निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी.)
(१) तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून भेसळयुक्त बियाण्यामुळे झालेली नुकसानभरपाई मिळणेकामी सदर तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केला आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांची मौजे दुसाने शिवारात बागायत शेत जमिन आहे. त्यांना सदर शेतात गव्हाची लागवड करावयाची असल्याने, त्यांनी सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादीत केलेले गव्हाचे बियाणे जात - लोकवन, लॉटनं.३२७१९ सीए हे दि魦ࠀ.०६-१२-२०१० रोजी सामनेवाले क्र.२ यांच्याकडून विकत घेतले. सदर बियाणे हे दि魦ࠀ.०४-१२-२०१० रोजी ताब्यात घेतले असून त्याचे बिल दि魦ࠀ.०६-१२-२०१० रोजी घेतले आहे. बियाण्याची योग्य ती काळजी घेऊन लागवड केलेली आहे. परंतु प्रत्यक्ष पिक मोठे झाले तेव्हा पिकाची परिस्थिती पाहता, पेरलेले बियाणे हे कनिष्ट दर्जाचे व भेसळयुक्त असल्याचा संशय तक्रारदार यांना आला. त्यामुळे तक्रारदार यांनी पंचायत समिती यांच्याकडे दि.१४-०३-२०११ रोजी पिकाची तपासणी होऊन अहवाल मिळणेसाठी अर्ज केला. त्याप्रमाणे चौकशी समितीने पिकाचा पंचनामा करुन अहवाल तक्रारदार यांना दि魦ࠀला. तक्रारदार यांनी बियाणे विकत घेतेवेळी मिळालेल्या माहितीनुसार सदर बियाणे पेरले होते. परंतु सदरचे बियाणे भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे तक्रारदार यांचे १०० टक्के नुकसान झालेले आहे. त्याकरिता तक्रारदार यांनी वकिलांमार्फत सामनेवाले यांना नोटीस पाठविली. सदरचे पिक घेण्यासाठी तक्रारदार यांना एकूण खर्च रु.७० ते ८० हजार आलेला आहे व एकरी १५ पोते गव्हाचे कमी उत्पन्न झाले आहे. जे उत्पन्न आले आहे ते दर्जाहिन व भेसळयुक्त असल्याने सदरचा माल हा दर्जा पाहून विकत घेण्यास व्यापारी तयार नाहीत. त्यामुळे तो साठवन करुन ठेवलेला असून खराब होत आहे. सदर नुकसानीमुळे तक्रारदार यांना झालेल्या आर्थिक, मानसिक त्रासाकामी सामनेवाले हे जबाबदार आहेत, त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
सबब विनंती की, तक्रारदार यांना बियाण्यांचा खर्च व झालेल्या नुकसानीबाबत व मानसिक, शारीरिक त्रासाकामी एकूण रक्कम रु.९६,३५०/- व्याजासह सामनेवाले यांच्याकडून वसूल होऊन मिळावेत व सदर अर्जाचा खर्च मिळावा.
(३) तक्रारदारांनी सदर अर्जासोबत नि.नं.६ वर शपथपत्र, नि.नं.८ वरील दस्तऐवज यादीसोबत अनुक्रमे १ ते १२ कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. यामध्ये बिल, पंचनामा, फोटो, नोटीस, ७/१२, खाते उतारा, इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
(४) सामनेवाले नं.१ यांनी त्यांचा लेखी जबाब नि.नं.१७ वर दाखल केला आहे. त्यामध्ये त्यांनी तक्रारदाराचे म्हणणे माहिती अभावी अमान्य व नाकबूल केले आहे. तसेच अधीकचे कथन यामध्ये नमूद केले आहे की, सामनेवाले हे उत्कृष्ट बियाणे उत्पादन करणारी कंपनी आहे. कुठलेही बियाणे उगवण्याकरिता वातावरण, मातीचा दर्जा, खते, किटकनाशके व पाऊस इ.घटकांचा उगवणशक्तीवर परिणाम होत असतो. तक्रारदार यांनी अधिकृत मृदू तपासणी अहवाल दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेली बिले पाहता, दि.०४-१२-२०१० रोजी बियाणे विकत घेतलेले आहे व त्याचे बिल दि.०६-१२-२०१० रोजी घेतले आहे ही बाब संशयास्पद वाटते. सदर पिक परिस्थितीचा पंचनामा दाखल केला असून, त्यात पिकाची उगवण व वाढ चांगली दर्शविली आहे. याचा अर्थ कंपनीचे बियाणे हे चांगले होते. त्यामध्ये अभिप्रायानुसार ८.४ टक्के भेसळ आढळून आली, परंतु सदर अभिप्रायामध्ये इतर कोणत्या वाणाची भेसळ होती याबद्दल अथवा बियाण्याच्या दोषाबद्दल कोणताही अभिप्राय दिलेला नाही. तक्रारदाराची बियाण्याच्या उगवणशक्तीबद्दल तक्रार नाही. लागवडीपुर्वी आंतर मशागत करतांना काळजी घेणे आवश्यक असते. कारण तण व इतर धान्य आढळल्यास त्यामुळे पिकाच्या पेरणीनंतर तनाचे प्रमाण वाढते हा सर्वांगीन दोष गव्हाचे पिकात आढळून येतो. तसेच योग्य प्रमाणात पेरणी नंतर काही ठिकाणी उगवण झाली नसल्यास, शेतकरी स्वत:जवळील बियाणे “गॅप फिलींग” करिता वापरत असतो. म्हणजेच स्वत:जवळील बियाणे वापरल्यामुळे भेसळ आढळल्यास त्या करिता कंपनी जबाबदार होऊ शकत नाही. तक्रारदार यांनी बियाण्याच्या दोषाबद्दल प्रयोगशाळेचा अहवाल दाखल केलेला नाही. सीडस् अॅक्ट व महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकाप्रमाणे अहवालाचे वेळेस सर्व प्रतिनिधींना हजर राहणे बंधनकारक आहे, मात्र सदर प्रकरणात हे घडून आलेले नाही. तसेच या प्रकरणात तक्रारदार यांची नुकसान भरपाईची मागणी ही रु.८०,०००/- ची आहे परंतु तक्रारदारांच्या नोटीसमध्ये मात्र रक्कम रु.१०,०००/- ची मागणी केलेली आहे. यावरुन तक्रारदारांची मागणी ही अवास्तव आहे. तक्रारदारांना बियाण्यापासून उत्पन्न आलेले आहे. त्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. सबब सदरची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
(५) सामनेवाले यांनी त्यांच्या जबाबाच्या पुष्टयर्थ शपथपत्र दाखल केले आहे.
(६) सामनेवाले नं.२ हे सदर प्रकरणात हजर झाले, परंतु नेमलेल्या पुढील सर्व तारखांना ते गैरहजर आहेत व त्यांनी त्यांचा खुलासा प्रकरणात दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द दि.१६-०६-२०१४ रोजी “नो-से” आदेश पारित करण्यात आला आहे.
(७) तक्रारदारांचा अर्ज, शपथपत्र, कागदपत्र, सामनेवाले नं.१ यांची कैफीयत, शपथपत्र, तसेच तक्रारदारांचा लेखी युक्तिवाद पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले नं.१ व २ यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : नाही. |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(८) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सदर बियाणे खरेदी केल्याची छायांकीत पावती पान नं.११ वर दाखल केलेली आहे. सदर पावती पाहता ती तक्रारदार हंसराज भिकनराव खैरनार यांचे नांवे असून त्यावर दि.०४-१०-२०१० रोजी नुझी विडू सिड्स, लॉट नं.३२७४९, ४० किलो वजनाचे पाच नग एकूण रक्कम रु.६,३५०/- किमतीस विकत घेतल्याची नोंद आहे. सदर पावती ही दि.०४-१०-२०१० रोजी सामनेवाले क्र.२ यांनी दिलेली दिसत आहे. परंतु तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे सदरचे बियाणे हे दि.०४-१२-२०१० रोजी ताब्यात घेतले व त्याची पावती ही दि.०६-१२-२०१० रोजी घेतलेली आहे. या म्हणण्या प्रमाणे तक्रारदार यांना सदर पावती ही नक्की कोणत्या दिवशी मिळाली आहे हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या या म्हणण्याबाबत शंका निर्माण होत आहे. परंतु सदर पावतीवरील तक्रारदार यांचे नांव पाहता, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी सदर बियाण्याची योग्य त्या पध्दतीने लागवड स्वत:चे शेतात केल्यानंतर तक्रारदारांना, पेरलेले बियाणे कनिष्ट दर्जाचे व भेसळयुक्त असल्याचा संशय आला. त्याबाबत त्यांनी कृषिअधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे दि.१४-०३-२०११ रोजी तक्रार अर्ज केला आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने दि.२४-०३-२०११ रोजी तक्रारदारांचे पिक परिस्थितीचा पंचनामा केलेला आहे. सदर पंचनामा नि.नं.१८ वर दाखल आहे. सदर पंचनामा पाहता यामध्ये असे नमूद आहे की, तक्रारदार यांनी नुझी विडू सिड्स हैद्राबाद, बियाणे लॉट नं.३२७४९ हे दि.०५-१२-२०१० रोजी पेरले आहे. सदर पिकाची उगवण व वाढ चांगली आहे. अभिप्रायामध्ये “...प्रक्षेत्रातील रॅण्डम पध्दतीने १ X १ मिटर प्लॉट मधील पाच ठिकाणी निरीक्षणे घेतली असता १ X १ मिटर प्लॉटमधील सरासरी एकूण १२४ झाडे आढळून आले व त्यामध्ये सरासरी १३ झाडे भेसळयूक्त गहू पिकाच्या इतर वाणाची आढळून आली. तक्रारीतील प्रक्षेत्रात एकूण सरासरी १०.४ टक्के भेसळयुक्त गहू पिकाची झाडे आढळून आली. बियाणे प्रमाणिकरणाच्या मापदंडानुसार दोन टक्के भेसळयुक्त झाडे क्षम्य असतांना, सदर प्रकरणी ८.४ टक्के जास्त भेसळयुक्त झाडे आढळून आली आहेत. दर्जात्मक दृष्टया नुकसान झाले असल्याचे समितीचे मत आहे ” असे नमूद केले आहे.
या पंचनाम्याप्रमाणे पिकाची उगवण चांगली दर्शविली आहे. परंतु आलेल्या उत्पादनामध्ये ८.४ टक्के भेसळ आढळून आली आहे असा अभिप्राय दिला आहे. परंतु अहवालामध्ये सदर भेसळीत कोणत्या वाणाची भेसळ आहे हे नमूद केलेले नाही. भेसळयुक्त असलेल्या बियाण्याचे आलेले उत्पादन हे कोणत्या दर्जाचे होते तसेच कोणत्या वाणाचे आहे याबाबत कोणताही खुलासा केलेले नाही. केवळ ८.४ टक्के बियाण्यांमध्ये भेसळ आहे असे नमूद केलेले आहे. त्यामुळे सामनेवाले कंपनीचे बियाण्यांमध्ये भेसळ आहे हे स्पष्ट होत नाही.
तसेच तक्रारदार यांनी विकत घेतलेल्या बियाण्यांच्या पिशव्या या सिलबंद अवस्थेत होत्या किंवा नाही याबाबत खुलासा केलेला नाही. तसेच त्यामध्ये काही बदल आढळून आल्यास त्याबद्दल तशी तक्रार कंपनी किंवा विक्रेत्याकडे केलेली नाही व त्यांचे तसे म्हणणे नाही. तसेच तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीप्रमाणे, बियाणे पेरल्यानंतर त्याची उगवण योग्य झाली आहे. म्हणजेच बियाण्यामध्ये उगवणशक्ती होती परंतु त्यामध्ये ८.४ टक्के पिक हे भेसळयुक्त आहे, त्याचा दर्जा कसा होता याबाबत तक्रारदारांनी कोणताही खुलासा केलेला नाही.
(१०) तक्रारदार यांनी सदर तक्रारीत असे नमूद केले आहे की, उत्पादन हे भेसळयुक्त असल्याने कोणताही व्यापारी सदर माल घेण्यास तयार नाही. त्यामुळे सदर उत्पादन हे साठवण करुन ठेवलेले आहे. यावरुन तक्रारदार यांना उत्पादन मिळाले आहे मात्र एकूण किती उत्पादन मिळाले आहे याचा खुलासा तक्रारदार करीत नाही. तसेच सदर उत्पादनावरुन कोणत्या प्रकारच्या वाणाच्या बियाण्याची भेसळ झाली आहे हे निदर्शणास येवू शकत होते, परंतु तसे तक्रारदार यांनी केलेले नाही.
तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. त्याकामी त्यांनी रक्कम रु.८०,०००/- ची मागणी केली आहे. परंतु तक्रारदारांनी सामनेवाले यांना दिलेल्या नोटीसमध्ये रक्कम रु.१०,०००/- ची मागणी केली आहे, सदर नोटीस नि.नं.२८ वर दाखल आहे. या दोन्ही मागणीमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. यावरुन तक्रारदार यांचे नेमके किती रकमेचे नुकसान झाले हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी केवळ पैसे मिळविण्यासाठी सदरची तक्रार दाखल केली आहे असे दिसते.
(११) वरील पंचनाम्याप्रमाणे सामनेवाले यांच्या बियाण्याची उगवणशक्ती योग्य आहे परंतु बियाण्यामध्ये भेसळ आहे असे नमूद आहे, परंतु ते कोणत्या वाणाचे आहे हे नमूद केलेले नाही. त्यामुळे सामनेवालेंनी विक्री केलेल्या बियाण्यामध्ये भेसळ आहे हे स्पष्ट होत नाही.
सदर पंचनाम्यामध्ये बियाण्यात भेसळ होण्याबाबत कोणतेही ठोस कारण दिलेले नाही, किंवा तक्रारदार यांनी बियाण्यात भेसळ असल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. आमच्यामते त्यावेळचे हवामान, पाऊस, खतांची मात्रा, किटकांचा प्रादुर्भाव व माती इत्यादी गोष्टी शेती उत्पादनासाठी कारणीभूत असतात. केवळ भेसळयुक्त बियाणे ही एक बाब असू शकत नाही, असे आमचे मत आहे. तसेच तक्रारदार यांनी सदर बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत कोणत्याही प्रयोगशाळेचा दाखला दाखल केलेला नाही. त्यामुळे सदर बियाणे निकृष्ट दर्जाचे व भेसळयुक्त आहे हे सिध्द होत नाही. या सर्व बाबीचा विचार होता, सामनेवाले नं.१ यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होत नाही.
(१२) सामनेवाले नं.२ हे सामनेवाले नं.१ या कंपनीचे वितरक आहेत. त्यांनी कंपनीने उत्पादीत केलेले बियाणे केवळ तक्रारदारास विक्री केले आहे. त्यामुळे बियाण्यातील दोषास वितरक जबाबदार होणार नाही. सामनेवाले नं.२ यांनी बियाणे भेसळ केल्याबाबत तक्रारदारांचे म्हणणे नाही, तसेच पुरावाही नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या होणा-या नुकसानीसही वितरक जबाबदार नाही, असे आमचे मत आहे. यावरुन सामनेवाले नं.२ यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होत नाही. या बाबीचा विचार करता मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(१३) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील सर्व बाबीचा विचार होता, तक्रारदारांची तक्रार रद्द करणे योग्य होईल असे या मंचाचे मत आहे. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज रद्द करण्यात येत आहे.
(ब) अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक : १३-११-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.