नि. 15
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य : श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 234/2011
----------------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 09/08/2011
तक्रार दाखल तारीख : 08/09/2011
निकाल तारीख : 18/06/2013
-----------------------------------------------------------------
निहाल बापूसो शेख
वय वर्षे – 22, धंदा– नोकरी
रा. 311, खणभाग, शेवाळे गल्ली, सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. दि केअर मॅनेजर,
नोकिया इंडीया प्रा.लि.
एस.पी.इन्फोसिटी, इंडस्ट्रीयल प्लॉट नं.243,
उद्योग विहार फेज 1, डुनडाहेरा,
गुरगांव 122016 हरियाणा
2. नवतरंग रेडिओ हाऊस
कृष्णा कॉम्प्लेक्स, आमराई रोड,
सांगली 416 416
3. नोकिया केअर सेंटर,
सुरेश इलेक्ट्रॉनिक्स, मुख्य एस.टी.स्थानकासमोर,
मॉडर्न बेकरीजवळ, सांगली 416 416 ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड व्ही.एस.झांबरे
जाबदार क्र.1 ते 3 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार जाबदार यांचेकडून नोकीया मोबाईल हॅंडसेट खरेदी केला. विक्रीपश्चात त्यामध्ये सातत्याने बिघाड होत राहिला. मात्र दुरुस्ती करुनही त्यामध्ये असलेला दोष जाबदाराकडून निघू शकला नाही. त्यामुळे तक्रारदाराने मोबाईल हँडसेटची रक्कम मिळावी यासाठी ही तक्रार दाखल केलेली आहे.
2. सदरच्या तक्रारीचा थोडक्यात तपशील असा -
तक्रारदाराने जाबदार क्र.2 यांचेकडून (जे जाबदार क्र.1 चे अधिकृत विक्रेते आहेत), दि.11/9/2010 रोजी मॉडेल नं.नोकिया 5530 बी रेड (Nokia-5530 B Red) I.M.E.I.No. 358304033977228 G.S.M. बिल नं. ANS/C.S/RO/6413 हा मोबाईल हँडसेट रु.9,600/- खरेदी केला. सदर मोबाईल खरेदी केल्यानंतर 15 दिवसांतच त्यामध्ये तक्रारी सुरु झाल्या. त्यामध्ये मोबाईल हँग होणे, टच स्क्रीन बंद होणे, बॅटरी लो होणे, हे दोष सातत्याने दिसू लागले. त्यासंदर्भात तक्रारदाराने जाबदार क्र.3 नोकिेया केअरसेंटरमध्ये मोबाईल दाखविला. मात्र त्यातील दोष निघाले नाहीत. जाबदार क्र.2 यांनी जाबदारक क्र.3 यांचेकडून हँडसेट बदलून घेणेस सांगितले, त्याप्रमाणे जाबदार क्र.3 यांना सांगितले असता दि.26/2/2011 रोजी हँडसेट ठेवून घेतला व मदर बोर्ड बदलून दि.6/4/2011 रोजी नवीनच हँडसेट आहे म्हणून परत केला व मूळ बिलाचे मागे I.M.E.I.No. 3583040369999779 असा लिहून सर्व्हिस सेंटरचा शिक्का मारुन मूळ बिल अर्जदारांना दिले आहे. पुन्हा 26/6/2011 रोजी त्यात बिघाड झाल्याने जाबदार क्र.3 यांचेकडे मोबाईल दिला, तो अद्याप त्यांचेकडेच आहे. त्यामुळे तक्रारदारास आर्थिक नुकसानीबरोबरच मानसिक शारिरिक त्रास झाला आणि म्हणून तक्रारदाराने मोबाईल हँडसेटची किंमत तसेच शारिरिक मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व प्रकरण खर्च रु.2,000/- मिळावेत यासाठी ही तक्रार मंचासमोर दाखल केली आहे.
3. आपले तक्रारीचे पुष्ठयर्थ तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्रासह नि.क्र.4 वर एकूण 2 कागदपत्रे व नि.13 वर एकूण 2 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. जाबदार क्र.2, 3 यांनी नोटीस लागू होऊनही त्यांनी आपले म्हणणे दाखल केलेले नाही व जाबदार क्र.1 यांना रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवूनही त्यांनी आपले म्हणणे अथवा उपस्थिती दर्शविली नसलेने जाबदार क्र.1 ते 3 यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला आहे.
5. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदाराची तक्रार, लेखी कथन, कागदोपत्री पुरावे आणि विधिज्ञांचा युक्तिवाद यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आलेला आहे.
अ.क्र. |
मुद्दे |
उत्तरे |
1. |
तक्रारदार हे जाबदार यांचा ग्राहक आहेत काय ? |
होय. |
2 |
जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? |
होय. |
3 |
काय आदेश ? |
खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3
i) तक्रारदार याने जाबदार क्र.2 यांचेकडून नोकिेया मोबाईल हँडसेट खरेदी केल्याची पावती नि.क्र.4/1 वर सादर केलेली आहे. त्यावरुन तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक-सेवादार नाते निर्माण झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हा जाबदार क्र. 1 ते 3 यांचा ग्राहक आहे हे निश्चित होते.
ii) तक्रारदाराने नोकिेया मोबाईल हँडसेट खरेदी केल्यानंतर पंधरा दिवसातच त्यामध्ये दोष दिसून येऊ लागले. जाबदार क्र.3 यांनी वारंवार दुरुस्ती करुन सुध्दा मोबाईल हँडसेटमधील दोष पूर्णतः गेले नाही. जाबदारांनी मोबाईल मध्ये मॅन्युफॅक्चरींग डिफेक्ट असल्याने तक्रारदाराला नवीन हँडसेट देणे आवश्यक होते मात्र तसे न करता त्याच हँडसेटमध्ये दोष शोधण्याचा प्रयत्न केला. तो तक्रारदाराच्या दृष्टीने कालापव्यय ठरला. तक्रारदाराला ज्यावेळी वैयक्तिक महत्वाच्या कामासाठी मोबाईलची गरज होती, त्यावेळी तो उपलब्ध न झाल्याने व जाबदार क्र.1 ते 3 यांनी योग्य सेवा न दिल्याने तो सेवेतील दोष ठरतो.
iii) मंचामध्ये तक्रारदाराने तक्रार दाखल केल्यानंतर जाबदार क्र.1 ते 3 यांनी अनास्था दाखवून तक्रारदाराने केलेली तक्रार मान्य असल्याने दर्शवून दिले आणि म्हणूनच मंचाला नि.क्र.1 वर एकतर्फा आदेश पारीत करावा लागला.
iv) तक्रारदाराने रु.9,600/- चा नोकिया मोबाईल जाबदार क्र.2 यांचेकडून खरेदी केला व त्यातील दोष दुरुस्त करुन देण्यास जाबदार क्र.1 व 3 असमर्थ ठरले, हे स्पष्ट होते. त्याहीपुढे सदर हँडसेट जाबदार क्र.3 यांनी दुरुस्तीच्या नावाखाली आपल्याकडेच ठेवून घेतला ही अनुचित व्यापार पध्दती जाबदारांनी अनुसरल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदाराने तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे मोबाईल हँडसेटची पूर्ण किंमत तसेच मानसिक शारिरिक त्रासापोटी व प्रकरण खर्चापोटी जाबदार क्र.1 ते 3 यांचेकडून रक्कम मिळणेस क्रमप्राप्त आहे. सबब आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तपणे तक्रारदाराच्या मोबाईल हँडसेटची किंमत रु.9,600/- द.सा.द.शे. 8.5 टक्के दराने परत करावी.
3. जाबदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तपणे तक्रारदाराला शारीरिक व मानसिक ञासापोटी रु.5,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रुपये 1,000/- अदा करणेचे आदेश करण्यात येत आहेत.
4. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदार क्र.1 ते 4 यांनी 45 दिवसांत करावी. जाबदार यांनी विहीत मुदतीत आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 18/06/2013
(के.डी. कुबल ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष