मंचाचे निर्णयान्वये सौ. जयश्री येंडे, सदस्या.
- आदेश -
(पारित दिनांक – 09/04/2012)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या कथनानुसार, तो गैरअर्जदाराचा मोबाईल क्र. 9371985793 चा ग्राहक आहे व गैरअर्जदाराने त्यांचे हॅण्डसेटवर स्वतःहून काही महिन्यापूर्वी मोफत कॉलर ट्यून लागू केली होती. ही सेवा सुरु करावी कि नाही हे विचारण्यात आले होते. परंतू विशेष काळ संपल्यावर आपोआप बंद करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पुढे ही कॉलर ट्युनची सेवा न विचारता तशीच ठेवण्यात आली व प्रत्येक महिन्यात तक्रारकर्त्याचे टॉक टाइममधून रक्कम वजा केल्या जात होती. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचे कार्यालयात स्वतः जाऊन तक्रार नोंदविली. एक मुलीने फोनवर विचारपूस केल्यानंतर कपात केलेली रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतू कपात केलेली रक्कम परत करण्यात आली नाही. दि.30.11.2011 ला तक्रारकर्त्याने रु.50/- टॉक टाईम टाकला. त्यातून कॉलर ट्युनची रक्कम कापून रु.71/- शिल्लक दाखविण्यात आले. तक्रारकर्त्याने दि.29.08.2010 ला मे. शितल इंटरप्रायजेस, इतवारी, नागपूर येथून गैरअर्जदार कंपनीचे सिम कार्ड विकत घेतले. हे कार्ड तक्रारकर्त्यास पत्नीला भेट द्यावयाचे होते. परंतू सीम कार्ड, activate सुरु झाले नाही व पत्नीला फक्त मोबाईलचा खोका भेट द्यावा लागला. त्यामुळे तक्रारकर्त्याला लाजेला सामोरे जावे लागले. Inbox रीकामे नसल्यामुळे गैरअर्जदाराचे दर अर्ध्या तासाने 24 तास रींग वाजवून तक्रारकर्त्यास त्रास देणे सुरु केले, त्यामुळे शेवटी तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना नोटीस पाठविली. ती परत आली. रु.50/- च्या टॉक टाईममध्ये रु.8/- कशाचे कापले जातात हे कळत नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन, कपात करण्यात आलेली रक्कम परत करण्यात यावी, सीम एक्टीव्ह होत नसतांना अशा सीमची विक्रेत्यांना विक्री केल्याने दंड करावा, रींग वाजवून त्रास दिल्याने दंड ठोठावण्यात यावा, कार्यवाही खर्च मिळावा, रु.8/- ची कपात का करतात याची विचारणा व्हावी अशा मागण्या केल्या.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराना दिली असता, नोटीस प्राप्त होऊनही, त्यांनी मंचासमोर हजर होऊन तक्रारीस लेखी उत्तर दाखल न केल्याने, मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
3. सदर प्रकरण मंचासमोर युक्तीवादाकरीता आले असता, मंचाने तक्रारकर्त्यांचा युक्तीवाद ऐकला व दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. गैरअर्जदार गैरहजर.
-निष्कर्ष-
4. प्रस्तुत प्रकरणात सादर केलेले तक्रारकर्त्याचे शपथपत्र, इतर दस्तऐवज यावरुन निर्विवादपणे स्पष्ट होते की, तक्रारकर्ता हा गैरअर्जदार कंपनीच्या मोबाईल क्र. 9371985793 चा धारक आहे. त्यामुळे तो गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्याचे कथनानुसार गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचे सीम कार्डमधून विना परवानगी कॉलर टयुनकरीता रक्कम कपात केली व ही सेवा वारंवार विनंती करुनही बंद केली नाही. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचे हे कथन खोडून टाकावयास कुठलाही पुरावा सादर न केल्यामुळे तक्रारकर्त्याने हे कथन मान्य करण्यात येते. वारंवार विनंती करुनही, एखादी सेवा बंद न करणे ही निश्चितच सेवेतील कमतरता आहे.
5. दस्तऐवज क्र. 2 वरुन असे स्पष्ट होते की, गैरअर्जदाराने मे. शितल इंटरप्रायजेस कडून दि.29.08.2010 रोजी गैरअर्जदार कंपनीचे prepaid sim card विकत घेतले होते. हे कार्ड तक्रारकर्त्याला आपल्या पत्नीला भेट द्यावयाचे होते. परंतू सेवा activate झाली नाही. गैरअर्जदाराने हे खोडून टाकणारा पुरावा सादर केल्यामुळे हे कथनसुध्दा ग्राह्य धरण्यात येत आहे. दस्तऐवज क्र. 3 व 4 वरील अनुक्रमे दि.05.06.2010, दि.13.06.2010 रोजी तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला लिहिलेल्या पत्रावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याने वरचेवर आपली तक्रार गैरअर्जदाराकडे नोंदविली होती. परंतू त्याची दखल गैरअर्जदाराने घेतलेली दिसत नाही.
6. प्रकरणातील वरील वस्तूस्थितीचा विचार करता हे मंच या निष्कर्षाप्रत येते की, गैरअर्जदाराने विना परवानगी तक्रारकर्त्याचे सीममधून कॉलर टयुनकरीता कपात केलेली रक्कम अयोग्य आहे. तसेच तक्रारकर्त्याचे सीम कार्ड activate न करुन सेवेतील कमतरता दिली आहे व त्याकरीता गैरअर्जदार जबाबदार आहेत. सबब आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याचे टॉक टाईममधून कपात केलेली रक्कम तक्रारकर्त्यास परत करावी.
3) गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याला नुकसान भरपाईपोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.