जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन.
----------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १९१/२०११
तक्रार दाखल दिनांक – १६/०९/२०११
तक्रार निकाली दिनांक – ०१/०१/२०१३
श्री. तुषार पुंडलीक जाधव
उ.वय - २६ वर्षे, धंदा - शिक्षण,
रा.-३४, शंकर पांडू माळी नगर,
शिरपूर जि.धुळे. ............ तक्रारदार
विरुध्द
१. दि. ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनी लि.
म. शाखाधिकारी
दि. ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनी लि.
शाखा कार्यालय के.एम. भवसार कॉम्लेक्स,
गल्ली नं.५ ता.जि.धुळे. ...........विरुध्द पक्ष
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड. के.आर. लोहार)
(विरुध्दपक्ष तर्फे – अॅड. अनिल बी. देशपांडे)
निकालपत्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांचा विमा दावा अयोग्य कारण देऊन नाकारून विमा कंपनीने सेवेत त्रृटी केली म्हणुन तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी नवकार व्हील्स यांचेकडून रक्कम रू.३९,२५०/- ला हिरो होंडा प्लस ही मोटार सायकल खरेदी केली. त्याचा नोंदणी क्रं. एम.एच.-१८ वाय/९४७३ आहे. सदर गाडीची दि.१६.११.०९ ते १५.११.१० या कालावधीसाठी विरूध्द पक्ष दि. ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनी लि. (यापुढे संक्षिप्तेसाठी विमा कंपनी असे संबोधण्यात येईल) यांचेकडून विमा पॉलीसी घेतली होती. परंतु विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसी दि.३०/०८/११ रोजी दिली.
३. तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की दि.२०.०७.१० रोजी रात्री ९ ते दि.२१.०७.१० रोजी सकाळी ५ वाजण्याचे दरम्यान सदर विमा असलेली मोटारसायकल चोरी गेली. त्याची फिर्याद शिरपूर पोलीस स्टेशनला देण्यात आली व विमा कंपनीस ही कळवले. तक्रारदार व पोलीसांनी बराच तपास केला परंतु वाहन सापडले नाही. त्यामुळे तक्रारदाराने दि.०५/०८/१० रोजी रितसर क्लेम सादर केला. त्यानंतर विमा कंपनीने काही कागदपत्रांची मागणी केली त्याची ही पुर्तता केली. परंतु विमा कंपनीने दि.०८/०८/११ रोजी पत्र देऊन विमा दावा अयोग्य कारण देऊन नाकारला व सेवेत त्रृटी केली.
४. तक्रारदार यांनी शेवटी विमा कंपनीस गाडीची किंमत व त्यावर १८% दराने व्याज, मानसीक त्रासापोटी रू.२५,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.५,०००/- देण्याचा आदेश करावा अशी विनंती केली आहे.
५. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.३ वर शपथपत्र तसेच नि.५ वरील कागपत्रांच्या यादीनुसार ९ कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.५/१ वर चलन, नि.५/२ वर विमा पॉलीसी, नि.५/३ वर कव्हर नोट, नि.५/४ वर फिर्याद, नि.५/६ वर क्लेम फॉर्म, नि.५/७ वर कंपनीचे पत्र, नि.५/८ वर तक्रारदाराचे पत्र आणि नि.५/९ वर विमा दावा नाकारल्याचे पत्र दाखल केले आहे.
६. विमा कंपनीने आपला खुलासा नि.९ वर दाखल करून तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे, त्यांत करण्यात आलेली मागणी करता येत नाही, त्यामुळे ती रदद करावी अशी विनंती केली आहे.
७. विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की विमा पॉलीसीच्या अटीनुसार वाहन चोरीस गेल्यास वाहनाची माहीती/ सुचना ४२ तासाच्या आत विमा कंपनीस देणे बंधनकारक आहे. परंतु तक्रारादार यांनी १५ दिवसानंतर सदर सुचना दिलेली आहे. त्यामुळे विमा पॉलीसीच्या अटीचा भंग झाला आहे. म्हणुन तक्रारदार कोणतीही रक्कम मिळण्यास पात्र नाही. तशी माहीती तक्रारदारास देण्यात आली आहे, त्यात सेवेत त्रृटी केलेली नाही.
८. विमा कंपनीने आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.१३ वर शपथपत्र दाखल केले आहे
९ तक्रारदार यांची तक्रार, विमा कंपनीचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दे उत्तर
१ विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन
सेवेत त्रुटी केली काय? होय.
२ तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
३ आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
१०. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी आपल्या मोटारसायकल क्र. MH-18/ Y-9473 चा दि.१६.११.०९ रोजी विमा कंपनीकडून विमा घेतला होता व सदर गाडी दि.२०.०८.२०१० रोजी चोरीस गेली, याबदृल वाद नाही. तक्रारदार यांच्या महणण्यानुसार त्यांना विमा पॉलीसी ही दि.३०.०८.११ रोजी देण्यात आली. तसेच गाडी चोरी गेल्यामुळे त्यांनी दाखल केलेला विमा दावा विमा कंपनीने चुकीचे कारण देऊन दि.०८/०८/२०११ रोजी नाकारला आहे व सेवेत त्रृटी केली आहे.
११. विमा कंपनीने आपल्या खुलाशामध्ये म्हटले आहे की विमा पॉलीसीच्या अटीनुसार वाहन चोरीस गेल्यास वाहनाची माहीती/ सुचना ४२ तासाच्या आत विमा कंपनीस देणे बंधनकारक आहे. परंतु तक्रारादार यांनी १५ दिवसानंतर सदर सुचना दिलेली आहे. त्यामुळे विमा पॉलीसीच्या अटीचा भंग झाला आहे. म्हणुन तक्रारदार कोणतीही रक्कम मिळण्यास पात्र नाही. तशी माहीती तक्रारदारास देण्यात आली आहे, त्यात सेवेत त्रृटी केलेली नाही.
१२. आम्ही तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. त्यात नि.५/३ वर कव्हर नोट आहे. त्यामध्ये ४८ तासात विमा कंपनीस कळवणे आवश्यक असल्याचा उल्लेख नाही. तक्रारदार यांनी विमा पॉलीसी कंपनीने त्यांना ३०.०८.२०११ रोजी दिल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. या संदर्भात विमा कंपनीने सदर पॉलीसी तक्रारदारास कव्हर नोट घेतल्यानंतर कधी पाठवली होती याचा पुरावा दाखल केलेला नाही किंवा त्याची तारीख दिलेली नाही. त्यामुळे विमा पॉलीसीमध्ये असलेल्या अटींची तक्रारदारास माहीती होती असे म्हणता येणार नाही. त्या अटींची माहीती तक्रारदारास देण्यात आली नाही त्या अटींच्या आधारे विमा कंपनीस विमा दावा नाकारता येणार नाही असे आम्हास वाटते. तक्रारदार यांची गाडी चोरी गेल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याचे नि.५/४ वरील फिर्यादीवरून दिसुन येते. पोलीसांनी तात्काळ तपास सुरू केल्याचे दिसुन येते. यावरून तक्रारदाराने तात्काळ गाडीच्या शोधासाठी कार्सवाही केल्याचे दिसुन येते. त्यामुळे विमा पॉलीसीच्या अटीचा तांत्रीक दृष्टया भंग झाला आहे हे मान्य केले तरी विमा कंपनीच्या हक्कास कुठल्याही प्रकारे बाधा आलेली नाही असे आम्हास वाटते.
१३. मा. राष्ट्रीय आयोग व मा. सर्वोच्च न्यायालय यांनी अनेक न्यायीक दृष्टांतांमध्ये तांत्रीक कारणे देऊन विमा दावे नाकारू नयेत असे तत्व विषद केलेले आहे.
१४. या संदर्भात आम्ही खालील न्यायीक दृष्टांतांचा आधार घेत आहोत.
(1)मा.सर्वोच्च न्यायालय 2010 CTJ 485 Amaindo Sahoo V/s Oriental Insurans Co.Ltd.
(2)मा.सर्वोच्च न्यायालय B.V.Nagaraju V/s M/S.Oriental Insurance Co.Ltd.Divisional Office Hassan 1996 (2) T.A.C.429 (S.C.)
(3)मा.सर्वोच्च न्यायालय National Insurance Company Ltd. V/s Nitin Khandelwal 2008 CTJ 680.
१५. यावरून विमा कंपनीने तक्रारदार यांचा दावा चुकीचे कारण देऊन नाकारला आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१६. मुद्दा क्र.२- तक्रारदार यांनी विमा कंपनीकडून गाडीची किंमत व त्यावर १८% दराने व्याज, मानसीक त्रासापोटी रू.२५,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.५,०००/- देण्याचा आदेश करावा अशी विनंती केली आहे. तक्रारदार यांची गाडी १६.११.०९ रोजी खरेदी केलेली असल्यामुळे व चोरी दि.२०/०७/१० रोजी झालेली असल्यामुळे घसारा कमी करता येणार नाही परंतु मा. राष्ट्रीय आयोग यांनी IV(2010)CPJ297, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. विरूध्द कमल सिंघल या न्यायीक दृष्टांतामध्ये नमुद केल्यानुसार नॉन स्टॅंण्डर्ड तत्वावर एकूण रक्कम रूपये ३९,२५०/- च्या ७५% रक्कम रूपये २९,४३७/- व त्यावर विमा दावा नाकारल्याची तारीख दि.०८.०८.०९ पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.१०००/- मिळणेस पात्र आहेत.
१७. मुद्दा क्र.३ - वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. विरुध्द पक्ष दि. ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनी लि. यांनी तक्रारदारास रक्कम रूपये २९,४३७/- व त्यावर विमा दावा नाकारल्याची तारीख दि.०८.०८.०९ पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज या आदेशाच्या प्राप्ती पासून ३० दिवसाच्या आत द्यावेत.
३. विरुध्द पक्ष दि. ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनी लि. यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.१०००/- या आदेशाच्या प्राप्ती पासून ३० दिवसाच्या आत दयावेत.
(सौ.एस.एस.जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.