(मंचाचे निर्णयान्वये, श्री मनोहर गो. चिलबुले, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 5 ऑक्टोंबर 2013)
अर्जदार मनुकाबाई दावजी पारसे यांनी सदरचा अर्ज ग्राहक हक्क संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
अर्जदार मनुकाबाई दावजी पारसे यांची संक्षिप्त तक्रार अशी की,
1. अर्जदाराचे पती दावजी देवसु पारसे हे शेतकरी होते. त्यांचा दि.8.6.2009 रोजी सर्पदंशाने मृत्यु झाला. सदर अपघाती मृत्यु बाबत महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी विमा योजने अंतर्गत विमा लाभ रुपये 1,00,000/- मिळावा म्हणून तिने गैरअर्जदार क्र.3 तालुका कृषि अधिकारी, कुरखेडा यांचे मार्फत सर्व दस्तऐवजांसह गैरअर्जदार क्र.1 कडे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे विमा क्लेम सादर केला. गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांनी जिल्हा कृषि अधिकारी गडचिरोली यांना अर्जदाराचा विमा क्लेम नामंजूर झाला असे कळविण्यास सांगितले. परंतु विमा क्लेम नामंजूरीचे कारण कळविले नाही. सदर कारण कळवावे म्हणून अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 कडे गेली असता, त्यांनी गैरअर्जदार क्र.1 कडे चौकशी करण्यास सांगितले. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडे चौकशी केली असता तिला विमा क्लेम नामंजूरीचे कोणतेही संयुक्तीक कारण सांगण्यात आले नाही. शेवटी अर्जदाराने विमा क्लेम नामंजूरीचे कारण लेखी कळविण्याबाबत गैरअर्जदार क्र.3 ला दि.26.9.2011 रोजी पञ दिले. परंतु, त्यावर कोणतेही उत्तर मिळाले नाही, म्हणून शेतकरी विमा योजने अंतर्गत अपघात विम्याची रक्कम रुपये 1,00,000/- सदर रकमेवर दि.8.9.2009 ते 15.1.2012 पर्यंत व्याज रुपये 28,000/- गैरअर्जदाराकडे दावा दाखल करण्याचा खर्च रुपये 10,000/-, मानसिक ञासापोटी रुपये 25,000/- आणि सदर तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- अशी एकूण रुपये 1,68,000/- नुकसान भरपाई मिळावी, अशी अर्जदाराने मागणी केली आहे.
2. गैरअर्जदार क्र.1 ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि. नागपूर ने नि.क्र.17 प्रमाणे लेखी बयाण दाखल करुन अर्जास तिव्र विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराचा जो विमा क्लेम गैरअर्जदार क्र.2 कडून प्राप्त झाला त्यांत ञुटी होत्या. अर्जदाराचे पतीचा सर्पदंशाने मृत्यु झाल्याबाबत व्हिसेरा रिपोर्ट सादर केला नव्हता म्हणून गैरअर्जदार क्र.1 ने नियमाप्रमाणे दि.15.1.2010 रोजी क्लेम नस्ती करुन त्याबाबतची माहिती दि.22.3.2010 रोजी अर्जदारास व कबाल इन्शुरन्स कंपनी यांना कळविली. गैरअर्जदार क्र.1 चे म्हणणे असे की, अर्जदार मृतकाची वारस नाही, परंतु बनावट दस्ताऐवज दाखल करुन नुकसान भरपाई मिळण्याचा अर्ज केला आहे. अर्जदाराने आवश्यक दस्ताऐवज न पुरविल्याने क्लेम खारीज झाला आहे. यात गैरअर्जदार क्र.1 ची चुक नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यांत यावी.
3. गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि. नागपूर यांनी त्यांचे लेखी बयाण नि.क्र.12 प्रमाणे दाखल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, ते महाराष्ट्र शासन व शेतकरी यांना शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यासाठी बिना मोबदला सहाय्य करतात. त्यांनी शासनाकडून कोणताही विमा प्रिमियम घेतला नसल्याने विमा रक्कम देण्याची त्यांची जबाबदारी नाही, म्हणून त्यांचे विरुध्द तक्रार खारीज करावी यासाठी त्यांनी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई च्या औरंगाबाद पिठाने प्रथम अपिल क्र.1114/2008 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. -विरुध्द- श्रीमती सुशिला भिमराव सोनटक्के या प्रकरणातील दि.16.3.2009 च्या आदेशाची प्रत दाखल केली आहे.
4. गैरअर्जदार क्र. 3 तालुका कृषि अधिकारी, कुरखेडा यांनी त्यांचे लेखी बयाण नि.क्र.13 प्रमाणे दाखल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराचा विमा क्लेम फार्म सर्व कागदपञांसह त्यांनी दि.2.12.2009 रोजी कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांना सादर केला आहे. सदर विमा क्लेम नामंजूर होण्यात त्यांचा कोणताही दोष नसल्यामुळे त्यांचे विरुध्द तक्रार अर्ज खारीज करावा.
5. अर्जदार व गैरअर्जदारांचा परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील, निष्कर्ष व त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
1) गैरअर्जदार क्र.1 ने शेतकरी अपघात विमा योजनेच्या : होय.
लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केला आहे काय ?
2) अर्जदार मागणीप्रमाणे विमा रक्कम व नुकसान भरपाई : अंशतः पाञ आहे.
मिळण्यास पाञ आहे काय ?
3) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
तक्रार अंशतः मंजूर
- कारण मिमांसा -
6. अर्जदार श्रीमती मनुकाबाई दावजी पारसे हिने स्वतःची साक्ष शपथपञ नि.क्र.18 प्रमाणे दिली असून दस्तऐवजांची यादी नि.क्र.4 सोबत आपल्या कथनाचे पृष्ठ्यर्थ खालील प्रमाणे दस्तऐवज दाखल केले आहेत.
1) कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस ने जि.अ.कृषि अधिकारी यांना दिलेले पञ दि.17.2.2011.
2) कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस ने जि.अ.कृषि अधिकारी यांना दिलेले पञ दि.17.2.2011.
3) अर्जदार बाईने तालुका कृषि अधिकारी कुरखेडा यांना दिलेले पञ दि.26.9.2011.
4) पी.एम.रिपोर्ट दि.8.6.2009.
5) घटनास्थळ पंचनामा दि.8.6.2009.
6) इन्क्वेस्ट पंचनामा दि.8.6.2009.
7) मृत्यु प्रमाणपञ दि.22.6.2009.
8) राशन कार्ड
9) उत्पन्नाचा दाखला दि.9.7.2009.
10) कुंटूंब विवरण पञ दि.9.7.2009
11) सात-बारा गाव नमुना दि.23.5.2007
12) गाव नमुना आठ-अ दि.23.5.2007.
गैरअर्जदारांनी पुराव्याचे वेगळे शपथपञ दाखल केले नाही, म्हणून शपथपञावरील लेखी बयाण व त्यासोबत दाखल दस्तऐवज हाच गैरअर्जदारांचा पुरावा समजण्यांत आला. अर्जदारातर्फे नि.क्र.19 प्रमाणे आणि गैरअर्जदार क्र.1 तर्फे नि.क्र.25 प्रमाणे लेखी युक्तिवाद दाखल करण्यांत आला.
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
7. अर्जदार मनुकाबाई ही मय्यत दावजी देवसू पारसे, रा. येंगलखेडा, ता. कुरखेडा, जिल्हा- गडचिरोली याची पत्नी असल्याचे सिध्द करण्यासाठी अर्जदाराने दावजी देवसू पारसे यांच्या कौटुंबिक शिधापञिकेची प्रत यादी नि.क्र.4 सोबत दस्त क्र.अ-8 वर आणि तहसिलदार कुरखेडा यांनी दिलेले कुंटूंब विवरण पञ दस्त क्र.अ-10 वर दाखल केले असून त्यांत अर्जदार मनुकाबाई मय्यत दावजी देवसू पारसे यांची पत्नी म्हणून उल्लेख आहे.
8. मय्यत दावजी देवसू पारसे हा शेतकरी होता व त्यांच्या मालकीची मौजा येंगलखेडा, प.ह.नं.9, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली येथे खाते क्र.115 क.न.2 प्रमाणे भू.क्र.148/4 क्षेञ 2.00 ही शेतजमीन असल्याबाबत 7/12 चा उतारा दस्त क्र.अ-11 वर आणि गांव नमुना आठ-अ ची सत्यप्रत दस्त क्र.अ-12 वर आहे.
9. दावजी देवसू पारसे याचा मृत्यु दि.8.6.2009 रोजी सर्प दंशाने झाला हे दर्शविण्यासाठी अर्जदाराने घटनास्थळ पंचनाम्याची सत्यप्रत दस्त क्र.अ-5 वर , इन्क्वेस्ट पंचनाम्याची प्रत दस्त क्र.अ-6 वर आणि पोस्टमार्टम रिपोर्टची सत्यप्रत दस्त क्र.अ-4 वर दाखल केली आहे. या दस्तऐवजांत दावजी देवसू पारसे याचा मृत्यु दि.8.6.2009 रोजी सर्पदंशाने झाल्याचे नमुद आहे. निबंधक जन्म मृत्यु तथा ग्रा.पं. येंगलखेडा यांनी दिलेला दावजी देवसू पारसे याच्या मृत्यु दाखला दि.22.2.2009 चा दस्त क्र.अ-7 वर आहे.
10. गैरअर्जदार क्र.1 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांनी त्यांचे लेखी बयाण व लेखी युक्तिवादात दावजी देवसू पारसे याचा सर्पदंशाने मृत्यु झाला हे सिध्द करण्यासाठी अर्जदाराने व्हिसेरा अॅनॉलिसीस रिपोर्ट दाखल केला नाही असा आक्षेप घेतला आहे. सदरच्या प्रकरणात पोष्ट मार्टेम रिपोर्ट मध्ये कॉलम नं.5 मध्ये Supposed Cause of death or reason for examination. ‘snake bite’ असे नमुद केले आहे. कॉलम नं.9 आणि 14 मध्ये ‘Two fang marks over right little finger dorsal aspect over middle phalanges’ असे नमूद आहे. कॉलम 22 मध्ये Opinion as to the probable cause of death – “Poisoning due to snake bite” असे नमुद आहे.
वरील प्रमाणे पोस्टमार्टम अहवालातील मृतकाच्या शरीरावरील सर्पदंशाच्या खूना साठी डॉक्टरांचा अभिप्राय हा दावजी देवसू पारसे याचा मृत्यु दि.8.6.2009 रोजी सर्पदंशाने झाला हे सिध्द करण्यास पुरेसा आहे.
11. शरीराच्या ज्या भागावर सर्पदंश झाला होता त्या भागावरील त्वचेचे तुकडे पोस्टमार्टमचे वेळी काढून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत विश्लेषनासाठी पाठविण्यांत आल्याचे पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये नमुद आहे. परंतु, सदर नमुन्याचा अहवाल काय आला याची माहिती उपलबध नाही. सर्पदंश झालेल्या व्यक्तिचा व्हिसेरा किंवा त्वचेच्या नमुन्याच्या न्यायवैद्यक प्रयोग शाळेतील तपासणीत तपासणीचे वेळी सापाचे विष आढळून येईलच याची 100 टक्के खाञी देता येत नाही. म्हणून जर सर्पदंश झालेल्या व्यक्तीची प्रत्यक्ष तपासणी करणा-या डॉक्टरांचा पुरावा उपलब्ध असेल तर अशा पुराव्यावरुन मृत्यु सर्पदंशाने झाला किंवा नाही हे ठरवावे लागते. न्यायवैद्यक प्रयोग शाळेच्या तपासणी अहवालात जरी व्हिसेरा किंवा त्वचेच्या नमुन्यात सापाचे विष आढळून आले नाही तरी त्याचा अर्थ सदर व्यक्तीचा मृत्यु सर्पदंशाने झाला नाही असा होत नाही, असा निर्णय मा.राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांनी Union of India & Anr –Vs.- Shahjahanabi bashir Bagwan, First Appeal No.634 of 2008 in consu. Complaint No.297/07 District Consumer Forum, Solapur या प्रकरणांत दिला आहे. मा.राज्य आयोगाने नोदंविलेला अभिप्राय खालील प्रमाणे आहे.
“ Initially, no definite opinion about cause of death is expressed in the Postmortem and the Medical Officer collected Viscera. The Viscera was sent to Forensic Laboratory. The Chemical Analyzer certified in the report that no poison was detected in the Viscera. However, the Medical Officer attached to Rural Hospital Mahol, certified that the cause of death is due to snake poisoning. The claim submitted by mother of the deceased was repudiated by the Postal Department relying on the report of the Chemical Analyzer. Therefore, mother of the deceased approached the District Consumer Forum.
There is definite opinion given by the Medical Officer. The Medical Officer in his final report stated that the cause of death is snake-bite. The Postal Department therefore should have accepted the final cause of death certified by the Medical Officer and should have paid the amount of postal insurance. Some time, poison cannot be detected in Viscera even in case of snake bite. It does not mean that death is not by snake-bite.”
12. सदर प्रकरणात पोस्टमार्टम करणा-या डॉक्टरांचा सुस्पष्ट अभिप्राय दावजी देवसू पारसे याचा मृत्यु दि.8.6.2009 रोजी सर्पदंशाने झाला हे सिध्द करण्यास पुरेसा असल्याने केवळ व्हिसेरा किंवा त्वचेच्या नमुन्याचा न्यायवैद्यक प्रयोगशाळा तपासणी अहवाल सादर केला नाही म्हणून अर्जदाराचा विमा क्लेम नाकारण्याची गैरअर्जदार क्र.1 ची कृती ही विमा लाभार्थ्याप्रती सेवेतील न्युनता आहे. म्हणून मुद्दा क्र.1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
13. गैरअर्जदार क्र.1 ने न्यायोचित कारणाशिवाय अर्जदाराचा विमा क्लेम नाकारला असल्याने सदर अपघात विमा क्लेमबाबत रुपये 1,00,000/- मिळण्यास अर्जदार पाञ आहे. तसेच, सदर अपघात जून 2009 मध्ये घडल्यानंतर गैरअर्जदार क्र.3 ने अपघाताबाबत विमा क्लेम डिसेंबर 2009 मध्ये गैरअर्जदार क्र.2 कडे पाठविला व त्यांनी छाननी करुन तो गैरअर्जदार क्र. 1 कडे पाठविला. गैरअर्जदार क्र.1 ने सदरचा क्लेम 6 महिन्यांच्या मुदतीत मंजूर करुन रक्कम अर्जदारास देणे अपेक्षित होते. परंतु, सदर क्लेम नामंजूर करण्याचे कोणतेही कारण अर्जदारास कळविले नाही. म्हणून सदर विम्याच्या रकमेवर 1 जुलै 2010 पासून अर्जदार द.सा.द.शे. 9 % प्रमाणे व्याज मिळण्यास पाञ आहे. याशिवाय मानसिक व शारीरीक ञासाबाबत रुपये 5,000/- आणि या तक्रार अर्जाचा खर्च रुपये 2,000/- अर्जदारास मंजूर करणे न्यायोचित होईल. म्हणून मुद्दा क्र.2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येत आहे.
(1) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास तिचे पती दावजी देवसू पारसे याच्या अपघात विम्याची रक्कम रुपये 1,00,000/- दि.1 जुलै 2010 पासून रक्कम अर्जदाराचे हातात पडेपर्यंत द.सा.द.शे.9 % व्याजासह द्यावी.
(2) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारस शारीरीक व मानसिक ञासाबद्दल रुपये 5,000/- आणि या तक्रार अर्जाचा खर्च रुपये 2,000/- द्यावा.
(3) गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना विमा दाव्याची रक्कम देण्याच्या जबाबदारीतून मुक्त करण्यांत येते.
(4) वरील आदेशाची पुर्तता आदेशाचे तारखेपासून 1 महिन्याचे आंत करावी.
(5) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पाठवावी.
गडचिरोली.
दिनांक :- 5/10/2013