जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 49/2011 तक्रार दाखल तारीख –09/03/2011
राजाराम ऊर्फ राजाभाऊ चंद्रकांत बारवकर
वय 28 वर्षे धंदा व्यापार व शती .तक्रारदार
रा.मु.पो.पाथरुड ता.भुम जि.उस्मानाबाद
विरुध्द
1. एनपीआर फायनान्स लि.
अ’17,सुर्यप्रकाश अपार्टमेंट,मार्केट यार्ड रोड,
पूणे -411 037 सामनेवाला
2. श्री.वैद्यनाथ अँटो एजन्सी
पिगो,मोटार प्रायव्हेट लिमिटेड चे अधिकृत
विक्रेते,परळी रोड, बीड ता.जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.पी.एन.मस्कर
सामनेवाला तर्फे ः- कोणीही हजर नाही.
सामनेवाला क्र.2 तर्फे ः-‘अँड.एल.एम.काकडे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार मु.पो.पाथरुड ता.भूम जि.उस्मानाबाद येथील रहीवासी आहे. त्यांचा स्वतःचा शेवचिवडा विकण्याचा धंदा आहे. त्यासाठी दि.6.9.2006 रोजी श्री.वैद्यनाथ अँटो एजन्सी परळी,बीड यांचे शोरुम मधून पिंगो मोटार प्रायव्हेट लि.कंपनीचा तिन चाकही डिझेलवर चालणारा ज्यांचा नंबर एम.एच.23-4796 एक अँटो खरेदी केला. खंरेदी करीत असताना त्यांचे रु.1,17,400/- किंमत असल्याने रु.33,000/- व इतर खर्च रु.60,000/- रोख भरुन वैद्यनाथ अँटो एजन्सीमध्ये भरले. राहिलेली रक्कम रु.84,000/- वैद्यनाथ अँटो एजन्सीच्या सांगण्यावरुन त्यांच्याच शोरुम मध्ये असलेल्या एनपीआर फायनान्स लि. पूणे यांच्या एजंट मार्फत एनपीआर फायनान्स लि. पूणे यांच्याकडून कर्ज म्हणून घेततली. सदरील रक्कम ठरल्यानंतर 24 हप्त्यामध्ये भरण्याचे ठरवून प्रत्येक हप्ता हा रु.4400/- चा राहील असे 24 हपते एनपीआर फायनान्स ने सांगितल्याप्रमाणे श्री. वैद्यनाथ अँटो एजन्सी मध्ये भरण्याचे ठरले होते. सर्व हप्ते भरल्यानंतर रिक्षाचे आरसी बूक एनपीआर फायनान्सकडून येण्याचे ठरले होते. 24 हप्ते नियमित वैद्यनाथ अँटो एजन्सीमध्ये भरले. त्यांची पोहच पावत्या तक्रारदारांना त्यांनी दिलेल्या आहेत.एवढेच नाही तर तक्रारदारांनी काही हप्ते डि.डि. मार्फत एनपीआर फायनान्सचे नांवाने भरले आहेत. त्यांच्या पावत्याही तक्रारदाराकडे आहेत. 24 हप्ते भरल्यानंतर तक्रारदारांनी आरसी बूकाची मागणी केली. ब-याच वेळेला एनपीआर फायनान्स व वैद्यनाथ अँटो एजन्सीमध्ये जमा कर्ज प्रकरणाची माहीती व आरसी बूकाची मागणी केली परंतु एनपीआर यांनी व वैद्यनाथ यांनी तक्रारदारांना समाधानकारक माहीती दिली नाही. एनपीआर फायनान्स व वैद्यनाथ अँटो एजन्सी यांनी संगनमताने तक्रारदारांना फसवण्याचा गून्हा केलेला आहे. योग्य ती सेवा देण्यास हेतूपुरस्कर टाळाटाळ केली आहे. आरसी बूक देण्यास वेळ लावून व व्याजाची रक्कम वाढवण्याचा दृष्ट हेतूने तक्रारदारास त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे. अशा प्रकारे सामनेवाला यांनी सेवेत कसूर केलेला आहे. अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे. दि.19.01.2011 रोजी वकीलामार्फत नोटीस सामनेवाला यांना दिलेली आहे. त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
विनंती की, सामनेवाला क्र.2 यांनी लावलेली आजपर्यतची अवाजवी व्याज व थकबाकी भरणे ही तक्रारदाराची जबाबदारी नसून सामनेवाला क्र.2 ची आहे असे आदेश करावेत. नियमीत 24 हप्ते भरुन कर्जाची परतफेड केलेली असल्याने एनपीआर फायनान्सला आरसी बूक देण्या बाब आदेश व्हावेत.सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक व संयूक्तीकरित्या जबाबदार धरुन आरसी बूक देण्यास टाळाटाळ करुन तक्रारदाराचा केलेला हक्काचा भंग व तक्रारदारास पुणे, बीड व परळी येथे सतत जाऊन चौकशी व आरसी बूक मागणी करावयास लागलेला वेळ, खर्च, मानसिक , व्यापारी व आर्थिक नूकसान म्हणून रु.2,00,000/- नूकसान भरपाई देण्याचा आदेश करावा.
सामनेवाला क्र.1 व 2 यांना जाहीर नोटीस काढण्यात आली. सामनेवाला हजर नाही.त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश दि.3.9.2011 रोजी झाला.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.मस्कर यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे सामनेवाला क्र.2 यांचेमार्फत कर्ज घेतले आहे. सदर कर्जाची परतफेड 24 हप्ते करायचे ठरले होते. त्याचप्रमाणे हप्ता भरले आहेत. तथापि, सामनेवाला तक्रारदारांना आरसी बूक देत नाहीत अशी प्रामुख्याने तक्रारदाराची तक्रार आहे. परंतु या संदर्भात तक्रारदाराने तक्रारीत दाखल केलेले कागदपत्र पाहता इन्व्हाईस आणि पैसे भरल्याचे पावत्या या दोन बाबी बाबतचे पत्र आहेत. परंतु सामनेवाला क्र.1 ने कर्ज मंजुरी केल्याचे पत्र नाही. सदर कर्ज मंजूर केल्या बाबत सामनेवाला क्र.1 ने पत्रच दिलेले नाही असे तक्रारदाराचे म्हणणे नाही. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कडून किती रक्कमेचे कर्ज घेतले या संदर्भात त्यांचे म्हणण्याचे पुष्टयर्थ सामनेवाला क्र.1 चे पत्र हे तक्रारदारांना पुरक ठरले असते परंतु त्याबाबतची कोणतेही पत्र नाही व तसेच परतफेडी बाबतचा करार किंवा परिशिष्ट नाही. त्यामुळे जरी सामनेवाला यांचे सदर तक्रारीस कोणतेही आव्हान नाही अशा परिस्थितीत तक्रारीची तजविज करण्याची जबाबदारी तक्रारदाराचीच आहे. सदरची तक्रार शाबीत करण्यासाठी वरील कागदपत्र नसल्याकारणाने तक्रारदाराची तक्रार मंजूर करणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार निकाली काढण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड