(घोषित दि. 27.03.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे शेतकरी असून त्यांची गट नंबर 63, उटवद ता.जि. जालना येथे शेती आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे बियाणे उत्पादक आहेत व गैरअर्जदार क्रमांक 3 हे विक्रेता आहेत. तक्रारदारांनी दिनांक 05.06.2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 यांचेकडून गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्पादित केलेले कपाशीचे मल्लीका 207 हे बियाणे खरेदी केले त्याचा बिल क्रमांक 001556, लॉट नंबर 152152049 असा आहे. तक्रारदारांनी वरील बियाणे त्यांचे शेतात 2 हेक्टरमध्ये दिनांक 07.06.2012 रोजी टोकन पध्दतीने लावले त्यांना योग्य प्रमाणात खते देवून माशागत केली. परंतू काही झाडे कमी उंचीने वाढली म्हणून दिनांक 07.08.2012 रोजी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केली. दिनांक 22.08.2012 रोजी जायामोक्यावर तालुका कृषी अधिकारी यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. त्यात कमी उंचीच्या झाडांची संख्या 188 आढळून आली व 13 % झाडांची उंची 1 फुटच आढळून आली. यावरुन गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना सदोष बियाणांची विक्री केल्याचे दिसते. त्यानंतर वारंवार विनंती करुनही गैरअर्जदारांनी तक्रारदारांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. सदोष बियाणाच्या विक्रीमुळे तक्रारदारांचे सुमारे 5,00,000/- रुपयांचे नुकसान झालेले आहे. दिनांक 24.09.2012 रोजी तक्रारदारांनी गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीसही पाठवली. त्याचे गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी खोटे उत्तर दिले. तक्रारदार प्रस्तुत तक्रारीद्वारे रुपये 5,00,000/- ऐवढी नुकसान भरपाई मागत आहेत.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत तालुका कृषी अधिकारी यांना लिहीलेले पत्र, दिनांक 30.08.2012 चा पंचनामा, कायदेशीर नोटीस व तिचे उत्तर, बियाणे खरेदीची पावती इत्यादि कागदपत्रे दाखल केली.
गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी जबाब दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 च्या लेखी जबाबानुसार त्यांची कंपनी मागील 33 वर्षांपासून बियाणे तयार करते व त्यांचा दर्जा उत्तम असतो बियाणे उगवण्यासाठी बियाणाच्या दर्जा शिवाय वातावरण, मातीचा दर्जा, किटकनाशकांचे प्रमाण, खत इत्यादि गोष्टी अवलंबून असतात. तक्रारकर्त्याने मृदा तपासणी अहवाल मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यांनी शेतात कपाशीची लागवड केल्याचा काहीही पुरावा मंचात दाखल केलेला नाही. तक्रारदारास 90 % उत्पादन झालेले आहे. पंचनामा लागवडीनंतर 21/2 महिन्यांनी केलेला आहे. त्यांनी दिलेल्या अर्जात पण 10% झाडे रोगग्रस्त असून त्यांची वाढ झालेली नाही असे नमूद केले आहे. पंचनाम्यात बियाण्याच्या दोषाबाबत काहीच सांगितलेले नाही. तक्रारदारांची मागणी अवास्तव आहे म्हणून तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या लेखी जबाबानुसार तक्रारदारांनी त्यांचेकडून दिनांक 05.06.2012 रोजी बियाणे घेतले. परंतू बियाणे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी उत्पादित केलेले होते. त्यांनी विक्रीसाठी पाठवलेले बियाणे सीलबंद अवस्थेत त्यांनी तक्रारदारांना विकले. गैरअर्जदार क्रमांक 3 बियाणांची केवळ विक्री करतात. त्यामुळे तक्रारदारांच्या नुकसान भरपाईसाठी गैरअर्जदार यांना जबाबदार धरता येणार नाही. पंचनाम्याच्या वेळी गैरअर्जदार क्रमांक 3 चे प्रतिनिधी उपस्थित नव्हते त्यामुळे त्यांना पंचनामा मान्य नाही. तक्रारदारांनी केवळ त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांना तक्रारीत गोवले आहे.
तक्रारदारांनी साक्षीदार म्हणून तत्कालीन तालुका कृषी अधिकारी श्री. डी.बी.व्यवहारे यांचा शपथेवर जबाब घेतला. त्यांचा गैरअर्जदार क्रमांक 3 यांचे वतीने उलटतपास घेण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 उलट तपासाच्या वेळी गैरहजर होते.
तक्रारदारांतर्फे अॅड.जी.बी.सोळंके आणि गैरअर्जदार यांचे तर्फे अॅड.बी.के.खांडेकर यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 अथवा त्यांचे वकील सुनावणीसाठी मंचा समोर हजर राहिले नाहीत. दाखल कागदपत्रे व दोनही पक्षाच्या युक्तीवादातून खालील गोष्टी स्पष्ट होतात.
तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 3 यांचेकडून गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी उत्पादित केलेले कपाशीचे बियाणे मल्लीका 207 II हे दिनांक 05.06.2012 रोजी रुपये 3,720/- ला खरेदी केले. ही गोष्ट खरेदी पावती (नि.3/4) वरुन स्पष्ट होते व ती उभयपक्षी मान्य आहे.
तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीच्या पंचनाम्या वरुन (नि.3/2) समितीचा निष्कर्ष म्हणून “13% झाडे कमी उंचीची व पानाच्या कडा लालसर दिसत आहेत व वाढ खुंटली आहे” असे नमूद केले आहे. त्याच पंचनाम्यात मुद्दा 12 (4) अंतर्गत वांझपणाची कारणे दिलेली आहेत. त्यात 1 क्रमांकावर सदोष बियाणे असा पर्याय असताना क्रमांक 7 ‘इतर’ या पर्यायावर खूण केलेली दिसते आहे. तक्रारदारांनी नि.3/1 वर कृषी अधिकारी यांना पत्र लिहीले आहे त्यात 10 % झाडे रोगग्रस्त आहेत असा उल्लेख केलेला आहे. साक्षीदार कृषी अधिकारी यांनी वरील बाबीचे साक्षीत बियाणे तपासणीसाठी उपलब्ध नव्हते म्हणून आम्ही तसा उल्लेख केला व ‘इतर’ या कारणात देखील सदोष बियाण्यांचा अंतर्भाव आहे असे स्पष्टीकरण दिले. परंतु त्यांचे स्पष्टीकरण मंचाला योग्य वाटत नाही.
तक्रारदारांनी तक्रारीत म्हटल्या प्रमाणे केवळ 13% झाडे कमी उंचीची व वाढ खुंटलेली होते. 1274 झाडापैकी केवळ 177 झाडे वाढ खुंटलेली होती. 1462 झाडांची वाढ चांगली झालेली दिसते यावरुनच विक्री केलेली बियाणे सदोष नव्हते असे दिसते.
तक्रारदार रुपये 5,00,000/- ऐवढी नुकसान भरपाईची रक्कम मागत आहेत. परंतू त्या पृठयर्थ त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही.
तक्रारदारांनी लिहीलेले पत्र व पंचनामा या कागदावरुन तक्रारदारांच्या शेतातील 13% झाडाची वाढ खुंटली याचे कारण सदोष बियाणे नसुन ती झाडे रोगग्रस्त झाली हे आहे ही बाब स्पष्ट होते. गैरअर्जदारांनी तक्रारदारांना विक्री केलेले बियाणे सदोष होते ती गोष्ट तक्रारदार पुराव्यानिशी सिध्द करु शकलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणे योग्य ठरेल असा निष्कर्ष मंच काढत आहे.
मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.