निकालपत्र
(द्वारा- मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी)
(१) सामनेवाले यांनी विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केली या कारणावरुन तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारदार यांनी त्यांच्या एम.एच.१८/एन ५२९७ या महिंद्रा मॅक्स वाहनाची पॅकेज विमा पॉलिसी सामनेवाले यांच्याकडून काढली होती. तिचा कालावधी दि.०६-११-२००९ ते दि.०५-११-२०१० असा होता. पॉलिसीची रक्कम रु.२,६५,०००/- इतकी होती. त्यापोटी तक्रारदार यांनी रु.१३,३३३/- इतका हप्ता भरला होता. दि.२०-०५-२०१० रोजी तक्रारदार यांच्या वाहनाला खेडे ता.धुळे शिवारात अपघात झाला. त्यात वाहनाचे रु.१,५०,०००/- एवढे नुकसान झाले. सामनेवाले यांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे केला. दि.२४-०५-२०१० रोजी तक्रारदार यांनी दावा अर्ज भरुन घेऊन नुकसान भरपाईची मागणी केली. त्यासोबत आवश्यक कागदपत्रेही दाखल करण्यात आली. तथापि दि.०४-११-२०११ रोजी सामनेवाले यांनी सदर वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते असे कारण दाखवून दावा नामंजूर केला. सामनेवाले यांची ही कृती सेवेतील त्रुटी असून सामनेवाले यांना भरपाई देण्याचे आदेश करावेत, मानसिक, शारीरीक त्रासापोटी रु.५०,०००/- मिळावेत, अर्जाचा खर्च रु.५,०००/- मिळावा आणि संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत त्यावर द.सा.द.शे.१२ टक्के प्रमाणे व्याज मिळावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
(३) आपल्या तक्रारीसोबत तक्रारदार यांनी विमा दावा नामंजूर केल्याबाबतचे पत्र, दावा अर्ज, फिर्याद, घटनास्थळ पंचनामा, विमा पॉलिसीची प्रत, वाहनचालकाचा परवाना, वाहनाचे नोंदणीपत्र, वाहन दुरुस्तीसाठी झालेल्या खर्चाच्या पावत्या आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
(४) सामनेवाले यांनी हजर होऊन खुलासा दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन खोटे आणि लबाडीचे आहे. तक्रारदार यांनी भरपाईपोटी मागितलेली रक्कम अवास्तव असून सामनेवाले यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. विमा कंपनी विमा पॉलिसी देतांना ठराविक अटी आणि शर्तींच्या अधिन राहून पॉलिसी देत असते. त्या अटी व शर्तींचे पालन करणे विमाधारकास अनिवार्य असते. कोणत्याही अटीचा अथवा शर्तीचा भंग झाल्यास तो कराराचा भंग असतो. अशा परिस्थितीत विमा कंपनी नुकसान भरपाई देण्याच्या जबाबदारीतून मुक्त असते. तक्रारदार यांच्या वाहनाची क्षमता ५ + १ अशी होती. वाहनाची नोंदणी करतांना परिवहन विभागाकडे अशीच नोंद करण्यात आली आहे. मात्र अपघात झाला त्यावेळी वाहनात १३ + १ प्रवासी प्रवास करीत होते. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पोलिसांच्या कागदपत्रांवरुन हे स्पष्ट होते. यामुळे विमाधारक व विमा कंपनी यांच्यातील कराराचा भंग झाला असून तक्रारदार यांना नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सदरची तक्रार रद्द करावी अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे.
(५) आपल्या खुलाशाच्या पुष्टयर्थ सामनेवाले यांनी वाहन नोंदणीची कागदपत्रे, विमा पॉलिसीची सत्यप्रत, विमा कंपनीकडे केलेल्या दावा अर्जाची प्रत, सर्व्हेअरचा रिपोर्ट, सर्व्हेअरचा अंतिम रिपोर्ट, बिल चेक रिपोर्टची प्रत आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
(६) तक्रारदार यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांनी खुलाशासोबत दाखल केलेली कागदपत्रे आणि सामनेवाले यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद यांचा विचार करता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब) सामनेवाले यांनी सेवा देण्यात त्रुटी केली आहे काय ? | : नाही |
(क) तक्रारदार हे वाहनाची विमा दावा रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | : नाही |
(ड) आदेश काय ? | : अंतिम आदेशाप्रमाणे |
| | | |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून त्यांच्या एमएच १८/एन ५२९७ या वाहनाची विमा पॉलिसी घेतली होती. त्या पॉलिसीची छायांकीत प्रत तक्रारादार यांनी तक्रारीसोबत दाखल केली आहे. सामनेवाले यांनी ही बाब नाकारलेली नाही. एवढेच नव्हे तर सामनेवाले यांनी पॉलिसीची सत्यप्रत दाखल केली आहे. यावरुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून विमा पॉलिसी घेऊन व्यवहार केला हे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” आहेत हे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांच्या वाहनाला दि.२०-०५-२०१० रोजी अपघात झाला. या घटनेत तक्रारदार यांच्या वाहनाचे सुमारे रु.१,५०,०००/- एवढया रकमेचे नुकसान झाले. त्याबाबत सामनेवाले यांच्याकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी तक्रारदार यांनी दि.२४-०५-२०१० रोजी सामनेवाले यांच्याकडे विमा दावा अर्ज आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे दाखल केली. तर सामनेवाले यांनी दि.०४-११-२०११ रोजी तक्रारदार यांना त्यांचा विमा दावा नाकारीत असल्याचे कळविले. तक्रारदार यांच्या वाहनाची प्रवासी क्षमता ५ + १ एवढी असतांना त्यांनी वाहनात १३ प्रवासी बसविले असे कारण त्यासाठी सामनेवाले यांनी दिले आहे. तक्रारदार यांनी विमा दावा मागणी केल्यानंतर सामनेवाले यांनी त्यावर त्यांना योग्य वाटणारे कारण देऊन तो दावा नाकारला आहे. यावरुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांना सामनेवाले यांनी योग्य ते उत्तर कळविले आहे असे दिसून येते. म्हणजेच यावरुन हे स्पष्ट होते की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली असे तक्रारदारांचे म्हणणे सिध्द होत नाही. तक्रारदार आणि सामनेवाले यांनी अनुक्रमे त्यांची तक्रार आणि खुलाशात केलेल्या कथनानुसार आणि दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मागणी पत्रावर उत्तर कळविले असल्याचे दिसून येते. म्हणूनच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्ट होत नाही, असे आमचे मत बनले आहे. याच कारणावरुन मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘क’’ – तक्रारदार यांनी तक्रारीसोबत विमा दावा अर्ज, पोलिसात दिलेली फिर्याद, वाहन नोंदणीची कागदपत्रे दाखल केली आहेत. तर सामनेवाले यांनीही अशीच कागदपत्रे आपल्या खुलाशासोबत दाखल केली आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या विमा दावा अर्जात कलम “ब” मधील उपकलम “न” मध्ये “स्वीकृत यात्रीयोकी संख्या” या कलमात प्रवासी संख्या ५ + १ अशी नमूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर तक्रारदार यांनीच दाखल केलेल्या वाहन नोंदणी प्रमाणपत्रात प्रवासी संख्या (कलम १३) यात ५ + १ अशी संख्या नमूद करण्यात आली आहे. सामनेवाले यांनी दाखल केलेल्या विमा दावा अर्जाच्या प्रतितही वरील प्रमाणेच संख्या नमूद करण्यात आली आहे. सामनेवाले यांनी विमा पॉलिसीची सत्यप्रत दाखल केली आहे. त्यातही प्रवासी क्षमता ५ + १ अशी नमूद केली आहे. तर सामनेवाले आणि तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पोलीस फिर्यादीत अपघात झाला त्यावेळी वाहनातून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या १३ अशी नमूद करण्यात आली आहे. यावरुन तक्रारदार यांच्या वाहनाची प्रवासी क्षमता ५ + १ अशी होती. त्यांनी विमा पॉलिसी घेतांना आणि विमा दावा मागणी करतांना तेवढीच संख्या नमूद केली असल्याचे स्पष्ट होते. तथापि, ज्या वेळी अपघाताची घटना घडली त्यावेळी तक्रारदार यांच्या वाहनातून १३ प्रवासी आणि एक चालक असे १३ + १ म्हणजेच १४ प्रवासी प्रवास करीत होते हे पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन स्पष्ट होते. याचाच अर्थ तक्रारदार यांच्या वाहनातून क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी प्रवास करीत होते असे दिसून येते. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी तक्रारदार म्हणजे श्री.यतीन सुधाकर महाजन हे स्वत: वाहन चालवित होते हेही तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. सदर वाहन तक्रारदार यांच्या मालकीचेच असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरुन दिसून येते.
सामनेवाले यांनी आपल्या खुलाशात केलेल्या कथनानुसार कोणतीही विमा पॉलिसी म्हणजे विमाधारक आणि विमा कंपनी या दोघांमधील करार असतो. हा करार करतांना त्यातील अटी आणि शर्तींचे पालन करणे दोन्हीपक्षांवर बंधनकारक असते. कोणत्याही एका पक्षाकडून नियम अथवा अटींचे उल्लंघन झाल्यास संबंधित कराराचाही भंग होत असतो. सदर तक्रारीत तक्रारदार यांच्या वाहनाची क्षकता ५ + १ अशी असतांना अपघात घडला त्यावेळी प्रत्यक्षात वाहनातून १३ + १ एवढे प्रवासी प्रवास करीत असल्याचे दिसून येते. याचाच अर्थ तक्रारदार यांच्याडून विमा पॉलिसीतील अटी आणि शर्तींचा भंग झाला आहे हे स्पष्ट होते. याच कारणामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारला आहे. त्यांची ही कृती म्हणजेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब किंवा सेवेतील त्रुटी आहे असे म्हणता येणार नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारुन जबाबदारी नाकारलेली आहे, किंवा बेकायदेशीर कृती केली आहे असेही स्पष्ट होत नाही. उलटपक्षी तक्रारदार यांनी विमा पॉलिसीतील अटी आणि नियमांचे उल्लंघन करुन उभय पक्षातील विमा कराराचा भंग केला असल्याचे सिध्द होते. याच कारणामुळे तक्रारदार यांना सामनेवाले यांच्याकडे नुकसान भरपाई मागण्याचा हक्क पोहोचत नाही आणि तक्रारदार यांनी अशी भरपाई मागितल्यास ती देण्याची जबाबदारी सामनेवाले यांच्यावर येत नाही. याच कारणावरुन मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(१०) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – वरील सर्व विवेचनाचा विचार करता, तक्रारदार यांच्याकडून विमा पॉलिसीतील अटी आणि नियमांचा भंग झाला आहे हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत तक्रारदार हे त्यांच्या अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसानीपोटी भरपाई मागण्यास आणि ती मिळण्यास पात्र ठरत नाहीत असे आमचे मत आहे. याच कारणामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करावा या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. सबब आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक : ३०-१०-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.