अर्जदारासाठी वकील श्री.रामैय्या(मेसर्स.अपेक्स लॉ पार्टनर्स) गैर अर्जदारासाठी वकील श्री.राजेंद्र गुर्जर( खेतान आणि जयकर फर्म) मा.अध्यक्षानुसार दिलेले निकालपत्र. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे. 1. तक्रारदार रजिस्टर सहकारी हौसिंग सोसायटी आहे. सा.वाले ही कंपनी कोन एलीव्हेटर प्रा.लि. या कंपनीची सहायकारी कंपनी असून उदवाहन तंयार करते. तकारदार सोसायटीला त्यांचे इमारतीत दोन जुने उदवाहन बदलून नविन बसवावयाचे होते. म्हणून त्यांनी भारत बिजली लिमिटेड या कंपनीशी दिनांक 05/07/2004 रोजी उदवाहन बसविण्याचा करार रु.14 लाखाला केला. त्यानंतर त्यांनी उदवाहनाचा दर वाढवून रु.14,70,000/- केला तो सोसायटीने मंजूर केला. सोसायटीने कराराची प्रत व दर वाढविल्याबद्दलची कागदपत्रं तक्रारीच्या निशाणी ए-1,ए-2 व ए-3 ला दाखल केली आहेत. तक्रारदार सोसायटीने दिनांक 06.09.2004 रोजी पहिल्या उदवाहनासाठी रु.2,76,500/- व दुस-या उदवाहनासाठी रु.73,500/- असे एकूण रु.3,50,000/- आगाऊ दिले. त्या बद्दलची पावती तक्रारीच्या निशाणी ए-4 ला आहे. या वस्तुस्थितीबद्दल उभय पक्षकारात दुमत नाही. 2. तक्रारदार सोसायटीचे म्हणणे की, सा.वाले यांनी पहिल्या उदवाहनाचे सामान 14 आठवडयात द्यावयाचे होते व त्यानंतर 14 आठवडयात पहिले उदवाहनाचे काम पूर्ण करुन देऊन ती दिनांक 09.03.2005 पर्यत चालु होईल असे आश्वासन दिले होते. त्या उदवाहनाचे काम यशस्वी झाल्यानंतर दुस-या उदवाहनाचे काम सुरु करावयाचे होते. परंतु सा.वाले यांनी ठरलेल्या वेळेत उदवाहनाचे सामान दिले नाही व उदवाहन बसवून दिले नाही. म्हणून तक्रारदार सोसायटीने सा.वाले यांचेशी बराच पत्रव्यवहार केला व उदवाहनाचे मटेरीयल लवकर देण्यासाठी व उदवाहन लवकर बसविण्याबाबत विनंती केली. सा.वाले यांनी त्या पत्रांना उत्तर देऊन त्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली व सा.वाले यांनी उदवाहनाचे काम पूर्ण करण्याबाबत ब-याच तारखांबद्दल आश्वासन दिले. मात्र ऑगस्ट, 2005 पर्यत ते काम पूर्ण झाले नाही. उदवाहन बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रमाणपत्र मिळण्यासही बराच वेळ लागला. शेवटी ते डिसेंबर, 2005 म्हणजे ठरल्यापेक्षा 9 महिन्यांनी उदवाहन बसविण्याचे काम पूर्ण होऊन त्याचा वापर चालू झाला. तक्रारदार व सा.वाले यांचेमध्ये झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती तक्रारदाराने दाखल केलेल्या आहेत. उदवाहन उशीरा बसवून देणे ही सा.वाले यांच्या सेवेत न्यूनता आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. 3. तक्रारदाराचा दुसरा आरोप की, उदवाहनाचे मटेरीयल हे कमी दर्जाचे होते. उदवाहन चालू झाल्यानंतर तिन दिवसापेक्षा जास्त दिवस सतत त्यानी काम दिले असे झाले नाही व म्हणून त्यांनी सा.वाले यांचेकडे वेळोवेळी त्याबाबत तक्रारी केल्या. सा.वाले यांना कमीत कमी आठवडयातून दोन तीन वेळा कारागिराला उदवाहन दुरुस्तीसाठी पाठवावे लागले. त्या बद्दलच्या नोंदी तक्रारदार सोसायटीने लॉगबुकामध्ये करुन ठेवलेल्या आहेत. त्या लॉगबुकाच्या प्रती रेकॉर्डवर दाखल केल्या आहेत. फेब्रुवारी 2006 मध्ये सा.वाले यांचे रिजनल मॅनेजर हेही उदवाहन पाहाणीसाठी आले होते त्यांनी ती सदोष आहे असे कबुल केले. सा.वाले यांनी त्यांच्या दिनांक 27/02/2006 च्या पत्रात म्हटले आहे की, उदवाहनाच्या दरवाज्याला हँन्डल बसविणे, लँन्डींग डोअरला पॅनेल ऐवजी एसएस प्लेट बसविणे, इ.कामे प्राधान्याने करावी लागतील. परंतु त्यांनी ते केले नाही. मे, 2006 मध्ये सोसायटीने रु.4,875/- खर्च करुन उदवाहनाचे आवश्यक काम करुन घेतले. उदवाहनाच्या फिनीशिंगचे काम अपूर्ण होते व एसएस प्लेट बसविण्याचे काम सा.वाले यांनी केलेले नाही. पहिले उदवाहन व्यवस्थित चालत नसताना व त्यातील दोष सा.वाले यांना वेळो वेळी कळविले असताना ते दोष दूर न करता सा.वाले यांनी दुस-या उदवाहना बद्दलच्या पैशाची मागणी केली. सा.वाले हे तक्रारदाराच्या पत्रांना प्रतिसाद देत नव्हते म्हणून तक्रारदाराने वकीलांमार्फत दिनांक 20.06.2006 ची नोटीस पाठविली व सा.वाले यांना दिलेली सर्व रकम परत मागीतली. तक्रारदार सोसायटीने वकीलामार्फत कोन एलीव्हेटरचे फिनलँड येथील अध्यक्ष यांचेकडेही तक्रार केली. परंतु सा.वाले यांनी तक्रारीची मागणी पूर्ण केली नाही. उलटपक्षी तक्रारदाराचे आरोप नाकारले. सा.वाले यांनी 24 महीन्याची वॉरंटी दिली होती. तक्रारदाराचे म्हणणे की, वारंटी उदवाहनाचा कमर्शियल वापर सुरु झाल्यानंतर सुरु व्हावयाची होती. परंतु उदवाहनाचा वापर अजून सतत 15 दिवसापेक्षाही जास्त झालेला नाही. यामुळे तिची वॉरंटी सुरु झालेली नाही. म्हणून ती वाढवून 72 महिन्याची करुन मिळावी. 4. सा.वाले यांनी उदवाहन उशिरा बसविणे, तसेच मटेरीयल कमी दर्जाचे, सदोष दिल्याने तक्रारदार सोसायटीतील सदनिका धारकांना मानसिक त्रास झाला व त्यांची गैरसोय झाली. सा.वाले यांच्या वरील सेवेतील न्यूनतेबद्दल तक्रारदाराने सदरहू तक्रार केलेली आहे. तक्रारदाराच्या खालील मागण्या आहेत. अ) सा.वाले यांनी तक्रारदार सोसायटीने पहिल्या उदवाहनाची दिलेली रकम रु.7,35,000/- परत करावी व त्यावर द.सा. द.शे. 18 दराने व्याज द्यावे. किंवा सा.वाले यांनी उदवाह- नातील सर्व दोष दूर करुन द्यावेत जेणेकरुन उदवाहन सतत 15 दिवसापेक्षा जास्त चालु राहू शकेल. ब) वारंटी 24 महिन्याची 72 महिन्यापर्यत वाढवून द्यावी. क) तक्रारदार सोसायटीने सा.वाले यांना दुस-या उदवाहनापोटी दिलेली रकम रु.73,500/- परत करावेत व त्यावर पैसे दिल्यापासून संपूर्ण रकम फिटेपर्यत द.सा.द.शे.18 दराने व्याज द्यावे. ड) सा.वाले यांनी तक्रारदार सोसायटीने उदवाहनासाठी केलेला खर्च रु.4,872/- द.सा.द.शे.18 दराने परत करावा. इ) सा.वाले यांनी तक्रारदार सोसायटीला त्यांच्या सभासदांना झालेल्या गैरसोईबद्दल रु 7,35,000/- नुकसान भरपाई द्यावी तसेच या तक्रारीचा खर्च द्यावा. 5. सा.वाले यांचे म्हणणे की, मे.भारत बिजली लि. हीपण पूर्वी उदवाहन तंयार करायची, तक्रारदार तसेच त्या कंपनीमध्ये बोलणी होऊन दिनांक 5.07.2004 रोजी त्यांच्यात करार झाला. मे.भारत बिजली लि. ने तक्रारदार सोसायटीच्या इमारतीत दोन उदवाहन बसवून देण्याचा करार केला. त्यानंतर तक्रारदार सोसायटीने त्यांना टॅक्सेस व इतर काही बाबतीत शंका कुशंका विचारल्या त्याचे उत्तर भारत बिजली लि. ने दिले. सोसायटीने पुन्हा काही स्पष्टीकरण विचारले त्याचे उत्तर दिनांक 15.07.2004 च्या पत्राने दिले. त्यानंतर दिनांक 07.09.2004 च्या पत्राने तक्रारदार सोसायटीने मे.भारत बिजली लि. कडे दोन उदवाहनाची ऑर्डर दिली व रु.3,50,000/- चेकने दिले. 6. सा.वाले यांचे म्हणणे की, उदवाहन बसवून देण्यास जो काही उशिर झाला तो त्यांनी हेतुपुरस्सर किंवा बुध्दी पुरस्सर केला नाही. मे.भारत बिजलीच्या उदवाहन विभागाचे त्यांच्यात विलीनीकरण झाले हे ही एक त्यास कारण होते. विलीनीकरणाच्या परवानगीबाबत प्रकरण कोर्टात प्रलंबीत होते. त्यानंतर कंपनीच्या नांवात बदल, रजिष्ट्रेशन, टॅक्स बद्दलच्या फॉरमॅलिटीज, लायसन्स इ. साठी वेळ लागला. त्यामुळे उदवाहनाचे सामान लवकर देता आले नाही. सा.वाले यांचे म्हणणे की, उदवाहन बसविण्यास जो उशिर झाला त्यात तक्रारदार सोसायटीसुध्दा कारणीभूत आहे. करार झाल्यानंतर सोसायटीने ब-याच शंका कुशंका उपस्थित केल्या. तसेच मे.भारत बिजली सेल्स मॉडरायझेशनचे मॅनेजर यांनी तक्रारदार सोसायटीच्या इमारतीत जाऊन पहाणी केली त्यावेळी उदवाहनाचे असलेले गाईडरेल्स/कार गाईडरेल्स उदवाहनाचे काम सुरळीत चालण्यासाठी बदलविणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगीतले. तक्रारदार सोसायटीने वास्तुविशारद याचे प्रमाणपत्र देण्यास उशिर केला. तसेच तक्रारदार सोसायटीशी काही फॉरमॅलीटिज् पूर्ण करावयाच्या होत्या यामुळेही उदवाहन बसविण्यास वेळ लागला. 7. सा.वाले यांचे म्हणणे की, तक्रारदार व भारत बिजली लि. यांच्यामध्ये झालेल्या कराराप्रमाणे उदवाहन कसे असावे याबद्दल टेक्नीकल डाटाशिट सोसायटीला दिलेली होती व त्यात उदवाहनाच्या दरवाज्याची डिझाईन नमुद केली होती. उदवाहनाच्या दरवाज्याचे हॅन्डल त्यांनी त्याप्रमाणे दिलेले आहे. सोसायटीने जर दुसरे हँन्डल बसविले तर त्या खर्चाची नुकसान भरपाई देण्यास सा.वाले यांची जबाबदारी नाही. त्यांनी सोसायटीला सदोष उदवाहन किंवा उदवाहनाचे कामकाजात कमी दर्जाचे मटेरीयल वापरले नाही. त्यांनी अगदी उत्तम दर्जाची सेवा दिली आहे. त्यांनी सोसायटीच्या उदवाहना बाबतीत प्रत्येक तक्रारीची दखल घेतली होती व त्यांचे कारागीर पाठविले होते. त्यांचा पर्यवेक्षक जाऊन त्यांनीही उदवाहनाची पहाणी केली होती. उदवाहनाच्या बाबतीत तथाकथीत तक्रार केवळ तिचा गैर वापर केला म्हणून उदभवला आहे. सोसायटीने लॉगबुकात केवळ पुरावा तंयार करण्याचे दृष्टीने नोंदी घेतल्या. केवळ त्या नोंदीवरुन उदवाहनाचा दर्जा कमी आहे असे होत नाही. जुलै, 2006 पासून त्यांनी दररोज सकाळी 9 वाजेपासून त्यांच्या कारागिराला तक्रारदार सोसायटीच्या त्या उदवाहनाचे बाबतीत नेमणूक केलेली होती. केवळ खोटा पूरावा तंयार करण्याच्या दृष्टीने सोसायटीचे सदस्य खोटया तक्रारी करतात. सा.वाले यांचे म्हणणे की, दुस-या उदवाहनाचे पैसे करारात असुनही सोसायटीने दिले नाही व करार भंग केला. रकम रु.4,04,250/- देण्यास तक्रारदार जबाबदार आहेत. तक्रार खोटी असून ती रद्द करण्यात यावी. 8. या तक्रारीचे कामी दिनांक 30.09.2009 पासून तक्रारदार गैरहजर राहीले. दिनांक 22.10.2010 पासून सा.वालेही गैर हजर राहीले. सा.वाले यांनी कैफियत, शपथपत्र व लेखी युक्तीवाद दिलेला आहे. तक्रारदाराने प्रतिनिवेदन/शपथपत्र दिले आहे. आम्ही तक्रारीतील कागदपत्रं वाचली व उभय पक्षकारांचे म्हणणे वाचले. 9. तक्रारदाराने तक्रारीच्या निशाणी ए-1 ला सा.वाले यांनी दिलेल्या प्रस्तावाची कॉपी दाखल केली आहे. त्यात नमुद केले आहे की, उदवाहन ऑर्डरच्या बरोबर अडव्हान्स पेमेंट व कंपनीचा मंजूर नकाशा त्यांना मिळाल्यानंतर 14 आठवडयात ते उदवाहनाचे सामान देतील. व त्यानंतर 14 आठवडयात उदवाहन बसविण्याचे काम केले जाईल. सदरहू बाब सा.वाले यांनी नाकारलेली नाही. तक्रारदाराने तक्रारीच्या निशाणी ए-4 ला सा.वाले यांनी त्यांना पाठविलेल्या पत्राची/पावतीची कॉपी जोडलेली आहे. त्यावरुन असे दिसून येते की, तक्रारदाराने दिनांक 06.09.2004 च्या पे-ऑर्डरने सा.वाला यांना रु.3,50,000/- दिले होते. ती रकम सा.वाले यांच्या खात्यात दिनांक 07.10.2004 रोजी जमा झाली होती. त्या दिवसापासून 14 आठवडयाचे आत उदवाहनाचे सामान देणे व त्यानंतर 14 दिवसाचे आत उदवाहन बसवून देणे ही सा.वाले यांची जबाबदारी होती. म्हणजे जवळ जवळ 05.04.2005 पावेतो उदवाहन बसविण्याचे काम पूर्ण व्हावयास पाहिजे होते. परंतु तक्रारदार व सा.वाले यांचेमध्ये झालेल्या पत्रव्यवहारकरुन असे दिसते की, सा.वाले यांनी उदवाहन बसविण्याचे काम डिसेंबर, 2005 पावेतो पूर्ण केले. म्हणजे उदवाहन बसविण्यास जवळ जवळ 9 महिने उशिर झाला. सा.वाले यांनी याबाबत त्यांच्या पत्राव्दारे दिलगीरी व्यक्त केली आहे. सा.वाले यांचे म्हणणे की, मे.भारत बिजली यांच्या उदवाहन विभागाचे त्यांच्या खात्यात विलीनीकरण झाले. त्या प्रक्रियेला काही फॉरमॅलिटीज् करण्यासाठी उशिर झाला. म्हणून वेळेच्या आत उदवाहन बसवून देऊ शकले नाही. 10. तसेच सा.वाले यांचे म्हणणे की, सोसायटीनेही अनेक शंका कुशंका उपस्थित केल्यामुळे व वास्तुविशारद यांचे प्रमाणपत्र उशिरा दिल्यामुळे उदवाहन बसविण्यास उशिर झाला. मात्र सा.वाले यांनी मा.कोर्टाकडून विलीनीकरणासाठी कधी परवानगी मिळाली याबद्दल त्यांचे उत्तरात उल्लेख केलेला नाही. उदवाहन बसविण्यास सोसायटीसुध्दा कारणीभूत आहे हे सूचित करणारी कागदपत्रं त्यांनी दाखल केलेली नाही. त्यामुळे उदवाहन बसविण्यास तक्रारदार सोसायटीमुळे उशिर झाला असे म्हणता येत नाही. विलीनीकरणाच्या प्रक्रियेमुळे जरी उदवाहन बसविण्यास उशिर झाला तर तक्रारदार त्यास जबाबदार नाही. उदवाहन बसविण्यास उशिर झाल्यामुळे तकारदार सोसायटीतील सभासदांना मानसिक त्रास झाला, त्यांची अडचण झाली व त्यांची गैरसोय झाली याला सा.वाले सर्वस्वी जबाबदार आहेत. सा.वाले यांच्या सेवेतील न्यूनतेमुळे तक्रारदार सोसायटीच्या सभासदांना जो त्रास सहन करावा लागला त्यासाठी नुकसान भरपाई देणे ही सामनेवाले यांची जबाबदारी आहे. 11. तक्रारदार सोसायटीचा दुसरा आरोप की, सा.वाले यांनी बसवून दिलेले उदवाहन हे सदोष असून सुरळीत काम देत नाही. या आरोपाचे पृष्ठयर्थ तक्रारदार यांनी लॉगबुकमध्ये घेतलेल्या नोंदीच्या कॉपी दाखल केल्या आहेत.सा.वाले यांचे म्हणणे की, त्यांनी सोसायटीच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन कारागीर दुरुस्तीसाठी पाठविला होता. त्याबाबतच्या अटेंन्डन्स रजिस्टरची कॉपी सा.वाले यांनी दाखल केली आहे. हा दस्तेवज पहाता असे दिसून येते की, उदवाहन वारंवार नादुरुस्त होत होते. ते व्यवस्थित काम देत नव्हते. केव्हा 2/3 दिवसानंतर आणि कधी कधी दररोज 2/3 वेळा सा.वाले यांचे कारागीर उदवाहन दुरुस्तीला आलेले दिसतात. उदवाहन नविन बसविल्यानंतर अशी समस्या निर्माण होणे हे सोसायटीला अपेक्षित नव्हते. सा.वाले यांनी जरी तक्रारदार सोसायटीच्या उदवाहनाबद्दलच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांचे कारागीर पाठविले तरी उदवाहन हे सुरळीत झाले नव्हते व नेहमीच त्याच्यामध्ये बिघाड होत होता हे सिध्द होते. म्हणजेच एक तर उदवाहनाचे मटेरीयल कमी दर्जाचे असावे किंवा सा.वाले यांनी पाठविलेले कारागीर उदवाहन दुरुस्तीत तज्ञ नसावे. ही सामनेवाले यांच्या सेवेत न्यूनता आहे. 12. सा.वाले यांनी दुस-या उदवाहनाचेसुध्दा पैसे मागीतले मात्र सा.वाले यांनी दिनांक 15.05.2005 रोजीचे सोसायटीला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, पहिल्या उदवाहनाचे काम समाधानकारक पूर्ण झाल्यानंतरच सोसायटीने दुस-या उदवाहनाची ऑर्डर द्यावी. वर विचेचन केल्याप्रमाणे पहिल्या उदवाहनाचे काम समाधानकारक झालेले नसताना दुस-या उदवाहनाचे पैसे देण्याची किंवा त्यासाठी ऑर्डर देण्याची सा.वाले सोसायटीची करारानुसार जबाबदारी येत नाही. सोसायटीने दुस-या उदवाहनासाठी दिलेली रकम सा.वाले यांनी सोसायटीला परत करावयास पाहिजे होती. कारण त्याबद्दल त्यांनी सोसायटीला काही सेवा दिलेली नाही. सा.वाले यांनी ती रकम परत केली नाही ही सा.वाले यांच्या सेवेत न्यूनता आहे. 13. तक्रारदाराने पहिल्या उदवाहनाची सा.वाले यांना दिलेली संपूर्ण रकम परत मागीतलेली आहे किंवा सा.वाले यांनी उदवाहन पूर्णपणे दुरुसत करुन द्यावे अशी मागणी केली आहे. मंचाचे मते उदवाहन बसविण्याचे काम डिसेंबर, 2005 मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर सोसायटी उदवाहनाचा वापर करत आहे. ते उदवाहन बंद पडले किंवा त्यांनी दुसरे बसविले असे तकारदाराचे म्हणणे नाही. आशा परिस्थितीत पहिल्या उदवाहनाची संपूर्ण रकम तक्रारदाराला परत करणे हे मंचाला योग्य वाटत् नाही. मात्र सा.वाले यांनी तक्रारदार सोसायटीचे हे उदवाहन पूर्णपणे दुरुस्त करुन द्यावे हा आदेश देणे योग्य होईल. तसेच दुरुस्त केल्यानंतर त्याची एक वर्षाची वारंटी देणेही योग्य आहे. सा.वाले यांनी उदवाहनाच्या दरवाज्याला हॅन्डल बसविला त्यासाठी रु.4,875/- खर्च केला असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु त्या बद्दलची बिलं किंवा पावत्या त्यांनी दाखल केलेल्या नाहीत. उदवाहनाच्या दरवाज्याला बसविण्यात आलेला हँन्डल कराराप्रमाणे नव्हता असे तक्रारदार सोसायटीच्या वतीने सिध्द केलेले नाही. त्यामुळे सदरहू रकम त्यांना मंजूर करता येत नाही. उदवाहन बसविण्यास 9 महिने उशिर झाला त्यामुळे तक्रारदार सोसायटीच्या सदस्यांची गैरसोय झाली व त्यांना जो त्रास झाला त्याबद्दल सोसायटीला नुकसान भरपाई देणे हे योग्य वाटते. मंचाच्या मते खालील आदेश न्यायाचे हिताचे दृष्टीने योग्य राहील. म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्र. 319/2006 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी सोसायटीला बसवून दिलेले उदवाहन दुरुस्त करुन देऊन दुरुस्त केल्यापासून एक वर्षाची वॉरंटी द्यावी. 3. सामनेवाले यांनी तक्रारदार सोसायटीला रु.25,000/- नुकसान भरपाई द्यावी. 4. सामनेवाले यांनी तक्रारदार सोसायटीला त्यांनी दुस-या उदवाहनासाठी दिलेली रकम रु.73,500/- परत करावी व त्यावर द.सा.द.शे.6 दराने दिनांक 07.05.2004 पासून तो रकम फिटेपर्यत व्याज द्यावे. 5. सामनेवाले यांनी तक्रारदाराला या तक्रारीच्या खर्चापोटी रु.5000/- द्यावे. 6. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |