निकालपत्र :- (दि.20.07.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2, 5, 7, 9, 10 यांनी एकत्रित म्हणणे दाखल केले. तसेच, सामनेवाला क्र. 1 व 3 यांनीही एकत्रित म्हणणे दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.1 व 3 यांचे म्हणणेच सामनेवाला क्र.4 व 8 यांचे म्हणणे म्हणून वाचणेत यावे अशी पुरसिस दाखल केलेली आहे. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला संस्थेचे चेअरमन यांनी युक्तिवाद केला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेच्या भोगावती परिते शाखेमध्ये दि.04.02.2002 रोजी ठेव पावती क्र.1961 नुसार दामदुप्पट ठेव योजनेखाली रुपये 30,000/- इतकी मुदत ठेव ठेवली आहे. सदर ठेवीची मुदत दि.04.08.2006 रोजी पर्यन्त होती. वरीलप्रमाणे तक्रारदारांची सामनेवाला संस्थेकडे ठेव रक्कम रुपये 60,000/- व मुदत संपलेपासूनचे म्हणजेच दि.04.08.2006 रोजीपासूनचे व्याज सामनेवाला संस्थेकडून येणे आहे. सदर ठेवीची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमेची ब-याच वेळा मागणी केली आहे. यातील तक्रारदारांनी दि.16.02.2006 रोजी सदर ठेव पावतीवर रुपये 5,000/- इतके ठेव तारण म्हणून कर्ज घेतले आहे. दि.04.08.2006 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला यांचे भोगावती-परिते शाखेमध्ये जावून सदर कर्ज व त्यावरील दि.16.02.2006 ते दि.04.08.2006 रोजीपर्यन्त होणारे व्याज व कर्जाची रक्कम वजाजाता उर्वरित ठेव रक्कम परत करणेबाबत विनंती केली. तथापि, सामनेवाला संस्थेने कोणताही प्रतिसाद न देता तक्रारदारांना त्यांची ठेव रक्कम आजतागायत परत दिलेली नाही. तक्रारदार हे वृध्द व गरीब शेतकरी असलेने त्यांना सदर रक्कमेची आवश्यकता आहे. यातील सामनेवाला क्र.2 ते 10 हे सामनेवाला संस्थेचे संचालक असून सहकार कायद्यानुसार संस्थेच्या सर्व व्यवहाराबाबत ते सामुहिक व व्यक्तिगतरित्या जबाबदार आहेत. त्यामुळे तक्रारदारांनी दि.28.04.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्याजासह ठेवींच्या रक्कमांची मागणी केली. सदरची नोटीस सर्व सामनेवाला यांना पोहचूनही सामनेवाला यांनी तक्रारदारांची ठेव रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कम रुपये 60,000/-, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावती व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(5) सामनेवाला क्र.2 5, 7, 9 व 10 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी ठेवीवरील ठेव तारण कर्ज घेतल्याचे नमूद केले आहे. सदरची ठेव पावती तारण म्हणून संस्था दप्तरी दिलेली असते असे असताना पावती संस्थेत हजर केली असे म्हणता येणार नाही. तक्रार मुदतीत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व तक्रारदारांनी खोटा अर्ज केले कारणावरुन रुपये 5,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी केली आहे. (6) सामनेवाला क्र.1, 3, 4 व 8 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला क्र.1-पांडुरंग श्रीपती पाटील हे संस्थेचे केंव्हाही मॅनेजर नव्हते. तसेच, सामनेवाला क्र.2 ते 10 हे तक्रारदारांची ठेव रक्कम देणेस केंव्हाही वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार नव्हते व नाहीत. तक्रारदारांनी सदर ठेव रक्कमेवर रुपये 5,000/- इतके कर्ज काढलेले आहे. सदर कर्जाची आजअखेर येणेबाकी रुपये 10,000/- पर्यन्त असून सदर कर्ज रक्कम भागविणेचा तक्रारदारांनी केंव्हाही प्रयत्न केलेला नाही. अशी रक्कम व त्यावरील व्याज देणेची तक्रारदार यांची जबाबदारी आहे. सामनेवाला संस्थेची गेली 2 ते 3 वर्षे आर्थिक अडचणीत आहे. सदर रक्कमा देणेचे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे एकरकमी व्याजासह ठेव देणे संस्थेस अशक्य आहे. तरीदेखील जास्तीत जास्त वसुल करुन संस्था ठेव परत करणेचा प्रयत्न करीत आहे. तक्रारदारांच्या नुकसानीपोटी व तक्रारीचा खर्च अशी केलेली मागणी चुकीची आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (7) या मंचाने तक्रारदारांच्या वकिलांचे तसेच सामनेवाला संस्थेचे चेअरमन यांचे युक्तिवाद ऐकले. तसेच, तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रे यांचे बारकाईने अवलोकन केले आहे. प्रस्तुत तक्रारीतील तक्रारदार यांनी सामनेवाला संस्थेकडे दि.04.02.2002 रोजी दामदुप्पट ठेव पावती क्र.1961 अन्वये रुपये 30,000/- ठेवली होती, तिची दि.04.08.2006 रोजी मुदत संपलेली व तक्रारदारांना दामदुप्पट रक्कम रुपये 60,000/- इतकी रक्कम देय झाली. सदर ठेव पावतीवर तक्रारदारांनी दि.16.02.2006 रोजी रुपये 5,000/- इतके ठेव तारण कर्ज घेतले आहे. इत्यादी बाबी निर्विवाद आहेत. (8) सामनेवाला क्र.1, 3, 4 व 8 यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांनी घेतलेल्या ठेव तारण कर्जाची थकबाकी रुपये 10,000/- भागविणेचा प्रयत्न केलेला नाही. सदरची रक्कम भागविणेची तक्रारदारांची जबाबदारी आहे असे कथन केले आहे. तक्रारदारांच्या ठेव पावती क्र.1961 चे अवलोकन केले असता सदर पावतीच्या पाठीमागील भागावर तक्रारदारांनी वेळोवेळी घेतलेल्या ठेव तारण कर्जाचा तपशील नमूद आहे. त्यामध्ये दि.16.02.2006 रोजी तक्रारदारांनी रुपये 5,000/- इतके कर्ज उचललेचे दिसून येते व तत्पूर्वीच्या ठेव तारण कर्ज रक्कमां वसुल/जमा झालेचे नमूद आहे. सदरचे कर्ज हे ठेव तारण कर्ज असलेने तक्रारदारांनी त्याची फेड केली नाही तरी सामनेवाला यांनी सदर ठेव पावतीची दि.04.08.2006 रोजी मुदत संपलेनंतर कर्ज रक्कम व व्याज वजाजाता उर्वरित रक्कम तक्रारदारांना अदा करणे क्रमप्राप्त होते. तथापि, सामनेवाला यांनी तसे केले नसल्याने तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.28.04.2009 रोजी नोटीस पाठविलेली आहे. सदर नोटीसीवरुन व तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले प्रतिउत्तरावरुनही कर्ज रक्कम व दि.16.02.2006 ते दि. 04.08.2006 रोजीअखेरचे व्याज वजाजाता रक्कमेची मागणी केलेचे दिसून येते. सदर नोटीसीनंतरही सामनेवाला हे तक्रारदारांची कर्ज रक्कम व व्याज वजाजाता उर्वरित रक्कम तक्रारदारांना अदा करु शकले असते. तसेच, प्रस्तुत सामनेवाला यांनीच त्यांच्या म्हणण्यामध्ये गेली 2 ते 3 वर्षे संस्था आर्थिक अडचणीत असल्याने तक्रारदारांची ठेव रक्कम परत करणे अशक्य असल्याचे कथन केले आहे. इत्यादी विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांची ठेव तारण कर्ज रुपये 5,000/- व दि.16.02.2006 ते दि. 04.08.2006 या कालावधीतील व्याज वजाजाता दामदुप्पट ठेव रक्कम तक्रारदारांना परत न करुन सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदार हे दामुदप्पट ठेव पावती क्र.1961 वरील मुदतपूर्ण रक्कम ठेव तारण कर्ज रुपये 5,000/- व दि.16.02.2006 ते दि. 04.08.2006 या कालावधीतील व्याज वजाजाता उर्वरित रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(9) तक्रारदारांची व्याजासह ठेव रक्कम सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांची ठेव रक्कम देण्याची सामनेवाला क्र. 1 (संस्था) ते 10 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.1 (मॅनेजर) हे संस्थेचे कर्मचारी असल्याने त्यांची केवळ संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) तक्रारदार हे जेष्ठ नागरिक आहेत. तक्रारदारांनी ठेव रक्कमेची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कम परत न दिल्याने सदर रक्कम मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र. 1 (संस्था) ते 10 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.1 (मॅनेजर) यांनी तक्रारदारांना त्यांच्या दामदुप्पट ठेव पावती क्र.1961 वरील मुदतपूर्ण रक्कम रुपये 60,000/- (रुपये साठ हजार फक्त) द्यावेत. सदर रक्कमेवर दि. 05.08.2006 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे.
(3) सामनेवाला यांनी वरील आदेश कलम 2 मधील तक्रारदारांना संपूर्ण व्याजासह रक्कम अदा करतेसमयी ठेव तारण कर्ज रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) व त्यावरील दि.16.02.2006 ते दि. 04.08.2006 या कालावधीतील व्याज वळते करुन घ्यावे.
(4) सामनेवाला क्र. 1 (संस्था) ते 10 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.1 (मॅनेजर) यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |