निकालपत्र :- (दि.16/08/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 त्यांचे प्रतिनिधी मार्फत उपस्थित राहून त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.2 यांना नोटीस लागू होऊनही ते मंचासमोर हजर नाहीत. तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकला. युक्तीवादाच्या वेळेस सामनेवाला क्र.1 चे प्रतिनिधी हजर. सदरची तक्रार ही सामनेवाला यांनी दोषयुक्त टी.व्ही.देऊन फसवणूक करुन अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेने सेवा त्रुटी ठेवलेमुळे दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-अ) तक्रारदार या शिक्षीका असून सामनेवाला क्र.1 हे ओनिडा टी.व्ही. उत्पादित करणारी कंपनी आहे तर सामनेवाला क्र.2 हे त्यांचे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारदाराने मनोरंजनासाठी टी.व्ही.खरेदी करणेचे ठरवून सन 2006 मध्ये वल्डकप 4 वर्ष वॉरंटी सर्व ओनिडा फ्लॅट टी.व्ही.वर अशी जाहिरात आलेने सामनेवाला क्र.2 यांचे दुकानात टी.व्ही. पाहण्यासाठी गेले असता नमुद ऑफर ही मर्यादित कालावधीसाठी म्हणजे दि.26/05/2006 ते 06/07/2006 अखेर असलेचे सांगितले. तक्रारदाराने ONIDA CTV 29'' Poision Theatre Sr. No.4004410 हा टी.व्ही. किंमत रु.24,530/-श्रीराम फायनान्सकडून रक्कम रु.16,000/-चे कर्ज घेऊन व रोखीत रक्कम रु.9,000/-सामनेवाला क्र.2 यांना सदर रक्कम देऊन खरेदी केला. दि.02/06/2006 रोजी रक्कम रु.9,000/-दिले व इन्व्हाईस बील देऊन तक्रारदारास वॉरंटी कार्ड दिले व उर्वरित रक्कम रु.16,000/-अदा केले नंतर दि.12/07/2006 रोजी बील तयार करुन दिले. प्रस्तुतचा टी.व्ही. सुरुवातीचे थोडे दिवस चांगला चालला. त्यानंतर त्याच्या तक्रारी सुरु झालेने तो सामनेवाला क्र.2 यांचेकडे दिला. त्यावेळी तो दोषयुक्त असलेचे समजलेने सामनेवाला क्र.2 यांनी त्याच कंपनीचा दि.11/10/2006 रोजी मॉडेल 29 ATL RS.NO.4005087 हा टी.व्ही. रिप्लेस दिला. मात्र सदरचा टी.व्ही हा तीन महिन्याने पिक्चर दिसणे व बंद होणे असे वारंवार घडल्यामुळे दुरुस्तीसाठी दिला असता दुरुस्तीसाठी 8 ते 10 दिवस लावत असत तसेच नमुदचे मॉडेल बंद पडलेने जादा पैसे देऊन दुसरा टी.व्ही.घ्या असे सांगत होते. तक्रारदाराने पैसे नसलेचे सांगितले असता श्री सुनिल पाळंदे यांनी धमकावण्याचे स्वरुपात फोन करुन तक्रारदाराचा अपमान केला. दि.09/02/2010 रोजी टी.व्ही.पूर्णत: बंद पडला असता फोनवरुन त्यांचेकडे तक्रार केली. सदर वेळी टी.व्हीतील संपूर्ण किट काढून नेले व खोका तेवढा ठेवून दिला. सदरचा टी.व्ही.दुरुस्त करुन दिलेला नाही. तसेच त्याचे तात्पुरतेही काम करुन दिलेले नाही. दुरुस्त करुन देणेस टाळाटाळ केलेली आहे. सदर टी.व्ही् ला चार वर्षाची वॉरंटी असतानाही एकदा टी.व्ही.बदलून दिलेला आहे आता आमचे कर्तव्य संपले अशी दमदाटीची व अर्वाच्य भाषा वापरतात.सबब तक्रारदाराने दि.19/03/2010 रोजी रजि.ए.डी.ने नोटीस पाठवून टी.व्ही. बदलून देणेची मागणी केली. सदर नोटीस पोहोच होऊनही त्यास उत्तर दिले नाही अथवा टी.व्ही.बदलून दिलेला नाही. तक्रारदार हे सामनेवालांचे ग्राहक असून ते त्यांची दिशाभूल करुन ऑफर मधील दोषयुक्त टी.व्ही.देऊन तक्रारदाराची फसवणूक केलेली आहे. सबब यामुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास झालेने प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर करुन सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी दोषयुक्त टी.व्ही.दिलेने टी.व्ही.ची रक्कम रु.25,000/-अथवा त्याच कंपनीचा नवीन टी.व्ही.बदलून देणेचा आदेश व्हावा, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.25,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/-सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावा अशी विंनती सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टयर्थ ओनिडा टी.व्ही. खरेदीचे बील, टी.व्ही.रिप्लेस दिलेचे डिलीव्हरी चलन, तक्रारदाराकडून टी.व्ही. घेतेवेळी घेतलेले रक्कम रु.530/-,वॉरंटी कार्ड,सामनेवाला यांना पाठविलेले वकील नोटीस व त्याची पाठवलेची पावती व पोहोच पावती व रिजॉइन्डर इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदारांची तक्रार खोटी व चुकीची असलेने तसेच वस्तुस्थिती दडवून ठेवलेने फेटाळणेस पात्र आहे. प्रस्तुत टी.व्ही.मध्ये कोणताही उत्पादित दोष नसलेने सामनेवाला क्र.1 यांचेविरुध्दची तक्रार खर्चासह नामंजूर होणेस पात्र आहे. तक्रारदारचा कायमचा रहिवाशी पत्ता सामनेवाला यांनी नाकारलेला आहे. कलम 2 मधील तक्रारदारास वॉरंटी कार्ड दिलेले होते जाहिरात दिलेली बाब मान्य केला असून अन्य मजकूर नाकारलेला आहे. कलम 3 मधील मजकूर सामनेवाला यांना मिळत नसलेने नाकारलेला आहे. कलम 4 ते 8 मधील मजकूर नाकारलेला असून रिप्लेसमेंट झालेबाबत भक्कम पुरावा देणे गरजेचे आहे. सामनेवालांनी वाद टाळणेसाठी नमुद टी.व्ही.दुरुस्तीसाठी त्यांचे तंत्रज्ञास पाठवून दिले असता तक्रारदाराने त्यास नकार दिला. तसेच तक्रारदाराचे नोटीसीस दि.05/05/2010 रोजी उत्तर दिलेले आहे. कलम 9 ते 11 मधील मजकूर चुकीचा व खोटा असलेने तो सामनेवाला यांना मान्य व कबूल नाही. तसेच कलम 12 ते 14 मधील वस्तुस्थिती रेकॉर्डवर आहे. कलम 15 मधील विनंती मान्य करता येणार नाही. तक्रारदार वस्तुस्थिती सदर मंचापासून दडवून ठेवलेली आहे. त्यामुळेत तक्रारदार हा स्वच्छ हाताने मे.मंचासमोर आलेला नाही. सबब सामनेवाला यांनी सेवेत कोणतीही त्रुटी ठेवली नसलेने तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला नसलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विंनती सामनेवाला क्र.1 यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला क्र.1 यांनी अधिकार पत्राशिवाय अन्य कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.
(6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, तसेच सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्हणणे व तक्रारदाराचा युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.1 :- सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या म्हणणेमध्ये ओनिडा टी.व्ही.बाबत जाहिरात दिलेचे तसेच तक्रारदारास वॉरंटी कार्ड दिलेची बाब मान्य केली आहे. सदर जाहिरातीस अनुसरुन तक्रारदाराने दाखल केलेले दि.12/07/2007 रोजीचे टी.व्ही.चे बील क्र.7957 चे अवलोकन केले असता तक्रारदाराने ONIDA CTV 29'' Poision Theatre Sr. No.4004410 नमुद टी.व्ही.मॉडेल हे सामनेवाला क्र.2 यांचेकडून रक्कम रु.24,530/- इतक्या रक्कमे खरेदी केलेची बाब निर्विवाद आहे. दि.11/10/2006 रोजीचे डिलीव्हरी चलन नं.2038 नुसार 29 ATL RS.NO.4005087 रिपेअर्ड ओके ची नोंद असलेचे दिसून येते.तसेच दि.28/07/2006 रोजी रिसीट नं.27250 नुसार तक्रारदाराकडून ONIDA CTV 29'' Poision Theatre Sr. No. 004410 रक्कम रु.530/- रोखीत घेतलेचे दिसून येते. तक्रारदाराने दाखल केलेल्या वॉरंटी कार्डमध्ये इन्व्हाईस तारीख 02/06/2006 दिसून येते व सदर वॉरंटी ही ONIDA CTV 29'' Poision Theatre Sr. No.4004410 साठीची आहे. प्रस्तुत कागदपत्रावरुन तक्रारदाराने प्रथमत: ONIDA CTV 29'' Poision Theatre Sr. No.4004410 हे मॉडेल खरेदी केले होते. परंतु सदर मॉडैलमध्ये बिघाड आलेने 29 ATL RS.NO.4005087 या मॉडेलचा नवीन टी.व्ही. तक्रारदारांना दिलेचे स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराने दि.19/03/2010 रोजी सामनेवाला क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठवलेली होती. नोटीस पाठवलेचे दाखल पावतीवरुन दिसून येते. सदर नोटीस सामनेवाला यांना पोहोच झालेली आहे. सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणेत नोटीस मिळालेची बाब मान्य केली आहे. तसेच दि.05/05/2010 रोजी तक्रारदारास प्रतिनोटीस पाठवलेचे नमुद केले आहे. तक्रारदाराने सदर बाब आपल्या रिजॉइन्डरमध्ये नाकारलेली आहे. सामनेवाला यांनी प्रस्तुत उत्तरी नोटीसची प्रत कामात दाखल केलेली नाही. वरील विस्तृत विवेचनाचा व कागदपत्रांचा विचार करता तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 यांचेकडून प्रथमत: खरेदी केलेल्या टी.व्ही.मध्ये दोष उत्पन्न झालेमुळेच सामनेवालांनी दुसरा टी.व्ही बदलून दिल्याचे डिलीव्हरी चलनावरून स्पष्ट होते. तसेच नमुद डिलीव्हरी चलनावर बदलून दिलेला टी.व्ही.रिपेअर्ड ओके चा शेरा दिसून येतो. यावरुन प्रस्तुत टी.व्हीत सुध्दा दोष होता हे स्पष्ट होते. सामनेवाला क्र.2 हे प्रस्तुत प्रकरणी नोटीस लागू होऊनदेखील हजर झालेले नाहीत. प्रस्तुतची तक्रार त्यांना मान्य आहे असे म्हणावे लागेल. तसेच सामनेवाला क्र.1 या कंपनीनेसुध्दा आपल्या म्हणणेमध्ये तक्रारदार व डिलर यांचेमध्ये परस्पर झालेल्या व्यवहाराची माहिती नसलेचे नमुद केले आहे. मात्र डिलीव्हरी चलन हे ओनिडा कंपनीचे असलेचे स्पष्टपणे दिसून येते.यावरुन सामनेवाला क्र.1 यांनी प्रस्तुत तक्रारीतील तक्रारदाराने वस्तुस्थिती दडवून ठेवलेचे लेखी म्हणणेत प्रतिपादन केले आहे. मात्र काय वस्तुस्थिती दडवून ठेवली होती व त्या अनुषंगीक त्यांनी कोणताही स्वंयंस्पष्ट पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. सबब त्यांचे नुसते कथनावर विश्वास ठेवता येणार नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराने आपल्या रिजॉइन्डरमध्ये सामनेवाला यांचेकडून टी.व्ही.दुरुस्त करुन देणेचा प्रयत्न हा तक्रार दाखल झालेनंतरच करणेत आलेला तसेच तक्रारदारास प्रथम खरेदी केलेला व नंतर बदलून दिलेला दोन्हींही टी.व्ही. दोष युक्त असलेने सदरचे दोष दुरुस्त करुन देणे अथवा ते दुर करणेची जबाबदारी सामनेवाला यांची होती परंतु त्यांनी टाळाटाळ केलेली आहे. तक्रारदारास सामनेवाला यांनी प्रतिनोटीस पाठवलेली होती ही बाब नाकारलेली आहे. सदरची नोटीस ही तक्रार दाखल केल्यानंतर मिळालेली आहे. तसेच टी.व्ही.दुरुस्तीसाठी सामनेवाला यांचेकडून कोणताही इसम तक्रार दाखल करणेपूर्वी आलेला नाही व तसा प्रयत्नही केलेला नाही असे शपथेवर नमुद केले आहे. प्रस्तुत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराने जाहिरातस भूलुन सदरचा नमुद टी.व्ही.खरेदी केला. मात्र तक्रारदारास दोष युक्त टी.व्ही.देऊन त्याबाबतची दुरुस्तीची सेवा पुरवण्यात सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी कसूर केलेला आहे. तसेच प्रस्तुतचा तक्रारदारास बदलून दिलेला 29 ATL RS.NO.4005087 टी..ही. सामनेवाला यांनी दुरुस्तही करुन दिलेला नाही अथवा नवीनही दिलेला नाही. सबब त्यासाठी सामनेवाला क्र. 1 व2 हे संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:- तक्रारदार यांनी नमुद टी.व्ही.हा कर्ज प्रकरण करुन घेतलेला आहे. टी.व्ही.घेऊनही ते मनोरंजनाचा आनंद उपभोगू शकलेले नाहीत.त्यामुळे तक्रारदार मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदारास त्याच मॉडेलचा नवीन दोषरहीत टी.व्ही. दयावा अथवा टी.व्ही.ची रक्कम रु.25,000/- व तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/-(रु.तीन हजार फक्त) व खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त)अदा करावी. 3) सदर आदेशाची पूर्तता सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या वसंयुक्तिकरित्या करणेची आहे.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |