न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे निगडी, पुणे येथे राहणेस असून ते रोजगार करुन मिळणा-या उत्पन्नातून त्यांचा व त्यांच्या कुटूंबीयांचा चरितार्थ चालवतात. जाबदार क्र. 6 यांचा बांधकामाचा व्यवसाय असून त्या अनुषंगाने विकसन करारान्वये ओनरशिप तत्वावर इमारतीचे बांधकाम करुन त्याचे विकसन करुन त्यामधील सदनिका, गाळे, विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. पस्तुत जाबदार क्र. 6 हे अजमत कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार म्हणून ओनरशीप तत्वावर बांधकाम करुन त्या इमारतीमधील गाळे विक्री करण्याचा व्यवसाय करतात. तर जाबदार क्र. 2 ते 5 हे जाबदार क्र. 1 ‘ओम कन्स्ट्रक्शन्स या पार्टनरशीप फर्मचे भागीदार असून जाबदार क्र. 2 ते 5 यांनी ओम कन्स्ट्रक्शन्सच्या नावे मौजे करंजे तर्फ सातारा, जि.सातारा येथील नगरपरिषद हद्दीबाहेरील बिगरशेती मिळकत याचा रि.स.नं. 393/2+3/4 अ/4 या बिगरशेती मिळकतीमधील प्लॉट नं. 17 यांचे क्षेत्र 154.00 चौ.मी. प्लॉट नं.18 यांचे क्षेत्र 171.50 चौ.मी., प्लॉट नं.19 याचे क्षेत्र 171.50 चौ. मी. व प्लॉट नं.20 याचे क्षेत्र 154.00 चौ.मी. अशी संपूर्ण 651.00 चौ.मी. मिळकत याची चतुःसिमा,-
पूर्वेस- ले-आऊट प्लॅनमधील 9 मीटर रुंदीचा रस्ता
दक्षिणेस- ले-आऊट प्लॅनमधील 6 मीटर रुंदीचा रस्ता
पश्चिमेस- प्लॉट नं. 16 व 21
उत्तरेस – ले आऊट प्लॅनमधील 6 मीटर रुंदीचा रस्ता
येणेप्रमाणे चतुःसिमेतील मिळकत ही जाबदार क्र. 1 ते 5 यांचे मालकी हक्क कब्जे वहिवाटीची असून सदर मिळकतीवर आर.सी.सी. इमारत बांधणेसाठी बांधकाम परवाना घेऊन सदरची मिळकत विकसन करण्यासाठी जाबदार क्र. 1 ते 5 यांनी जाबदार क्र. 6 यांना विकसन करारनामा मा. दुय्यम निबंधकसो, सातारा यांचेकडे दि. 7 एप्रिल,2010 रोजी दस्त क्र. 2258/2010 ने नोंदणीकृत करुन दिलेला आहे. त्यानंतर सदर जाबदार क्र. 6 यांनी प्रस्तुत मिळकत विकसीत करणेचा व त्यातील सदनिका, गाळे विक्री करण्याचा नोंदणीकृत विकसन करारनामा जाबदार क्र. 1 ते 5 यांचेकडून करुन घेतलेला आहे. सबब जाबदार क्र. 1 ते 5 यांनी त्यांचे वतीने सदरील मिळकत विकसित करुन इमारत बांधण्यासाठी सर्व हक्क व अधिकार जाबदार क्र. 6 यांना दिलेले आहेत. जाबदार क्र. 1 ते 5 यांचेवतीने जाबदार क्र. 6 यांचे नावे सदरील मिळकतीवरील बांधकाम करुन विकसीत करुन ओनरशिप तत्वावर बांधकाम केलेले आहे. सदर इमारतीमधील निवासी सदनिका व गाळे विक्री करण्याचे सर्व हक्क व अधिकार जाबदार क्र.1 ते 5 यांनी जाबदार क्र. 6 यांना दि. 8 एप्रील, 2010 रोजीचे नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्राने दिलेले आहेत. प्रस्तुत जाबदार क्र. 6 ने जिल्हा व तालुका पंचायत, सातारा, जिल्हा परिषद, सातारा तुकडी व पोटतुकडी सातारा पैकी मौजे करंजे तर्फ सातारा येथील वर नमूद मिळकतीवर ‘राज रेसिडेन्सी’ फेज-2 या नावाने इमारतीचे बांधकाम सुरु केले होते.
तक्रारदाराने जाबदार क्र. 6 यांचेकडून प्रस्तुत राज रेसिडेन्सी फेज-2 या इमारतीमधील तळमजल्यावरील फ्लॅट नं. जी-4 याचा एरिया 615 चौ.फूट + गार्डन एरिया 35 चौ. फूट ही मिळकत प्रस्तुत जाबदार क्र. 6 यांचेकडून कायमखूष खरेदी करणेच्या हेतूने बोलणी करुन तक्रारदाराने व जाबदार क्र. 6 यांचेतील चर्चेअंती प्रस्तुत सदनिका रक्कम रु.6,50,000/- ला खरेदी घेणेचे ठरविले. त्यानुसार तक्रारदार यांनी जाबदार क्र. 6 यांना वेळोवेळी विसारापोटी रक्कम रु.5,50,000/- चेकने व कॅशने अदा केले आहेत व सदरची रक्कम मिळालेबाबत पोहोच सदर जाबदार क्र. 6 यांनी तक्रारदार यांना सदर निवासी सदनिकेचे खुषखरेदीपत्राचे साठेखत दि.26/7/2010 रोजी मा. दुय्यम निबंधकसो, सातारा यांचेकडे नोंदणीकृत दस्त क्र.04957/2010 ने करुन दिले आहे. त्यामध्ये प्रस्तुत रक्कम तक्रारदारकडून मिळालेचे मान्य व कबूल केले आहे. तसेच तक्रारदाराला त्यानंतरदेखील जाबदार क्र. 6 यास वेळोवेळी शिल्लक रक्कम रु.1,00,000/- पैकी रक्कम रु.80,000/- दिले होते व आहेत.
प्रस्तुत जाबदार यांनी ‘राज रेसिडेन्सी’ फेज-2 या बांधकाम करत असलेल्या इमारतीमधील तळमजल्यावरील फ्लॅट नं. जी-2 या बांधकाम करत असलेल्या इमारतीमधील तळमजल्यावरील फ्लॅट नं. जी-4 ही निवासी सदनिका सदर करार झालेपासून दिड वर्षाचे आत तक्रारदार यांना बांधकाम पूर्ण करुन त्याचा ताबा देण्याचे मान्य व कबूल केले होते. तथापी सदर जाबदार क्र. 6 याचा जानेवारी, 2013 मध्ये अपघात झाला आहे व सदर अपघातामध्ये प्रस्तुत जाबदार क्र.6 हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर सदर जाबदार क्र. 6 हा जवळ-जवळ दीड वर्षे बेडरेस्टवर होता. त्यानंतर सदर जाबदार हा अपघातातून सावरल्यानंतर प्रस्तुत तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे अर्धवट राहीलेले बांधकाम पूर्ण करुन मागीतले. त्यावेळी सदर जाबदार यांनी प्रस्तुत इमारतीचे 75 टक्के बांधकाम पूर्ण केलेले होते. ऊर्वरीत अपूर्ण बांधकाम जाबदाराने अद्यापपर्यंत पूर्ण केलेले नाही. त्यानंतर बराच कालावधी गेलेनंतरदेखील जाबदार क्र. 6 यांनी तक्रारदाराचे प्रस्तुत निवासी सदनिकेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले नाही अगर प्रस्तुत सदनिकेचे खूषखरेदीपत्रही करुन दिलेले नाही. त्यामुळे जाबदार क्र. 6 ने साठेखत करारामधील अटी व शर्थींचा भंग केलेला आहे व तक्रारदार यांचे नुकसान केलेले आहे. वस्तुतः सदर जाबदार क्र. 6 यांनी साठेखत करारातील अटींची अंमलबजावणी न करता तक्रारदाराला सदोष सेवा पुरविलेली आहे व तक्रारदाराला सदर सदनिकेचा ताबा व खरेदीपत्र करुन न दिल्याने जाबदार क्र. 6 ने तक्रारदाराला ग्राहक या नात्याने सेवात्रुटी दिली आहे व तक्रारदारावर प्रचंड अन्याय केलेला आहे. सबब तक्रारदाराने जाबदार क्र. 6 यांचेकडून सदनिकेचा ताबा बांधकाम पूर्णत्वासह मिळावा म्हणून प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने याकामी राज रेसिडेन्सी फेज-2 मधील तळमजल्यावरील निवासी सदनिका क्र. जी-4 चे तात्काळ खरेदीपत्र करुन देणेचे आदेश व्हावेत, जाबदार क्र. 6 यांनी अगर अन्य कोणीही त्रयस्त इसमांनी तक्रारदाराचे प्रस्तुत निवासी सदनिका क्र. जी-4 या निवासी सदनिकेचा कोणताही व्यवहार ति-हाईत इसमांबरोबर करु नये अशी ताकीद जाबदार क्र. 6 यांना देण्यात यावी. तक्रारदाराला झाले आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.5,00,000/- जाबदार क्र. 6 कडून मिळावेत, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.2,00,000/- मिळावेत, या तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.30,000/- तक्रारदाराला जाबदार क्र. 6 कडून मिळावा, तक्रारदाराला जाबदार क्र. 6 कडून मिळावा अशी विनंती केली आहे. तसेच जाबदार क्र. 1 ते 5 कडून कोणतीही मागणी नाही असे कथन केले आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 5 चे कागदयादी सोबत नि.5/1 ते नि.5/2 कडे अनुक्रमे जाबदार यांनी तक्रारदार यांना करुन दिलेले साठेखत करारनामा सत्यप्रत, जाबदार क्र. 1 ते 5 यांनी जाबदार क्र. 6 यांना करुन दिलेले कुलमुखत्यारपत्राची सत्यप्रत, नि. 9 कडे तुर्तातूर्त ताकीद अर्ज, नि. 10 कडे तुर्तातूर्त ताकीद अर्जाचे अँफीडेव्हीट, नि. 21 कडे तक्रारदाराने दाखल केलेले अँफीडेव्हीट व कागदपत्रे हाच पुरावा समजणेत यावा अशी पुरसिस वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 5 यांनी नि.18 कडे म्हणणे दाखल केले आहे. नि.19 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, व नि.22 कडे म्हणणे व त्यासोबत दिले अँफीडेव्हीट हाच जाबदार क्र. 1 ते 5 चा पुरावा व लेखी युक्तीवाद समजणेत यावा म्हणून पुरसिस दिली आहे. तसेच पुरावा संपलेची पुरसिस दिली आहे.
जाबार क्र. 1 ते 5 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथने अंशतः मान्य व कबूल केली आहेत. परंतु काही मजकूर पूर्णपणे फेटाळला आहे. त्यांनी पुढीलप्रमाणे म्हणणे हदलेले आहे. सदर जाबदार क्र. 1 ते 5 यांचे नावे असलेली मौजे करंजे तर्फ सातारा येथील बिगरशेती मिळकत याचा रि.स.नं.393/2+3/4अ/4 या बिगरशेती मिळकतीमधील प्लॉट नं.17 याचे क्षेत्र 154.00 चौ.मी., प्लॉट नं.18 चे क्षेत्र 171.50 चौ.मी., प्लॉट नं.19 चे क्षेत्र 171.50 चौ.मी., प्लॉट नं.19 चे क्षेत्र 171.50 चौ. मी., प्लॉट क्र. 20 चे क्षेत्र 154.00 चौ.मी. अशी संपूर्ण 651.00 चौ. मी. ही मिळकत या जाबदार क्र. 1 ते 5 यांनी जाबदार क्र. 6 यास नोंदणीकृत विकसन कराराने विकसित करण्यासाठी दिलेली होती व आहे. सदर मिळकतीच्या बदल्यात या जाबदार क्र. 1 ते 5 यांनी जाबदार क्र.6 हे विकसीत करत असलेल्या राज रेसिडेन्सी फेज-2 या इमारतीमधील सदनिका मालकी हक्काने घेऊन सदर जाबदार यांनी वर नमूद मिळकतीवर त्यांचा असणारा मालकी हक्क जाबदार क्र.6 चे लाभात सोडून दिला होता व आहे व त्याअनुषंगे जाबदार क्र. 1 ते 5 यांनी जाबदार क्र. 6 यास राज रेसिडेन्सी फेज-2 या इमारतीमधील निवासी सदनिका व दुकान गाळे यांची विक्री करण्याचे सर्व कायदेशीर हक्क व अधिकार जाबदार क्र. 1 ते 5 यांनी जाबदार क्र. 6 यांना दि.7 एप्रील,2010 रोजीचे विकसन करारनामा क्र.2258/2010 मधील अटी व शर्तीस अधिन राहून दि.8 एप्रिल,2010 रोजीचे नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्राने दिले होते व आहेत. त्यामुळे जाबदार क्र. 1 ते 5 यांचा प्रस्तुत मिळकतीशी कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार राहीलेला नाही.
तसेच तक्रारदाराने त्यांचे वादातीत सदनिकांचे व्यवहार हे जाबदार क्र.6 यांचेबरोबर केलेले आहेत. प्रस्तुत जाबदार क्र. 1 ते 5 यांचेबरोबर तक्रारदाराने वादातीत सदनिकांचा कोणताही व्यवहार केलेला नाही अगर तसा कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारदाराने याकामी दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार क्र. 1 ते 5 यांचे ग्राहक होत नाहीत. त्यामुळे प्रस्तुत जाबदार क्र. 1 ते 5 विरुध्द सदरचा तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही. तक्रारदारानेही जाबदार क्र. 1 ते 5 यांचे विरुध्द कोणतीही दाद मागीतलेली नाही. जाबदार क्र. 6 यांचेकडूनच वादातीत सदनिकेची व नुकसानभरपाईची मागणी तक्रारदाराने केली आहे. सबब जाबदार क्र. 6 यांचेविरुध्द सदर तक्रार अर्ज मंजूर करणेस या जाबदार क्र. 1 ते 5 ची कोणतीही हरकत नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज जाबदार क्र. 1 ते 5 यांचेविरुध्द फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदार क्र. 1 ते 5 यांनी दाखल केले आहे. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 6 यास नोटीस लागू होऊनही मे. मंचात गैरहजर राहीले तसेच जाबदार क्र. 6 ने कोणतेही म्हणणे दाखल केलेले नाही. तसेच तक्रार अर्जातील कोणतेही कथन प्रस्तुत जाबदाराने खोडून काढलेले नाही. सबब जाबदार क्र. 6 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि. 1 वर पारीत झालेला आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ पुढील मुदद्यांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार यांनी जाबदार क्र. 6 यांचेकडून मौजे करंजे तर्फ सातारा येथील ‘राज रेसिडेन्सी’ फेज-2 या नावाने ओळखल्या जाणा-या ओनरशीप इमारतीमधील तळमजल्यावरील फ्लॅट नं. जी-4 याचा एरिया 615 चौ. फूट + गार्डन एरिया रक्कम रु.6,50,000/- (रुपये सहा लाख पन्नास हजार मात्र) या रकमेस घेण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदाराने विसारापोटी जाबदार क्र. 6 यांना रक्कम रु.5,50,000/- वेळोवेळी चेकने व कॅशने दिले आहेत ही बाब जाबदार क्र. 6 ने नोंदणीकृत साठेखतात मान्य केली आहे. तसे नोंदणीकृत साठेखत जाबदार क्र. 6 यांचेबरोबर झालेले आहे. म्हणजेच तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होते तर जाबदार हे सेवापुरवठादार आहेत. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे. कारण- तक्रारदार व जाबदार क्र. 6 यांचेदरम्यान झाले नोंदणीकृत साठेखत नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 कडे दाखल केले आहे. त्याचे अवलोकन करता जाबदार क्र. 6 यांनी तक्रारदारकडून रक्कम रु.5,50,000/- विसारापोटी मिळालेचे मान्य व कबूल केले आहे. तसेच प्रस्तुत साठेखत करारामधील अटी व शर्तीप्रमाणे ‘राज रेसिडेन्सी’ फेज-2 या इमारतीमधील तळमजल्यावरील फ्लॅट नं. जी-4 ही सदनिका जाबदार क्र. 6 यांनी प्रस्तुत साठेखत करार झालेपासून दिड वर्षाचे आत तक्रारदार यांना बांधकाम पूर्ण करुन त्याचा ताबा देण्याचे जाबदार क्र. 6 यांनी मान्य व कबूल केले होते. परंतू तक्रारदाराने प्रस्तुत दीड वर्षे पूर्ण झाल्यानंतर वारंवार जाबदार क्र. 6 यांचेकडे मागणी करुनही जाबदाराने वेळ मारुन नेली. त्यानंतर जाबदार क्र. 6 चा अपघात होऊन तो गंभीर जखमी झालेने पुन्हा जवळ-जवळ दिडवर्षे अपघातातून सावरणेसाठी वेळ गेला. जाबदार क्र. 6 हा अपघातातून सावरलेनंतर पूर्ण बरा झालेनंतरही तक्रारदाराने प्रस्तुत सदनिकेचे अर्धवट बांधकाम पूर्ण करुन ताबा द्यावा अशी मागणी जाबदार क्र. 6 कडे केली. परंतु जाबदार क्र. 6 ने प्रस्तुत इमारतीचे अर्धवट राहीलेले बांधकाम पूर्ण केलेले नाही. वेळोवेळी वेळ मारुन नेऊन टाळाटाळ करत आहेत. सबब जाबदार यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिलेचे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट सिध्द होत आहे. याकामी तक्रारदाराने जाबदार क्र. 1 ते 5 यांचेविरुध्द कोणतीही दाद मागीतलेली नाही. तसेच जाबदार क्र. 6 बरोबरच तक्रारदाराने सदनिकेचा व्यवहार केलेला असलेने जाबदार क्र. 1 ते 5 यांचेविरुध्द कोणतेही आदेश करणे न्यायोचीत होणार नाही. मात्र जाबदार क्र.6 बरोबर नोंदणीकृत साठेखत होऊन सदनिकेच्या विसारापोटी रक्कम रु.5,50,000/- जाबदार क्र. 6 यांना तक्रारदाराने अदा केलेले असूनही जाबदार क्र. 6 ने प्रस्तुत वादातील इमारतीचे अर्धवट राहीलेले बांधकाम पूर्ण केलेले नाही. तसेच सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा तक्रारदाराला दिलेला नाही. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिलेला नाही व खूषखरेदीपत्र करुन दिलेले नाही. याकामी जाबदार क्र. 6 ने तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब जाबदार क्र. 6 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे हे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट व सिध्द होते. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. वरील सर्व मुद्दे व विवेचन लक्षात घेता तसेच याकामी दाखल जाबदार क्र. 1 ते 5 चे म्हणणे व जाबदार क्र. 6 व तक्रारदार यांचेत झालेले नोंदणीकृत साठेखत यांचे अवलोकन करता प्रस्तुत कामी जाबदार क्र. 6 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविलेचे स्पष्ट होते. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज जाबदार क्र. 6 विरुध्द प्रस्तुत तक्रार अर्ज फेटाळणेस पात्र आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
9. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार क्र.6 यांनी तक्रारदार यांना ‘राज रेसिडेन्सी फेज-2’ या इमारतीमधील
तळ मजल्यावरील निवासी सदनिका क्र. जी-4 चे उर्वरीत बांधकाम साठेखतात
ठरलेप्रमाणे गुणवत्तापूर्वक, कोणताही जादा मोबदला न घेता करुन द्यावे व
सदर सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा जाबदार क्र. 6 ने तक्रारदाराला द्यावा.
3. तक्रारदाराने जाबदार क्र. 6 यांना ऊर्वरीत रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक
लाख मात्र) अदा करावेत व जाबदार क्र. 6 यांनी राज रेसिडेन्सी फेज 2 या
इमारतीतील तळमजल्यावरील निवासी सदनिका क्र. जी-4 चे नोंदणीकृत
खरेदीपत्र तक्रारदाराला करुन द्यावे व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला द्यावा.
4. तक्रारदाराला जाबदारामुळे झाले आर्थीक नुकसानीपोटी जाबदार क्र. 6 यांनी
तक्रारदाराला रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) अदा करावेत.
5. जाबदार क्र. 6 ने तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-(रुपये
पंचवीस हजार फक्त) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रुपये
पाच हजार फक्त) अदा करावेत.
6. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदार क्र. 6 यांनी आदेश पारीत तारखेपासून
45 दिवसांचे आत करावी.
7. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 5 यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाही.
8. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
9. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत
याव्यात.
10. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 12-01-2016.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा