द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
** निकालपत्र **
दिनांक 12/10/2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. जाबदेणार यांनी किरकटवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नं. 52 पैकी क्षेत्र 00 हे 06 आर या मिळकतीवर विकतील केलेल्या इमारतीतील दुस-या मजल्यावरील सदनिका क्र.202, 58.55 चौ.मी. रक्कम रुपये 8,00,000/- किंमतीस दिनांक 16/6/2008 रोजी नोंदणीकृत करारनाम्यान्वये तक्रारदारांनी खरेदी केली. करार दिनांकापासून 6 महिन्यांच्या आत दिनांक 12/12/2008 अखेर करारात नमूद साई-सुविधांसह जाबदेणार यांनी सदनिकेचा ताबा तक्रारदारांना दयावयाचा होता. सदनिकेची संपुर्ण रक्कम रुपये 8,00,000/- व वीज कनेक्शन व अपार्टमेंट चार्जेस पोटी रुपये 25,000/- स्विकारुनही, जाबदेणार यांनी करारानुसार सदनिकेचा ताबा तक्रारदारांना दिलेला नाही, त्यामुळे तक्रारदारांना इतरत्र भाडयाने रहावे लागले, आर्थिक, शारिरीक, मानसिक त्रास झाला म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून सदनिकेचा ताबा अथवा जाबदेणार यांना अदा केलेली संपुर्ण रक्कम रुपये 8,25,000/- व्याजासह मागतात. तसेच इतरत्र रहावे लागल्यामुळे भाडयाची रक्कम, बँकेकडील व्याजाची रक्कम मिळून रुपये 2,35,000/-, नुकसान भरपाईपोटी रुपये 10,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी सोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1 ते 4 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द दिनांक 5/10/2010 रोजी मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणारांनी तक्रारदारांना नोंदणीकृत करारनाम्याद्वारे विक्री केलेली सदनिका, न्यायप्रविष्ट असतांनादेखील सौ. किरण सुहास हगवणे यांना दिनांक 12/7/2010 रोजी विकल्याचे Index II चे अवलोकन केले असता दिसून येते. जाबदेणारांनी तक्रारदारांकडून सदनिकेची संपुर्ण किंमत रुपये 8,00,000/- व विज कनेक्शन, मीटर व अपार्टमेंट चार्जेसपोटी रुपये 25,000/- स्विकारलेले आहेत. जाबदेणारांनी तक्रारदारांच्या सदनिकेची बेकायदेशीररित्या विक्री सौ. हगवणे यांना केल्यामुळे तक्रारदारांना जाबदेणारांविरुध्द हवेली पोलिस स्टेशन मध्ये दिनांक 9/7/2010 रोजी लेखी तक्रार दाखल करणे भाग पडले. सदरहू तक्रारीचे मंचाने अवलोकन केले. लेखी तक्रारीनंतर जाबदेणारांनी दिनांक 12/7/2010 रोजीच्या ताबा पत्राद्वारे सदरहू सदनिकेचा ताबा तक्रारदारांना दिल्याचे दिसून येते. तसेच दिनांक 12/7/2010 रोजीच्या पत्रामध्ये जाबदेणारांनी “ करारामध्ये ठरल्याप्रमाणे सदर मिळकतीची संपूर्ण रक्कम आपल्याकडून आम्हांस यापुर्वीच मिळालेली आहे. प्लॅटचे उर्वरित काम मी कोणत्याही परिस्थितीत आजपासून 15 दिवसांचे पूर्ण करुन देईन ” असे नमूद केलेले आहे. वास्तविक दिनांक 16/6/2008 रोजी नोंदणीकृत करारनाम्यान्वये जाबदेणारांनी करारातील परिशिष्ट अ पान क्र.13 व 14 मधील नमूद केलेल्या सर्व सोई-सुविधांसह सदनिकेचा ताबा तक्रारदारांना करार दिनांकापासून 6 महिन्यांच्या आत देण्याचे करारतील पान क्र.9 कलम डी मध्ये मान्य करुन देखील प्रत्यक्षात तक्रारदारांना सदनिकेचा ताबा दिनांक 12/7/2010 रोजी जाबदेणारांनी दिल्याचे ताबा पत्र दिनांक 12/7/2010 वरुन दिसून येते. तसेच जाबदेणारांनी सदनिकेची संपुर्ण किंमत स्विकारुनही, ताबा नमूद दिनांकापेक्षा उशिरा दिल्याचे, व करारात नमूद सर्व सोई-सुविधा तक्रारदारांना दिलेल्या नसल्याचे देखील ताबा पत्र दिनांक 12/7/2010 वरुन दिसून येते. ही जाबदेणा-यांच्या सेवेतील त्रुटी आहे. अपु-या सोई-सुविधांमुळे तक्रारदारांना नवीन वीज मिटर जोडणी व वायरींग पोटी रुपये 8,450/- खर्च करावे लागल्याचे दिनांक 12/5/2011 श्री सुक्टे इलेक्ट्रीकल्स यांच्या बिलावरुन दिसून येते. विद्युत वितरण कंपनीकडे अनामत रकमेपोटी रुपये 1621/- तक्रारदारांनी भरल्याचे दिनांक 19/4/2011 च्या बिलावरुन दिसून येते. तसेच पेंटींग व अंतर्गत प्लॅस्टर पोटी तक्रारदारांनी रुपये 9,500/- श्री. जीवा बाळासाहेब पवार यांना दिनांक 13/5/2011 रोजी अदा केल्याचे दाखल पावतीवरुन दिसून येते. अॅल्युमिनीअम खिडक्या बसविण्यापोटी तक्रारदारांनी एस.पी. अॅल्युमिनीअम्स यांना रुपये 6200/- अदा केल्याचे दिनांक 15/6/2011 च्या पावतीवरुन दिसून येते. ही सर्व रक्कम तक्रारदार जाबदेणारांकडून मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. जाबदेणा-यांच्या सेवेतील त्रुटी मुळे तक्रारदारांना निश्चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागल्यामुळे तक्रारदार नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 25,000/-मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी भाडयापोटी मागितलेल्या रकमेसंदर्भात पुरावा – भाडे पावती, तसेच बँकेला व्याजापोटी भरलेल्या रकमेसंदर्भात बँकेचे स्टेटमेंट सादर न केल्यामुळे तक्रारदारांची ही मागणी अमान्य करण्यात येते. दिनांक 16/6/2008 च्या नोंदणीकृत करारनाम्यातील परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या सोई-सुविधा मिळण्यासदेखील तक्रारदार पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व कारणमिमांसेवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2. जाबदेणार क्र.1 ते 4 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना दिनांक 16/6/2008 च्या नोंदणीकृत करारनाम्यातील परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या सोई-सुविधा आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्यात आत दयाव्यात.
3. जाबदेणार क्र.1 ते 4 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना दुरुस्ती पोटी आलेल्या खर्चाची रक्कम रुपये 25,771/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्यात आत अदा करावी.
4. जाबदेणार क्र.1 ते 4 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 25,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्यात आत अदा करावेत.
5. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
5.