( निकालीपत्र पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या)
::निकालपत्र::
(पारीत दिनांक –09 एप्रिल, 2012 )
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत
तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, तक्रारकर्त्याने, गैरअर्जदारा कडून दिनांक-08.11.2010 रोजी ओनीडा कंपनीचा 24 इंचीचा एल.सी.डी. दुरचित्रवाणी संच विकत घेतला. सदर दुरचित्रवाणीसंच खरेदी करते वेळी सांगितलेल्या अटी प्रमाणे दोन स्क्रॅच कॉर्ड प्रमाणे त्यात लागलेल्या वस्तु या ग्राहकांच्या मालकीचे होतील. त्याप्रमाणे तक्रारदारास रुपये-1,199/- एवढया किंमतीच्या वस्तु (रिलायन्स केबल एन्टीना व इतर साहित्य ) लागलेल्या आहेत परंतु सदर वस्तु गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास दिल्या नाहीत. रिलायन्सचे केबल कनेक्शन घ्यावे किंवा नाही ही बाब तक्रारकर्त्यावर अवलंबू आहे.
3. तसेच सदर दुरचित्रवाणीसंचास खालून उजवी कडून किंवा डावी कडून पाहिल्यावर फरक पडत नाही. परंतु सदर दुरचित्रवाणीसंच खाली बसून पाहिल्यावर त्यातील चित्र हे अस्पष्ट दिसत होते हा दोष आढळून आला. वस्तुतः याच मॉडेलचा 24 इंचीचा दुसरा एल.सी.डी. दुरचित्रवाणी संच पाहिल्यावर सदर दोष दिसून आला नाही. त्यामुळे सदर दुरचित्रवाणी संचामध्ये दोष आहे. अशाप्रकारे दोषयुक्त दुरचित्रवाणी संचाची विक्री गैरअर्जदाराने तक्रारदारास केल्याने सेवेत कमतरता दिली आहे.
ग्राहक तक्रार क्रमांक: 788/2011
4. म्हणून शेवटी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार दाखल करुन, गैरअर्जदाराने रुपये-1199/- चे स्क्रॅच कॉर्डद्वारे लागलेले साहित्या द्यावे अथवा तेवढी रक्कम परत करण्याचे आदेशित व्हावे. तसेच गैरअर्जदाराने दोषयुक्त दुरचित्रवाणी संच बदलवून त्याऐवजी त्याच मॉडेलचा नविन दुरचित्रवाणी संच द्यावा अथवा दुरचित्रवाणी संचाची रक्कम रुपये-18,000/-परत करावी. तसेच तक्रारकर्त्यास तक्रारखर्चाची रक्कम मिळावी अशा प्रकारच्या मागण्या केल्यात.
5. प्रस्तुत प्रकरणात यातील गैरअर्जदारास न्यायमंचाचे मार्फतीने रजिस्टर नोटीस पाठविली असता, ती गैरअर्जदारास मिळाल्या बद्यलची पोच पान क्रमांक 9 वर दाखल आहे परंतु गैरअर्जदार न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा न्यायमंचा समक्ष आपला लेखी जबाबही दाखल केला नाही. म्हणून गैरअर्जदारा विरुध्द प्रस्तुत प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात दिनांक-06.03.2012 रोजी न्यायमंचाने पारीत केला.
6. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत पान क्रमांक 4 वरील यादी नुसार दुरचित्रवाणी संचाचे बिलाची प्रत, गैरअर्जदारास दिलेल्या रजिस्टर नोटीसची पोच प्रत दाखल केली. तसेच पान क्रमांक 10 वरील यादी नुसार स्क्रॅच कॉर्डची मूळ प्रत, तसेच तक्रार रजिस्टरमध्ये नोंदविलेल्या तक्रारीची प्रत दाखल केली.
7. तक्रारकर्त्याची लेखी तक्रार, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज आणि तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकल्या नंतर न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
::निष्कर्ष ::
8. प्रस्तुत प्रकरणातील एकंदर वस्तुस्थिती, तसेच तक्रारकर्त्याचे शपथपत्र आणि उपलब्ध दस्तऐवजाच्या प्रती पाहता, न्यायमंचाचे असे निदर्शनास
ग्राहक तक्रार क्रमांक: 788/2011
येते की, तक्रारकर्त्याने, गैरअर्जदाराकडून ओनीडा कंपनीचा 24 इंचीचा एल.सी.डी. दुरचित्रवाणीसंच रक्कम रुपये-16,000/-एवढया किंमतीत दिनांक 08.11.2010 रोजी खरेदी केला होता. तसेच व्हॅटपोटी रुपये-2000/- अदा केले होते.
9. तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार सदर दुरचित्रवाणीसंच खाली बसून पाहिल्या नंतर त्यामधील चित्र अस्पष्ट दिसत होते असा दोष दिसून आला . परंतु तक्रारकर्त्याने सदर दुरचित्रवाणीसंचा मध्ये सदरचा दोष उत्पादकीय दोष असल्या बाबत कुठलाही पुरावा प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेला नाही. त्यामुळे सदरचा दुरचित्रवाणी संच बदलवून देण्याची वा रक्कम परत करण्याची मागणी या मंचास मान्य करता येणार नाही. परंतु तक्रारकर्त्याचे शपथपत्रावरुन सदर दुरचित्रवाणी संचातील चित्र अस्पष्ट दिसत असल्याचे दिसून येते. कारण कोणताही ग्राहक विनाकारण कोणा विरुध्द तक्रार करणार नाही.
10. यातील गैरअर्जदार न्यायमंचाची नोटीस मिळून सुध्दा न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्यांनी न्यायमंचा समक्ष आपला लेखी जबाब दाखल केला नाही व तक्रारकर्त्याचे तक्रारीतील विधाने खोडून काढलेली नाहीत. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येते. सबब सदर दुरचित्रवाणी संचातील दोष विनामुल्य दुरुस्त करुन देण्यास गैरअर्जदार जबाबदार आहे.
11. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीद्वारे स्क्रॅच कॉर्ड मध्ये लागलेल्या वस्तुची गैरअर्जदार कडून मागणी केलेली आहे परंतु तक्रारकर्त्यास खरेदीचे वेळी स्क्रॅच कॉर्डवर लागलेल्या वस्तुची मागणी त्याच वेळेस त्याने गैरअर्जदार कडे करावयास
ग्राहक तक्रार क्रमांक: 788/2011
हवी होती. गैरअर्जदाराने स्क्रॅच कॉर्डवर लागलेल्या वस्तु तक्रारकर्त्यास दिल्या नाहीत हे तक्रारकर्त्याचे म्हणणे पुराव्या अभावी मान्य करता येणार नाही.
12. वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करुन, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1)तक्रारकर्त्याची तक्रार गैरअर्जदारा विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदाराने, तक्रारकर्त्यास बिल क्रमांक 6631, बिल दिनांक 08.11.2010 मध्ये
नमुद केलेला ओनीडा कंपनीचा एलसीडी 24 इंची सिरीएल नं.0000936
दुरचित्रवाणीसंच विनामुल्य दुरुस्त करुन द्यावा.
3) गैरअर्जदाराने, तक्रारकर्त्यास मानसिक त्रासापोटी रुपये-500/-/-(अक्षरी रुपये-
पाचशे फक्त) व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 500/-(अक्षरी रुपये पाचशे फक्त)
द्यावेत.
4) गैरअर्जदाराने सदर आदेशाचे अनुपालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे
दिनांकापासून तीस दिवसाचे आत करावे.
5) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व संबधित पक्षांना विनामुल्या द्याव्यात.