-ःनिकालपत्रः द्वारा- मा.सदस्या,सौ.ज्योती अभय मांधळे, 1. तक्रारदारानी दि.17-12-2010 रोजी सामनेवालेंकडून त्यांचा नोकिया एक्स-2 मोबाईल जो सतत हँग होत असल्यामुळे बॅटरी चार्जिंगला खूप वेळ लागत असल्यामुळे तपासणीसाठी जमा केला. सामनेवालेनी सदर मोबाईल हेड ऑफिस,दिल्लीला पाठवाला लागेल असे सांगितले व त्यासाठी 10-15 दिवस लागतील असे सांगितले, त्याप्रमाणे सामनेवालेंनी त्यांचा मोबाईल जमा करुन घेतला. दि.24-12-10 रोजी सामनेवालेनी तक्रारदारास फोनवरुन असे कळवले की, त्यांचा मोबाईल दुरुस्त झाला असल्यामुळे येऊन घेऊन जावा. त्याप्रमाणे दि.25-12-10 रोजी तक्रारदार त्यांचा मोबाईल घेण्यासाठी सामनेवालेकडे गेले त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की, त्यांना जुनी व खराब बॉडी असलेला मोबाईल दिला आहे. तक्रारदारानी सदर मोबाईलची पहाणी केली असता त्यांच्या लक्षात आले की, सदरचा मोबाईल जुना आहे व त्यावरील स्क्रीन गार्डही लावलेले नाही. कारण त्यांचा मोबाईल नवीन होता व त्यावर स्क्रीन गार्डही लावलेले होते त्यामुळे तक्रारदारानी सामनेवालेकडून तो देत असलेला मोबाईल घेण्यास नकार दिला व निघून आले. त्यानंतर दि.6-1-11 रोजी तक्रारदार सामनेवालेकडे त्यांचा मोबाईल घेण्यास गेले असता सामनेवालेनी पुन्हा त्यांना वेगळी बॉडी असलेला मोबाईल दाखवला. तक्रारदारानी सामनेवालेंस सांगितले की, हा ही त्यांचा मोबाईल नाही. त्यावेळी सामनेवालेनी पुन्हा 5 मिनीटानी वेगळा मोबाईल दाखवला. त्यालाही जुनी बॉडी होती व स्क्रीनगार्ड नव्हते. त्यामुळे तक्रारदारांनी तो मोबाईल घेण्यास नकार दिला. तक्रारदारांची विनंती की, त्यांना त्यांचा मूळ दोषरहित मोबाईल किंवा नवीन मोबाईल नुकसानभरपाईसह सामनेवालेनी दयावा असे आदेश मंचाने पारित करावेत. तक्रारदारानी आपल्या तक्रारअर्जामध्ये त्यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रु.5,000/- मागितली आहे व तक्रारखर्च रु.1,000/- मागितला आहे. 2. तक्रारदारानी आपल्या तक्रारीसोबत नि.2 अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, नि.3 अन्वये कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात सर्व्हीस जॉबशीट, मोबाईल खरेदीचे बील दाखल केले आहे. सदरच्या बिलावरुन तक्रारदारानी दि.29-9-10 रोजी रु.5,800/- ला नोकिया एक्स-2 खरेदी केल्याचे दिसते. नि.5 अन्वये मंचाने सामनेवालेना नोटीस पाठवून जबा दाखल करण्यासाठी निर्देशित केले. नि.6 अन्वये त्याची पोच अभिलेखात दाखल आहे. दि.6-4-11 रोजी सामनेवालेना नोटीस मिळूनही व योग्य संधी देऊनही त्यानी आपले म्हणणे दाखल केलेले नाही व ते हजरही झाले नाहीत म्हणून त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशी आदेश पारित करणेत आला. दि.4-6-11 रोजी तक्रारदार गैरहजर होते. सदरचे प्रकरण एकतर्फा चौकशीसाठी नेमण्यात आले. 3. तक्रारदारानी दाखल केलेला तक्रारअर्ज, प्रतिज्ञापत्र, कागदपत्रे या सर्वाचा विचार करुन मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला- मुद्दा क्र.1- सामनेवालेनी तक्रारदाराना दोषपूर्ण सेवा दिली आहे काय? उत्तर - होय. मुद्दा क्र.2- तक्रारदार सामनेवालेकडून मूळ दोषरहित मोबाईल घेण्यास पात्र आहेत काय? उत्तर - होय. मुद्दा क्र.3- तक्रारदार सामनेवालेकडून मानसिक त्रासापोटी, न्यायिक त्रासापोटी तसेच तक्रार खर्च मिळणेस पात्र आहेत काय? उत्तर - होय. विवेचन मुद्दा क्र.1- 4. तक्रारदारानी सामनेवालेकडून त्यांचा नोकिया एक्स-2 मोबाईल दि.17-12-10 रोजी दुरुस्तीसाठी दिला होता. सदरचा मोबाईल सतत हँग होत होता व बॅटरी चार्जिंगलाही खूप वेळ लागत होता. हे तपासण्यासाठी त्यानी सामनेवालेकडे सदरचा मोबाईल दुरुस्तीसाठी नेला. सामनेवालेनी त्यांचा मोबाईल दुरुस्तीसाठी हेड ऑफिसला पाठवावा लागेल व त्यासाठी त्यांनी तक्रारदाराना 10-15 दिवसानी बोलावले. दि.24-12-10 रोजी सामनेवालेनी तक्रारदाराना त्यांचा मोबाईल दुरुस्त झाल्याचे फोनवरुन सांगितले व तो नेण्यास कळवले. त्याप्रमाणे तक्रारदार दि.25-12-10 रोजी त्यांचा मोबाईल घेण्यास गेले असता त्यांच्या लक्षात आले की, त्यांना देण्यात आलेला मोबाईल जुना आहे तसेच त्याची बॉडीही खराब आहे. तसेच त्यावर त्यानी मोबाईलला लावलेले स्क्रीनगार्डही नाही त्यामुळे त्यांनी सामनेवालेकडून तो दाखवत असलेला मोबाईल घेण्यास नकार दिला. नंतर पुन्हा 6-1-11 रोजी तक्रारदार सामनेवालेकडे त्यांचा मोबाईल घेण्यास गेले असता सामनेवालेनी त्यांना पुन्हा वेगळी बॉडी असलेला मोबाईल दाखवला. तो त्यांनी नाकारल्यावर सामनेवालेनी त्याना पुन्हा 5 मिनीटानी दुसरा मोबाईल दाखवला पण त्याची बॉडी जुनी होती व स्क्रीन गार्ड लावले नव्हते त्यामुळे तक्रारदारानी तो पण घेण्यास नकार दिला. मंचाचे मते मंचाने सामनेवालेस सदर तक्रारीबाबत नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करण्याचे निर्देश नि.5 चे नोटीसीप्रमाणे दिले होते. नोटीस मिळूनही सामनेवाले मंचाकडे हजर झाले नाहीत व त्यांनी लेखी जबाब दाखल केला नाही म्हणून त्यांचेविरुध्द 6-4-11 रोजी एकतर्फा चौकशी आदेश पारित करणेत आला होता. तसेच सामनेवालेनी तक्रारदाराना त्यांनी त्यांच्याकडे जमा केलेला मूळ मोबाईल दिला नसल्याने ती ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतुदीनुसार दोषपूर्ण सेवा ठरते. विवेचन मुद्दा क्र.2 व 3- 5. तक्रारदारानी सामनेवालेकडे दि.17-12-10 रोजी त्यांचा नोकिया एक्स-2 मोबाईल दुरुस्तीसाठी दिला पण सामनेवालेनी तक्रारदारांचा मोबाईल दुरुस्त झाल्यानंतर मूळ मोबाईल न देता दुसरा मोबाईल देत होते. त्यामुळे तक्रारदार सामनेवालेकडून त्यांनी सामनेवालेकडे जमा केलेला त्यांचा मूळ दोषरहित मोबाईल सामनेवालेकडून मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सामनेवालेनी तक्रारदाराना योग्य ती सेवा दिली नसल्यामुळे तसेच त्यांचा मूळ दोषरहित मोबाईल परत न देता दुसरा मोबाईल जुन्या व खराब बॉडीसह देत असल्यामुळे साहजिकच तक्रारदाराना मानसिक त्रास होत होता व अदयापपर्यंत त्यांना त्यांचा दोषरहित मूळ मोबाईल सामनेवालेकडून मिळालेला नाही. त्यामुळे मंचाचे मते सामनेवालेकडून तक्रारदार त्यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहेत, तसेच तक्रारदारानी सामनेवालेकडे त्यांचा स्वतःचा मोबाईल घेण्यासाठी अनेक फे-या माराव्या लागल्या परंतु सामनेवालेनी त्यांना काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे तक्रार दाखल करणे भाग पडले त्यामुळे ते सामनेवालेकडून रु.1,000/- न्यायिक खर्च मिळण्यास पात्र आहेत. 6. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे- -ः आदेश ः- 1. तक्रार क्र.10/11 एकतर्फा मंजूर करण्यात येत आहे. 2. सामनेवालेनी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत खालील आदेशाचे पालन करावे- अ) सामनेवालनी तक्रारदारास मूळ दोषरहित मोबाईल परत करावा. आ) सामनेवालेनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.5000/- व न्यायिक खर्चापोटी रु.1,000/- असे एकूण रु.6,000/- तक्रारदाराना दयावेत. इ) उपरोक्त आदेशाचे पालन सामनेवालनी विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार उपरोक्त संपूर्ण रक्कम सामनेवालेकडून आदेश पारित तारखेपासून ते रक्कम मिळेपर्यंत 18 टक्के व्याजाने वसूल करणेस पात्र रहातील. 3. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना पाठवण्यात याव्यात. ठिकाण –कोकणभवन, नवी मुंबई. दि. 6-6-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |