मा. सदस्य, श्री कैलास वानखडे यांनी निकाल कथन केला :-
ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ते हे व्यवसायाने वकील असून त्यांनी नोकिया मोबाईल मॉडेल लुमिया 520 सीआन हा मोबाईल विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचेकडून स्नॅपडिल कंपनीद्वारे ऑनलाईन ₹ 8,530/- रुपयामध्ये दिनांक 28-10-2013 रोजी खरेदी केला होता. त्याचा आयएमईआय क्रमांक 359205050574534 असा असून सदरचा मोबाईल तक्रारकर्त्याला अकोला येथे स्नॅपडिल या कंपनीद्वारे घरपोच दिला होता.
तक्रारकर्त्याला मोबाईल घेतल्याच्या 6 महिन्यानंतर मोबाईलमध्ये Hanging Problem सुरु झाला. 3 महिन्यांनी मोबाईलची बॅटरी गरम होऊ लागली, बॅटरी बॅकअप सुध्दा खराब झाले होते आणि व्हॉल्युम की मध्ये सुध्दा खराबी आली होती. या व्यतिरिक्त मोबाईलमध्ये विविध प्रकारचे प्रॉब्लेम सुरु झाले. तक्रारकर्त्याने सदरचा मोबाईल जुलै 2014 पासून वापरणे बंद केले.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने विरुध्दपक्ष क्रमांक 3 ला बुलढाणा येथे नोकिया मोबाईलच्या दुरुस्ती व सेवेसाठी अधिकृत सर्व्हिस मधून नियुक्त केले आहे. अकोला येथे नोकिया मोबाईलचे अधिकृत सर्व्हिस सेंटर नसल्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 3 ने सप्टेंबर 2014 पासून आपल्या प्रतिनिधी मार्फत अकोला येथून दर सोमवारी व गुरुवारी अकोला येथील नोकिया मोबाईल विक्रेत्याकडून नादुरुस्त मोबाईल दुरुस्तीसाठी घेणे सुरु केले आणि विरुध्दपक्ष क्रमांक 3 ने अकोला येथे सदरचा मोबाईलचे दुरुस्तीचे जॉबशिट अकोला येथे देणे सुरु केले.
सदर मोबाईलमध्ये 6 ते 7 महिन्यानंतर Hanging Problem सुरु झाला. परंतु, विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे अधिकृत सर्व्हिस सेंटर, अकोला मधील बंद झाल्यामुळे तक्रारकर्त्याला सदर मोबाईल दुरुस्तीसाठी जवळच्या जिल्हयात जाण्यास सांगितले. परंतु, तक्रारकर्ते हे व्यवसायाने वकील असल्यामुळे ते जवळच्या जिल्हयात बुलढाण्यात जावू शकत नव्हते. विरुध्दपक्ष क्रमांक 3 ने सप्टेंबर 2014 पासून आपल्या प्रतिनिधीमार्फत दर सोमवारी व गुरुवारी अकोला येथील नोकिया मोबाईल विक्रेत्यांकडून नादुरुस्त मोबाईल दुरुस्तीसाठी घेणे सुरु केले आणि विरुध्दपक्ष क्रमांक 3 ने अकोला येथे सदरचे मोबाईल दुरुस्तीचे जॉबशिट अकोला येथे देणे सुरु केले हे विरुध्दपक्षाने कबूल केलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 15-09-2014 रोजी विरुध्दपक्षाकडे सदर मोबाईल दुरुस्तीसाठी टाकला, हे दस्त क्रमांक 12 वरुन दिसून येते. त्यानंतर सुध्दा तक्रारकर्त्याचा मोबाईल व्यवस्थित दुरुस्त न झाल्याने तक्रारकर्त्याने दिनांक 22-09-2014, 16-10-2014, दिनांक 26-11-2014 रोजी विरुध्दपक्षाकडे मोबाईल दुरुस्तीसाठी टाकलेला आहे हे दाखल केलेल्या दस्तांवरुन दिसून येते.
तक्रारकर्त्याची प्रार्थना की, विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याला त्याचा मोबाईल बदलून दयावा व सोबत तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक त्रासापोटी ₹ 10,000/- आणि आर्थिक नुकसान भरपाईपोटी ₹ 20,000/- तसेच प्रकरणाचे खर्चापोटी ₹ 5,000/- देण्यात यावे किंवा विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याला ₹ 8,530/- जे त्यांनी मोबाईल खरेदी करतांना विरुध्दपक्ष यांना दिले होते ते परत करावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 12 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 3 यांचा संयुक्त लेखी जवाब :-
विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 3 यांनी प्रस्तुत प्रकरणात संयुक्त लेखी जबाब दाखल केला असून, त्यानुसार त्यांनी तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करीत असे नमूद केले की, सदरच्या कारणास्तवही तक्रार ही विदयमान न्यायमंचात प्रतिपालनीय नसून Non Joinder of necessary Parties या तत्वानुसार सदर तक्रार ही खारीज होणे क्रमप्राप्त आहे.
विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांनी सदर मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारे बिघाड नसतांनाही तक्रारकर्ते यांच्या मागणीनुसार सदर मोबाईलची चांगल्याप्रकारे दुरुस्ती व सर्व्हिसिंग करुन सदर मोबाईल हा परत युक्ती सेल्युलर नोकिया मोबाईल यांच्याकडे पाठविला. परंतु, तदनंतरही तक्रारकर्त्याने सदर मोबाईल नादुरुस्त असल्याबाबत विविध कारणे दाखवून, सदर मोबाईल दोन वेळा युक्ती सेल्युलर नोकिया मोबाईल यांचेमार्फत विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांच्याकडे दुरुस्तीकरिता पाठविला. तेव्हाही विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांनी सदर मोबाईलची तक्रारकर्त्याच्या मागणीनुसार मोबाईल चांगल्या स्थितीत असतांनाही सर्व्हिसिंग करुन सदर मोबाईल हा युक्ती सेल्युलर नोकिया मोबाईल यांच्यामार्फत तक्रारकर्त्याला दिला व असे कळविले की, सदर मोबाईल हा स्मार्ट फोन असल्यामुळे तो व्यवस्थितपणे हाताळल्यास तो वापरण्यास कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही, तसेच प्रत्येक स्मार्ट फोनची बॅटरी ही खूप काळ टिकत नाही, असेही सांगितले. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेला तक्रार अर्ज हाच मुळी विदयमान न्यायमंचात प्रतिपालनीय नसून तक्रारकर्ता यांनी वस्तुस्थिती लपवून व विदयमान न्यायालयाची दिशाभूल करुन खोटया विधानांच्या आधारे आपल्याच चुकांचा गैरफायदा घेण्याचे हेतुने प्रकरण दाखल केलेले असून, वरील सर्व कारणास्तव तक्रारकर्ता यांचा सदर तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचा लेखी जवाब :-
विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी प्रस्तुत प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे. त्यानुसार त्यांनी तक्रारदाराच्या तक्रारीतील बहूतांश विधाने अमान्य करुन अधिकचे कथनात असे नमूद केले की, विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांना नोटीस प्राप्त झाली. परंतु, सदर नोटीस ही मराठी भाषेमध्ये असल्यामुळे नोटीसमध्ये नमूद केलेली माहिती विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांना समजली नाही. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रार क्रमांक 137/2015 ची प्रत किंवा खरेदी बिल किंवा ईतर दस्तऐवज सुध्दा विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांना प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 2 प्राधान्याने लेखी जवाब सादर करु शकले नाही. येथे पुढे नमूद करावेसे वाटते की, विरुध्दपक्ष क्रमांक 2 हे फक्त डिलर म्हणून या तक्रारीत सामील आहेत आणि वस्तुमधील किंवा मालामधील कोणत्याही दोषाबद्दल किंवा उत्पादनातील दोषाबद्दल विरुध्दपक्ष क्रमांक 2 हे जबाबदार नाहीत कारण सदर वस्तू ही विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून उत्पादित केलेली नाही. सबब, विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांची न्यायमंचास विनंती आहे की, आदरणीय न्यायमंचाने विरुध्दपक्ष क्रमांक 2 चे विरुध्द असलेली तक्रार ही खारीज करावी.
:: का र णे व नि ष्क र्ष ::
सदर प्रकरणात तक्रारकर्त्याची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 3 यांचा संयुक्त लेखी जवाब, विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचा वैयक्तिक लेखी जवाब, तक्रारकर्त्याचे प्रतिउत्तर व तोंडी युक्तीवाद, सदर प्रकरणात विरुध्दपक्षातर्फे कोणीही युक्तीवाद केला नाही. त्यामुळे त्यांनी सादर केलेले लेखीजवाबावरुन अंतिम आदेश पारित केला.
तक्रारकर्त्याचे म्हणणे असे की, तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांच्यात जो व्यवहार झालेला आहे तो अकोला जिल्हयात झालेला आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे हे सिध्द् होते.
सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने दिनांक 28-10-2015 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांच्याकडून स्नॅपडिल कंपनीकडून ऑनलाईन मोबाईल खरेदी केला. सदर मोबाईल तक्रारकर्त्याने ₹ 8,530/- ला खरेदी केला. त्याचा आयएमईआय क्रमांक 359205050574534 असा आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्त क्रमांक 11 या दस्तावरुन ग्राहक असल्याचे सिध्द् होते व सदर तक्रारीचे कारण अकोला येथे घडलेले असल्यामुळे सदर प्रकरण मंचाला चालविण्याचा अधिकार आहे.
सदर मोबाईलमध्ये 6 ते 7 महिन्यानंतर Hanging Problem सुरु झाला. परंतु, विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे अधिकृत सर्व्हिस सेंटर, अकोला मधील बंद झाल्यामुळे तक्रारकर्त्याला सदर मोबाईल दुरुस्तीसाठी जवळच्या जिल्हयात जाण्यास सांगितले. परंतु, तक्रारकर्ते हे व्यवसायाने वकील असल्यामुळे ते जवळच्या जिल्हयात बुलढाण्यात जावू शकत नव्हते. विरुध्दपक्ष क्रमांक 3 ने सप्टेंबर 2014 पासून आपल्या प्रतिनिधीमार्फत दर सोमवारी व गुरुवारी अकोला येथील नोकिया मोबाईल विक्रेत्यांकडून नादुरुस्त मोबाईल दुरुस्तीसाठी घेणे सुरु केले आणि विरुध्दपक्ष क्रमांक 3 ने अकोला येथे सदरचे मोबाईल दुरुस्तीचे जॉबशिट अकोला येथे देणे सुरु केले हे विरुध्दपक्षाने कबूल केलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 15-09-2014 रोजी विरुध्दपक्षाकडे सदर मोबाईल दुरुस्तीसाठी टाकला, हे दस्त क्रमांक 12 वरुन दिसून येते. त्यानंतर सुध्दा तक्रारकर्त्याचा मोबाईल व्यवस्थित दुरुस्त न झाल्याने तक्रारकर्त्याने दिनांक 22-09-2014, 16-10-2014, दिनांक 26-11-2014 रोजी विरुध्दपक्षाकडे मोबाईल दुरुस्तीसाठी टाकलेला आहे हे दाखल केलेल्या दस्तांवरुन दिसून येते. सदर मोबाईल दुरुस्त होत नसल्याने तक्रारकर्त्याने दिनांक 24-12-2014 ला विरुध्दपक्षाला नोटीस पाठविली होती आणि विरुध्दपक्षाने ती कबूल केलेली आहे.
विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी तसेच अनुचित प्रथेचा अवलंब कलेला नसतांना तक्रारकर्त्याने गैरकायदेशीर विधानाच्या आधारे खोटी मागणी केलेली आहे. तक्रारकर्ते यांनी आवश्यक ते पक्ष प्रकरणात अंतर्भूत केलेले नसल्याने सदरच्या कारणास्तवही तक्रार ही विदयमान न्यायमंचात प्रतिपालनीय नसून Non Joinder of Necessary Parties या तत्वानुसार ही सदर तक्रार ही खारीज होणे क्रमप्राप्त आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांनी सदर मोबाईल तक्रारकर्त्याच्या मागणीनुसार मोबाईल चांगल्या स्थितीत असतांनाही सर्व्हिसिंग करुन सदर मोबाईल हा युक्ती सेल्युलर नोकिया मोबाईल यांच्यामार्फत तक्रारकर्त्याला दिला व तक्रारकर्त्याला असे कळविले की, सदर मोबाईल हा स्मार्ट फोन असल्यामुळे तो व्यवस्थितपणे हाताळल्यास तो वापरण्यास कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही तसेच प्रत्येक स्मार्टफोनची बॅटरी ही खूप काळ टिकत नाही असेही सांगितले.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी मंचाला पाठविलेल्या इंग्रजीतील उत्तरामध्ये तक्रारकर्त्याचे कथन नाकबूल केले. परंतु, त्यात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याची तक्रार मराठीत असल्यामुळे त्यातील मजकूर त्यांना समजला नाही.
तक्रारकर्त्याने सदर प्रकरणात तोंडी युक्तीवाद केला व लेखी युक्तीवादही दाखल केला. परंतु, विरुध्दपक्षाने युक्तीवाद केला नाही.
विरुध्दपक्षाच्या प्रतिनिधीने जे या प्रकरणात विरुध्दपक्ष क्रमांक 3 आहेत. त्यांनी मंचासमोर असे सांगितले की, त्यांच्याकडील विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 ने दिलेली एजन्सी बंद करण्यात आलेली असल्याने युक्तीवादासाठी आवश्यक असलेले दस्त त्यांच्याकडे उपलबध नाही. त्यामुळे ते युक्तीवाद करु शकत नाही. तक्रारकर्त्याच्या युक्तीवादावरुन व दाखल दस्तावरुन दिनांक 15-09-2014, 22-09-2014, 16-10-2014, 26-11-2014 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 3 कडे सदर मोबाईल दुरुस्तीसाठी वारंवार दिल्याचे मंचाच्या निदर्शनास येते व दाखल जॉबशिट वरुन तक्रारकर्त्याची मोबाईल संबंधीच्या तक्रारी, अशा होत्या की, मोबाईल हँग होणे, म्युझिक सिस्टीम सुरु होणे, आवाज कमी, मोबाईल गरम होणे, अशा होत्या. परंतु, या दूर झाल्या किंवा नाही यासंबंधी विरुध्दपक्षाकडून कोणताही संयुक्तिक पुरावा न आल्यामुळे तक्रारकर्त्याच्या कथनात मंचाला तथ्य आढळते. त्यामुळे, तक्रारकर्ता त्यांच्या मागणीनुसार नवीन मोबाईल अथवा मोबईलची संपूर्ण रक्कम मिळण्यास पात्र आहे. परंतु, तक्रारकर्त्याने युक्तीवादाच्या वेळी, दरम्यानच्या काळात नवीन मोबाईल खरेदी केला असल्याने तक्रारकर्त्याला केवळ मोबाईलची रक्कम परत हवी असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता मोबाईलची रक्कम मिळण्यास व शारीरिक, आर्थिक, मानसिक नुकसान भरपाईपोटी ₹ 3,000/- मिळण्यास पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
सदर तक्रार तक्रारकर्ते यांनी वैयक्तिकरित्या दाखल केलेली असल्याने व तक्रारकर्ते हे स्वत: पेशाने वकील असल्याने प्रकरणाचा खर्च नामंजूर करण्यात येत आहे. सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
अं ति म आ दे श
तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याकडील नोकिया मोबाईल मॉडेल लुमिया 520 सीऑन हा परत घेऊन त्याची रक्कम ₹ 8,530/- ( अक्षरी रुपये आठ हजार पाचशे तीस फक्त ) व शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसानीपोटी ₹ 3,000/- ( अक्षरी रुपये तीन हजार फक्त ) वैयक्तिकपणे व संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला दयावे.
सदर आदेशाचे पालन विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी आदेश प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावे.
उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.