तक्रारदारातर्फे – वकील श्रीमती.कल्पना त्रिवेदी. सामनेवालेतर्फे – वकील श्रीमती.सपना भुपतानी. मा.अध्यक्षानुसार दिलेले निकालपत्र. 1. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की, तिचे पती कांताप्पा(हल्ली मयत) यांनी सामनेवाले यांचेकडून Term Assurance policy No,GDL-03-00001-00/1 घेतली होती. पॉलीसीची आश्वासित रककम रुपये 1,00,000/- होती. तिचे पती दिनांक 23/11/2004 रोजी बोरीवली येथील भगवती रुग्नालयात ह्दयविकाराने (Cerebro vascular disease I.H.D. ) ने मरण पावले. तिने सामनेवाले यांचेकडे तिच्या पतीच्या मृत्यू पश्चात पॉलीसी क्लेम दाखल केला. मात्र सामनेवाले यांनी तो त्यांच्या तारीख 9/5/2005 च्या पत्राने नाकारला. या वस्तुस्थितीबाबत सामनेवाले यांनी वाद उपस्थित केलेला नाही. 2. तक्रारदारा हिचे म्हणणे की, सामनेवाले यांनी मागणी केल्यामुळे तिने कोर्टातुन सक्सेशन सर्टिफीकेट काढले व त्यासाठी रुपये 15,000/- खर्च केला. पॉलीसी घेतली त्यावेळेस तिच्या पतीची तब्बेत एकदम चांगली होती. त्यांना कोणताही आजार नव्हता किंवा आजाराची लक्षणं नव्हती. क्लेम नाकारल्याचे पत्र तिला मिळाल्यानंतर तिने उत्तर पाठविले होते. तिच्या पतीला रुग्नालयात भरती केले त्यावेळेस तिचेजवळ तिच्या पतीबाबत कोणतेही मेडीकल पेपर नव्हते असे तिने सामनेवाले यांना कळविले होते. मात्र सामनेवाले यांनी तिच्या उत्तराला प्रतिसाद दिला नाही व क्लेम बाबत पुनर्विचार केला नाही. तक्रारदार हिचे म्हणणे की, पॉलीसीखालील आश्वासीत रक्कम मिळण्यास ती पात्र असूनही सामनेवाले यांनी तिचा क्लेम नाकारला ही त्यांच्या सेवेत न्यूनता आहे तीला सदरची आश्वासित रक्कम रुपये 1,00,000/- सामनेवाले यांचेकडून मिळावी. 3. सामनेवाले यांनी कैफीयत दाखल करुन तकारदाराने त्यांच्यावर केलेले आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, तकारदार हिच्या पतीने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून त्यांनी त्याला पॉलीसी दिली होती. परंतु त्यांनी दिलेली माहिती खोटी होती. कारण त्याला 10 वर्षापासुन ह्दय विकाराचा आजार होता व ही गोष्ट त्यांने त्यांना सांगीतली नाही. Praposal Form मध्ये खोटी माहिती देऊन तक्रारदाराच्या पतीने त्यांच्याकडून पॉलीसी घेतली.पॉलीसी खोटया माहितीच्या आधारावर असल्यामुळे ती मुलतः रद्दबातल होते व आहे. त्यामुळे ते तक्रारदाराला क्लेम देण्यास जबाबदार नाहीत. पॉलीसी काढताना तक्रारदार हिच्या पतीची तब्बेत चांगली होती हे तक्रारदार हिचे म्हणणे खोटे आहे. त्यांनी तक्रारदार हिचा क्लेम फॉर्म मिळाल्यानंतर चौकशी केली असता त्यांना असे आढळून आले की, तिक्रारदार हिच्या पतीला Cerebro vascular accident व I..H.D. हा आजार होता व त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पॉलीसीनुसार ते क्लेम देण्यास जबाबदार नाहीत. सदरहू तक्रार रद्द करण्यात यावी व त्यांचा खर्च देववावा. 4. आम्ही तक्रारदारतर्फे वकील श्रीमती.कल्पना त्रिवेदी व सामनेवालेतर्फे वकील श्रीमती. सपना भुपतानी यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला व कागदपत्रं वाचली. 5. या तक्रारीमध्ये मुद्दा उपस्थित होतो की, सामनेवाले यांनी तक्रारदार हिच्या पतीला ह्दयविकाराचा आजार पॉलीसी घेण्याच्या अगोदरपासून होता हे सिध्द केले आहे काय ? मंचाच्या मते सामनेवाले यांनी त्यांचा हा बचाव पुराव्यानिशी सिध्द केलेला नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार हिच्या पतीच्या ट्रीटमेंटबाबत कोणताही मेडीकल पेपर/केस पेपर दाखल केलेला नाही की, ज्यावरुन मंच या निर्णयाला येऊ शकेल की त्याला पॉलीसी घेण्याच्या अगोदरपासुन ह्दयविकाराचा त्रास होता. सामनेवाले यांनी तक्रारदार हिच्या पतीने पॉलीसीसाठी भरुन दिलेल्या Praposal Form ची किंवा त्याची कॉपी तसेच पॉलीसी किंवा पॉलीसीच्या शर्ती व अटी हेसुध्दा दाखल केलेले नाही. सामनेवाले यांचे वकील श्रीमती सपना भुपतानी यांनी सामनेवाले यांचे लेटरहेडवर भगवती रुग्नालयाने तक्रारदाराला दिलेल्या प्रमाणपत्राकडे मंचाचे लक्ष वेधले. या प्रमाणपत्रात असे लिहीले आहे की, It was a old case of CVA-IHD, Duration 10 Years, Date of diagnosis not Known, आजाराचे निदान Cerebro vacular disease व I..H.D. सदरहू प्रमाणपत्र बोरीवली या रुग्नालयातील Indore Record वरुन दिले आहे असे म्हटले आहे. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदाराचे भगवती रुग्नालयाचे Indore case paper मंचापुढे दाखल केले नाही. Indore case paper मध्ये काय माहिती लिहीलेली आहे व कशाच्या आधारावर लिहीली आहे या बद्दलचा काहीही पुरावा मंचासमोर आलेला नाही. जर सामनेवाले यांनी चौकशी केली होती तर भगवती रुग्नालयाचा Indocre record मंचापुढे दाखल करण्यास त्यांना काहीही अडचण नव्हती. परंतु हेतु-पुरस्सर सामनेवाले यांनी ते पेपर मंचापुढे दाखल करण्याची टाळाटाळ केली आहे. तक्रारदार हिच्या पतीला ह्दयविकाराचा त्रास पॉलीसी घेण्याच्या अगोदरपासून होता या निर्णयाला सदरच्या प्रमाणपत्रावरुन मंच येऊ शकत नाही. मंचाच्या मते सामनेवाले यांनी तक्रारदाच्या पतीला ह्दयाचा आजार हा Pre-existing होता हे पुरेश्या पुराव्यासहीत सिध्द केलेले नाही. तिच्या पतीच्या मृत्यूच्या वेळेस पॉलीसी अस्तित्वात असतांना तीचा क्लेम मंजूर करावयास पाहीजे होता तो त्यांनी नाकारला हे त्यांच्या सेवेत न्यूनता आहे. मंचाच्या मते तक्रारदार हिचा क्लेम देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत. म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्रमांक 479/2006 मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी तक्रारदार हिला रु.1,00,000/-(रुपये एक लाख मात्र) हा आदेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावे. अन्यथा विलंबापोटी द.सा.द.शे. 6 दराने या रक्कमेवर व्याज व मूळ रक्कम रु. 1 लाख देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील. 3. सामनेवाले यांनी तक्रारदार हिला या तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- ( रुपये पाच हजार मात्र) द्यावा. 4. सामनेवाले यांनी स्वतःचा खर्च सोसावा. 5. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONORABLE S P Mahajan] PRESIDENT | |