1. गैरअर्जदार यांनी, अर्जदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने अर्जदारांने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. 2. अर्जदार हा वरील ठिकाणी रहात असून क्र. 2 ही मोबाईल कनेक्शन देणारी कंपनी तर गैरअर्जदार क्र. 2 हे त्यांचे अधिकृत विक्रेते आहेत. अर्जदाराने 6-7 वर्षापूर्वी गै.अ.क्र.2 कंपनीचा प्रिपेड मोबाईल सिम क्र.9767174757 घेतला व तो 5 वर्षे वापरला. त्यामुळे सदर मोबाईल क्रमांक सर्व संबंधीत लोकांकडे दिल्या गेलेला आहे. त्यानंतर गैरअर्जदाराने सदर सीम पोस्टपेड करण्याबाबत सल्ला दिल्यामुळे 1 वर्षापूर्वी अर्जदाराने सदर सीम पोस्टपेड केले व सुमारे 3 महिनेपर्यंत गैरअर्जदाराकडून चांगली सेवा मिळाली.मात्र त्यानंतर गैरअर्जदाराने अतिरीक्त चार्जेसलावून बील पाठविणे सुरू केले. अर्जदाराला सुमारे 250 ते 300 रूपयांचे बील येत होते व ते त्यांनी नियमीत भरले. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी जानेवारी,2016 चे बिल पाठविले नाही व फेब्रुवारीमध्ये अर्जदाराचे आऊटगोईंग कॉल बंद केले. अर्जदाराने चौकशी केली असता वापरलेल्या सेवेचे बिल भरण्याची सुचना केली. अर्जदाराने बिलाची संपूर्ण माहिती मागितली केली असता बिल आपल्या पत्त्यावर येईल असे सांगून अर्जदाराचे सिम बंद केले. गैरअर्जदाराने अर्जदारांस 27/4/2016 रोजी रू.3548/- चे बील पाठविले. अर्जदाराने सदर बिलाबाबत गै.अ.क्र.1 कडे चौकशी केली असता, बिल भरल्यानंतर मोबाईल सुरू करण्यात येईल असे त्याला सांगण्यात आले. त्यामुळे नाईलाजाने अर्जदाराने दिनांक 5/5/2016 रोजी रू.3548/- बिल भरले. त्यावेळी 24 तासात मोबाईल सेवा सुरू करण्यात येईल असे आश्वासन देण्यांत आले.मात्र त्यानंतरही ती सुरू न झाल्यामुळे अर्जदाराने चौकशी केली असता गै.अ.क्र.1 ने त्याला पुन्हा कागदपत्रांची मागणी करण्यांत आली. अर्जदाराने कागदपत्रे गै.अ.क्र.1 कडे जमा करून त्याची सुचना दिनांक 26/6/2016 रोजी गै.अ.क्र.2 लादेखील दिली. परंतु तरीदेखील सेवा सुरू न झाल्यामुळे दिनांक 4/7/2016 रोजी गै.अ.क्र.2 चे मेल आय डी वर मेसेज पाठविला असता गै.अ.क्र.2 ने दि.8/7/2016 रोजी मेसेजद्वारे 4 जुलै,2016 पासून मोबाईल सेवा सुरू झाल्याचे कळविले परंतु सेवा सुरू झाली नाही. यानंतर गै.अ.क्र.2 ने दिनांक 9/7/2016 रोजी मेलद्वारे अर्जदारांस त्याचे खाते चेक करण्याची सुचना दिली. त्याप्रमाणे अर्जदाराने माहिती घेवून गै.अ.क्र.2 ला दिनांक 10/7/2016 रोजी मेलद्वारे कळविली व दिनांक11/7/2016 रोजी मेलद्वारे पुन्हा सेवा सुरू करण्याची विनंती केली. मात्र यानंतर गै.अ.क्र.2 ने मेलद्वारे अर्जदाराचा सिम क्र. 9767174757 हा दिनांक 19/3/2016 पासून कायमस्वरूपी खंडीत करण्यांत आल्याची माहिती दिली. या व्यवहारात गैरअर्जदारांनी अर्जदाराकडून दिनांक 5/5/2016 रोजी पैसे भरून घेतले, कागदपत्रांची पुर्तता करून घेतली, अर्जदाराचा मोबाईल 8 जुलै,2016 पासून सुरू केल्याची खोटी माहिती दिली व शेवटी गै.अ.क्र.2 ने अर्जदाराची सेवा पूर्वीच खंडीत केल्याचेदेखील कळविले. सबब गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीप्रती अनुचित व्यापार पध्दती अवलंबली तसेच सेवेत त्रृटी दिली. अर्जदाराने सदर सिमचा नंबर त्याच्या स्वयंरोजगारासाठी वापरीत असल्यामुळे सेवेअभावी त्याच्या रोजगाराचे नुकसान होवून शारिरीक व मानसीक त्रास सहन करावा लागला. सबब अर्जदारांने गैरअर्जदार यांच्याविरुद्ध मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि, अर्जदाराला गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे घोषित करावे तसेच अर्जदाराचा मोबाईल क्र. 9767174757 पुन्हा सुरू करून द्यावा, अर्जदाराला व्यवसायात झालेल्या आर्थीक नुकसान भरपाईपोटी रू.50,000/-, तसेच त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.10,000/- आणी तक्रार खर्चापोटी रक्कम रु.10,000/- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी प्रत्येकी अर्जदारांस देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली. 3. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करून गैरअर्जदारक्र. 1 व 2 यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. परंतु गैरअर्जदार क्र. 1 यांना नि.क्र.7 नुसार नोटीस प्राप्त होऊनदेखील ते प्रकरणात हजर न राहिल्याने त्यांचेविरुद्ध दि. 20/6/2018 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आले. 4. गैरअर्जदार क्र. 2 ने मंचासमक्ष हजर होवून आपले लेखी उत्तर नि.क्र.10 वर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदाराचे तक्रारीतील कथन नाकबुल करुन पुढे नमुद केले कि, गै.अ.क्र.2 च्या प्रतिनिधीने अर्जदाराची भेट घेवून बिलाबाबत समजावून सांगूनही अर्जदाराने मंचासमक्ष खोटी तक्रार दाखल केली आहे. गै.अ.क्र.2 ने नमूद केले की, मोबाईलचे पोस्टपेड बील हे मुदतीत भरावयाचे असते व तसे भरले न गेल्यास ग्राहकाला स्मरणपत्र देवून वा काही वेळा बोलावून बील भरण्यास सुचीत करण्यांत येते. सदर प्रक्रियेत बिल भरण्याच्या मुदतीनंतर 7 दिवस व त्यानंतर क्रेडीट लिमीट वाढवून 15 दिवसांतदेखील बिलाचा भरणा न केल्यांस केवळ आऊटगोईंग कॉल तात्पुरते थांबविले जातात मात्र इनकमींग कॉल सुरू राहतात. परंतु 1 महिनेपर्यंतदेखील बिलाचा भरणा न केल्यांस संपूर्ण सेवा तात्पुरती खंडीत करण्यांत येते. परंतु मोबाईल धारकाने तरीही बिल भरून सेवा पुर्ववत करून घेतली नाहीतर सदर क्रमांक नेहमीकरीता खंडीत करण्यांत येतो व सदर नंबर खंडीत झाल्यानंतर 90 दिवसांनी बाजारात अन्य ग्राहकाला देण्यांत येतो. सदर प्रक्रिया TRAI च्या निर्देशांनुसार भारतातील सर्व मोबाईल सर्व्हीस ऑपरेटर्सकडून राबविली जाते. प्रस्तुत अर्जदार मोबाईलधारक हा ऑक्टोबर,2015 पासून बीलाचा भरणा नियमीतरीत्या करीत नव्हता व त्यामुळे त्याची सेवा दिनांक19/1/2016 रोजी तात्पुरती खंडीत करण्यांत आली. त्यानंतरही बिल न भरले गेल्यामुळे 19/3/2016 रोजी सदर सेवा कायमस्वरूपी खंडीत करण्यांत आली व अर्जदारांस बिल भरण्याबाबत अनेक नोटीस पाठविण्यांत आल्या. अर्जदाराने दिनांक 5 मे,2016 रोजी बिलाचा भरणा केला व त्यानंतर प्रस्तूत तक्रार दाखल करून त्याच मोबाईल नंबरची मागणी केली जेव्हा की सदर नंबर 8/7/2016 रोजी दुस-याला देण्यांत आल्याबाबत व आता तो अर्जदाराला मिळणे शक्य नसल्याबाबत अर्जदाराला पूर्ण कल्पना आहे. सदर प्रक्रिया TRAI च्या निर्देशांनुसार करण्यांत आली असून त्याबाबत तक्रारींच्या निवारणासाठी नोडल ऑफीसर उपलब्ध असतो. मात्र तक्रारकर्त्याने सदर पर्याय न निवडता मंचासमक्ष तक्रार दाखल केली. गैरअर्जदारयांनी अर्जदारांस योग्य ती सेवा दिली असुन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला नाही. सबब, अर्जदाराची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. 5. अर्जदाराची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार क्र. २ यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच अर्जदार व गै.अ.क्र.2 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष 1. प्रस्तूत तक्रार चालविण्याचा मंचास अधिकार आहे काय ? होय 2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी मोबाईल सेवा पुरविण्यात कसूर केल्याची बाब अर्जदार सिद्ध करतात काय ? नाही 3. आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे कारण मिमांसा मुद्दा क्र. 1 बाबत :- 6. अर्जदाराने गै.अ.क्र.2 कंपनीचा प्रिपेड मोबाईल सिम कार्ड क्र.9767174757 विकत घेऊन सेवा घेतली व त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व2 यांचा ग्राहक आहे हयाबाबत वाद नाही. गैरअर्जदार क्र.2 ने त्यांच्या उत्तरात, अर्जदाराने TRAI च्या निर्देशांनुसार तक्रारींच्या निवारणासाठी नियुक्त नोडल ऑफीसर कडे दाद न मागता मंचासमक्ष तक्रार दाखल केली व ती चालविण्याचे मंचास न्यायकक्षा नाही असा आक्षेप घेतला. मात्र ग्राहक संरक्षण कायदा,1986 च्या कलम 3 नुसार ग्राहकांना दाद मागण्याचा अतिरीक्त पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे व पर्याय निवडण्याचा अधिकार ग्राहकाला देण्यांत आलेला आहे. त्यानुसार अर्जदाराने या मंचाकडे दाद मागण्याचा पर्याय निवडला असल्यामुळे मंचास प्रस्तूत तक्रार चालविण्याची निश्चीतच न्यायकक्षा आहे असे मंचाचे मत असून सबब, मुद्दा क. १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 2 बाबत :- 7. अर्जदाराने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे त्याने गै.अ.क्र.2 कंपनीचा प्रिपेड मोबाईल सिम क्र.9767174757 घेवून प्रिपेड सेवा घेतली व त्यानंतर ती पोस्टपेड केली. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे ते पोस्टपेड बील नियमीत भरीत होते. परंतु अर्जदाराने हेसुध्दा कथन केले आहे की गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी जानेवारी,2016 मध्ये अर्जदाराचे आऊटगोईंग कॉल बंद केले. या विधानाला उत्तर देतांना गैरअर्जदार हयांनी त्यांच्या उत्तरात कथन केले की अर्जदार हा नियमीत देयके भरीत नव्हता.गैरअर्जदाराने न भरलेल्या बिलांसंदर्भात खालीलप्रमाणे तक्ता उत्तरात दाखल केला आहे. महिना बिलाची देय रक्कम भरलेली रक्कम बिलाची थकबाकी ऑक्टो,15 292.00 - 292.00 13.11.2015 - 300.00 - 27.11.2015 1074.17 - 1074.17 27.12.2015 2248.00 - 2248.38 27.1.2016 466.38 - 2714.00 8. वरील तक्त्याचे निरीक्षण करता असे दिसून येते की अर्जदाराने फक्त ऑक्टोबर,2016 या महिन्याचे बील रू.300/- हे दि.27.11.2015 रोजी गै.अ.कडे भरले व त्यानंतरचे 27.1.2016 पर्यंतचे एकही बील भरलेले दिसून येत नाही. सबब गैरअर्जदाराने जानेवारी,2016 मध्ये अर्जदाराची आऊटगोईंग सेवा बंद केली. वरील तक्त्याप्रमाणे जानेवारी महिन्यात केवळ रेंटल बिल दिल्याचे दिसून येते. सबब अर्जदाराचे तक्रारीतील म्हणणे की ते नियमीत बील भरायचे ही बाब ग्राहय धरण्यासारखी नाही. मंचाच्या मते अर्जदार हे डिफॉल्टर असून त्यांच्या प्रलंबीत देयकांसाठी अर्जदाराची सेवा गैरअर्जदाराने दिनांक 29/1/2016 रोजी तात्पुरती बंद केल्यानंतर थकीत देयकांचा भरणा करून सदर सेवापुर्ववत करून घेणे ही अर्जदाराची जबाबदारी होती. मात्र सदर सेवा तात्पुरती बंद करण्यांत आल्यापासून 90 दिवसांचे आंत अर्जदाराने सेवा पुर्ववत करण्याचे प्रयत्न न केल्यामुळे अर्जदाराचे सीम TRAI ने घालून दिलेल्या दिशानिर्देशांनुसार 19/3/2016 रोजी कायमचे बंद करण्यांत येऊन सदर नंबर 8/7/2016 रोजी अन्य ग्राहकाला देण्यांत आला. वरील संपूर्ण प्रक्रिया गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी TRAI ने घालून दिलेल्या दिशानिर्देशांनुसार केलेली असल्यामुळे गैरअर्जदारांनी अर्जदाराप्रती कोणतीही सेवेतील न्युनता केलेली नाही असे मंचाचे मत आहे. 9. मुद्दा क्र. 1व 2 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. ग्राहक तक्रार क्र. 82/2016 खारीज करण्यात येते. २. उभय पक्षांनी आप आपला खर्च सोसावा. 3. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. चंद्रपूर दिनांक – 05/09/2018 (श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |