सौ. जयश्री येंडे, सदस्यायांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 16/01/2012)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या कथनानुसार, तक्रारकर्ता हा मोबाईल सीम कार्ड क्र. 7276797595 आणि क्र.9028523066 चा सेवाधारक ग्राहक आहे. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराचे SMS मधील सुचनेनुसार ½ पैसा प्रतिसेकंद या दराकरीता रु.34/- भरण्यास सांगितल्यानुसार तक्रारकर्त्याने प्रत्येकी रु.34/- भरले. तसेच पुढे टी.व्ही.वरील जाहिरातीनुसार सहा महिन्याकरीता 1 पैसे प्रति दोन सेकंदाकरीता यानुसार दर प्राप्त करण्याकरीता रु.94/- भरलेत. यानुसार एकूण रु.188/- भरले. परंतू पुढे गैरअर्जदाराचे कार्यालयात जाऊन चौकशी केल्यानंतर कळले की, ही सुविधा फक्त टाटा डोकोमो ते टाटा डोकोमो या कॉल्सकरीता आहे. परंतू ही अट अगदी बारीक अक्षरात लिहिलेली आहे. त्यानंतर गैरअर्जदाराने रु.56/- भरल्यानंतर प्रती 2 सेकंदाला 1 पैसा हा दर लागेल असे SMS द्वारे कळविले. परंतू ही रक्कम भरल्यानंतरही अटीनुसार सेवा उपलब्ध झाली नाही. गैरअर्जदारांनी रु.56/- पैकी रु.30/- परत केलेत, परंतू इतर रक्कम परत केली नाही. तक्रारकर्त्याने पुढे असेही म्हटले आहे की, त्याने Personalized Horoscope ही ग्राहकांची भविष्य सांगणारी सेवा सुरु केली व तक्रारकर्त्याचे संमतीविना रु.10/- कापण्यात आले. तक्रारकर्त्याने ही सेवा बंद करण्याचा प्रयत्न केला असता त्याला योग्य उत्तर देत नाही. रु.50/- चे कार्ड घेतले तर रु.42/- टॉकटाईम मिळतो व रु.8/- कशाचे कापले जातात हे कळत नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, त्याची अनावश्यक कपात केलेली रक्कम परत मिळावी, न मागता सुरु केलेल्या इतर सेवा व त्याबाबत कपात होणारी रक्कम बंद करावे, रु.50/- च्या कार्डवर रु.42/- चा टॉकटाईम कसा मिळतो याचे समाधान करण्यात यावे अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. सदर तक्रार मंचासमोर दाखल झाल्यानंतर मंचाने गैरअर्जदारास नोटीस पाठविला असता त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. तसेच पुढे पूकारा केला असता गैरअर्जदार यांनी हजर होऊन तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.07.12.2011 रोजी केला व प्रकरण युक्तीवादाकरीता ठेवण्यात आले. युक्तीवादाचेवेळेस तक्रारकर्ता हजर, त्यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार गैरहजर. मंचाने सदर प्रकरणी उपलब्ध दस्तऐवजाचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
3. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन व प्रतिज्ञापत्रावरुन असे दिसते की, तक्रारकर्ता हा गैरअर्जदार कंपनीचा सीम कार्ड क्र. 7276797595 आणि क्र. 9028523066 चा सेवाधारक ग्राहक आहे.
4. तक्रारकर्त्याचे कथनानुसार त्याने वेळोवेळी दिलेल्या जाहिरातीनुसार आपल्या अटीचे पालन केले नाही व अयोग्य दराने भ्रमणध्वनीचे शुल्क आकारले आहेत. रु.34/- भरल्यानंतर ½ पैसे/सेकंद दर, रु.94/- भरल्यानंतर पुढील सहा महिन्यासाठी 1 पैसे/दोन सेकंदारकरीता, तसेच रु.56/- भरल्यानंतर 1 पैसा/1 सेकंद यानुसार माहिती देऊनही व तक्रारकर्त्याने त्याच्या प्रत्येक सीमकरीता रकमा भरल्यानंतरही गैरअर्जदाराने त्यानुसार दर लावला नाही.
5. गैरअर्जदाराने कशापध्दतीने आकारणी केली व कसे दर लावले व ते जाहिरातीतील अटीनुसार योग्य त-हेने लावले की नाही हे सिध्द करण्यास सबळ पुरावा तक्रारकर्त्याने सादर केलेला नाही. परंतू ही सेवा टाटा डोकोमो ते टाटा डोकोमो अशा सेवेकरीता उपलब्ध आहे हे स्पष्टपणे व ठळक अक्षरात व ग्राहकांना समजेल अशा पध्दतीने लिहावयास पाहिजे होती. कारण हे लक्षात न आल्यामुळे तक्रारकर्ता किंवा इतर ग्राहकांनी ही सेवा घेतली असेल. त्यामुळे गैरअर्जदार यांची कृती अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी आहे.
6. तसेच तक्रारकर्त्याचे संमतीशिवाय Personalized Horoscope संदर्भातील SMS करीता तक्रारकर्त्याचे संमतीशिवाय कापलेली रक्कम तक्रारकर्त्यास परत करावी. तसेच ग्राहकांना समजेल अशा पध्दतीने अट न लिहिल्यामुळे व त्याकरीता गैरअर्जदाराने मंचाला किंवा तक्रारकर्त्याला कुठलेही स्पष्टीकरण न दिल्यामुळे गैरअर्जदाराने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला या निर्णयाप्रत ग्राहक मंच येते व त्याकरीता गैरअर्जदार नुकसान भरपाई देण्यास बाध्य आहे. सबब खालील आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत असून, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याकडून Personalized Horoscope करीता SMS पाठवून कपात केलेली रक्कम परत करावी.
2) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास रु.2,000/- नुकसान भरपाईबाबत व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.1,000/- द्यावे.
3) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.