चुकीमुळे झालेला नाही. विमा असल्यामुळे त्यांनी विमा कंपनीकडे दावा दाखल केला असता विमा कंपनीने रक्कम देण्यास टाळाटाळ केली आहे व दि.04/05/2009 रोजी रक्कम देण्याचे नाकारले आहे व सेवेत त्रुटी केली आहे.
4. तक्रारदार यांनी विमा कंपनीकडुन रक्कम रु.2,50,000/- मानसिक त्रासापोटी रु.15,000/-, खर्च रु.10,000//- व त्यावर 12 टक्के दराने व्याज मिळावे अशी विनंती केली आहे.
5. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.2 वर शपथपत्र तसेच नि.4 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार 2 कागदपत्रे तसेच नि.17 वर पुराव्याचे शपथपत्र व 3 न्यायीक दृष्टांत दाखल केले आहेत.
6. विमा कंपनीने आपले लेखी म्हणणे नि.16 वर दाखल करुन तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे त्यामुळे ती अमान्य केली आहे. तक्रारदार यांनी विमा पॉलिसी घेतल्याबाबत त्यांनी मान्य केले आहे. परंतु खर्च,लायसन्स इ. तक्रारदाराने सिध्द करावे असे म्हटले आहे. तक्रारदार यांची मागणी ही त्यांनी नाकारली आहे.
7. विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, विमा पॉलिसीनुसार मालकाचा वैयक्तिक अपघात विमा रु.104/- भरुन काढण्यात आला होता. त्यानुसार विम्यापोटी जास्तीत जास्त रु.2,00,000/- ची जोखीम विमा कंपनीनची असते. विम्यानुसार विमेदारास मरण आल्यास अथवा 100 टक्के विकलांगता आल्यास त्याप्रमाणे रक्कम देय होते. परंतु तक्रारदार यांना फक्त 47 टक्के विकलांगता आली आहे त्यातही त्यांचा एखादा अवयव पुर्णपणे निकामी झालेला नाही त्यामुळ तक्रारदार विम्याची रक्कम मिळणेस पात्र नाही. त्यामुळे तक्रारअर्ज रद्य करावा.
8. विमा कंपनीने आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.17 वर शपथपत्र,नि.21 वर लेखी युक्तीवाद आणि नि.23/1 वर पॉलिसीच्या नियम व अटींची प्रत दाखल केली आहे.
9. तक्रारदार यांची तक्रार विमा कंपनीचा खुलासा व दाखल कागदपत्रांवरुन आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्ये. उत्तर.
1. विरुध्दपक्ष यांनी विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
2. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतीम आदेशाप्रमाणे
3. आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
विवेचन
10. मुद्या क्र. 1 – तक्रारदार यांच्या गाडीचा विमा होता व गाडीच्या अपघातामध्ये तो जखमी झाला याबद्यल फारसा वाद नाही. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पायास मार लागल्यामुळे ता 47 टक्के विकलांग झाला आहे त्यामुळे तो वाहन चालवण्यास कायमचा असमर्थ झालेला आहे. त्यामुळे तो विमा पॉलिसीनुसार रक्कम रु.2,50,000/- मिळण्यास पात्र आहे. विमा कंपनीने विमा पॉलिसीनुसार मृत्यु झाल्यास 100 टक्के रक्कम मिळू शकते किंवा एखादा अवयव पुर्णपणे निकामी झाल्यास त्याप्रमाणात रक्कम मिळू शकते. परंतु तक्रारदाराचे अपंगत्व फक्त 47 टक्के आहे व ते ही फक्त खांदयात व गुडघ्यात वाकण्यात आले आहे त्यामुळे तक्रारदार रक्कम मिळण्यास पात्र नाही. या संदर्भात विमा पॉलिसीच्या अटी काय आहेत हे पाहणे या ठिकाणी आवश्यक ठरते. सदर अटीची प्रत नि.23/1 वर आहे. त्यात खालील प्रमाणे तरतुद आहे.
1. विमेदाराचा मृत्यु झाल्यास - 100 टक्के
2. दोन अवयव निकामी झाल्यास – 100 टक्के
3. एक अवयव निकामी झाल्यास – 50 टक्के
4. जखमांमुळे कायमचे अपंगत्व आल्यास – 100 टक्के
वरिल तरतुदी पाहता तक्रारदार यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र पहाता तक्रारदार यांना 47 टक्के अपंगत्व आल्याचे नमुद आहे. त्यांच्या उजवा हात व कंबरमध्ये अपंगत्व आल्याचे त्यात नमुद आहे. तक्रारदार हे वाहन चालवण्यास असमर्थ आहेत असे सदर प्रमाणपत्रावरुन दिसुन येते
11. त्यामुळे तक्रारदार सदर जखमेमुळे वाहन चालवण्यास असमर्थ आहेत असे आम्हास वाटते. त्यामुळे तक्रारदार यांचे अपंगत्व व त्यांचा व्यवसाय पाहता त्यांना वरील अट क्र. 3 नुसार एक अवयव निकामी झाला आहे असे दिसुन येते.
या संदर्भात आम्ही पुनमभाई खोडभाई परमार विरुध्द जी.केनेल कंन्स्ट्रक्शन व इतर 1984 एजीजे 739 या निवाडयाचास आधार घेत आहोत. त्यामध्ये मे.गुजरात उच्च न्यायालयाने असे मत व्यक्त केले आहे की, Permanent total disablement is to be judged form the point of view of the job which the workman was doing and if the disablement renders him unfit to do that job, the disablement is total and not partial. त्यामुळे विमा कंपनीने त्यांना पॉलिसीनुसार विम्याचे लाभ देणे आवश्यक होते. सदर लाभ देण्याचे नाकारुन विमा कंपनीने सेवेत त्रुटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणुन मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
12. मुद्या क्र. 2 – तक्रारदार यांनी पॉलिसीनुसार रक्कम रु.2,00,000/- ची मागणी केली आहे तसेच मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व खर्च रु.10,000/- ची मागणी केली आहे. परंतु तक्रारदार यांनी घेतलेल्या पॉलिसीच्या नियम व अटी पाहता तक्रारदार हे फक्त 50 टक्के रक्कम मिळण्यास पात्र आहेत. त्यामुळे विमा कंपनीने त्यांना रक्कम रु.1,00,000/- द्यावेत तसेच मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.1,000/- द्यावेत असा आदेश करणे आम्हास योग्य व न्यायाचे वाटते.
13. मुद्या क्र.3 – वरिल विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश.
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
2. दि.ओरिएन्टल इन्शोरन्स कंपनीने तक्रारदार यांना रक्कम रु.1,00,000/- या आदेशाच्या प्राप्ती पासुन 30 दिवसांचे आत द्यावेत.
3. दि.ओरिएन्टल इन्शोरन्स कंपनीने तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्ती पासुन 30 दिवसांचे आत द्यावेत.
4. दि.ओरिएन्टल इन्शोरन्स कंपनीने तक्रारदार यांना वरिल मुदतीत रक्कम न दिल्यास तक्रारदार सदर रक्कमेवर दि.04/05/2009 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र राहतील
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव) (श्री.डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव