श्री.नरेश बनसोड, मा. सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 30/09/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून, तक्राकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्याने दि.26.11.2009 रोजी गैरअर्जदार क्र. 2 कडून नोकिया ए-82 हा मोबाईल रु.15,000/- देऊन बिल क्र. 14879 अन्वये खरेदी केला. सदर मोबाईल 10 महिने व्यवस्थीत चालला, मात्र पुढे त्यात दोष निर्माण झाला. ही बाब त्यांनी गैरअर्जदार क्र. 2 च्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 कडे दुरुस्तीकरीता जाण्यास सांगितले, कारण सदर मोबाईल हा वारंटी कालावधीत होता. गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे सदर मोबाईल दुरुस्तीकरीता नेला असता त्यांनी टाळाटाळ केली व परत परत त्यांचेकडे दुरुस्तीकरीता गेले असता हाच प्रकार घडला. शेवटी गैरअर्जदार क्र. 1 यांनी 24.11.2010 ला ई.एल.एस. रीपोर्ट कळविण्यास सांगितले व नमूद केले की, वारंटी कालावधी हा जून 2010 मध्ये संपला. तक्रारकर्त्याचे मते यूजर गाईडप्रमाणे संच खरेदी केल्याचे तारखेपासून म्हणजेच दि.26.11.2009 पासून तो वारंटी कालावधीत येतो. म्हणून तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना कायदेशीर नोटीस दिला, परंतू त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. मंचासमोर सदर वाद दाखल करुन, गैरअर्जदाराकडून मागणी केली आहे की, नुकसान भरपाई रु.15,000/- मिळावी, कार्यवाहीचा खर्च व मानसिक त्रासाची भरपाई मिळावी अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. मंचासमोर तक्रार दाखल झाल्यानंतर, मंचाने गैरअर्जदारांवर नोटीस बजावली असता, दोन्ही गैरअर्जदारांना नोटीस मिळूनही ते मंचासमोर हजर झाले नाही किंवा तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता मंचासमोर आले असता मंचाने तक्रारकर्त्यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार गैरहजर. मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज व शपथपत्रांचे सुक्ष्म वाचन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आहे.
-निष्कर्ष-
4. दस्तऐवज क्र. 5 चे अवलोकनावरुन हे स्पष्ट होते की, वारंटीचा कालावधी हा खरेदीदाराची खरेदी तारखेच्या पुढे एक वर्षाची आहे. त्यामुळे सदर वारंटी ही 26.11.2009 ते 25.11.2010 पर्यंत होती, हा वारंटी कालावधी आहे हे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने दाखल दस्तऐवजावरुन व तक्रारकर्त्याने दाखल शपथपत्रावरुन तक्रार पूर्णतः सिध्द केलेली आहे व गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांनी पाठविलेल्या कायदेशीर नोटीसमधील कथन, तसेच मंचासमोर दाखल तक्रारीतील म्हणणे गैरअर्जदारांनी खोडून न काढल्याने ते त्यांना मान्य आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या सेवेतील त्रुटी सिध्द केलेली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे, म्हणून गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या सेवेत गंभीर स्वरुपाची त्रुटी असून गैरअर्जदार क्र. 1 व 2 तक्रारकर्त्याचा मोबाईल नोकिया एन-82 जो सदोष आहे तो बदलवून देण्यास बाध्य आहे अन्यथा मोबाईलची किंमत रु.15,000/- तक्रारकर्त्यास परत करावी. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक त्रासाची भरपाई म्हणून रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.2,000/- गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला देणे संयुक्तीक राहील असे मंचाचे स्पष्ट मत आहे व गैरअर्जदार त्यास बाध्य आहे. करीता खालील आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास नोकिया एन-82 हा सदोष मोबाईल परत घेऊन नविन बदलवून द्यावा अन्यथा मोबाईल संचाची किंमत रु.15,000/- तक्रारकर्त्यास परत करावे.
3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला, मानसिक त्रासाची भरपाई म्हणून रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.2,000/- द्यावे.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे करावी.