निकाल
पारीत दिनांकः- 31/05/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
1] प्रस्तुतची तक्रार, तक्रारदारांनी जाबदेणारांकडून खरेदी केलेल्या सदनिकेमधील बांधकामाच्या त्रुटी तातडीने दूर करुन द्याव्यात, मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई द्यावी म्हणून दाखल केलेली आहे.
2] तक्रारदारांनी जाबदेणार विकसीत करीत असलेल्या पुणे महानगरपालिका हद्दीतील स. नं. 24, हिस्सा नं. 13बी, ‘ओम संस्कृती’ या इमारतीमधील दुसर्या मजल्यावरील फ्लॅट क्र. 10, 602 चौ. फु. टेरेससह आणि कार पार्किंग क्र. 8 घेण्याचे ठरविले. सदर सदनिकेची किंमत सर्व खर्चासह रक्कम रु. 9,00,000/- इतकी ठरली. दि. 12/2/2008 रोजी तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये सदरची सदनिका खरेदी करण्याकरीता नोंदणीकृत करारनामा झाला व त्यांनी करारामध्ये नमुद केलेली उर्वरीत रक्कम वेळेत जाबदेणारांना दिली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी पुणे महानगरपालिकेच्या मंजूर नकाशाप्रमाणे त्यांच्या सदनिकेच, इमारतीचे व आजूबाजूच्या परीसराचे काम पूर्ण करुन देण्याचे आश्वासन नोंदणीकृत करारामध्ये केले होते, परंतु इमारतीची व मिळकतीच्या परीसरातील काही महत्वाची कामे राहीली होती, तरीही जाबदेणार, तक्रारदारांकडे सदनिकेचा ताबा घेण्यासाठी तगादा लावीत होते. तक्रारदारांनाही राहण्याची अडचण असल्याने व जाबदेणारांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून तक्रारदारांनी जाने. 2009 नंतर सदनिकेचा ताबा घेतला. सदनिकेचा ताबा घेतल्यानंतर जाबदेणार यांच्याकडे पाठपुरावा करुन सदनिका धारकांची सोसायटी स्थापन केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सदनिकेचा ताबा घेण्याआधी व ताबा घेतल्यानंतर खालील दोष आढळून आले.
अ. बेडरुमच्या पश्चिमेकडील भिंतीला ओल असल्यामुळे प्लास्टरचे तुकडे उडाल्यामुळे
नुकसान झाले आहे, बेडरुमच्या छ्ताचा रंग गेला आहे. बेडरुममध्ये खिडकी
खाली ओल आहे, त्यामुळे रंग गेला आहे.
ब. किचन रुम-बेडरुम यांच्या मधील समाईक भिंत लिकेज आहे, त्यामुळे ओल
आली आहे. खालच्या बाजूला स्कर्टिंगजवळ ओल आहे. प्लास्टर कमकुवत
झाले आहे. किचन रुममधील दक्षिणेकडील भिंतींना ओल आल्यामुळे रंग गेला
आह. प्लास्टर कमकुवत झाले आहे.
क. हॉल – फ्लॅट नं. 10 व फ्लॅट नं. 9 मधील समाईक भिंतीला ओल आलेली आहे.
रंग गेला आहे. प्लास्टर कमकुवत झाले आहे. तसेच पूर्वेकडील भिंतीला ओल आली आहे तसेच क्रॅक आले आहेत आणि रंग गेला आहे. प्लास्टर कमकुवत झाले आहे.
ड. इमारतीला योग्य पद्धतीने कंपाऊंड वॉल केलेली नाही. कंपाऊंड वॉलला अनेक
ठिकाणी तडे गेलेले आह्त. भिंती लिकेज असल्यामुळे बहुतांशी प्रश्न निर्माण झाले
आहेत.
इ. हॉलच्या पूर्व बाजूला भिंतीला ओल आल्याने प्लास्टर कमकुवत होवून रंग गेलेला
आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांना अनेकवेळा लेखी व तोंडी विनंती करुन, तसेच त्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन करारामध्ये नमुद केलेल्या सुविधा देण्याची मागणी केली, परंतु जाबदेणारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तक्रारदार सोसायटीमध्ये कोणकोणते दोष आहेत याबद्दल कायदेशिर व शास्त्रिय पद्धतीन माहिती मिळविण्यासाठी, तक्रारदारांनी बांधकाम क्षेत्रातील तज्ञ व शासकिय मान्यता असणारे श्री प्रशांत महाजन, बी.ई. सिव्हील, यांच्यामार्फत इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करुन त्याचा अहवाल जाबदेणारांना दिला व त्या अहवालाप्रमाणे योग्य ते दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली, तसेच करारात ठरल्याप्रमाणे बाकी कामे त्वरीत पूर्ण करण्याची विनंती केली. परंतु जाबदेणारांनी कोणतीही कामे केली नाहीत, म्हणून तक्रारदारांनी दि. 2/5/2010 रोजी सोसायटीमार्फत नोटीस दिली. तरीही जाबदेणारांनी वरील कामे करुन दिली नाहीत, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार, जाबदेणारांनी त्यांना निकृष्ट सेवा दिली व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला असे जाहीर करण्यात यावे, वर नमुद केलेले दोष तातडीने दूर करावेत, मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 20,000/-, तक्रारीचा खर्च रक्कम रु. 10,000/- व इतर दिलासा मागतात.
3] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र, कागदपत्रे व फोटोग्राफ्स दाखल केले आहेत.
4] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तक्रारदारास डिसे. 2009 रोजी सदनिकेचा ताबा दिलेला आहे, त्यामुळे तक्रार मुदतबाह्य आहे. इमारतीचे बांधकाम हे त्यांनी पुणे महानगरपालिकेने मंजूर केलेल्या नकाशानुसारच केले आहे. सदरच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी त्यांना ISI मार्क असलेले मटेरिअल वापरलेले आहे, तसेच बांधकाम क्षेत्रातील तज्ञांकरवी हे बांधकाम केलेले आहे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी तक्रारदारास सदनिकेचा ताबा दिलेला आहे. ताबा देतेवेळी तक्रारदार व सोसायटीच्या इतर सभासदांनी सर्व सोयी-सुविधा तपासूनच ताबा घेतला आहे. जाबदेणारांना पुणे महानगरपालिकेकडून दि. 31/12/2008 रोजी पूर्णत्वाचा दाखला मिळालेला आहे व पुणे महानगरपालिकेने सर्व बांधकाम तपासूनच दाखला दिलेला आहे. तसेच, सोसायटीतील बर्याच सभासदांनी बेकायदेशिररित्या प्रायव्हेट वॉटर पंपाचा वापर करुन फायबरचा स्टोरेज टॅंक बसविला आहे व त्याकरीता इमारतीच्या भिंतींमध्ये लोखंडाचा रॉड फिक्स केला आहे, तसेच तक्रारदार व इतर सभासदांनी बेकायदेशिररित्या ओपन बाल्कनी कव्हर करण्यासाठी स्लॅबमध्ये लोखंडी रॉड बसविले आहेत, त्यामुळे इमारतीच्या स्लॅबचा, आर.सी.सी. स्ट्रक्चरचा आणि बांधकामाचा दर्जा निकृष्ट झालेला आहे. टाक्यांमधून पाणी ओव्हरफ्लो होत असल्यामुळे व तक्रारदारांने टेरेसवर झाडांच्या कुंड्या ठेवून रोज त्यांना पाणी दिल्यामुळे भिंतींचा रंग आणि प्लास्टरचे नुकसान झालेले आहे. सोसायटीतील सभासदांनी बेकायदेशिररित्या बांधकाम केल्यामुळे, भिंतींना तडे गेलेले आहेत व त्यामुळे संपूर्ण इमारतीचे बांधकाम सदोष झालेले आहे. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, जर सदनिकेचा ताबा देतेवेळी बांधकामामध्ये एवढ्या त्रुटी होत्या, तर तक्रारदारांनी ताबा का घेतला व आजपर्यंत सदरची सदनिका कसे वापरीत आहेत. तक्रारदार सदरच्या त्रुटी कागदपत्री पुराव्यानिशी सिद्ध करु शकले नाहीत, फक्त त्यांनी एक्सपर्टचे ओपिनिअन दाखल केले आहे, तेही त्यांनी मुद्दामपणे तक्रारदारांच्या बाजूने मांडलेले आहे. इतर सर्व आरोप अमान्य करीत जाबदेणार तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी करतात.
5] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र, कागदपत्रे व फोटोग्राफ्स दाखल केले आहेत.
6] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणारांबरोबर दि. 12/2/2008 रोजी नोंदणीकृत करारनामा करुन ‘ओम संस्कृती’ या इमारतीमधील दुसर्या मजल्यावरील फ्लॅट क्र. 10, 602 चौ. फु. टेरेससह आणि कार पार्किंग क्र. 8 खरेदी केली व सदर सदनिकेची किंमत सर्व खर्चासह रक्कम रु. 9,00,000/- जाबदेणारांना दिली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सदर सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वीही इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नव्हते, परंतु जाबदेणारांनी आग्रह केल्यामुळे व त्यांचीही राहण्याची अडचण असल्यामुळे त्यांनी जाने. 2009 मध्ये सदनिकेचा ताबा घेतला. ताबा घेतल्यानंतर तक्रारदारांना त्यांच्या सदनिकेमधील बरीच कामे अपूर्ण व निकृष्ट दर्जाची दिसली. अनेक ठिक़ाणी लिकेज असल्याचे, पेंटींग योग्य केले नसल्याचे, वॉटर प्रुफिंग योग्य केले नसल्याचे लक्षात आले. जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये, इमारतीचे बांधकाम करण्यासाठी त्यांनी ISI मार्क असलेले मटेरिअल वापरलेले आहे, तसेच बांधकाम क्षेत्रातील तज्ञांकरवी हे बांधकाम केलेले आहे असे नमुद केले आहे, परंतु अशा कुठल्याही तज्ञांचे शपथपत्र किंवा अहवाल जाबदेणार दाखल केलेला नाही. त्याचप्रमाणे जाबदेणार त्यांच्या बांधकामाचे फोटोग्राफ्स दाखल केलेले आहेत, सदरचे फोटोग्राफ्स हे इमारतीच्या बाहेरील भागावरुन घेतलेले आहेत. तक्रारदारांनी त्यांच्या सदनिकेच्या ज्या भागाच्या तक्रारी मांडलेल्या आहेत, त्यापैकी एकाही भागाचा फोटो जाबदेणारांनी दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी लिकेजबाबतचे सर्व फोटोग्राफ्स दाखल केलेले आहेत, तसेच श्री. प्रशांत महाजन, बी.ई. सिव्हील, इंजिनिअर & कॉंन्ट्रॅक्टर, शासकिय नोंदणीकृत कॉंन्ट्रॅक्टर, पुणे महानगरपालिकेचा परवानाधारक इंजिनिअर यांचा दि. 10/08/2010 रोजीचा तक्रारदारांच्या सदनिकेचा व्हिजिट रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामध्ये त्यांनी खालील गोष्टी नमुद केल्या आहेत,
1. Bed Room – Leakages at west side wall of bed room and dampness found.
Due to leakages the paint and wall plaster is damaged.
2. Bed room ceiling paint is damaged.
3. Bed room, leakages found below the window sill. Due to leakage the paint
is damaged.
4. Kitchen room – Common wall between kitchen and Bed room found leakage
at under side of wall near skirting. Due to leakages the paint and wall plaster
is damaged.
5. Kitchen Room – South side wall leakage found in kitchen room. Due to leakages
the painting and wall plaster is damaged.
6. Hall – Cracks found in Hall at South side common wall between flat no. 10 and
Flat no. 9.
7. Hall – East side wall of hall found leakage and due to leakages the painting
and wall plaster is damaged.
The above noted points are occurred due to leakages from outside of wall and can bee repaired. After repairing and testing the painting can be done. The total approximately cost of work done will be Rs. 2,00,000/-.
तसेच तक्रारदारांनी वॉटर प्रुफिंगसाठीचे नॅशनल वॉटर प्रुफिंग कंपनीचे रक्कम रु. 2,57,700/- चे कोटेशन दाखल केलेले आहे. या सर्व कागदपत्रांवरुन जाबदेणारांनी बांधकामामध्ये त्रुटी ठेवलेल्या आहेत हे दिसून येते. फोटोग्राफ्स, बांधकाम क्षेत्रातील तज्ञाचा अहवाल आणि कोटेशन, हा पुरावा जाबदेणारांची सेवेतील त्रुटी सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे, असे मंचाचे मत आहे. या सर्व त्रुटी दुरुस्त करुन मिळण्यास तक्रारदार हक्कदार ठरतात असे मंचाचे मत आहे. त्याचप्रमाणे जाबदेणारांनी बांधकामामध्ये ठेवलेल्या त्रुटींमुळे तक्रारदारांना साहजिकच मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला असेल आणि म्हणूनच प्रस्तुतची तक्रार मंचामध्ये दाखल करावी लागली, त्यामुळे ते नुकसान भरपाई मिळण्यासही पात्र ठरतात.
7] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारीतील परिच्छेद क्र. 5(अ) ते (इ),
या सर्व त्रुटी तक्रारदारास या आदेशाची प्रत मिळाल्या
पासून सहा आठवड्यांच्या आंत दुरुस्त करुन द्याव्यात.
3. जाबदेणारांनी तक्रारदारास रक्कम रु. 20,000/- (रु.
वीस हजार फक्त) नुकसान भरपाईपोटी आणि रक्कम
रु. 2000/- (रु. दोन हजार फक्त) तक्रारीच्या खर्चापोटी
या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या
आंत द्यावेत.
4. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.