जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १३९/२०११
तक्रार दाखल दिनांक – २२/०७/२०११
तक्रार निकाली दिनांक – २३/०४/२०१४
श्रीमती पार्वताबाई रमेश पगारे (पाटील) ----- तक्रारदार
उ.व.५० वर्ष, धंदा- घरकाम
रा.कोकले,ता.साक्री,जि.धुळे
विरुध्द
(१)नेटसर्फ कम्युनिकेशन प्रा.लि. ----- सामनेवाले
ऑफिसनं.४,तारा आयकॉम,
वाकडेवाडी,पुणे ४११ ००३.
तालुका व जिल्हा पुणे.
(२)नॅशनल इन्शोरन्स कंपनी लि.
नोटीसीची बजावणी म.शाखाधिकारी,
नॅशनल इन्शोरन्स कंपनी लि.
धुळे महानगरपालीकेजवळ,धुळे.
ता.जि.धुळे यांचेवर व्हावी
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.डी.जोशी)
(सामनेवाले क्र.१ तर्फे – वकील श्री.पी.एस.खाणकरी)
(सामनेवाले क्र.२ तर्फे – वकील श्री.सी.पी.कुलकर्णी) निकालपत्र
तक्रारदार यांनी त्यांच्या मयत पतीची गृप इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम सामनेवाले यांच्याकडून मिळणेकामी, सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केली आहे.
(१) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांचे पती नांमे रमेश गोविंदराव पगारे(पाटील) हे दि.२५-०४-२००६ रोजी अपघातात मयत झाले. मयताने सामनेवाले क्र.१ यांच्याकडून जीपीए विमा पॉलिसी ही दि.१६-१२-२००५ रोजी घेतली होती. सामनेवाले क्र.१ ही कंपनी सामनेवाले क्र.२ यांच्याशी संलग्न आहे. त्यामुळे विमा पॉलिसीची रक्कम देण्याची संपूर्ण जबाबदारी सामनेवाले क्र.२ यांची आहे. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सदर क्लेमची रक्कम मिळणेकामी कागदपत्रे सामनेवाले क्र.१ यांच्याकडे सादर केली, त्यांनी ती सामनेवाले क्र.२ यांच्याकडे पाठविली. परंतु सामनेवाले क्र.२ यांनी,तक्रारदारांच्या मयत पतीचे पॉलिसीवर नांव रमेश गोविंदराव पाटील असे असल्यामुळे विमेदाराचे नांव त्यांच्याकडील कागदपत्रांशी जुळत नसल्यामुळे फाईल बंद केली असे दि.१९-०१-२००७ रोजीच्या पत्राने कळविले. त्यानंतर तक्रारदार यांनी पुन्हा सामनेवाले क्र.२ यांच्याकडे शपथपत्र करुन कागदपत्र पुन्हा सादर केले. परंतु सामनेवाले क्र.२ यांनी दि.२८-१०-२०१० च्या पत्राने सदर क्लेम नामंजूर केलेला आहे असे कळविले. त्यामुळे तक्रारदारांना सदरची तक्रार या मंचात दाखल करावी लागली आहे. सामनेवाले क्र.२ यांचे क्लेम नामंजूरीचे पत्र दि.२८-१०-२०१० रोजीचे आहे. तेव्हा तक्रार अर्ज दाखल करण्यास कारण घडले असल्यामुळे सदरचा तक्रार अर्ज मुदतीत दाखल केलेला आहे.
तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांनी वैयक्तिक व संयुक्तिक रित्या तक्रारदार यांना पॉलिसीची रक्कम रु.१,००,०००/- सन २००७ पासून व्याजासह अदा करावी. तसेच मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.१,००,०००/- व अर्जाचा खर्च सामनेवालेंकडून मिळावा.
तक्रारदार यांनी सदर तक्रार अर्जा सोबत नि.नं.३ वर शपथपत्र तसेच नि.नं. ५ वरील दस्तऐवज यादी सोबत एकूण चार कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. त्यात पर्सनल अॅक्सीडेंट डेथ नशुरन्स कार्डची प्रत व सामनेवालेंचा पत्रव्यवहार इ.चा समावेश आहे.
(२) सामनेवाले क्र.१ यांनी नि.नं.१७ वर त्यांची कैफियत दाखल केली आहे. त्यांनी सदरचा अर्ज नाकारला असून त्यांचे असे म्हणणे आहे की, सामनेवाले क्र.१ ही कंपनी कायद्याखाली स्थापन झालेली नोंदणीकृत संस्था आहे व ती इतर कंपन्यांच्या उत्पादनाची विक्री करण्याचे काम करते. सामनेवाले क्र.१ यांच्याकडे असलेल्या नोंदी प्रमाणे रमेश गोविंदराव पाटील हे त्यांच्याकडे ऑप्समेंट म्हणून कंपनीचे वितरक म्हणून काम पाहत होते. त्यांचे नांव कंपनीच्या दप्तरी रमेश गोविंदराव पगारे असे कधीही नव्हते. सामनेवाले क्र.१ यांनी त्यांच्या व्यवसायाचे धोरण म्हणून गृप पर्सनल अॅक्सीडेंट विमा पॉलिसी ही सामनेवाले क्र.२ यांच्याकडून घेतली होती. तक्रारदार यांनी त्यांच्या पतीच्या मृत्युनंतर मुदतीत सामनेवाले यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केलेली नव्हती. त्यानंतर तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे सामनेवाले क्र.२ यांनी दि.१९-०१-२००७ रोजीच्या पत्राने क्लेम नाकारला असे कळविले आहे. त्यानंतर पुन्हा फाईलचा पुनर्विचार करण्याची विनंती केली असता, दि.२१-१०-२०१० रोजीच्या पत्राने सदर अर्ज पुन्हा नाकारलेला आहे. मयत रमेश गोविंदराव पाटील यांचा वारस मुलगा म्हणून अनिल रमेश पगारे यांनी नुकसान भरपाई मिळण्याकामी अर्ज केला होता व प्रस्तुतचा अर्ज, अर्जदार हिने मयताची पत्नी म्हणून केला आहे. अशा प्रकारे अर्जदार व अनिल रमेश पगारे हे सामनेवालेंची दिशाभुल करीत आहेत. सबब तक्रारदारांची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाले यांची वैयक्तिक अथवा संयुक्तिक रित्या नाही. त्यामुळे सदरचा अर्ज रदद करण्याची मागणी सामनेवाले क्र.१ यांनी केली आहे.
सामनेवाले क्र.१ यांनी नि.नं.१८ सोबत शपथपत्र दाखल केले आहे.
(३) सामनेवाले क्र.२ यांनी नि.नं.१९ वर त्यांची लेखी कैफियत दाखल केली असून, सदरचा अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांच्या पतीचे अपघातात निधन झाले त्या बाबतचा त्यांचा क्लेम देय नाही हे तक्रारदार यांना दि.१९-०१-२००७ च्या पत्राने कळविलेले आहे. त्या निर्णया विरुध्द या कायद्यातील तरतुदी नुसार दि.१८-०१-२००९ रोजी पर्यंत सदर तक्रार दाखल करणे आवश्यक होते. त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्जास मुदतीची बाधा येत आहे. त्यानंतर सदर क्लेमचा पुनर्विचार तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे केला असून, दि.२८-०२-२०१० च्या पत्राने सदर क्लेमचा पुनर्विचार होऊ शकत नाही, असे तक्रारदार यांना कळविलेले आहे. तसेच तक्रारदार यांनी पुणे कार्यालयातून विमा उतरविला असून, या मंचास तक्रार दाखल करुन घेण्याचा अधिकार नाही. तसेच पॉलिसीतील अट क्र.८/४ प्रमाणे सदर क्लेम मुदतीत दाखल केलेला नाही. त्यामुळे क्लेम देय होत नाही. सबब सामनेवालेंच्या सेवेते त्रुटी नाही. म्हणून सदरची तक्रार रद्द करण्याची विनंती सामनेवाले क्र.२ यांनी केली आहे.
सामनेवाले क्र.२ यांनी त्यांच्या म्हणण्याचे पुष्टयर्थ नि.नं.२० वर प्रतिज्ञापत्र व नि.नं.२२ वर पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
(४) प्रकरणातील दाखल कागदपत्रे, तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यावर, मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दे |
निष्कर्ष |
(अ) तक्रारदार या सामनेवाले यांच्या ग्राहक आहेत काय ? |
: होय |
(ब) तक्रारदारांचा तक्रार अर्ज मुदतीत आहे काय ? |
: नाही |
(क) सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? |
: नाही |
(ड) आदेश काय ? |
:अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(५) मुद्दा क्र. ‘‘अ’’–तक्रारदारांचे पती हे सामनेवाले क्र.१ यांच्याकडे काम करीत होते. सामनेवाले क्र.१ यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडे, त्यांच्याकडील कर्मचा-यांकरिता गृप पर्सनल अॅक्सीडेंट इन्शुरन्स अपघात विमा पॉलिसी ही योजना रक्कम रु.१,००,०००/- ची, डिसेंबर २००५ ते डिसेंबर २००६ या कालावधी करिता घेतली असून, त्या बाबत असलेले इन्शुरन्स कार्ड तक्रारदारांनी नि.नं.५/३ वर दाखल केले आहे, ते सामनेवाले यांनी नाकारलेले नाही. याचा विचार होता विमेधारकाच्या पत्नी या नात्याने वारसदार म्हणून तक्रारदार या सामनेवालेंच्या “ग्राहक” आहेत हे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(६) मुद्दा क्र. ‘‘ब’’–तक्रारदार यांच्या पतीचे दि.२५-०४-२००६ रोजी अपघातात निधन झाले आहे. त्याबाबत तक्रारदार यांनी विमा क्लेमची रक्कम मिळण्याकामी सामनेवाले क्र.१ यांच्यातर्फे सामनेवाले क्र.२ यांच्याकडे विमा क्लेम व कागदपत्रे सादर केली. परंतु सामनेवाले क्र.२ यांनी मयत विमेधारकाचे नांव हे त्यांच्याकडील असलेल्या कागदपत्रांशी जुळत नसल्यामुळे फाईल बंद केली व तसे पत्र दि.१९-०१-२००७ रोजी तक्रारदार यांना कळविले आहे. सदरचे पत्र दोन्ही पक्षांनी दाखल केलेले नाही. परंतु तक्रारदार यांनी त्यांच्या प्रस्तुत तक्रारीमध्ये त्याबाबत नमूद करुन मान्य केले आहे.
(७) तक्रारदार यांनी सदरच्या क्लेम बाबत पुन्हा विचार करणेकामी सामनेवाले यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु सामनेवाले क्र.२ यांनी दि.२६-१०-२०१० च्या पत्राने सदर क्लेम नामंजूर केला असून, सदरचे पत्र नि.नं.५/५ वर दाखल आहे. या पत्राचे अवलोकन केले असता असे दिसते की, तक्रारदार यांचा क्लेम सामनेवाले यांनी दि.१९-०१-२००७ रोजीच्या पत्राने मयत विमेधारकाचे नांव त्यांचेकडील कागदपत्रांशी जुळत नसल्याने फाईल बंद केल्याचे कळविले आहे. त्याच प्रमाणे पॉलिसीतील अट क्र.८ प्रमाणे १२ महिन्याचे आत क्लेम सादर केलेला नाही. या कारणाने क्लेम देय होऊ शकत नाही, असे कळविलेले दिसत आहे. या पत्रा प्रमाणे तक्रारदार यांना दि.१९-०१-२००७ च्या पत्राने मयताचे नांव कागदपत्रांशी जुळत नाही, त्यामुळे क्लेम देय नाही असे कळविलेले आहे. याचा अर्थ तक्रारदार यांना दि.१९-०१-२००७ रोजीच्या पत्राने क्लेम नाकारल्याचे ज्ञान झाले आहे असे दिसते. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करण्यास कारण हे दि.१९-०१-२००७ रोजीच घडले आहे असे स्पष्ट होते.
त्यानंतर तक्रारदार यांनी पुन्हा सदर क्लेमचा पुनर्विचार करण्याकामी सामनेवाले यांना कळविले आहे. त्यावेळी विमा कंपनी यांनी सदर क्लेमचा पुन्हा विचार न करता, पुर्वी दि.१९-०१-२००७ रोजीच्या पत्राने क्लेम देय नाही हे पुन्हा नव्याने कळविलेले आहे. तसेच क्लेम हा अटी प्रमाणे मुदतीत दाखल केला नाही, असे कळविलेले आहे. या पत्रा प्रमाणे सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदार यांच्या क्लेमचा पुन्हा विचार केलेला नसून, पुर्वी दिलेल्या पत्राने जे कळविले आहे तेच केवळ दि.२८-१०-२०१० च्या पत्राने पुन्हा सांगितले आहे. त्यामुळे तक्रारीचे कारण हे सामनेवालेंच्या दि.१९-०१-२००७ रोजीच्या पत्राने घडले असून ते बदलत नाही. तक्रारदार या सामनेवालेंच्या दि.२८-१०-२०१० च्या पत्राचा आधार घेत आहेत. परंतु या पत्रात सामनेवालेंनी केवळ पुर्वीचाच क्लेम नाकारला आहे असे नव्याने नमूद करुन कळविले आहे. त्यामुळे या पत्राने नव्याने दाव्यास कारण निर्माण होत नाही. म्हणून तक्रारदार या पत्राचा आधार घेऊ शकत नाहीत, असे आमचे मत आहे.
याचा विचार होता सदर तक्रारीस कारण हे दि.१९-०१-२००७ रोजी घडलेले असून या दिनांकापासून दोन वर्षाचे आत सदर तक्रार दाखल करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदार यांनी दि.२२-०७-२०११ रोजी सदर तक्रार या मंचात दाखल केलेली आहे. याचा विचार होता, सदर तक्रार मुदतीच्या बाहेर असून तक्रारीस मुदतीची बाधा येत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘क’’–सामनेवाले क्र.१ यांनी त्यांच्या जबाबात असे नमूद केले आहे की, श्री.रमेश गोविंदराव पाटील हे त्यांच्या कंपनीत काम करीत होते. त्यांचे नांव कंपनीच्या दप्तरी रमेश गोविंदराव पगारे असे कधीही नव्हते. याचा विचार होता मयत विमेधारकाचे नांव “रमेश गोविंदराव पाटील” असे कंपनीत कामाचे ठिकाणी होते. त्यामुळे ही दोन्ही नांवे एकच आहेत हे स्पष्ट होत नसून त्या बाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा सामनेवाले क्र.१ यांच्या दप्तरी नाही, असे दिसते.
तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ विमा कंपनीकडे मयत विमेधारकाचे नांव हे वेगवेगळे असले तरी सदर व्यक्ती एकच आहे या बाबतचे प्रतिज्ञापत्र दिलेले नाही. प्रस्तुत प्रकरणात सादर केलेले प्रतिज्ञापत्र हे अनिल रमेश पगारे यांनी सादर केल्याचे दाखल छायांकीत प्रतीवरुन दिसत आहे. त्याच बरोबर मयत विमेधारकाचे नांव एकच असल्याबाबतचा इतर कोणताही पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. त्यामुळे मयत विमेधारक रमेश गोविंदराव पगारे व रमेश गोविंदराव पाटील या नावाची व्यक्ती एकच आहे हे तक्रारदारांनी मंचात पुरावा देऊन सिध्द केलेले नाही. याचा विचार होता, सामनेवाले यांनी तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी केली आहे असे सिध्द होत नाही. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘ड’’–वरील सर्व कारणांचा विचार करता, तक्रारदारांची तक्रार मुदती बाहेर असून तक्रारदारांची विनंती योग्य व रास्त नाही असे आमचे मत आहे. या सर्व विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः २३-०४-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.