निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 30/03/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 05/04/2011 तक्रार निकाल दिनांकः-13/10/2011 कालावधी 06 महिने 08 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सिंधुताई भ्र.राजाभाऊ वाघ. अर्जदार वय 30 वर्ष.धंदा.घरकाम व शेती. अड.एल.एम.वानखेडे. रा.पोखर्णी ता.जि.परभणी विरुध्द 1 ओरियंटल इन्शुरन्स कं. गैरअर्जदार. शाखा व्यवस्थापक. अड.जी.व्ही.नरवाडे. दौलत बिल्डींग.शिवाजी चौक.परभणी. 2 एस.डी.जाधव. अड.बी.एम.कुलकर्णी. मु.पो.आडगांव.खांडागळयाचे, ता.वसमत.हिंगोली. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) अर्जदाराच्या पतीचा मृत्यू विमा दावा फेटाळून गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदाराकडून पॉलिसी क्रमांक 30598/1 दिनांक 14/01/2005 ते दिनांक 13/01/2009 रु.7,500/- भरुन घेतलेली होती. व ती रु.3,00,000/- ची होती.दिनाक 20/03/2006 रोजी अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला.त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराच्या एजंटला पतीच्या मृत्यूची बातमी कळवली व त्याने गैरअर्जदाराच्या मुख्य शाखेस ही क्लेमची माहिती कळवली आहे.असे अर्जदारास सांगीतले व अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदाराकडे क्लेमची मागणी केली पण त्यांनी दिनांक 15/02/2011 रोजी पत्र पाठवुन अर्जदाराचा क्लेम नाकारला म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. व पॉलिसी रक्कम रु.3,00,000/- दिनांक 20/03/2006 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजाने मिळावी व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- मिळावेत.अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत तिचे शपथपत्र, इन्शुरंसचे प्रमाणपत्र, क्लेमफॉर्म, गैरअर्जदारांशी झालेला पत्रव्यवहार, पोस्टमार्टेम रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा, मृत्यूचा दाखला,इ. कागदपत्र दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्याच्या लेखी जबाबात जनता पर्सनल अक्सीडेंट पॉलिसी मध्ये मृताच्या नातेवाईकांनी गैरअर्जदारास मृत्यूनंतर 30 दिवसाच्या आत कळवणे जरुरी आहे.अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दिनांक 20/03/2006 रोजी झाला व गैरअर्जदाराला अर्जदाराने घटनेनंतर सोडतीन वर्षांनी म्हणजे दिनांक 15/10/2009 रोजी कळवले.म्हणून सदरील विमा दावा फेटाळण्यात आला.तसेच अर्जदाराच्या पतीचा मृत्यू अपघाती नसुन त्याने आत्महत्या केलेली आहे.दिनाक 20/03/2006 रोजी बाळासाहेब वाघ यांनी दैठणा पोलिस स्टेशनला दिलेल्या खबरीनुसार अर्जदाराच्या पतीने आत्महत्या केली आहे.असे म्हंटले आहे.म्हणून सदरील घटना ही पॉलिसीच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे.म्हणून अर्जदाराची तक्रार ही खर्चासहीत फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने केलेली आहे.गैरअर्जदाराने लेखीजबाबासोबत त्याचे शपथपत्र, अकस्मात मृत्यू रिपोर्ट व खबर ही कागदपत्र दाखल केलेली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी गैरअर्जदार क्रमांक 2 ला दिलेली होती व तो अर्जदाराचा नातेवाईक आहे हे म्हणणे नाकारले आहे.तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 च्या मार्फत विमा काढल्याचेही त्याने नाकारले आहे.म्हणून त्याच्या विरुध्दची तक्रार फेटाळण्याची विनंती त्याने केलेली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र दिलेले आहे. तक्रारीत दाखल कागदपत्र व वकिलांच्या युक्तीवादा वरुन तक्रारीत निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थीत होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास तक्रार मुदतीच्या कालावधीत आहे काय ? नाही. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदाराकडून पॉलिसी क्रमांक 30598/1 दिनांक 14/01/2005 ते दिनांक 13/01/2009 या कालावधीसाठी घेतलेली होती ही बाब सर्वमान्य आहे.अर्जदाराच्या पतीच्या मृत्यूनंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विमा दावा दाखल केला,परंतु त्यांनी दिनांक 15/02/2011 रोजी पत्र (नि.4/1) पाठवुन विमा दावा फेटाळला म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.असे अर्जदाराचे म्हणणे आहे.परंतु अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पतीच्या मृत्यूनंतर विमा दावाच उशीरा दाखल केला जो गैरअर्जदाराला दिनांक 15/10/2009 रोजी मिळाला हे नि.4/16 वरील गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराला पाठवलेल्या पत्रावरुन सिध्द होते हे पत्र अर्जदारानेच तक्रारीत दाखल केलेले आहे.म्हणजे अर्जदाराने दिनांक 20/03/2006 रोजी झालेल्या पतीनिधनानंतर साडेतीन वर्षां नंतर विमा दावा गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाखल केलेला आहे. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 24 II अन्वये. 1) जिल्हा मंच - राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग यांनी कोणताही तक्रार अर्ज, अर्जास कारण घडल्यापासून 2 वर्षाच्या आत सादर केलयाशिवाय तो दाखल करुन घेण्यात येवु नये. 2) पोट कलम 2 मध्ये काहींही नमुद केले असले तरी पोट कलम (1) मध्ये नमुद केलेल्या मुदतीत जर तक्रार अर्ज दाखल करण्यात आला नाही,परंतु तक्रारकर्त्याने जिल्हा मंच, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग यांच्याकडे पुरेशा करणामुळे विहित केलेल्या मुदतीत तक्रार अर्ज सादर करता आला नाही याबाबतीत त्यांची खात्री पटवली तर मुदतीनंतरही तक्रार अर्ज दाखल करुन घेता येईल,परंतु जिल्हा मंच, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग यांना विलंब माफीची कारणे नमुद करावी लागतील. सदरील प्रकरणात घटना घडल्यापासून साडेतीन वर्षानंतर गैरअर्जदाराकडे विमा दावा दाखल करण्यात आला व गैरअर्जदाराने विमा दावा फेटाळल्याचे पत्र (नि.4/16) दिनांक 09/12/2009 रोजी अर्जदाराला पाठवले.त्यानंतर अर्जदाराने दिनांक 30/03/2011 रोजी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.म्हणजे घटना घडल्यानंतर पाच वर्षांनी तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणात उशीर माफीचा अर्जही नाही किंवा मुदतीनंतर तक्रार का दाखल करण्यात आली याची कारणेही दिलेली नाहीत.म्हणून सदरील तक्रारीस मुदतीची बाधा येते. अर्जदाराची तक्रार मुदतीत दाखल केलेली नसल्यामुळे खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे. 2 तक्रारीचा खर्च अर्जदार व गैरअर्जदाराने आपापला सोसावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |