(पारीत व्दारा मा.सदस्या श्रीमती वृषाली गौ.जागीरदार)
(पारीत दिनांक – 28 जानेवारी, 2019)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्द पक्षा विरुध्द दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून तो मौजा सावरी, ता. लाखनी जिल्हा भंडारा येथील भूमापन क्रं- 284 व 285 ही शेतजमीन वाहतो. सदर शेतीमध्ये ठिंबक सिंचन पध्दतीने शेती करण्याची सुविधा आहे. विरुध्दपक्ष क्रं-2 ही भेंडीचे बियाणे उत्पादन करणारी कंपनी आहे . विरुध्द पक्ष क्रं. 1 हे सदर कंपनीचे अधिकृत विक्रेता असून तो सदर भेंडीचे बियाणे विकण्याचे काम करतो. विरुध्द पक्ष क्रं. 2 ने प्रसिध्द केलेल्या जाहीरातीनुसार भेंडीचे बियाणे हे खरीप व रब्बी पिकाकरीता उपयुक्त आहे. सदरचे बियाणे हे संकरीत असून भेंडी बुटकी व ठोकळ 2 ते 3 इंच लांब व 2 ते 3 इंच गोलाईची आहे तसेच भेंडीचे ही साधारणतः 7 महिने पिक देणारी असून एकरी उत्पन्न 250 क्विंटल म्हणजेच 25,000/- किलो देणारी आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 2 यांच्या जाहीरातीवर विश्वास ठेवून विरुध्द पक्ष क्रं. 1 यांचेकडून दिनांक 04/11/2015 रोजी भेंडीचे बियाणे जे.के.ओ.एस/045, 250 ग्रॅम वजनाचे, लॉट नंबर 1313-874007 एफ चे एकूण 28 पॉकीट खरेदी केले.
तक्रारकर्ता पुढे असे नमुद करतो की, त्याने दिनांक 04/11/2015 व दिनांक 05/11/2015 रोजी विकत घेतलेल्या भेंडीच्या बियाणाची लागवड गट क्रं.284 व 285 मध्ये 1.75 एकर जागेवर केली. तक्रारकर्त्याने सदरची लागवड ठिंबक सिंचन व मन्चींग पेपर व बेट पध्दतीने केलेली होती. भेंडाच्या पिकाची लागवड करतांना तक्रारकर्त्याने 10 ट्रॅक्टर शेणखत, डि.ए.पी.3 बॅग व इतर खत दिलेले होते. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार लावलेल्या भेंडी बियाणाचे उत्पन्न लागवड केल्यानंतर 60 दिवसांनी मिळण्यास सुरवात होते. त्यानुसार दिनांक 28/12/2015 ला तक्रारकर्त्याचे शेतात भेंडी लागण्यास सुरवात झाली परंतु सदरची भेंडी ही विरुध्द पक्ष क्रं. 2 ने प्रसिध्द केलेल्या जाहीरातीनुसार दिसत नसल्याने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 ला भेंडीचे परिक्षण करण्याकरीता तोंडी कळविले परंतु विरुध्द पक्ष क्रं. 1 ने तक्रारकर्त्याच्या शेतात जाऊन पाहणी केली नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना वारंवार भेंडीच्या वाढीसंबंधी कळविले असता विरुध्द पक्ष क्रं. 1 ने तक्रारकर्त्यास बियाणामध्ये फरक असु शकतो, त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 2 कंपनीचे अधिकारी श्री. कांबळी यांना भेटा असे सांगितले. तक्रारकर्त्याने श्री. कांबळी यांचेशी फोनद्वारे संपर्क साधला असता ते बाहेरगावी असल्याने त्यांनी त्या भागातील काम पाहणारे विरुध्द पक्ष क्रं.2 कंपनीचे कर्मचारी श्री. कावळे यांना पाहणी करण्यास पाठविले. त्यानुसार श्री.कावळे हे श्री. पद्ममाकर खेडीकर यांचे सोबत तक्रारकर्त्याचे शेतावर जाऊन भेंडीच्या पिकाची पाहणी केली व बियाणामध्ये (बिजायत) खराबी असल्याने असे पिक निघत असल्याचे तोंडी सांगितले, परंतु त्यानंतरही कंपनीचा कोणताही अधिकारी तक्रारकर्त्याचे पिकाची पाहणी करण्याकरीता आला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 09/02/2016 ला कृषी अधिकारी साकोली तसेच दिनांक 08/08/2016 व दिनांक 15/02/2016 रोजी तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी यांनी दिनांक 23/02/2016 रोजी मोक्यावर पाहणी केली व त्यांनी आपल्या अहवालात प्रत्येक भेंडीच्या झाडाला 25 ते 30 भेंडया लागलेल्या असून त्यापैकी 75 टक्के भेंडया हया बाजारात विकण्यायोग्य नाही असे नमुद केले आहे तसेच विरुध्द पक्ष क्रं. 2 ने तयार केलेले भेंडीचे बियाणे योग्य नसल्याने तक्रारकर्त्याच्या भेंडीच्या पिकाला रोगाचा प्रार्दुभाव झाल्याचे नमुद केले आहे.
तक्रारकर्ता पुढे असे नमुद करतो की, त्याला भेंडीच्या पिकाचे उत्पादन घेत असताना सदर भेंडीच्या लागवडीकरीता अंदाजे 3,50,000/- ते 4,00,000/- रुपये खर्च करावे लागले. जर विरुध्द पक्ष क्रं. 2 उत्पादीत भेंडीचे बियाणे योग्य असते तर तक्रारकर्त्याला जानेवारी 2016 पासून ते जुलै 2016 पर्यंत एकरी 250 क्विंटल भेंडीचे उत्पन्न झाले असते. सदर भेंडी 20 ते 25 रुपये किलोप्रमाणे विकली असती तर तक्रारकर्त्यास अंदाजे रुपये 8,75,000/- उत्पन्न झाले असते, परंतु भेंडीचे बियाणे योग्य नसल्याने पिक हे निकृष्ट दर्जाचे निघाल्यामुळे त्याचे जवळपास रुपये 8,75,000/- चे आर्थिक नुकसान झालेले आहे. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांचा ग्राहक असून त्यांनी तक्रारकर्त्यास ग्राहक सेवा देण्यात टाळाटाळ केली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थिक, शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. विरुध्द पक्ष क्रं. 2 उत्पादीत बियाणांची त्यांच्या जाहीरातीनुसार उत्पन्न न दिल्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी तक्रारकर्त्याची फसवणूक केलेली आहे व त्याचे जवळपास 8,75,000/- रुपयांचे नुकसान झालेले असून विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 हे तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत.
तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्याने वकीलामार्फत कायदेशीर नोटीस दिनांक 10/03/2016 रोजी विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांना पाठविली. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांना नोटीस प्राप्त होऊन सुध्दा उत्तर दिले नाही व नुकसान भरपाई दिलेली नसल्यामुळे तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी केलेल्या सेवेतील त्रुटीमुळे आर्थिक,मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागला म्हणून त्याने नुकसान भरपाई रुपये 8,75,000/- आणि झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांचेकडून मिळण्याकरीता सदर तक्रार दाखल केलेली आहे.
03. विरुध्द पक्ष क्रं.1 अधिकृत विक्रेता, तर्फे मंचासमक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात त्याने तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष क्रं. 2 उत्पादीत कंपनीचे भेंडीचे बियाणे विकल्याचे कबुल केले आहे. विरुध्द पक्ष क्रं.1 ने पुढे असे नमुद केले आहे की, सदर भेंडीचे बियाणे हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे तक्रारकर्त्यास कोणतेही उत्पन्न झाले नाही व त्याचे आर्थिक, शारीरीक व मानसिक नुकसान झाले आहे. सदर नुकसान भरपाई भरुन देण्याची संपूर्ण जबाबदारी ही विरुध्द पक्ष क्रं. 2 यांची आहे.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे उत्पादीत कंपनी तर्फे मंचासमक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्त्याच्या तक्रारीला सक्त विरोध केला आहे. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी असा आक्षेप घेतला आहे की, तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ही नुकसान भरपाईचे संबंधित असल्याने परिस्थितीचे योग्य मुल्यांकन होणे गरजेचे आहे. सदर प्रकरणात योग्य पुरावा तसेच उलट तपासणी गरजेचे असल्याकारणाने सदर प्रकरण हे विद्यमान न्यायमंचाचे अधिकार कक्षेबाहेरील बाब आहे व नुकसान भरपाई संबंधित वाद मिटविण्याचा अधिकार हा केवळ दिवाणी न्यायालयालाच आहे, म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी तसेच तक्रारकर्ता हा ग्राहक या सज्ञेत मोडत नाही, म्हणून सदर तक्रार खारीज करण्यात यावी असे नमूद केले आहे.
विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी पुढे असा आक्षेप घेतला आहे की, तक्रारकर्त्याने अभिलेखावर 7/12 उतारा दाखल केला नसून जमीनीच्या मालकी बद्दल कोणताच पुरावा दाखल केलेला नाही. तसेच विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी पुढे असे नमुद केले आहे की, बियाण्याच्या उत्पादन क्षमतेमध्ये त्रुटी असल्याबद्दल शासकीय प्रयोग शाळेचा तांत्रिक अहवाल तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. विरुध्द पख क्रं. 2 यांनी विकलेल्या 045 प्रकारच्या भेंडी बियाणाचे तक्रारदारा व्यतिरिक्त कोणीही तक्रार केलेली नाही. त्याचप्रमाणे उपरोक्त संकरित बियाणे JKOH045 च्या उत्पादनाचा परवाना मुख्य आयुक्त कृषी विभाग क्लॉलीटी कंट्रोल, पुणे यांनी बियाणाच्या उत्पादन क्षमतांची चाचणी करुन परवाना दिलेला आहे. विरुध्द पख क्रं. 2 ने पुढे नमुद केले की, तक्रारकर्त्याने फसलेची योग्य निगा न राखल्यामुळे व वेळोवेळी खत-पाणी न दिल्यामुळे व खराब हवामानामुळे भेंडी चे योग्य उत्पादन झाले नाही त्यास विरुध्द पक्ष क्रं. 2 जबाबदार नाही. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांना मौका चौकशी बद्दल कोणताच नोटीस देण्यात आला नाही परंतु विरुध्द पक्ष क्रं.1 यांना नोटीस पाठविण्यात आला होता. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 2 यांचेकडून पैसे उखळण्यासाठी सदरची खोटी तक्रार दाखल केली आहे, त्यामुळे सदर तक्रार खारीज करण्यांची विनंती केली आहे.
05. तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ठ क्रं-15 नुसार एकूण-08 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या आहेत. पृष्ठ क्रं- 62 वर त्याने तक्रार अर्जालाच पुराव्याचे शपथपत्र समजण्यात यावी अशी पुरसिस दाखल केली आहे. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी पुराव्याचे शपथपत्र पृष्ठ क्रं- 60 वर दाखल केले. तक्रारकर्त्याच्या वकीलांनी लेखी युक्तिवाद पृष्ठ क्रं- 65 ते 68 वर दाखल केला आहे. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी दाखल केलेले लेखी उत्तर व पुरावा यालाच लेखी युक्तिवाद समजण्यात यावी अशी पुरसिस पृष्ठ क्रं- 73 वर दाखल केली आहे. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी लेखी युक्तिवाद पृष्ठ क्रं- 70 ते 72 वर दाखल केला आहे.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र, विरुध्दपक्ष क्रं-1) व 2) तर्फे दाखल लेखी उत्तर, शपथपत्र, व लेखी युक्तिवाद आणि उभय पक्षाने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्त्याचे वकील आणि विरुध्दपक्षा तर्फे वकील यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
07. वरील प्रमाणे तक्रारकर्ता व विरुध्द यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील निष्कर्ष पुढील प्रमाणे आहे.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | वि.प. ने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे ? व वि.प.चे सेवेतील त्रृटी दिसून येते काय? | होय |
3 | तक्रारकर्ता प्रार्थनेतील मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? | अंशतः स्वरुपात |
4 | आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
:: निष्कर्ष ::
08. मुद्या क्रमांकः- 1 विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्ता हा ग्राहक या सज्ञेत मोडत नाही असा आक्षेप घेतला आहे, परंतु विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी त्यांचे लेखी उत्तरात तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षक्रं. 1 कडून दिनांक 04/11/2015 रोजी भेंडीचे बियाणे 28 पॉकीट प्रती 250 ग्रॅम वजनाचे, रुपये 8,750/- किंमतीमध्ये बियाणे खरेदी केल्याची बाब मान्य केली आहे. तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेल्या बियाणे खरेदी बीलाच्या छायाकिंत प्रतीचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याने खरेदी केलेले भेंडीचे बियाणे JKOHO45 असे नमुद आहे. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी JKOHO45 हे बियाणे उत्पादीत केले असल्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांचा ग्राहक आहे.
त्याचप्रमाणे गट क्रं. 284 व 285 चा मौका चौकशी पंचनामा हा तक्रारकर्त्याने केलेल्या तक्रारीवरुन तक्रार निवारण समितीने केल्याचे दिसून येते. सदर मौका चौकशीमध्ये तक्रारकर्ता हा सदर शेत वाहत नाही याबाबत कुठल्याही व्यक्तीने उजर घेतल्याचे दिसून येत नाही यावरुन असे स्पष्ट होते की, सदर दोन्ही शेत गट क्रं. 284 व 285 तक्रारकर्ता वाहत होता. दुस-या कोणत्याही व्यक्तीच्या मालकीचे शेतात त्याचे संमतीने शेतीची वाहती करु शकतो. ज्याअर्थी मौका चौकशीचे वेळी कुणाचाही तक्रारकर्त्याच्या मालकी/वाहतीबाबत उजर आला नाही त्याअर्थी तक्रारकर्ता हा सदर गट क्रं. 284 व 285 वाहत होता हे मानण्यास हरकत नाही. यावरुन तक्रारकर्त्याने 7/12 चा उतारा पेश केला नसुन जमीनीची मालकी बद्दल कोणताच पुरावा दाखल केला या विरुध्द पक्षाच्या आक्षेपात तथ्य दिसून येत नाही, म्हणून मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
09. मुद्या क्रमांकः- 2 तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार त्याला विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी उत्पादीत निकृष्ट बियाणांमुळे योग्य पिक घेता आले नाही तसेच बियाणांची लागवड केल्यानंतर निघणारी भेंडी निकृष्ट दर्जाची निघाल्यामुळे तक्रारकर्त्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
अभिलेखाचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याने जिल्हा उपविभागीय कृषी अधिकारी साकोली यांचेकडे पीक नुकसानीबाबत व फसवणूक झाल्याबाबत लेखी तक्रार दिनांक 15/02/2016 रोजी केल्याचे दिसून येते. सदर अर्जाची छायाकिंत प्रत पृष्ठ क्रं. 16 वर दाखल केली आहे. त्या तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने दिनांक 04/11/2015 रोजी बियाणे ठिंबक सिंचन पध्दतीने पेरले व त्याला दिनांक 28/12/2015 भेंडी लागायला सुरवात झाली पण ती भेंडी नसून रान भेंडी व बौड सारखी दिसत असल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना कळविले असता त्यांनी 1-2 दिवसात पाहुन घेऊ असे सांगितले. त्यानंतरही चांगली भेंडी निघत नसल्याकारणाने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना पुन्हा त्याबद्दल कळविले असता बियाणातला फरक असु शकतो त्यामुळे तुम्ही विरुध्द पक्ष क्रं. 2 कंपनीचे अध्रिकारी यांना भेंडीची पाहणी करण्याकरीता बोलवा असे सांगितले. त्यानुसार विरुध्द पक्ष क्रं 2 चे प्रतिनिधी श्री.कावळे तक्रारकर्त्याचे शेतावर आले व भेंडीच्या बिजायत मधला फरक असल्यामुळे अश्या प्रकारची भेंडी निघत असल्याचे सांगितले. तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन तालुका तक्रार निवारण समिती यांनी दिनांक 23/02/2016 ला तक्रारकर्त्याच्या शेताची पीक पाहणी करुन अहवाल व पंचनामा केल्याचे पृष्ठ क्रमांक 17 ते 20 वर दाखल पंचानाम्यावरुन दिसून येते. सदर पंचनामा हा तक्रार समितीने प्रत्यक्ष मौक्यावर जावून तक्रारकर्त्याने दिलेल्या माहिती व पीकाच्या प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करुन दिला आहे असे दिसून येते. सदर अहवालात पांढरी माशी, तुडतुडे या किडी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे तसेच भेंडीच्या प्रत्येक झाडाला 25 ते 30 फलधारणा झालेली असून त्यापैकी 90 ते 95 टक्के फळ ही बेढप आकाराची( बुटकी व ठोकळ 2 ते 3 इंच लांब व गोलाई 2 ते 3 इंच) ती बाजारात विक्रि योग्य नाही असे नमुद आहे तसेच तक्रारकर्त्याला सदोष बियाणांमुळे कमी उत्पादन झाल्याचेही नमुद केले आहे. सदर अहवालाचे निष्कर्षात उपविभागीय कृषी अधिकारी साकोली यांनी सदोष बियाणांमुळे भेंडी पिकाच्या उत्पन्नात 90 ते 95 टक्के घट झालेली आहे असे स्पष्ट नमुद केले आहे. शेती गट क्रं. 284 व 285 मध्ये ही भेंडी पिकाची लागवड झालेली आहे. भेंडीचे पिक हे ठिंबक सिंचन व मन्चींग पेपर व बेट पध्दतीने केली आहे असा निष्कर्ष तक्रार निवारण समितीने काढल्याचे दिसून येते. तसेच पाहणी अहवालावर विरुध्द पक्ष क्रं 1 यांची इतर सदस्यासोबत सही असल्याचे दिसून येते. विरुध्द पक्ष क्रं. 2 कंपनीचा प्रतिनिधी प्रत्यक्ष मौका चौकशीचे वेळी हजर नव्हते. विरुध्द पक्ष क्रं. 2 कंपनीने मौका चौकशीचे वेळी त्यांना बोलाविण्यात आले नाही, म्हणून ते गैरहजर होते असा आक्षेप घेतलेला नाही, म्हणजेच त्याबाबतची संपूर्ण माहिती असुनही विरुध्द पक्ष क्रं. 2 हे जाणूनबुजुन गैरहजर होते असे दिसते त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 2 ने तक्रार दाखल होण्यापूर्वी सदर पंचनाम्यावर कोणताही आक्षेप नोंदविला नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 2 यांना मौका चौकशी बद्दल कोणताच नोटीस देण्यात आला नाही या त्यांच्या आक्षेपात तथ्य नाही.
विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी त्यांच्या लेखी उत्तरात असा आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्याचे झालेले नुकसान हे केवळ दोषपूर्ण बियाणांमुळे झाली ही बाब सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारकर्त्याची असुन वस्तु ही दोष पुर्ण आहे तर त्या सबंधी योग्य पृथ्थकरण व चाचणी केल्याशिवाय वस्तु मधे दोष सिध्द होऊ शकत नाही. अश्यावेळी अश्या वस्तुंचे सॅम्पल प्रयोग शाळेकडे पाठविण्यात येतात परंतु तक्रारकर्त्याने या वाणाचे सॅम्पल प्रयोग शाळेकडे पाठवले नसल्यामुळे बियाणात दोष आहे हे तक्रारकर्ता सिध्द करू शकला नाही. परंतु या संबंधी मा. राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या खालील न्याय निवाडयामध्ये-
Kanta kantha rao Vs Y. Surya narayan and others Revision petition no 1008 to 1010 of 2017 (CPR 2017(2) Desided on 03/05/2017
मा. राष्ट्रीय आयोगाने न्यायनिर्णीत केले आहे की, तक्रारकर्त्याने खरेदी केलेल्या पुर्ण बियाणांची पेरणी केली असेल आणि प्रयोग शाळेत पृथ्थकरण परिक्षणाकरिता ते बियाणे पाठविले नाही तर त्याचा असा कदापिही अर्थ होणार नाही की ते बियाणे सदोष नाहीत. संदर्भिय न्यायनिर्णयात विषद केलेल्या न्याय तत्वानुसार सदोष बियाणे सिध्द करण्यासाठी बियाणांची पेरणी करण्यापुर्वी प्रयोग शाळेत तपासणी करिता पाठविण्यासाठी काही बियाणाची पेरणी करू नये, पेरणी नंतर उगवण क्षमतेमधे दोष आढळल्यास राखीव बियाणाची तपासणी प्रयोग शाळेत करून घेऊन अहवालाप्रमाणे पुढिल कार्यवाही करावी असे मापदंड असले तरी केवळ वर नमुद प्रक्रीया पुर्ण केली नाही यामुळे सदोष बियाणे बाबतचा निष्कर्ष मंच काढु शकणार नाही ही बाब कायदेशीर नाही असे नमुद केले आहे.
वरील प्रमाणे विवेचन व न्यायनिवाड्याचा आधार घेत विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी प्रयोग शाळेतील योग्य चाचणीशिवाय बियाण्यातील दोष तक्रारकर्ता सिध्द करुन शकत नाही या विधानाला तथ्य उरत नाही.
वरील न्यायनिर्णयाचा आधार घेता मंच या निष्कर्षास येत आहे की, विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी निर्मित केलेले बियाणे विरुध्द पक्ष क्रं. 2 ने तक्रारकर्त्याला सदोष बियाणे विकून अर्जदाराप्रती सेवेत न्युनता तसेच अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केला आहे. विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटी सिध्द होत असल्यामुळे मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नमुद करण्यात येत आहे.
10. मुद्या क्रमांकः- 3 तक्रार निवारण समितीच्या अहवालात तक्रारकर्त्याच्या पिकाचे 90 ते 95 टक्के नुकसान झाल्याचे नमुद आहे. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार तो दरवर्षी भेंडीचे उत्पादन घेत होता. त्या संबंधात तक्रारकर्त्याने सन 2014 व 2015 या वर्षामध्ये किती उत्पादन झाले याबाबतचे भेंडीचे बील अभिलेखावर दाखल केल्याचे दिसून येते. सदर बीलाचे अवलोकन केले असता सदर बिलावर मर्चंट अँड कमिशन एजन्टची स्वाक्षरी व शिक्का दिसून येत नाही, तसेच तक्रारकर्त्याने एकरी किती उत्पादन घेतले हे स्पष्ट होत नाही. त्याचप्रमाणे सन 2014 व 2015 मध्ये भेंडीचे जितके उत्पादन घेतले तितकेच उत्पादन प्रत्येक वर्षी होईल याची खात्री देता येणार नाही. तक्रारकर्त्याने सन 2014 व 2015 वर्षात घेतलेल्या उत्पादनाची तंतोतंत आकडेवारी ग्राह्य धरता येणार नाही. परंतु विरुध्द पक्षाने पुरविलेले सदर बियाणे दोषपूर्ण नसते तर तक्रारकर्त्याने निश्चितपणे 150 ते 200 क्विंटल भेंडीचे उत्पादन घेतले असते. तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीत त्याला एकूण एकरी 250 क्विटंल भेंडीचे उत्पादन अपेक्षीत होते व त्याची 20 ते 25 रुपये प्रति किलो किंमत लावल्यास त्याला रुपये 8,75,000/- नुकसान झाले असल्यामुळे त्याने रुपये 8,75,000/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. परंतु तक्रारकर्त्याने चालु बाजार भावाबाबत कुठलाही दस्ताऐवज दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याच्या योग्य पुराव्याअभावी रुपये 8,75,000/- नुकसान भरपाई देणे उचित होणार नाही, त्या ऐवजी मंचाला भेंडीचे पीक नुकसान भरपाई म्हणून रुपये 4,60,000/- देणे योग्य वाटते. तसेच भेंडीची लागवड व मशागतीकरीता तक्रारकर्त्यास निश्चितपणे खर्च आलेला आहे. परंतु तक्रारकर्त्याने त्यासंबंधीचे योग्य बील मंचासमक्ष दाखल केलेले नाही. त्यामुळे लागवड व मशाकरीता लागलेला खर्च रुपये 40,000/- असे एकूण मिळूण रुपये 5,00,000/- तक्रारकर्ता विरुध्द पक्ष 2 कडून मिळण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 यांचेकडून बियाणे व किटकनाशके खरेदी केले होते. त्यामुळे सदर बियाणे व किटकनाशकाची किंमत रुपये 10,130/- विरुध्द पक्ष क्रं. 1 कडून मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे निश्चितच तक्रारकर्त्याला मानसिक व शारीरीक त्रास झालेला आहे. त्या सदराखाली रुपये 10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांचेकडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. त्यानुसार मुद्या क्रमांक 3 चे उत्तर मंच होकारार्थी देत आहे.
11. मुद्या क्रमांकः- 3 वर नमूद मुद्यांचा विचार करता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आ
::आदेश::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं- 2 यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला भेंडीच्या पीकाचे नुकसान भरपाईपोटी एकूण रक्कम रुपये 5,00,000/- (अक्षरी रुपये पाच लाख फक्त) तक्रार दाखल दिनांक - 06/10/2016 पासून 6 टक्के द.सा.द.शे. व्याजासह 30 दिवसाचे आत प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो तक्रारकर्त्याला द्यावी.
(03) विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याने खरेदी केलेले बियाणे व किटकनाशकाची किंमत रुपये 10,130/- (अक्षरी रुपये दहा हजार एकशे तीस फक्त) तक्रार दाखल दिनांक - 06/10/2016 पासून 6 टक्के द.सा.द.शे. व्याजासह 30 दिवसाचे आत प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो तक्रारकर्त्याला द्यावी.
(04) विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 च्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये- 5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांनी तक्रारकर्त्याला वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या द्यावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकाराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.