निकाल
(घोषित दि. 05.12.2016 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार ही मयत संजय तुकाराम पवार यांची पत्नी आहे. मयत संजय तुकाराम पवार यास दि.24.10.2015 रोजी सकाळी 5.30 च्या दरम्यान सर्पदंश झाला. त्यामुळे त्याला तात्काळ गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात वैद्यकीय उपचाराकरता आणले. तक्रारदाराच्या पतीस दवाखान्यात शरीक करुन घेतल्यानंतर डॉक्टरांना स्पष्ट शब्दात सुचना देण्यात आली की, पेशंटला सर्पदंश झालेला आहे. त्यावेळी गैरअर्जदार डॉक्टर यांनी आश्वासन दिले की, त्यांचेजवळ सर्पदंश करिता आवश्यक असलेली सर्व उपचार सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे दि.24.10.2015 रोजी सकाळी 06.00 च्या दरम्यान तक्रारदार हिच्या पतीस गैरअर्जदार क्र.1 यांचे दवाखान्यात इन पेशंट वॉर्डमध्ये दाखल करुन घेण्यात आले. तक्रारदाराचा पती सदर दवाखान्यात पूर्ण दोन दिवस दाखल होता. त्या कालावधीत तो गैरअर्जदार क्र.2 या डॉक्टरांच्या निगराणी व उपचारामध्ये होता. गैरअर्जदार क्र.2 हा गैरअर्जदार क्र.1 हया दवाखान्याचा मालक आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णास अॅन्टी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन तात्काळ दिले तर सदर पेशंट सर्पदंशाच्या परिणामापासून वाचु शकतो. तक्रारदार हिचा असा आरोप आहे की, गैरअर्जदार यांनी तिच्या पतीस अॅन्टी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन दिलेच नाही. परंतू अॅन्टी स्नेक व्हेनम हया इंजेक्शनची किंमत मात्र तिच्याकडून वसूल करुन घेण्यात आली. गैरअर्जदार यांनी दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे व अॅन्टी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन न दिल्यामुळे तक्रारदार हिच्या पतीची प्रकृती नाजुक झाली. दि.26.10.2015 रोजी असे दिसून आले की, तक्रारदार हिच्या पतीची अवस्था अत्यंत नाजुक आहे म्हणुन त्याला धुत हॉस्पीटल औरंगाबाद येथे पुढील उपचाराकरता पाठविण्याचे ठरले. त्याकरिता गैरअर्जदार क्र.2 यांनी डॉ.निकाळजे यांना तारीख न लिहीलेले एक पत्र दिले. शरीर प्रकृती अत्यंत नाजुक झाल्यानंतर गंभिर अवस्थेतील पेशंटला दुस-या हॉस्पीटलमध्ये पुढील उपचाराकरता पाठविणे म्हणजे स्वतःवरील जबाबदारी दुस-या दवाखान्यावर ढकलण्यासारखे आहे. तक्रारदार हिच्या पतीस धुत हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर दि.26.10.2015रोजी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यावेळी सर्पदंशामुळेच त्याचा मृत्यू झाला असे निष्पन्न झाले. प्रत्यक्षात दोन दिवसांचा कालावधी गैरअर्जदार क्र.2 यांना उपलब्ध होता, त्या कालावधीत ते तक्रारदार हिच्या पतीस योग्य तो वैद्यकीय उपचार देऊ शकत होते, परंतू त्यांनी योग्य तो वैद्यकीय इलाज दिला नाही. त्याचप्रमाणे सापाचे विष शरीरामध्ये पसरु नये म्हणून योग्य ती उपाययोजना केली नाही. थोडक्यात तक्रारदार हिच्या पतीस गैरअर्जदार क्र.2 यांनी अॅन्टी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन न दिल्यामुळे तसेच तिच्या पतीस योग्य तो औषधोपचार त्यावेळी न दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला म्हणून गैरअर्जदार क्र.1 व 2 हे जबाबदार आहेत असा तक्रारदार हिचा आरोप आहे. तक्रारदार हिने या सर्व कारणास्तव वैद्यकीय निष्काळजीपणाकरता नुकसान भरपाई रु.15,00,000/- तसेच तिला झालेल्या मानसिक त्रासाकरता नुकसान भरपाई रु.4,50,000/- आणि कार्यवाहीच्या खर्चापोटी रु.40,000/- तिला मिळावेत अशी मागणी केलेली आहे.
तक्रारदार हिने तक्रार अर्जासोबत जोडलेल्या यादीत दर्शविल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे व त्याच्या नक्कला मंचाच्या अवलोकनार्थ दाखल केलेल्या आहेत.
गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे. त्यांनी तक्रारदार हिने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. गैरअर्जदार यांच्या म्हणण्याप्रमाणे पेशंटला त्यांच्याकडे वैद्यकीय उपचाराकरता दि.24.10.2015 रोजी सकाळी 6 वाजता आणण्यात आले. पेशंट त्यांच्या दवाखान्यात दि.24.10.2015 ते 26.10.2015 (सकाळी 12.30 वाजेपर्यंत) अॅडमीट होता. पेशंटचा वैद्यकीय इलाज सदर कालावधीत गैरअर्जदार क्र.2 यांनी केलेला आहे. गैरअर्जदार यांनी स्पष्ट शब्दात नाकारले आहे की, गैरअर्जदार यांनी सर्पाचे विष पेशंटच्या शरीरात पसरु नये म्हणून तात्काळ योग्य ती उपाययोजना केली नाही. तसेच त्यांनी नाकारले आहे की, अॅन्टी स्नेक व्हेनम या इंजेक्शनचे पैसे घेऊनही सदर इंजेक्शन पेशंटला दिले नाही. प्रत्यक्षात अॅन्टी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन सदर पेशंटला वेळोवेळी देण्यात आले आहे. डॉ.निकाळजे यांना गैरअर्जदार क्र.2 यांनी एक पत्र लिहीलेले आहे, सदर पत्र तक्रारदार हिच्या नातेवाईकांच्या विनंतीनुसार लिहीण्यात आलेले आहे. गैरअर्जदार यांनी नाकारले आहे की, त्यांच्या दवाखान्यावरील जिम्मेदारी दुस-या दवाखान्यावर ढकलण्याकरता त्यांनी पेशंटला दुस-या दवाखान्यात पाठविण्यास सुचित केले. गैरअर्जदार यांना धुत हॉस्पीटलमध्ये सदर पेशंटला काय ट्रीटमेंट दिली हे माहीत नाही. तक्रारदार हिने सर्व खोटे आरोप गैरअर्जदार यांचेकडून पैसे उकळण्याकरता केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 हे इस्पीतळ आय.एस.ओ.सर्टीफाईट असून त्यामध्ये योग्य ते शिक्षण घेतलेले, योग्यता प्राप्त डॉक्टर, नर्सेस व इतर स्टॉफ आहे. पेशंटला गैरअर्जदार क्र.1 या दवाखान्यात अॅन्टी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन दिले होते ही बाब तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांना माहीत होती. सेठ नंदलाल धुत हॉस्पीटलमध्ये पेशंटला शरीक केले त्यावेळी त्यांनी ती गोष्ट धुत हॉस्पीटलमध्ये सांगितली. मुळातच तक्रारदार हिच्या पतीची प्रकृती नाजुक होती. 2009 मध्ये त्याची अॅंजिओप्लास्टी झाली होती व तो हृदय विकाराने पिडीत होता, त्याला हृदय विकारावरील औषधी चालू होती. दि.25.10.2015 चे रात्री उशीरा संबंधित पेशंटचा भाऊ रमेश गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे आला व त्यांनी पेशंटला औरंगाबादला हलवण्याची इच्छा व्यक्त केली. कारण औरंगाबाद येथे पेशंटला नेल्यास त्याची देखभाल करणे पेशंटच्या नातेवाईकांना सोईस्कर होते. त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 यांनी डॉ.निकाळजे यांना पत्र लिहून दिले. यावरुन संबंधित पेशंटच्या नातेवाईकांच्या इच्छेवरुनच पेशंटला औरंगाबादला हलवले ही गोष्ट स्पष्ट होते. डॉ.निकाळजे हे एम.आय.टी. हॉस्पीटलला संलग्न आहेत. संबंधित पेशंटच्या नातेवाईकांनी डॉ.निकाळजे यांना पत्र द्या, असे सांगितले होते त्यामुळे त्यांचे नांवाने पत्र देण्यात आले. परंतू प्रत्यक्षात मात्र संबंधित पेशंटला धुत हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. तक्रारदार हिने तक्रारीत असा उल्लेख केला आहे की, सर्पदंश झालेल्या व्यक्तीस अॅन्टी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन दिल्यास तो सर्पदंशाच्या परिणामापासून संपूर्णपणे मुक्त होऊ शकतो. परंतू ही गोष्ट प्रत्येक वेळीच खरी ठरते असे नाही. कारण काही विशिष्ट जातीच्या सर्पाने दंश केला तर अॅन्टी स्नेक व्हेनम हया इंजेक्शनचा उपयोग होऊ शकत नाही. या सर्व कारणास्तव गैरअर्जदार यांनी तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा व ही तक्रार द्वेषबुध्दीने खोटी दाखल केली आहे असे निरीक्षण करावे अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार यांनी त्यांच्या युक्तीवादासोबत काही कागदपत्रे ग्राहक मंचाच्या अवलोकनार्थ जोडलेली आहेत.
या प्रकरणात तक्रारदार हिचा पती संजय यास दि.24.10.2015 रोजी सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात अॅडमीट करण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 हा दवाखाना असून गैरअर्जदार क्र.2 हे सदर दवाखान्याचे चालक आहेत. तक्रारदार हिच्या पतीस गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात आणले त्यावेळी गैरअर्जदार क्र.2 यांना स्पष्टपणे कल्पना दिली होती की, तक्रारदार हिच्या पतीस सकाळी सर्पदंश झाल्यामुळे त्याला उपचाराकरता दवाखान्यात आणले आहे. त्यानंतर दि.26.10.2015 चे दुपारी 12 पर्यंत तक्रारदार हिचा पती गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात वैद्यकीय उपचार घेत होता. तक्रारदार हिच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.2 यांनी तिच्या पतीस अॅन्टी स्नेक व्हेनम हे औषध देण्याकरता पैसे घेतले परंतू सदर औषधाचे इंजेक्शन तिच्या पतीस दिलेच नाही. त्याचप्रमाणे इतर अत्यावश्यक उपचार तिच्या पतीस करणे आवश्यक होते परंतू सदर उपचारही करण्यात आले नाहीत. या मुद्यावर गैरअर्जदार यांनी तक्रारदार हिने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आमचे मताने तक्रारदार आणि तिचा पती यांचे गैरअर्जदार क्र.2 यांच्याशी कोणताही वैर नाही, किंवा कोर्टामध्ये भांडण नाही. तसेच पैशाचे बाबतीत देवाणघेवाणीचा वाद नाही. अशा परिस्थितीत सर्पदंश होऊन गंभीर स्थितीत गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात दाखल केलेल्या पेशंटला योग्य तो उपचार न देऊन गैरअर्जदार हे कोणता फायदा घेणार होते हेच कळून येत नाही. गैरअर्जदार क्र.2 यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, तक्रारदार हिच्या पतीस अॅन्टी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन वेळोवेळी आवश्यक त्या प्रमाणात देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे इतर आवश्यक उपचार सुध्दा करण्यात आले आहेत.
तक्रारदार हिने अॅन्टी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन तिच्या पतीस गैरअर्जदार यांनी दिलेच नाही असा आरोप केला आहे. परंतू ते सिध्द करण्याकरता योग्य तो पुरावा सादर केलेला नाही. या मुद्यावर गैरअर्जदार यांच्या इन पेशंट वॉर्डच्या दैनंदिन उपचाराचे रेकॉर्ड मंचासमोर दाखल करण्यात आले आहे त्याचे अवलोकन केल्यावर असे दिसून येते की, तक्रारदार हिच्या पतीस वेळोवेळी अॅन्टी स्नेक व्हेनम हया इंजेक्शनचे डोस देण्यात आले. दि.24.10.2015 रोजी सकाळी 10 वाजता परत अॅन्टी स्नेक व्हेनम हया इंजेक्शनचा चार व्हायलचा डोस देण्यात आला. दि.25.10.2015 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास परत अॅन्टी स्नेक व्हेनम चा चार व्हायलसचा डोस देण्यात आला. औषधी विकत घेतल्याच्या पावत्या सुध्दा रेकॉर्डवर दाखल करण्यात आल्या आहेत. प्रत्येक पावतीवर वेगवेगळे कॅश मेमो नंबर असून त्या संगणकाद्वारे दिल्या आहेत. सदर पावत्यामध्ये कॅश मेमो नं.CA/11710 दि.दि.25.10.2015 नुसार अॅन्टी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन तक्रारदार हिच्या पतीस देण्याकरता घेतल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे कॅश मेमो CA/11732 दि.25.10.2015 प्रमाणे अॅन्टी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन तक्रारदार हिच्या पतीस देण्याकरता घेतल्याचे दिसून येते. दि.24 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 5 वाजून 59 मिनीटानी तक्रारदार हिच्या पतीचा केस पेपर डॉ.निलेश अग्रवाल यांनी लिहील्याचे दिसून येते. त्यामध्ये पेशंटला अॅन्टी स्नेक व्हेनम चा उपचार देणेबाबत उल्लेख असल्याचे दिसून येते. याचाच अर्थ तक्रारदार हिच्या पतीस गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात अॅन्टी स्नेक व्हेनम हया औषधांचा उपचार दिलेला दिसून येतो. उपलब्ध पुरावा खोटा आहे हे सिध्द करण्याकरता तक्रारदार हिने कोणताही प्रतिपुरावा आणलेला नाही.
गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारदार हिच्या पतीच्या उपचाराकरता डॉ.निकाळजे यांना पाठविलेले पत्र रेकॉर्डवर दाखल आहे. गैरअर्जदार यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार हिच्या पतीचा भाऊ दि.25.10.2015 या तारखेस रात्री उशिरा गैरअर्जदार क्र.2 यांना भेटला व पेशंटला अधिक चांगला उपचार देण्याकरता औरंगाबाद येथे नेण्याची इच्छा व्यक्त केली. पेशंटचे इतर नातेवाईक औरंगाबाद येथील रहिवाशी असल्यामुळे दवाखान्यात जाणेयेणे सोईस्कर आहे असे सांगण्यात आले. तसेच पेशंटला एम.आय.टी.हॉस्पीटलमध्ये नेण्याचे कारण सांगितल्यामुळे गैरअर्जदार क्र.2 यांनी डॉ.निकाळजे यांचे नावे पत्र लिहीले, परंतू प्रत्यक्षात मात्र एम.आय.टी. हॉस्पीटल औरंगाबाद येथे तक्रारदार हिच्या पतीस दाखल न करता त्याला धुत हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले आणि पेशंटचा मृत्यू होईपर्यंत त्याला तेथेच इलाज देण्यात आला. डॉ.निकाळजे यांना गैरअर्जदार क्र.2 यांनी लिहीलेल्या पत्रात अॅन्टी स्नेक व्हेनमच्या 9 व्हायल पेशंटला दिल्याचा उल्लेख आहे. सदर उल्लेख गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांच्या शपथपत्रात केलेला आहे. सदर पत्रावर तारीख जरी लिहीली नसेल तरी असे दिसून येते की, सदर पत्र दि.25.10.2015 च्या मध्यरात्री अथवा दि.26.10.2015 चे सकाळी केव्हातरी लिहीलेले असावे. त्यावेळी तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये वाद नव्हता. त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर पत्रामध्ये जे काही लिहीले आहे ते वाढवून किंवा अतिशयोक्ती करुन, किंवा स्वतःचे निरपराधीत्व दाखविण्याकरता लिहीले आहे असे गृहीत धरता येणार नाही.
अशा रितीने गैरअर्जदार क्र.1 हया इस्पीतळातून डिस्चार्ज घेऊन पेशंटला सेठ नंदलाल धुत हॉस्पीटलमध्ये दाखल केले. ग्राहक मंचासमोर दाखल केलेल्या कागदपत्रांच्या नक्कलामध्ये अ.क्र.35 वर सेठ नंदलाल धुत हॉस्पीटलची MLC शीटची नक्कल आहे त्यामध्ये पेशंटला अॅन्टी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन ओम साई हॉस्पीटल जालना येथे दिले होते असा उल्लेख आहे. याचाच अर्थ गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर माहिती पेशंटच्या त्यांनी दिलेल्या डिस्चार्ज कार्डवर लिहीली होती. तसेच तक्रारदार यांना ही तसे सांगितले होते असे गृहीत धरावे लागेल. त्यामुळेच सेठ नंदलाल धुत हॉस्पीटलच्या MLC शीटवर पेशंटला जालना येथे अॅन्टी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन दिल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
तक्रारदार हिच्या पतीस पुर्वीचा गंभीर स्वरुपाचा विकार होता. त्यामुळे त्याला तज्ञ डॉक्टरांकडून सदर विकारावर औषधोपचार चालू होता इ.स. 2009 मध्ये तक्रारदाराच्या पतीची अॅंजिओप्लास्टी झाली होती. त्याला हृदयविकाराचे दुखणे होते असा उल्लेख स्पष्ट शब्दात गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या परिच्छेद क्र.18 मध्ये केलेला आहे. तसेच शपथपत्राच्याही परिच्छेद क्र.18 मध्येही तोच उल्लेख दिसून येतो. सदर पुराव्याला प्रत्युत्तर म्हणून तक्रारदाराने पुरावा दिलेला नाही. त्यामुळे असे गृहीत धरावे लागेल की, तक्रारदार हिच्या पतीस पुर्वी जो काही गंभीर स्वरुपाचा विकार होता त्या बाबतची माहिती तक्रारदार हिने गैरअर्जदार क्र.2 यांना सांगितली नाही.
धुत हॉस्पीटलमध्ये तक्रारदार हिच्या पतीस जो औषधोपचार दिला गेला, त्यानंतरच पेशंटचा मृत्यू झाला असे दिसून येते. अशा परिस्थतीत तक्रारदार हिच्या पतीचा मृत्यू धूत हॉस्पीटलमधील इलाजानंतर झालेल्या उपचाराच्या परिणामामुळे झाला असू शकतो असे म्हटले तरी त्यात चुकी होणार नाही.
गैरअर्जदार यांचे वकील श्री.तवरावाला यांनी असा युक्तीवाद केला की, अॅन्टी स्नेक व्हेनम हे औषध सर्पदंशावर अतिशय गुणकारी आहे. परंतू जगात असलेल्या सर्वच सापांच्या जाती व प्रजातीच्या विषावर त्याचा प्रभावी परिणाम होत नाही. जर तक्रारदार हिच्या पतीस अशाच एखाद्या अतिविषारी सर्पाने दंश केला असेल तर अॅन्टी स्नेक व्हेनम या इंजेक्शनचा त्या विषावर परिणाम न झाल्यामुळे पेशंटचा मृत्यू होऊ शकतो. अशा परिस्थितीत पेशंटच्या मृत्यूला गैरअर्जदार हे जिम्मेदार राहू शकत नाहीत. तक्रारदार हिच्या पतीस कोणत्या जातीच्या सापाने दंश केला याबाबत ग्राहक मंचासमोर कोणतीही माहिती उपलब्ध नाही. शपथपत्राच्या व लेखी जबाबाच्या परिच्छेद 21 मध्ये गैरअर्जदार यांनी स्पष्ट शब्दात निवेदन केले आहे की, Hum Nosed Pit Viper या सापाच्या विषावर अॅन्टी स्नेक व्हेनम या औषधांचा कोणताही परिणाम होत नाही.
दि.24.10.2015 सकाळी 6 पासून ते 26.10.2015 चे दुपारी 12=30 पर्यंत तक्रारदाराचा पती गैरअर्जदार क्रं.2 चा वैदयकीय उपचार घेत होता. त्या कालावधीत तक्रारदाराचे जर गैरअर्जदार क्रं.2 बरोबर भांडण असते तर तिने तिच्या नव-याला गैरअर्जदारा चे दवाखान्यात दाखलच केले नसते. रेकॉर्ड वरील पुराव्या नुसार असे दिसते की, पेशंटला दवाखान्यात Admit केले त्या वेळी Admit Card वर सुध्दा Anti Snake Venum चा उपचार देणेचा उल्लेख आहे. दवाखान्यात दाखल केलेल्या पेशंटला जो दैनंदिन उपचार दिला जातो त्याच्या सविस्तर नोंदी तारीख व वेळेसहित उपलब्ध आहेत. त्या मध्ये ही अॅटी स्नेक व्हेनम पेशंटला दिल्याचा उल्लेख आहे. अॅंटी स्नेक व्हेनम विकत घेतल्याच्या औषध दुकानाच्या वेगवेगळया पावत्या ही उपलब्ध आहेत हे सर्व रेकॉर्ड दैनंदिन कामकाजाचे मध्ये त्या त्या वेळी लिहीलेले असल्याचे दिसते. सदर रेकॉर्ड बनावट असण्याची शक्यता नाही कारण तक्रारदार व गैरअर्जदार यांचे मध्ये तेंव्हा पासून किंवा त्याचे आधी पासून शत्रुत्व असल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे जाणुन बुजुन तक्रारदाराचे पतीकडे दुर्लक्ष करण्याचे गैरअर्जदारास कोणतेही संयुक्तीक कारण नाही.
वरील सर्व चर्चेच्या पार्श्वभूमीवर आम्ही असा निष्कर्ष काढतो की, तक्रारदार यांनी त्यांचे आरोप गैरअर्जदार यांच्या विरुध्द पुरेशा पुराव्याने सिध्द केलेले नाहीत. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांची, तक्रारदार यांच्या पतीच्या सेवेत त्रुटी होती असे दिसून येत नाही. तसेच तक्रारदार हिच्या पतीस अॅन्टी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन देण्याकरता गैरअर्जदार यांनी पैसे घेतले परंतू सदर इंजेक्शन त्याला दिले नाही असे गृहीत धरण्यास कोणताही पुरावा नाही. त्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना