निकालपत्र
(1) अध्यक्ष,श्री.डी.डी.मडके – विरुध्दपक्ष यांनी सेवेत त्रृटी केली म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, महाराष्ट्र शासनाने शेतक-यांना नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यु आल्यास शासन निर्णय क्र./शेअवि 2009/प्र.क्र.268/11-अे दि.12 ऑगष्ट 2009 अन्वये विमा योजना कार्यान्वीत केली आहे. त्यासाठी शासनाचे सल्लागार म्हणून कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि.मुंबई यांची नेमणूक केली आहे. ही योजना दि.15 ऑगष्ट 2009 ते 14 ऑगष्ट 2010 या कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे.
(3) तक्रारदारांचे पती किशोर राजधर भामरे हे दि.26-10-2009 रोजी त्यांचे शेतातील विहिरीत पडुन बुडुन मरण पावले. त्याबाबत सोनगीर पोलीस स्टेशनला अ.मृत्यु.र.नं.31/2009 अन्वये सी.आर.पी.सी. कलम 174 प्रमाणे खबर दाखल आहे.
(4) तक्रारदारांचे पती शेतकरी होते व त्यांचे नांवे मेहेरगांव येथे गट क्र.353/1 क्षेत्र 73 आर होते. त्यामुळे तक्रारदारांनी त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यु झाल्यामुळे शासनाच्या शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव दि.03-05-2010 रोजी तालुका कृषी अधिकारी धुळे यांच्याकडे दाखल केला. त्यांनी तो विमा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचेकडे पाठविला. परंतु विरुध्दपक्षाने अद्याप पावेतो विमा रक्कम रु.1,00,000/- दिलेली नाही. त्यामुळे त्यांना सदर तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे.
(5) तक्रारदार यांनी शेवटी विरुध्दपक्ष यांचेकडून विमा रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.-2010 पासून द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे व्याज मिळावे, नुकसान भरपाईपोटी रु.25,000/- मिळावेत, सेवेतील कमतरतेबद्दल रु.20,000/- मिळावेत, तक्रार अर्जाच्या खर्चाचे रु.5,000/- मिळावेत व इतर योग्य व न्यारूय हुकुम तक्रारदारांच्या लाभात व्हावेत अशी विनंती केली आहे.
(6) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयर्थ नि.नं.3 वर शपथपत्र तसेच नि.नं.5 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार 11 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.नं.5/2 वर गाव नमुना नं.8 खाते उतारा, नि.नं.5/3 वर गा.न.नं.7,7अ व 12, नि.नं.5/4 वर हक्काचे पत्रक (गा.नं.नं.6), नि.नं.5/8 वर मरणोत्तर पंचनामा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
(7) विरुध्दपक्ष क्र.2 यांनी त्यांचे म्हणणे नि.नं.7 वर दाखल केले असून, त्यात त्यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत. ते सदर विमा योजना राबविण्यासाठी शासनाला विना मोबदला सहाय्य करतात. त्यांनी राज्य शासन अथवा शेतकरी यांचेकडून कोणताही मोबदला घेतलेला नाही. तसेच तक्रारदारांचा विमा दावा अर्ज विरुध्दपक्ष यांनी मंजूर केला आहे व धनादेश क्र.277760 दि.14-10-2011 रु..1,00,000/- पाठविला आणि तक्रारदारांनी तो धनादेश दि.17-11-2011 रोजी स्वीकारला आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष यांना कारण नसतांना तक्रारीस सामोरे जावे लागले म्हणून, तक्रार अर्जाचा खर्च मिळावा आणि तक्रारीतून मुक्त करण्यात यावे अशी शेवटी त्यांनी विनंती केली आहे.
(8) विरुध्दपक्ष क्र.2 यांनी नि.नं.13 वर अर्ज करुन खुलासा देणेकामी मुदत मिळण्याची विनंती केली. तथापि त्यांनी अद्यापपावेता आपला खुलासा दाखल केलेला नाही. मात्र त्यांनी तोंडी युक्तिवादाचे वेळेस तक्रारदारास संपूर्ण विमा रक्कम मिळाली असल्याचे कथन केले आणि ती रक्कम तक्रारदारांनी कोणत्याही तक्रारीवीना स्वीकारल्याचेही कथन केले.
(9) तक्रारदारांची तक्रार, विरुध्दपक्षांचे कथन तसेच उभयपक्षाने पुराव्यासाठी दाखल केलेली कागदपत्रे व केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्या समोर विष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदारांना संपूर्ण विमा रक्कम मिळाली आहे काय ? | ः होय. |
(ब) तक्रारदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? | ः नाही. |
(क) आदेश काय ? | ः अंतिम आदेशा नुसार |
विवेचन
(10) मुद्दा क्र. ‘‘अ’’ - विरुध्दपक्ष क्र.2 यांनी दाखल केलेल्या नि.नं.11 वरील डिसचार्ज व्हाउचर चे अवलोकन केले असता, तक्रारदार यांना त्यांच्या मयत पतीच्या अपघाती मृत्यु बद्दल विमा रक्कम रु.1,00,000/- मिळाल्याचे स्पष्ट होते. तसेच तक्रारदारांनी ती रक्कम कोणत्याही तक्रारीशिवाय Full and final settlement स्वीकारल्याचेही दिसून येते. त्यामुळे तक्रारदार यांची विमा रक्कम मिळण्याची मागणी आता संपूष्टात आली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(11) मुद्दा क्र. ‘‘ब’’ - दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार यांनी विरुध्दपक्षाकडून Full and final settlement म्हणून विमा रक्कम रु. 1,00,000/- स्वीकारल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदारास त्या रकमेपेक्षा अधिक रक्कम विरुध्दपक्षाकडून मिळू शकत नाही. त्यामुळे तक्रारदार विरुध्दपक्ष यांचेकडून विमा रकमे व्यतिरीक्त इतर अनुतोष मिळण्यास पात्र नाहीत असे आमचे स्पष्ट मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(12) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.
धुळे
दिनांक – 27-04-2012.